Monday, October 23, 2023

श्री उन्नथपुरीश्वरर मंदिर

हे मंदिर तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यामध्ये तंजावूर-कुंभकोणम मार्गावर पापनाशम तालुक्यातील मेलत्तूर ह्या गावामध्ये स्थित आहे. हे शिव-शक्ती पीठ मानलं जातं आणि म्हणूनच श्री शिव-शक्ती पूजेसाठी हे प्रसिद्ध आहे. इथे श्री पार्वतीदेवींनी श्री मकुटेश्वरी ह्या त्यांच्या अंगरक्षक देवीसमवेत नवरात्रीच्या नवमीला पूजा केली. 


मुलवर (मुख्य देवता): श्री उन्नथपुरीश्वरर

पत्नी (श्री पार्वती देवी): श्री शिवगामी, श्री शिव-प्रियांबिका

स्थान: मेलत्तूर, पापनाशम तालुका, तंजावूर जिल्हा

पौराणिक नाव: उन्नथपुरी, उन्नथपुरम, नृत्य-विनोद-वळनाडू 


हे मंदिर साधारण १२०० वर्षे जुनं आहे. 


क्षेत्र पुराण:

हे स्थळ श्री महाविष्णूंच्या मत्स्यावताराशी निगडित आहे. एकदा सोमक नावाच्या असुराने चार वेद चोरून तो खोल समुद्रात जाऊन लपला. श्री महाविष्णूंनी मत्स्यरूप घेऊन खोल समुद्रात जाऊन सोमक दैत्याला मारून चार वेदांचं संरक्षण केलं. सोमक दैत्याला मारताना श्री महाविष्णू त्याचं रक्त प्यायले त्यामुळे ते उन्मत्त अवस्थेत गेले. त्या अवस्थेतून त्यांना बाहेर येणं कठीण झालं. त्यांची ती परिस्थिती बघून श्री ब्रह्मादि देव भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी कोळी आणि कोळिणीच्या रूपात आले. त्यांनी त्या माश्याला म्हणजेच मत्स्य रूपातल्या श्री महाविष्णूंना जाळ्यात पकडलं आणि त्याला पिळून काढलं ज्यामुळे त्या माश्यातल्या अंगातलं सर्व दूषित रक्त बाहेर पडलं. त्यानंतर श्री महाविष्णू परत आपल्या मूळ रूपात आले. 


अजून एका आख्यायिकेनुसार श्री महाविष्णू आपल्या वाहनासमवेत म्हणजेच गरुडासमवेत श्री शिवांच्या स्थानांत म्हणजेच कैलाशामध्ये शिरले. श्री शिवाचे वाहन श्री नंदिंनी श्री विष्णूंना अडविण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. हे श्री शिवांना आवडलं नाही आणि त्यांनी श्री विष्णूंना पृथ्वीवर सामान्य मनुष्याच्या रूपात जन्म घेण्याचा शाप दिला आणि गरुडाला एका सामान्य पक्ष्याच्या रूपात जन्म घेण्याचा शाप दिला. श्री शिवांनी त्यांना सांगितलं कि रामावतारानंतरच त्यांना आपल्या मूळ रूपात परत येता येईल. शापाच्या काळात त्यांनी श्री विष्णू आणि श्री गरुडाला शापमोचनासाठी उन्नतपूरम येथे राहून शिवलिंगाची आराधना करण्यास सांगितले. 


कल्मषपद ह्या चोळा राजाने अपत्यप्राप्तीसाठी अगस्त्य मुनींच्या सल्ल्यानुसार इथे तपश्चर्या केली. 


असा समज आहे कि इथल्या तीर्थामध्ये स्नान करण्याने सात पवित्र समुद्रांमध्ये स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. 


असा समज आहे कि श्री पार्वती देवी आणि आदि-मूळ-द्वारपालकी देव्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये ह्या नऊ मंदिरांना प्रदक्षिणा घालतात (ह्या लेखामधलं मंदिर आणि ह्याआधी ज्या आठ मंदिरांची माहिती प्रकाशित केली ती मंदिरे). 


मंदिरात साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment