Friday, May 26, 2017

Ballaleshwar - fifth incarnation of Lord Vinayaka

अवतार पांचवा - बल्लाळेश्वर (तसेच मयुरेश्वर) - अध्याय १३ ते १६

यात शंखासूर दैत्य व कमलासूर दैत्य यांनी वेदादि ग्रंथ नष्ट करून विद्येचा लोप केला. त्यावेळी विनायकाने दशभुज रूप धारण करून कमलासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. मयुरेश्वर क्षेत्राची स्थापना केली (मोरगाव).

दिव्य भीमकाय शरीर, दहा बाहु, भयानक रूप, पाश, अंकुश, परशु, कमळ, चक्र ही आयुधे उजव्या हातात, तर गदा, खङग, त्रिशूल, तोमर, डमरू ही आयुधे डाव्या हातात असे त्याचे स्वरूप आहे.

एकदा ब्रह्मदेव तपश्चर्येत मग्न असतांना शंखासूर दैत्य अचानक तेथे आला व त्याचे वेद, शास्त्रे, पुराण ग्रंथ त्याने चोरून नेले व सागरात ठेवले. ध्यान संपल्यावर ब्रह्मदेवांना जेव्हां हे समजले तेव्हा त्यांना फार दुःख झाले. हे शंखासुराचे कृत्य आहे हे त्यांना कळले. ते चिंतेत पडले. वेदशास्त्र पठण व ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे बंद झाली. ब्रह्मदेव क्षीरसागरी विष्णूंकडे गेले. तेथे श्री विष्णूंना योगनिद्रेत पाहून ते ही समस्या घेऊन कैलास पर्वतावर गेले. तेथे श्रीशंकरांना साष्टांग नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला. श्री शंकर म्हणाले "योगनिद्रेतून बाहेर आल्यावर श्री विष्णू शंखासुराला मारतील व कमलासूराला मारण्यासाठी विनायक अवतार घेतील."

श्री ब्रह्मदेव स्वस्थानी परत गेले व ओंकाराचा एकाक्षरी मंत्र जपून त्यांनी विनायकास प्रसन्न करून घेतले. विनायकाने चारी वेद शास्त्रे पुराणे चोरणाऱ्या शंखासुराचे कृत्य मला कळले असून, त्याच्या बंधूचा कमलासूराचा मी वध करीन असे आश्वासन ब्रह्मदेवांना दिले. तसेच सर्व वेदादि ग्रंथ मी परत आणीन, ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे पूर्ववत सुरु होतील असे पाहीन व या करीता मी जो अवतार तो घेईन तो "मयुरेश्वर" या नावाने प्रसिद्ध होईल. असे बोलून विनायक अंतर्धान पावला.

पुढे विनायकाने स्वतःच्या मायेने पुन्हा वेदशास्त्रे पुराणे यांची निर्मिती केली. स्नान, संध्या, जप, हवन, स्वाध्याय, देवतार्चन, वैश्वदेव, अतिथीपूजन ही अष्टकर्मे लोप पावल्याने ब्राह्मण, ऋषी चिंतीत झाले होते. तोच त्यांच्या समोर विनायक ब्राह्मण रूपाने अत्यंत तेजस्वी रूप घेऊन उभा राहिला. त्याने त्यांची शास्त्रे पुराणे वेदादि ग्रंथ त्यांना परत केले व ब्राह्मणांना त्यांची नैमित्तिक कर्मे परत सुरु करण्यास सांगितले. ऋषी ब्राह्मणांस अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या बल्लाळास आसनावर बसवून त्याचे पूजन स्तवन केले. पृथ्वीवर परत सर्व कर्मे यथासांग सुरु झाली.

दूतांकरवी हे वर्तमान कमलासूराला काळातच तो क्रोधीत झाला व शंखासुराच्या आज्ञेने प्रचंड सैन्यासह घोड्यावर बसून बल्लाळास (ब्राह्मणास) मारण्यासाठी निघाला. हे वृत्त ऐकताच ऋषी मुनी संतत्प झाले व त्यांनी बल्लाळास हे वृत्त कळवले. बल्लाळाने त्यांना शांत केले व स्वतःच प्रचंड सैन्य निर्माण केले व स्वतः दहा बाहुंचे भीमकाय शरीर प्रकट केले. दहा हातात दहा आयुधे होती. बल्लाळास व त्याच्या सेनेस बघून कमलासूर सेना भयकंपित झाली पण कमलासूराने त्यांना धीर दिला. घनघोर युद्ध झाले. कमलासूराने सर्पास्त्र सोडून सर्व बल्लालसैन्यामध्ये हा:हा:कार माजवला. कित्येक जण विषाग्निने मेले. उरले ते भीतीने पळू लागले. स्वतःच्या सैन्याची अशी दशा बघून बल्लाळाने रागाने स्वतःच्या बाणाने एक चक्र सोडले. त्यातून असंख्य चक्रे निर्माण झाली व त्याचे दैत्यसैन्य कुणाचे शीर, कुणाचे हातपाय तुटून बरेच जण धारातीर्थी पडले. ते पाहून कमलासूराने गदायुद्धाचे आव्हान बल्लाळास दिले. परंतु कमलासुराचे देवापुढे काही चालेना. शेवटी त्याने रणातून पलायन केले. बल्लाळ आश्रमात परत आला. स्वतःचे इतके सैन्य रणांत पडलेले पाहून प्रथम त्यास फार वाईट वाटले, पण ऋषींच्या प्रार्थनेनुसार त्याने संजीवनी मंत्र जपून पुन्हा आपल्या सैन्यास नवनवीन दिले. ऋषींनी बल्लाळास हवन करण्यास सांगितले. यज्ञाची सांगता होताच त्यातून मयूर उत्पन्न झाला. त्या मयूरावर विनायक आरूढ होऊन कमलासूराचा वध करण्यासाठी निघाला. मयूरावर बसला म्हणून त्याला "मयुरेश्वर" नाव पडले. 

मयुरेश्वर-विनायक सिद्धी बुद्धीसहित रणांगणावर निघाला. बुद्धीने स्वतः कमलासूराला माशीसारखा मारीन, मला आज्ञा द्या अशी विनायकास प्रार्थना केली. विनायकाने आनंदाने ते मान्य केले.  बुद्धी भयंकर देह धारण करून व मायेने प्रचंड सैन्य निर्माण करून ती रणांगणावर पोहोचली. पण कमलासूर व त्याच्या सैन्यापुढे तिचा टिकाव लागेना. तिने पुन्हा सैन्य निर्माण केले. पण तेही पराजित होऊ लागले. शेवटी बुद्धीने "लाभ" नामक मानसपुत्र निर्माण केला. तो धनुर्विद्या निपुण होता. बुद्धीला विचारून ऋषींच्या आश्रमात जाऊन मयूरावर आरूढ झालेल्या आपल्या पित्याचे विनायकाचे दर्शन घेऊन तो युद्धास निघाला. 

तो कोवळा कुमार पाहून कमलासूर प्रथम उपहासाने हसला व त्याला स्वगृही परत जाण्यास, पण तोपर्यंत लाभाने कमलासुराचे असंख्य सैनिक मारले. कमलासूराने मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून लाभाच्या सैन्याला मोहनिद्रेत नेले. एकटा लाभ व विनायक सोडून सर्व सैन्य मोहनिद्रेत गेले. विनायकानेही लाभाची परीक्षा घेण्यासाठी मोहनिद्रेत गेल्याचे नाटक केले. लाभ शोकाकुल झाला. पण त्याला हे संकट दूर करण्याची युक्ती आठवली. त्याने मोहिनीअस्त्राचा संहार करणारा मंत्र जपून मोहनिद्रेत गेलेल्या सैन्यास उठवले. पण विनायक काही उठला नाही. ते पाहून लाभ अत्यंत दुःखी झाला व त्याने आत्मदहन करण्याचे ठरवले. त्याने सैनिकांकडून लगेच काष्ठे जाणवली व त्यास अग्नी लावून चितेत उडी मारणार तोच विनायकाने आपले नाटक संपवून लाभास आवरले. लाभाला अत्यंत आनंद झाला. नंतर विनायक मयूरावर बसून प्रचंड सैन्यासह परत कमलासुरावर चाल करून गेला. 

विनायकाने विशाल रूप धारण केले. त्याचे मस्तक आकाशापर्यंत उंच पोहोचले. ते पाहून कमलासूराने त्याची निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. तेव्हा क्रोधीत होऊन विनायक म्हणाला "एका नेत्रकटाक्षात पूर्ण त्रैलोक्याचा मी संहार करीन. तुझ्यासारखे दैत्य मरण्यासाठीच माझा अवतार झाला आहे." दोघांत घनघोर युद्ध झाले. कमलासूर देवासमोर उभा न राहता सैन्यात शिरला व बाणाने अनेक शूरवीर मारले. ते पाहून लाभ धावून आला व कमलासुरावर मुष्टिप्रहार केला. कमलासूराने आकाशात उड्डाण केले व शुक्राचार्यांनी दिलेला मंत्र जपून योगसामर्थ्याने आकाशातच राहिला. तेथून त्याने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. विनायकाने पाश टाकून कमलासूरास आपल्यासमोर आणले. दैत्याने केलेल्या गदेचा प्रहार मोडून काढत त्याने कमलासुरावर अमोघ शास्त्रे सोडली व त्यास मारले. पण जेथे जेथे कमलासुराचे रक्त सांडे तेथे तेथे परत प्रति कमलासूर उत्पन्न होई. ते पाहून देवाच्या साहाय्यासाठी सिद्धी बुद्धी त्वरित धावून आल्या. त्यांनी आपल्या सामर्थ्याने दहा हजार किरात निर्माण केले व शत्रुसैन्यावर सोडले. शत्रुसैन्यात हा:हा:कार माजला. ते सैरावरा पळू लागले. सिद्धीबुद्धीने नवकोटी भूतगण निर्माण केले व दैत्यसैन्यास भक्षिण्यास सांगितले. भूतगण दैत्यसैन्यास भक्षू लागले. त्यांनी  प्रति कमलासुरांचेही भक्षण करण्यास सुरुवात केली. रणांगण पूर्ण रिकामे झाले. कमलासूराचा रक्तबिंदू पडतांना दिसताच तो जमिनीवर पडण्याआधीच भूतगणाने वरच्यावर चारण्यास सुरुवात केली. शेवटी एकटा कमलासूर रणांगणात उरला. तरीही त्याने धीर सोडला नाही. दोघांत घनघोर युद्ध झाले. सरतेशेवटी विनायकाने त्रिशुळाने आघात करून कमलासुराच्या देहाचे तीन तुकडे केले. जेथे कमलासुराचे शीर पडले तेथे विनायकाने आपले क्षेत्र निर्माण केले. 

कमलासूराचा वध झालेला पाहून सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवादिकांनी विनायकाची पूजा केली. पूजा करीत असताना नकळत ब्रह्मदेवाचा कमंडलू कलंडला व तेथे नदी निर्माण झाली. तिला कमंडलू तीर्थ म्हणतात. 

ते स्थान त्या दिवसापासून "मोरगाव" क्षेत्र म्हणून विख्यात झाले व विनायक मयुरेश्वर नांवाने प्रसिद्ध झाला. 

Friday, May 19, 2017

Vighneshwar - fourth incarnation of Lord Vinayaka

अवतार चौथा - विघ्नेश्वर - अध्याय ११ व १२ - श्री विनायक विजय

या अध्यायात विनायकाने विघ्नासुराचा पराभव केला. त्याने प्रार्थना केल्याने देवाने विघ्नराज हे धारण केले. मूषक हे वाहन आरोहणासाठी घेतल्याने "मूषकवाहन" नांव पडले.

चतुर्भुज, पाश, अंकुश, परशु, कमल ही आयुधे धारण केलेला, मूषकावर आरूढ झालेला असे विनायकाचे या अवतारात स्वरूप आहे.

पूर्वी हिमालयात सौभरी नांवाचे ऋषी रहात होते. त्यांच्या भार्येचे नांव सुशीलमति. ते दोघेही कंदमुळे व शेतातील एकेक दाणा जमवून त्यावर उदरनिर्वाह करीत. एके दिवशी एक गंधर्व त्यांच्या पर्णकुटीत आला. ऋषीपत्नी सुशीलमतिला पाहून तो मोहित झाला व तिला आपल्याबरोबर चलण्याविषयी बोलू लागला. सुशीलमतिने क्रोधाने म्हटले "माझा हात सोड नाहीतर मी तुला शाप देईन". तेवढ्यात सौभरीं ऋषीही तेथे आले व क्रोधीत होऊन "तू मूषकरूप होशील" असा शाप दिला. गंधर्वाने शापवाणी ऐकताच तो घाबरला व उ:शाप मागू लागला. ऋषींना दया आली व त्याला उ:शाप दिला "तू पार्श्वाश्रमाजवळ राहशील व जेव्हां परमात्मा विनायक अवतार घेईल तेव्हां नित्य त्यांच्या चरणाजवळ वास करशील!". उ:शाप मिळवून गंधर्वाने प्रयाण केले व ऋषी भार्येसह आश्रमात परतले.

एकदा स्वर्गात नारद इंद्राला भेटायला इंद्रसभेत आले. त्यांनी इंद्राला सांगितले "भूतलावर अभिनंदन नावाचा राजा आहे. त्याने ब्राह्मणांना यज्ञयागात इंद्राला हविर्भाग देऊ नका असे सांगितले आहे." हे ऐकताच इंद्राला राग आला व त्याने काळशक्तीला आवाहन केले. तिच्या साहाय्याने त्याने विघ्नदैत्य निर्माण केला. विघ्नदैत्याने भूतलावर यज्ञयागाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. ब्राह्मण त्रासले व सर्व मिळून जगन्नाथाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली. स्तुती केली. ते ऐकून देव प्रकट झाला व वरेण्य राजाच्या घरी अवतार घेऊन मी विघ्नदैत्याचा नाश करीन असे त्याने सांगितले" अशी अभयवाणी ऐकताच ब्राह्मण निश्चिन्त झाले.

विनायकाने वरेण्यराजाच्या घरी पुष्पिका राणीच्या पोटी जन्म घेतला. जन्मताच गजवदन असलेली व चतुर्भुज, सुनयन असलेली बालमूर्ती पाहताच पुष्पिका राणी घाबरली व तिने रडत रडत राजाला बोलावले. असे विचित्र बालक पाहताच राजाही घाबरला व त्याने बालकाला अरिष्ट समजून सैनिकांना सरोवरात सोडून देण्यास सांगितले. सैनिकांनी बालकास पाण्यात सोडून दिले. दुसरे दिवशी पार्श्वमुनी तळ्यावर स्नानास गेले असतांना त्यांना ते विचित्र बालक दिसले.  पार्श्वमुनी प्रथम भयचकीत झाले पण नंतर सावध होऊन स्वतःशीच विचार करू लागले "कुणी अभाग्याने अरिष्ट समजून हे बालक या सरोवरात सोडून दिले खरे, पण मला मात्र हे जपतपाचे फळ द्यायला आलेले सुखदायक बालक वाटते आहे. असं वाटत आहे की अधर्माचा नाश करून धर्मस्थापनेसाठी परमात्म्यानेच अवतार घेतला आहे." ऋषींनी बालक आश्रमात नेऊन आपल्या पत्नीला दीपवत्सेला दाखवला. ती म्हणाली "हा बालक सूर्यासारखा तेजस्वी आहे. आपल्या तपाचे फळ देण्यासाठी प्रत्यक्ष विनायकच अवतरला आहे." पुत्रजन्माचा सोहळाच त्या दोघांनी अनुभवला.

विनायक त्या आश्रमातच वाढू लागला. इकडे सौभरीऋषींच्या शापाने तो गंधर्व तत्काळ मूषक झाला व पार्श्वमुनींच्या आश्रमात येऊन गुप्त रूपाने राहिला. त्याने आपल्या दातांनी जागोजागी खणले. यज्ञवेदिकेत बिळे केली. कुरतडून वृक्षही पाडले. यज्ञपात्रे चावून चावून खराब केली. या उपद्रवांनी पार्श्वमुनी त्रस्त झाले. विनायक जवळच खेळत होता. त्याने जवळच्या पाशाने मूषकाला जवळ ओढून आणले. मूषकाने विनायकाला मिळालेल्या शापाबद्दल व उ:शापाबद्दलही सांगितले व त्याच्या चरणांजवळ जागा मागितली. विनायकाने मूषकाला आनंदाने आपले वाहन म्हणून स्वीकारले व त्याच्यावर आरूढ झाला. पार्श्वमुनी विनायकाच्या या लीलेने आश्चर्यचकित झाले. विनायकाने विघ्नासुराचा वध करून, अधर्माचा नाश करून, धर्मस्थापनेचे कार्य करून देवांना सुखी करीन असे आश्वासन दिले.

पृथ्वीवरचे ब्राह्मण, ऋषी विघ्नासुराच्या त्रासाने भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने "पार्श्वमुनींच्या आश्रमातील विनायक या विघ्नासुराचा वध करील" असे सांगितले.

सर्व ब्राह्मण ऋषी विनायकाच्या दर्शनाकरिता व पार्श्वमुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. सर्व वेदतुल्य ऋषी, ब्राह्मण एकत्र आलेले पाहून पार्श्वमुनींना आनंद झाला. त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे कारण विचारले. तितक्यात विनायकही तेथे आला. ऋषींनी येण्याचे कारण सांगितले व विघ्नासुराचा नाश करण्यास विनायकास विनविले. चतुर्भुज विनायक मूर्ती चारही हातात आयुधे घेऊन, मूषकावर आरूढ होऊन ब्राह्मणांसमवेत निघाली.

विनायकाने ब्राह्मणांना युद्ध पाहण्यास सांगून विघ्नासुरावर आपला अंकुश सोडला. तो अंकुश त्याच्या कंठाला लागून तो विनायकाजवळ खेचला गेला. त्याचे अक्राळविक्राळ रूप, भयानक दात-दाढा, लोंबणारी लांब लाल जिव्हा पाहून ऋषी चकीतच झाले.

तोच विघ्नासुराने जलरूप होऊन सर्व त्रैलोक्य व्यापले. विनायकाने ते सर्व जल प्राशन केले. विघ्नासुराने पक्ष्याचे रूप घेतले तर विनायकाने त्याच्यावर कमल सोडले. विघ्नासुराने अग्नीचे रूप घेऊन ब्रह्माण्ड जाळण्यास सुरुवात केली तो विनायकाने मेघ वर्षवून अग्नीस शांत केले. विघ्नासुराने वायूचे रूप घेऊन मेघांना पळवून लावले तर विनायकाने वायूस अडवण्यासाठी पर्वत निर्माण केले. दैत्य वज्ररूप झाला व त्याने सर्व पर्वतांचे चूर्ण केले. विनायकाने निर्वाणशक्ती सोडली. ती भक्षिण्यासाठी दैत्याने आपले मुख पसरले. ती सूर्यासारखी तेजस्वी क्रूर शक्ती पाहून दैत्याने आपले नेत्र झाकले व त्याचा सर्व गर्व उतरला. तो विनायकास शरण आला व त्याची स्तुती करू लागला. त्याची क्षमा मागू लागला. दैत्याची स्तुती ऐकून विनायकास संतोष झाला. तो म्हणाला "तूला मी ठार मारणार होतो, पण तू शरण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो. परंतु माझे एक वचन तुला पाळले पाहिजे. जेथे जेथे माझे नामस्मरण चालू असेल, भक्तिभावाने पूजा होत असेल ते स्थान तू तत्काळ सोडले पाहिजेस" विघ्नासुराने मान्य करून विनायकास मागणे मागितले "तुझ्या नावाच्या आधी माझे नांव आले पाहिजे" विनायकाने त्याचे मागणे मान्य केले व विनायक "विघ्नेश्वर" या नांवाने ओळखला जाऊ लागला.

हे वर्तमान ऐकताच राजा वरेण्यही आपल्या पत्नीसह तेथे आला. विनायकाने त्यासही अनेक वर दिले. विघ्नेश्वराच्या नावाने विनायकाचा सर्वजण जयजयकार करीत असतानाच विनायक अंतर्धान पावला.

असा हा विनायकाचा विघ्नेश्वर अवतार अध्याय समाप्त! 

Thursday, May 11, 2017

Gajanan - third incarnation of Lord Vinayak

अवतार तिसरा - गजानन - अध्याय ७ ते १० - श्री विनायक विजय

या अवतारात विनायकाने सिंदुरासूराचा वध केला. शस्त्राने त्याला मरण नसल्यामुळे विनायकाने दोन्ही हातांनी धरून त्याचे मर्दन केले. पिळून त्याचे चूर्ण करून तो सिंदूर आपल्या सर्वांगाला लावला. तेव्हांपासून देवाला सिंदूर आवडू लागला.

शंकर पार्वतीच्या पुत्राला गजासुराचे मस्तक लावल्याने देवांनी व ऋषींनी गजानन नाव ठेवले. किरीट कुंडले धारण केलेला, पितांबर नेसलेला, चतुर्बाहु, दिव्य आयुधे धारण केलेला असे ह्या गजाननाचे स्वरूप आहे. जवळ सिद्धी बुद्धी आहेत. विराट रूप म्हणून "विकट" नाव. भव्य देह म्हणून "महाकाय". शंकराने प्रेमाने आपली चंद्रकला त्याच्या मस्तकावर ठेवली म्हणून "भालचंद्र" अशी नावे पडली. जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला!

एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हां त्यांच्या मुखातून एक रक्तवर्णाचा, क्रूर चेहरा असलेला पुरुष बाहेर पडला. त्याच्या शरीराला येणाऱ्या सुगंधाने दाही दिशा व्यापल्या होत्या. ब्रह्मदेवाने आश्चर्याने विचारले "तू कोण? कुठून आलास?" त्या पुरुषाने उत्तर दिले "मी तुमचाच पुत्र आहे. तुमच्या मुखातून मी जन्म घेतला आहे. आता माझे नाव ठेवा व मला राहण्यासाठी उत्तम स्थान द्या. तुमच्या कृपेने माझा चरितार्थ मी स्वतः चालवीन."

ब्रह्मदेव म्हणाला "तुझे नांव सिंदूर. पृथ्वीवर हव्या त्या स्थानी तू रहा. तुला मी आणखी एक वर देतो. तुला शस्त्रास्त्रांपासून, विष्णू इंद्र आदी देवांपासून मृत्यूचे भय नाही. तू ज्याला मिठी मारशील त्याचे तात्काळ भस्म होईल!" सिंदुराला आनंद झाला. जे तपश्चर्येने व यज्ञ करूनही मिळायला अवघड असे दुर्लभ वर त्याला विनासायास मिळाले होते.

परत फिरताना त्याला दुर्बुद्धी सुचली व तो आपल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला मिठी मारायला निघाला. ब्रह्मदेवाला आता वर दिल्याचा पश्चात्ताप झाला. तो क्रोधाने म्हणाला "तुझा संहार करण्यासाठी विनायक अवतार घेईल". या शापाने भयभीत न होता सिंदूर पुढे सरसावला. ब्रह्मदेव आपल्या आसनासहित वैकुंठमार्गाने श्री विष्णूंकडे निघाला. मागोमाग सिंदुरही गेला. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्री विष्णूला कथन केला.  श्री विष्णू म्हणाले "तुम्ही जरी अविचाराने वर दिला तरी तो खोटा होंणार नाही. हा दैत्य सर्व त्रैलोक्याचा नाश करेल. जर विनायकाने अवतार घेतला तरच याचा नाश होईल." इतक्यात सिंदूर दैत्य तेथे पोहोचला व त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेव यांना युद्धाचे आव्हान दिले. श्री विष्णू म्हणाले "मी सत्वापासून निर्माण झालो आहे. निर्गुण, निरिच्छ आहे. ब्रह्मदेव वेदशास्त्रसंपन्न आहेत. आम्हाला दोघांनाही युद्धात स्वारस्य नाही. तू श्री शंकरांकडे जाऊन त्यांना युद्धाचे आव्हान दे"

उन्मत्त असा तो सिंदूर दैत्य कैलासावर गेला. शिवमंदिरात पोहोचला. भस्म चर्चित, गजचर्म परिधान केलेली, हातात खट्वाङ्ग असलेली, जटेत गंगा असलेली चंद्रमौळी श्री शंकरांची ध्यानस्थ सुंदर मूर्ती बघून, सिंदूर दैत्याचे मन फिरले. त्याला वाटले त्याला मिठी मारण्यापेक्षा याच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीलाच न्यावे. त्याने पार्वतीची वेणी ओढून तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. भयभीत होऊन पार्वतीने आक्रोश केला. श्री शंकरांची कळवळून प्रार्थना केली पण श्री शंकर ध्यानातून जागे झाले नाहीत.

ध्यानातून जागे झाल्यावर शिवगणांनी श्री शंकरांना सर्व वृत्त सांगितले. अत्यंत क्रोधित होऊन श्री शंकर हातात डमरू व त्रिशूल घेऊन नंदीवर बसून सिंदूर दैत्याकडे निघाले. त्याने आपल्या डमरूचा प्रहार सिंदुरावर केला. सिंदूर क्षणभर थांबला व श्री शंकरांना मिठी मारायला निघाला, तितक्यात एक दिव्य ब्राह्मण दोघांमध्ये प्रकट झाला. तो ब्राह्मण सिंदुराला म्हणाला "तू माझ्या समक्ष शंकरांना जिंकलेस तर पार्वती तुझी झाली." बोलता बोलता ब्राह्मणाने गुप्त परशु सिंदुरासुरावर सोडला. तो लागताच सिंदुरासूर शक्तिहीन झाला. दिव्य ब्राह्मणाने म्हटले "सिंदुरासुरा आता प्राण वाचवायचे असतील तर सत्वर पलायन कर, नाहीतर श्री शंकरांच्या त्रिशुळाच्या आघाताने तू मरशील" ते ऐकून पार्वतीला सोडून देऊन, पण क्रोधाने सिंदूर दैत्य पृथ्वीवर परतला.

पार्वतीने ब्राह्मणाला विचारले "या दुष्टापासून मला सोडवलेत. आपण कोण आहात?" उत्तरादाखल ब्राह्मण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. पार्वती समोर सगुण रूपात विनायक प्रकट झाला. चतुर्भुज, किरीट कुंडले घातलेली, सिद्धी बुद्धी दोन बाजूस असलेली, सिंहावर आरूढ झालेली अशी विनायकाची मूर्ती बघताच पार्वतीला आनंद झाला. विनायक पार्वतीला म्हणाला "तुला दुःख देणाऱ्या सिंदूर दैत्याचा मी नाश करिन. त्याकरता मी तुझ्याच पोटी जन्म घेईन" हे बोलून विनायक अंतर्धान पावले.

इकडे सिंदुरासुराने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येकांना मिठी मारून भस्म केले. कित्येक ब्राह्मणांना जीवे मारले. कित्येक क्षत्रियांचा वध केला. कित्येकांचे पुत्र मारले. यज्ञयागांचा विध्वंस केला. देव ब्राह्मण संत संन्यासी, पृथ्वीवरील शूर राजे, कुणालाच सोडले नाही. शेवटी सर्व देवांनी विनायकाची प्रार्थना केली. विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करेन असे आश्वासन दिले.

पार्वतीला डोहाळे लागले. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. एकदा पृथ्वीवर रमणीय उपवनात जाऊन कांही दिवस राहावे असे वाटू लागले. तिने श्री शंकरांना सांगितले. दोघेही नदीवर बसून पृथ्वीवर आले. तिथले दाट, सुगंधी झाडांनी वेलींनी युक्त असे रमणीय पर्यळी उपवन त्यांना दिसले. त्यांनी आपल्या सर्व शिवगणांसह तिथेच मुक्काम करण्याचे ठरवले.

एकदा गजासुर नावाच्या श्री शंकरांच्या भक्ताने, जो हत्ती होता, त्याने पर्यळी उपवनात शिवगणांनी खास पार्वतीकरता उभारलेला मंडप आपल्या सोंडेने उध्वस्त केला. हा गजासुर गतजन्मात महेश नांवाचा राजा होता. अत्यंत देवभक्त, पुराणे ऐकणारा, जपजाप्य करणारा, असा त्रिभुवनात प्रख्यात होता. एकदा त्याच्या राजवाडयात देवगुरु बृहस्पती आले. त्यांची राजाने यथाविधी  पूजा केली. त्यांच्या पायावर स्वतःचे मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. बृहस्पतीने त्याच्या आदरातिथ्याने भारावून जात त्याला आशीर्वाद दिला "जे मस्तक माझ्या पायावर ठेवलेस ते मस्तक तिन्ही जगतात सर्व देव ऋषींना पूज्य होईल. पुढच्या जन्मी तू गजराजाच्या योनीत जन्माला येशील तेव्हां तुझे मस्तक छेदून स्वतः श्री शंकर तुला मुक्ती देतील. 

एकदा महेश राजाने मार्गाने जात असलेल्या नारदमुनींना वंदन केले नाही. तेव्हां रागावून नारदमुनींनी त्याला पुढच्या जन्मी तुझे मुख हत्तीचे होईल व शंकर तुला कैलासात नेतील असा शाप देऊन निघून गेले. 

पुढे महेश राजा मरण पावला व पर्यळी वनात गजमुखाने जन्मला. हत्तीचे मुख सोडल्यास देह नराचा होता. देव राक्षस गंधर्व कुणीच त्याच्या बरोबरीला नव्हते. असा हा गजासुर! त्याने मंडप तोडला. शिवगण त्याला पाहून भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. पार्वतीने हे श्री शंकरांना सांगताच श्री शंकरांनी क्रोधीत होऊन त्रिशुळाने त्याचे मस्तक छेदले. अंतःसमयी त्या गजासुराने "ॐ नमः शिवाय" म्हणून प्राण सोडला. 

श्री शंकर म्हणाले "मग मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला मुक्ती दिली व त्याचे गजमुख माझ्या पूजास्थानी ठेवले. त्याचे चर्म मी स्वतः पांघरले. त्याचे चर्म पांघरले म्हणून माझे नांव महेश पडले."

इकडे सिंदुरासूर गर्वाने म्हणत होता "मला देव मनुष्य राक्षस यांपासून मृत्यू नाही." तोच आकाशवाणी झाली "मुर्खा तुझा वध करण्याकरता स्वतः परमात्मा विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे. तिच्या उदरात त्याचा गर्भ वाढतो आहे." ते ऐकून क्रोधीत होऊन गर्भातच शत्रूचा नाश करण्यासाठी  तो कैलासावर गेला. तेथे कुणी नाही हे पाहून पर्यळी उपवनात आला. श्री शंकर व पार्वती निद्रिस्त होते हे पाहून तो वायुरूपाने पार्वतीच्या उदरात शिरला व नखाने गर्भाचे शिर तोडून बाहेर आला. ते शिर त्याने नर्मदेच्या कुंडात टाकले. त्यामुळे नर्मदेतील पाषाणही रक्तासारखे लाल झाले. सर्व लाल पाषाण नर्मदी गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. तो दैत्य आपले काम करून गेला. पण निद्रावस्थेत असल्याने कुणाला काही कळले नाही. 

काही दिवस उलटल्यावर पार्वतीच्या इच्छेनुसार सर्व परत कैलासावर पोहोचले. नऊ मास भरल्यावर पार्वतीने एका बालकास जन्म दिला. पण ते बालक मस्तकविरहित होते. ते पाहून पार्वतीस अनावर शोक झाला व तिने शंकरांना बोलावले. श्री शंकरही दुःखाने व्याकुळ झाले व नंदीला बोलावून त्यांनी सर्व देवांना हे मस्तक विरहित बालक बघण्यास बोलावले. 

सर्व देव धावून आले. ते मस्तक विरहित बालक बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेवढ्यात ते बालक बोलू लागले. "सिंदुरासुराचा वध करण्यासाठी मी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे." बृहस्पतीने त्याच्या मस्तकाविषयी विचारले असता विनायकाने बृहस्पतीस महेश राजाची आठवण दिली व श्री शंकरांच्या पूजास्थानीचे गजमुख लावण्यास सांगितले. आपले मस्तक सिंदुरासुरानेच कुणाच्याही नकळत गर्भावस्थेतच नखाने छेदले हेही सांगितले. 

नारदाने सांगितले "आम्ही कुणीच गजमुख लावण्याच्या योग्यतेचे नाही. केवळ आपल्या प्रभावानेच ते शक्य होईल." असे सांगितल्यावर काहीच क्षणात गजमुख धारण केलेले विनायक, चतुर्भुज अवतारात, सिद्धीबुद्धी सह प्रकट झाले. 

नारदांनी सिंदुरासुराकडे जाऊन त्याला तुझ्या शत्रूचा जन्म कैलासावर झाला आहे असे सांगितले. सिंदुरासूर क्रोधीत झाला व आपल्या शत्रूला मारण्यासाठी कैलासावर चाल करून गेला. विनायकाला बालरुपात पाहून "तू अंगणात खेळण्याऐवजी इथे कसा आलास?" असे विचारले. ते ऐकून विनायकाने महाकाय रूप प्रकट केले. ते पाहून सिंदुरासूर भयकंपित झाला. विनायकाने दोन्ही हातांनी सिंदुरासुराचे मर्दन केले व त्याच्या सर्व रक्तांगाचे चूर्ण करून आपल्या अंगास लावले. सर्व दिशांत सुगंध भरून राहिला. सर्व देव ऋषी यांना आनंद झाला. सर्वांनी विनायकाचे पूजन केले. तोच सर्वांदेखत गजानन अवतार धारण केलेला विनायक अंतर्धान पावला. असा हा गजानन अवतार अध्याय समाप्त!