Monday, October 16, 2023

श्री हरिमुक्तीश्वरर मंदिर

हे मंदिर अरियामंगई (हरिमंगई) गावामध्ये वसलेलं आहे. १२०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध समूहांमध्ये समाविष्ट आहे. चक्रपल्लीच्या आसपास असणाऱ्या सप्तस्थानांपैकी हे एक मंदिर. तसेच सप्त-मंगई ह्या सात मंदिरांच्या समुहामधलं हे एक मंदिर आहे. सप्त-मंगई स्थानं हि सात मंदिरे आहेत जिथे श्री पार्वती देवीने सप्त मातृकांसहित शरद नवरात्रीची पूजा केली. त्या सप्त मातृकांपैकी श्री माहेश्वरी ह्या मातृकादेवीशी हे मंदिर निगडित आहे. 


मुलवर (मुख्य देवता): श्री हरिमुक्तीश्वरर

देवी: श्री ज्ञानाम्बिका  

क्षेत्र वृक्ष: आवळा (गुजबेरी)

पवित्र तीर्थ: सत्यगंगा तीर्थ (हरितीर्थ)

पुरातन नाव: आर्यमंगलम

तालुका: पापनाशम 

जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)


ह्या मंदिरातल्या मुर्त्या आणि देवालये:


श्री ज्ञानाम्बिकांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री विष्णूंची त्यांच्या पत्नी श्री भूदेवी आणि श्री श्रीदेवी ह्यांसह उत्तराभिमुख मूर्ती आहे. ह्या देवालयाजवळ अजून एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री आयुर्देवी (श्री दुर्गादेवी) ह्यांची द्वादशभुजा (बारा हात असलेली) मूर्ती आहे. 


श्री ज्ञानाम्बिकांच्या पाठीमागे सप्तमातृकांच्या पूर्वाभिमुख मुर्त्या आहेत. 


अजून एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री मुरुग ह्यांची मूर्ती त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसह आहे. तसेच श्री विनायकांचं पण स्वतंत्र देवालय आहे.


जुनं मंदिर विस्कळीत झाल्यामुळे अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. ह्या बांधकामामुळे मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर बरेच अडथळे असून मंदिराकडे जाणे जरा कठीण झाले आहे. 

 


क्षेत्र पुराण: 


असा समज आहे कि शरद नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री पार्वती देवींनी, सप्त मातृकांपैकी श्री माहेश्वरी ह्या मातृकादेवीसह, श्री शिवांची आराधना केली. त्यांना श्री शिवांच्या जटेमध्ये श्री गंगेचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला दिव्यगंगादर्शन असं नाव आहे. 


ह्या स्थानाला पूर्वी नल्लीवनं (गुजबेरीचे वन) असं नाव होतं. 


श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचे कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं. 


श्री विष्णुंबरोबर अखंड सौभाग्यवतीत्व प्राप्त व्हावं म्हणून श्री महालक्ष्मी देवींनी इथे तपश्चर्या केली आणि श्री शिवांची आराधना केली. ह्या तपश्चर्येच्या काळांत श्री महालक्ष्मी देवी सत्यगंगा तीर्थात स्नान करायच्या आणि फक्त आवळ्याचाच (गुजबेरी) आहार घ्यायच्या. 


श्री विष्णूंनी पण येथे श्री शिवाची आराधना केली. आणि म्हणूनच ह्या स्थानाला श्री हरिमुक्तीश्वरर असं नाव आहे.


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment