Friday, March 29, 2019

श्री महाकाळेश्वर

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असणारे महाकाळेश्वर हे एक स्वयंभू लिंग आहे. ह्या मंदिराचा उल्लेख जरी इसवीसनानंतर पाचव्या शतकात सापडतो तरी मंदिर कधी बांधले गेले याचा अंदाज करणे कठीण आहे. महाकाळेश्वराची मूर्ती दक्षिणमुखी म्हणजेच दक्षिणेकडे तोंड असणारी आहे. भगवान शंकर व माता पार्वती यांच्यामध्ये झालेल्या पवित्र संवादाला शिवनेत्र असे नाव आहे. शिवनेत्र परंपरेला अनुसरून मूर्ती दक्षिणमुखी आहे. या ठिकाणाला शक्तीपीठ म्हणून पुजले जाते. उज्जैनचे पूर्वीचे नाव अवंती होते व त्याविषयीचा उल्लेख पुराणांमध्ये ठिकठिकाणी सापडतो. कवी कालिदासाच्या प्रसिद्ध काव्यरचना त्याने येथेच केल्या आहेत. १२३४-१२३५ नंतर हे मंदिर पुन्हा बांधले गेले कारण आधीची वास्तू मोगलांनी उध्वस्त केली होती. सध्या असलेले मंदिर ग्वालियरच्या मराठा राजांनी चांगल्या अवस्थेत राखले आहे.

या मंदिराशी अनेक आख्यायिका व दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. पुराणात सांगितल्याप्रमाणे उज्जैनचा राजा चंद्रसेन हा शिवाचा निःसीम भक्त होता. त्याची भक्ती पाहून श्रीखर नावाचा मुलगा शिवभक्तीला अत्यंत आकर्षित झाला. जेव्हा त्याने राजाच्या महालात प्रवेश करावयाचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षारक्षकाने त्याला शहराबाहेर क्षिप्रा नदीच्या काठी घालवून दिले. पुढे ज्यावेळी राज्यावर आक्रमण झाले त्यावेळी श्रीखर व विधी नावाच्या पुजाऱ्याने क्षिप्रा नदीच्या काठी शंकराचा धावा केला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर महाकाळाच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांनी शत्रूचा बिमोड केला. भगवान शिव स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. मात्र हे लिंग तांत्रिक तत्वानुसार सांभाळले जाते. आजपर्यंत रोज पहाटे येथे भस्माभिषेक नेमाने केला जातो. भस्म, म्हणजेच अभिषेकाला लागणारी पवित्र राख, त्या दिवशी चितेमध्ये दहन केलेल्या पहिल्या देहाची असून तिला क्षिप्रा नदीच्या पवित्र जलाने व मंत्रांनी शुद्ध केले जाते व मगच त्याचा वापर अभिषेकाला होतो.

भर्तृहरी गुंफा नावाच्या गुहा पण येथेच आहेत. मुनी भर्तृहरी हे राजा विक्रमादित्याचे सावत्र बंधू होते व असे म्हणतात की राजा विक्रमादित्याने संसाराचा त्याग केल्यावर याच ठिकाणी ध्यान केले होते.

महाकाळेश्वराच्या या मंदिराजवळच काळभैरवाची मूर्ती आहे. ही मूर्ती कोणत्याही झिंग आणणाऱ्या म्हणजेच उन्माद निर्माण करणाऱ्या पेयाचाच नैवेद्य म्हणून स्वीकार करते. अर्धे पेय नैवेद्य म्हणून देणाऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून परत मिळते तर उरलेले अर्धे पेय आपल्या डोळ्यादेखत नाहीसे होते.

उज्जैन हे सात* मुक्तीस्थळांपैकी एक आहे.

*सात मुक्तीस्थळे: अयोध्या, मथुरा, हरिद्वार, वाराणसी, कांची, उज्जैन आणि द्वारका.  

Saturday, March 23, 2019

श्री शैलम्

बारा ज्योतिर्लिंगांमधले दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शैलम्. येथील शिवाचे नाव श्री मल्लिकार्जुन असे आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यात नल्लामाला टेकडीवर आहे. हैदराबादच्या दक्षिणेला सुमारे २१० किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी काठावर हे देवस्थान आहे. पूर्वी या जागेला श्री गिरी असे म्हणत. तिथेच असलेले श्री भ्रमराम्बा देवीचे मंदिर म्हणजे एक शक्तिपीठ आहे. साधारणतः पहिल्या शतकातील हे स्थळ शिवसाधकांनी स्तोत्रे व मंत्र म्हणलेल्या २७५ स्थळांपैकी (पाडळ पेथ्र स्थळं) एक आहे.

ह्या ठिकाणी श्री शिव आणि श्री पार्वती अनुक्रमे श्री मल्लिकार्जुन आणि श्री भ्रमराम्बा म्हणून प्रगट झाले. आख्यायिका अशी आहे की जेव्हा श्री शंकर, श्री पार्वती व बंधू श्री गणेश यांच्याशी पृथ्वीप्रदक्षिणेविषयी श्री कार्तिकेयाचे मतभेद झाले, तेव्हा तो क्रौंच पर्वतावर तपस्या करायला निघून गेला. श्री शिव आणि श्री पार्वती दोघांनीही श्री कार्तिकेयाची समजूत काढून त्याला शांत करायचा प्रयत्न केला. पण श्री कार्तिकेय, जवळच असलेल्या दुसऱ्या पर्वतावर गेला व देवांच्या विनंतीवरून तो तिथेच राहिला. दंतकथा अशी आहे की दर अमावास्येला श्री शंकर आणि पौर्णिमेला श्री पार्वती कार्तिकेयाला भेटायला ह्या ठिकाणी येतात.

श्री पार्वती देवीने महिषासुराला मारण्यासाठी श्री भ्रमराम्बा म्हणून अवतार घेतला. ह्या अवतारात तिच्या सर्वांगावर भुंगे होते. ह्या जागेवर भगवान शंकराने श्री मल्लिकार्जुन म्हणून व श्री पार्वती देवीने श्री भ्रमराम्बा म्हणून वृषभ देवाला त्याने केलेल्या तपस्येचे कौतुक म्हणून दर्शन दिले असे पुराणात सांगितले आहे. येथेच प्रभू श्रीरामांनी सहस्रलिंग तर पांडवांनी पंचपाण्डव लिंगांची स्थापना केली. शिवानंदलहरी ह्या संस्मरणीय ग्रंथाची रचना आदी शंकराचार्यांनी इथेच केली असे म्हणतात.

पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेली २७५ स्थळे म्हणजे २७५ मंदिरे आहेत व तिथे जी स्तोत्रे म्हणली जातात ती त्रेसष्ठ नयन्मारांनी म्हणजेच शैव सिद्धांनी रचली आहेत.

श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग स्थानाला कैलास पर्वताप्रमाणेच अनन्य साधारण महत्व आहे. जेथे हे लिंग आहे त्या पवित्र जागी येऊन पूजा केल्यास अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते असा सुद्धा या स्थानाचा महिमा आहे.

Thursday, March 14, 2019

श्री सोमनाथ

पुराणांमध्ये सोमनाथ याचा उल्लेख पहिले ज्योतिर्लिंग असा केलेला आहे. सोमनाथ याचा शब्दशः अर्थ म्हणजे चंद्राचा म्हणजेच सोमाचा नाथ (परमेश्वर) होय. सोमनाथाचे मंदिर हे शाश्वत स्वरूपाची अशी पवित्र जागा आहे. सौराष्ट्रच्या दक्षिण शिखरावर हे पवित्र स्थान आहे. त्याचा उल्लेख महाभारत व वेदांमध्ये सुद्धा सापडतो. लिंगाच्या अभिषेकाला काशीहून पाणी आणत असत असा पण एक समज होता. मोगलांनी देवळाला लक्ष्य करून अनेक वेळा हल्ले करून लूटमार केलेली आहे. कमीत कमी सात वेळा ह्या मंदिराचे नूतनीकरण अथवा पुनर्बांधणी झालेली आहे. मोगलांनी केलेल्या स्वाऱ्या व लुटमार याच्या खुणा आजही दिसतात. या मंदिराजवळ होळकरांच्या महाराणीने बांधलेले अजून एक देऊळ आहे. या देवळामध्ये सोमनाथाच्या मंदिरामधील मौल्यवान वस्तू व काही देवता मोगलांपासून सुरक्षित राहाव्यात म्हणून जतन केलेल्या आहेत. सोमनाथ मंदिर व वेरावळ बंदराच्या मध्यावर असलेल्या बालक तीर्थ ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा अंत झाला. श्रीकृष्णांवरचे अंतिम संस्कार सरस्वती, कपिला आणि हिरण्या नदीच्या त्रिवेणी संगमावर झाले असे समजतात.

सोमनाथाच्या मंदिरातील लिंग हे स्पर्श लिंग आहे. तिथेच चंद्रकुंड म्हणजेच सोमकुंड असून त्यात स्नान केल्यास महारोग व क्षयासारखे भयानक रोग बरे होतात असे म्हणतात. पुराणात सांगितल्याप्रमाणे चंद्राला सत्तावीस बायका होत्या. ह्या सर्व जणी दक्ष राजाच्या कन्या होत्या. चंद्राचे सर्वात जास्त प्रेम रोहिणीवर होते व स्वाभाविकपणे इतर सव्वीस पत्नींपेक्षा रोहिणीकडे तो जास्त लक्ष देत असे. याचा राग येऊन दक्षराजाने चंद्राला नाहीसा होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने भयंकर प्रायश्चित्त म्हणून प्रखर तपश्चर्या केली. ह्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकराने त्याला शापातून मुक्त केले व असा वर दिला की पंधरा दिवस कलेकलेने तो कमी होईल तर पंधरा दिवस कलेकलेने तो वाढेल. अशा प्रकारे शुक्लपक्ष व कृष्णपक्ष निर्माण झाले आणि पौर्णिमा व अमावास्या अस्तित्वात आल्या. सोमाच्या तपस्येमुळे सोमनाथ लिंगाला सोमनाथ हे नामाभिमान प्राप्त झाले.

Thursday, March 7, 2019

ज्योतिर्लिंग - प्रस्तावना

ज्योतिर्लिंग म्हणजेच लिंगस्वरूपी भगवान शंकर! ज्योतिर्लिंग म्हणजेच शंकराचे चैतन्यस्वरूप महाशक्तिमय रूप! शिवपुराणात उल्लेखलेल्या प्रमाणे आर्द्रा नक्षत्राच्या रात्री भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात की जेव्हा एखादा मनुष्य अध्यात्माची सर्वोच्च पातळी गाठतो तेव्हा तो लिंगासारखा म्हणजे एका पृथ्वीला भेदून जाणाऱ्या व उत्तुंग उंची गाठणाऱ्या अग्निस्तंभासारखा भासतो. ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण माहिती शिवपुराणात सापडते. 

पुराणांमध्ये असे म्हटले आहे की एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ निर्मिती कोणी केली आहे याबद्दल प्रचंड वाद चाललेला होता. निर्णयासाठी ते शंकराकडे गेले. त्यावेळी शंकर अंत नसलेल्या अतिप्रचंड तिन्ही लोकांना भेदून जाणाऱ्या अग्नि स्तंभाच्या स्वरूपात होते. ब्रह्मा आणि विष्णू अग्नी स्तंभाचे टोक शोधण्यास विरुद्ध दिशेला गेले. ब्रह्मदेवाने त्याला ज्योतीचे वरचे टोक सापडले असे सांगितले. ते खोटेच होते. विष्णूने मात्र मान्य केले की त्याला अग्निस्तंभाचे दुसरे टोक सापडले नाही. त्याच क्षणी शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले व ब्रह्मदेवाला शाप दिला की त्याला कोणत्याही समारंभात कोणत्याही प्रकारचे स्थान नसेल तर विष्णूला मात्र आशिर्वाद दिला की त्याचे पूजन जगाच्या अंतापर्यंत अखंड केले जाईल. 

ज्योतिर्लिंगाची सर्व स्थाने म्हणजे शंकर ज्योतिस्वरूपात जिथे प्रगट झाले त्या जागा. एकूण चौसष्ठ ज्योतिर्लिंग आहेत असा समज आहे. पण त्यातील बारा ज्योतिर्लिंगे ही अतिपवित्र, शुभ व मंगलदायक आहेत. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांमधे खालील बारा ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. 

१. सोमनाथ, सौराष्ट्र, गुजरात
२. मल्लिकार्जुन, श्री शैलम्, आंध्र प्रदेश
३. महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश
४. ओंकारेश्वर, मध्य प्रदेश
५. केदारनाथ, हिमालय
६. भीमाशंकर, महाराष्ट्र
७. काशी विश्वनाथ, वाराणसी, उत्तर प्रदेश
८. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र
९. वैजनाथ (वैद्यनाथ), परळी, महाराष्ट्र 
१०. नागेश्वर, द्वारका, गुजरात
११. रामेश्वर, तामिळनाडू
१२. घृष्णेश्वर, औरंगाबाद, महाराष्ट्र 

बारा ज्योतिर्लिंगाविषयी थोडक्यात माहिती पुढील लेखांत दिली आहे. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणाऱ्यांना दिलेली माहिती उपयुक्त ठरावी ही अपेक्षा.