Sunday, October 22, 2023

श्री मत्स्यपुरीश्वरर कोविल

हे मंदिर तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यामध्ये तंजावूर-कुंभकोणम मार्गावर पापनाशम गावाजवळ पंडरवाडी गावामध्ये आहे. ह्या स्थळाला कोविल-देवरायण-पेट्टई असं पण म्हणतात. शैव संत श्री संबंधर यांनी ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची स्तुती गायली म्हणून ह्या स्थळाला थेवर-वैप्पू स्थळ असं पण म्हणतात. 


मुलवर (मुख्य देवता): श्री मत्स्यपुरीश्वरर

पत्नी (देवीचे नाव): श्री सुगंध-कुंडल अंबिका

क्षेत्र वृक्ष: वन्नी (शमीचे झाड)

पौराणिक नाव: थिरुचेलूरसेलूर, राजकेसरी चतुर्वेदी मंगलम् 


हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. इथे श्री पार्वती देवींनी श्री वज्रेश्वरी ह्या त्यांच्या अंगरक्षक देवीसमवेत नवरात्रीच्या अष्टमी दिवशी येथे पूजा केली. 


मंदिराची वैशिष्ठ्य:


श्री मुरूगांचे त्यांच्या श्री वल्ली आणि श्री दैवनै पत्नींसहित इथे स्वतंत्र देवालय आहे. ह्या मूर्तीमध्ये पुढील बाजूस तीन आणि मागील बाजूस तीन अशी सहा मुखे आहेत आणि त्यांच्या एका हातात शंख तर दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे. 


देवळाच्या मागच्या बाजूला श्री महाविष्णूंची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस श्री अंबिका देवींची उभी मूर्ती आहे. श्री अंबिका देवींच्या मूर्तीपुढे महामेरुचे प्रतीक आहे. श्री अंबिका देवींच्या देवालयामध्ये कोष्ठ मुर्त्या नाहीत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस श्री गणपती आणि श्री नटराज ह्यांच्या मुर्त्या आहेत. देवळाच्या मागच्या बाजूला श्री अष्टभुजा दुर्गादेवींची उत्तराभिमुख मूर्ती आहे. 


मुख्य देवळाच्या प्रवेशद्वारावरील उजव्या बाजूच्या स्तंभावर भगवान शिवांची आराधना करत असलेल्या कामधेनूचे शिल्प आहे. उजव्या बाजूच्या स्तंभावर मत्स्य रूपात श्री विष्णू भगवान शिवांची आराधना करत आहेत असे शिल्प आहे. श्री विनायक आणि श्री नवग्रह ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. 


गाभाऱ्यामध्ये मत्स्य रुपातले श्री विष्णू भगवान शिवांची आराधना करत आहेत अशी मूर्ती आहे. कोष्टमुर्त्यांमध्ये श्री बालविनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. पण इथे श्री लिंगोद्भवरांची मूर्ती नाही. बाहेरील परिक्रमेमध्ये सिद्धरपीठम (श्री बालाजी), सप्तमातृकादेवी, नालवर, श्री नृसिंह, श्री काशी विश्वनाथ आणि श्री विशालाक्षी, श्री नृत्य विनायक, श्री गजलक्ष्मी, श्री चंडीश्वरर, श्री सरस्वती देवी, श्री मारुती, श्री योगभैरव, श्री कालभैरव, श्री शनीश्वरर आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


क्षेत्र पुराण:


हे मंदिर श्री महाविष्णूंच्या मत्स्यावताराशी निगडित आहे. हयग्रीव ह्या असुराने चोरलेल्या चार वेदांना परत मिळविण्यासाठी श्री महाविष्णूंनी मत्स्यावतार धारण केला. 


पुराणातील कथेनुसार श्री ब्रह्मदेव जेव्हा विश्रांती घेत होते त्यावेळी असुरांनी चार वेद चोरले आणि ते समुद्रात लपवून ठेवले. श्री ब्रह्मदेव आणि इतर देवांनी श्री महाविष्णूंना हे वेद परत आणण्यासाठी मदत मागितली. श्री महाविष्णूंनी ती मागणी मान्य केली. काही काळाने एकदा सत्यव्रत नावाचा राजा जेव्हा अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या हातामध्ये त्याला एक छोटा मासा दिसला. त्या माश्याने राजाला त्याचं संरक्षण करण्याची विनंती केली. राजा त्याला त्याच्या राजवाड्यामध्ये घेऊन गेला आणि एक छोट्या भांड्यामध्ये त्या माश्याला ठेवले. पण तो मासा खूपच वेगाने मोठा होत होता. राजाने त्याला एका तलावामध्ये ठेवले. शेवटी तलावामध्ये तो मावेना तेव्हा राजाने त्याला समुद्रात ठेवले. त्यावेळी त्या माश्याने राजाला सांगितले कि पुढल्या सात दिवसात प्रलय होईल आणि त्या प्रलयापासून राजा आणि त्याच्या  प्रजेचं संरक्षण करण्यासाठी एक मोठं जहाज (नाव) येईल. त्यानंतर जेव्हा प्रलयाची वेळ आली त्यावेळेस त्या माश्याने सांगितल्याप्रमाणे जहाज आलं  आणि राजा आणि त्याची प्रजा त्यामध्ये आरूढ झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली कि राजा आणि त्याच्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी श्री महाविष्णूंनी मत्स्यावतार घेतला आहे. जेव्हा प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जहाज कोलमडायला लागलं तेव्हा अचानक तो मोठा मासा आला आणि त्याने जहाजाला आधार देऊन त्याला सुरक्षित स्थळी पोचवलं. त्यानंतर तो मासा खोल समुद्रामध्ये वेदांचं रक्षण करण्यासाठी गेला आणि हयग्रीव राक्षसाला मारून चार वेदांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याने त्या वेदांना परत श्री ब्रह्मदेवाकडे सुपूर्त केलं. पण हयग्रीव असुराच्या हत्येमुळे श्री महाविष्णूंना पाप प्राप्त झालं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत येणं कठीण झालं. त्यावेळी मत्स्यावतारातल्या श्री महाविष्णूंनी ह्या ठिकाणी शिव लिंगाची स्थापना करून त्याची आराधना केली आणि श्री शिवाच्या कृपेने ते परत आपल्या मूळ रूपात आले. म्हणून इथे श्री शिवाचे नाव श्री मत्स्यपुरीश्वरर आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment