Wednesday, October 18, 2023

श्री जंबुकेश्वरर मंदिर

हे मंदिर तंजावूर-कुंभकोणम मार्गावरील पापनाशम गावाजवळ नल्लीचेरी (नंदिमंगई) गावामध्ये वसलेलं आहे. १२०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध समूहांमध्ये समाविष्ट आहे. चक्रपल्लीच्या आसपास असणाऱ्या सप्तस्थानांपैकी हे एक मंदिर. तसेच सप्त-मंगई ह्या सात मंदिरांच्या समुहामधलं हे एक मंदिर आहे. सप्त-मंगई स्थानं हि सात मंदिरे आहेत जिथे श्री पार्वती देवीने सप्त मातृकांसहित शरद नवरात्रीची पूजा केली. त्या सप्त मातृकांपैकी श्री वैष्णवी ह्या मातृकादेवीशी हे मंदिर निगडित आहे. 

मुलवर (मुख्य देवता): श्री जंबुकेश्वरर, श्री जम्बुनाथर 

देवी: श्री अखिलांडेश्वरी   

क्षेत्र वृक्ष: जांभूळ (जावा प्लम किंवा इंडियन ब्ल्यूबेरी)

पवित्र तीर्थ: देवकर्था तीर्थ आणि भगवान शिवाच्या देवालयाजवळची विहीर.

पुरातन नाव: नंदिमंगई

तालुका: पापनाशम 

जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)


हे मंदिर जरी पश्चिमाभिमुख असलं तरी मंदिरामध्ये प्रवेश मात्र दक्षिणेकडून आहे. काशीसमान हे मुक्ती-क्षेत्र मानलं जातं आणि म्हणूनच मंदिराचं प्रवेशद्वार स्मशानभूमीच्या दिशेने आहे. 


ह्या मंदिरातल्या मुर्त्या आणि देवालये:


श्री पार्वती देवींची मूर्ती दक्षिणाभिमुख. ह्या मूर्तीमध्ये श्री पार्वती देवी उभ्या असलेल्या दाखवलेल्या आहेत. श्री विष्णुदूर्गा देवींचं स्वतंत्र देवालय आहे. प्रवेशद्वाराच्या जवळ श्री विनायकांच्या मुर्त्या आहेत. 


क्षेत्र पुराण: 


असा समज आहे कि श्री वैष्णवी देवींनी, सप्त मातृकांपैकी एक, श्री पार्वतीदेवींसह नवरात्रीच्या चौथ्या दिवशी येथे पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या पायांचं आणि पायांपाशी श्री नंदिदेवांचं दर्शन झालं. भगवान शिवांच्या पायात त्यांना पैंजणांचं (तामिळ मध्ये कयल) दर्शन झालं. म्हणून ह्या दर्शनाला शिव-कयल दर्शन असं नाव आहे.   


एकदा श्री नंदिदेवांना भगवान शिवांच्या पैंजणांचा स्पर्श झाला. त्या स्पर्शाने श्री नंदिदेव उत्तेजित झाले आणि त्यांना असं वाटलं कि नुसत्या पैंजणांच्या स्पर्शाने जर मन एवढं उत्तेजित होत असेल तर भगवान शिवांच्या प्रत्यक्ष पायांच्या स्पर्शाने केवढा आनंद होईल. तो आनंद मिळविण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची १००८ वेळा प्रदोष पूजा केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांचे पाय श्री नंदिदेवांच्या शिरावर ठेवले. तसेच श्री नंदिदेवांनी तपश्चर्या करून भगवान शिवांकडून पंचाक्षराचा उपदेश मिळवला जो त्यांना थिरुवारुर येथे मिळाला नाही. 


श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचे कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं. 


विशेष वैशिष्ट्य: पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या संकटहरचतुर्थीच्या दिवशी सूर्याची किरणे श्री पार्वती देवींच्या मूर्तीवर पडतात


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment