तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यामध्ये तंजावूर-कुंभकोणम मार्गावर पापनाशम च्या जवळ थिरुपुल्लमंगाई ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध मंदिरांच्या समूहांशी निगडित आहे. नायनमारांनी ज्यांची स्तुती गायली आहे अशा २७६ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. तसेच सप्तमंगई (सात शिव मंदिरे जिथे श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांदेवीसह नवरात्रीची पूजा केली) मधलं पण हे एक मंदिर आहे. आणि तसेच चक्रपळ्ळीच्या आसपास असणाऱ्या सात शिव मंदिरांपैकी, ज्यांना सप्तस्थानं म्हणतात, त्या मंदिरांपैकी पण एक आहे.
मुलवर (मुख्य देवता): श्री पशुपतीश्वरर, श्री पशुपतीनाथर, श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री अलनथुराईनाथर
देवी: श्री सौंदर्यनायकी देवी, श्री आलीयंकोथाई
क्षेत्रवृक्ष: वडाचे झाड
पवित्र तीर्थ: कावेरी, कुडमुरुट्टी
पुराणिक नाव: थिरुपुल्लमंगाई
वर्तमान नाव: पशुपती कोविल
जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू
कावेरी नदीच्या कुडमुरुट्टी ह्या उपनदीच्या काठावर हे मंदिर वसलं आहे. वडाचं झाड असलेल्या नदी किनाऱ्यावर हे मंदिर वसलं आहे म्हणून ह्या स्थळ आलनथुराई असं नाव आहे. वर्तमान स्थितीमध्ये हे मंदिर थोड्या विस्कळीत स्थितीमध्ये आहे. पूर्वी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चोळा आणि मराठा साम्राज्यांच्या राजांनी केला होता.
चोळा साम्राज्यामध्ये बांधलेलं हे मंदिर मदकोविल ह्या शैलीवर आधारित आहे. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे.
श्री पार्वती देवींनी इथे चक्रवाक पक्ष्याच्या रूपामध्ये भगवान शिवांची आराधना केली. त्यांच्यासह श्री चामुंडी, सप्त मातृका देवींपैकी एक, ह्या पण होत्या. ह्या आराधनेनंतर त्यांना भगवान शिवांच्या गळ्यातील दैवी सर्पाचे दर्शन झाले. म्हणून ह्या दर्शनाला शिव-नाग-भूषण दर्शन असे नाव आहे.
क्षेत्रपुराण:
पुराणांनुसार इथे श्री पार्वती देवींनी चक्रवाक ह्या पक्ष्याच्या रूपामध्ये आराधना केली म्हणून ह्या स्थळाला पुल्लमंगाई असं नाव आहे. असा समज आहे कि अष्टनागांनी (आठ दैवी सर्प) इथे शिवरात्रीच्या दिवशी दहा कोटी नागलिंग (कैलासपती) पुष्पांनी भगवान शिवांची आराधना केली. म्हणून ह्या स्थळाला नागशक्ती स्थळ म्हणतात.
ह्या मंदिरामध्ये कामधेनू नावाची गाय भगवान शिवांची आराधना करत आहे असं शिल्प आहे.
एका आख्यायिकेनुसार भगवान शिवाची आराधना करून श्री ब्रह्म शापमुक्त झाले.
वैशिष्ट्य:
१. येथील श्री दुर्गादेवीचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या शिल्पातील तिच्या मूर्तीचे नाव श्री महिषासुरमर्दिनी आहे. ह्या शिल्पाचे वर्णन अशा रीतीने आहे. श्री देवी एका छत्रीखाली उभी आहे. तिचा एक पाय महिषासुरावर आहे. तिच्या अष्टभुजांमध्ये शंख, चक्र, खङग, धनुष्य, गदा, त्रिशूल, अंकुश आणि खट्वांग अशी शस्त्र आहेत. तिच्या एका बाजूला हरिण आणि एका बाजूला सिंह उभ्या मुद्रेमध्ये आहेत. तिचा एक हात अभयमुद्रेत आहे. ह्याशिवाय दोन सैनिक आपले शिर प्रदान करत आहेत असं पण ह्या शिल्पामध्ये दाखवले आहे.
२. येथील नवग्रह देवालयामध्ये मध्यभागी श्री नंदि आहेत.
३. येथील राजगोपुरावर आपल्याला गरुडं दिसतात.
४. इथे चोळा, विजयनगर आणि मराठा साम्राज्यातील राजांनी केलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचे चित्रीकरण दगडांवर कोरलेले आहे. ह्यामध्ये तंजावूरचे राजा प्रतापसिंह आणि राजा परान्तक चोळा ह्यांची नावे बघायला मिळतात.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये एकच प्रकारम् आहे. मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गाला परिक्रमा किंवा प्रकारं असं म्हणतात. इथे बलीपीठ आणि नंदि आहेत पण इथे ध्वजस्तंभ नाही. मंदिराच्या भोवती ३ फूट खोल कालवा आहे.
शिव मंदिराच्या परंपरेनुसार इथे श्री चंडिकेश्वरांचं देवालय आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर कोष्ठ मुर्त्या आहेत. तसेच चार प्रसिद्ध शिवभक्त ज्यांना “नालवर” म्हणतात त्यांच्या पण मुर्त्या आहेत.
श्री सौंदर्यनायकी देवी ह्यांचं स्वतंत्र देवालय आहे. परिक्रमेमध्ये श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. महामंडपाच्या प्रवेशाजवळ पण एक श्री गणेशांची मूर्ती आहे. त्याचबरोबर श्री सूर्य, श्री भैरव ह्यांच्या पण मुर्त्या मंदिरात बघायला मिळतात.
इथे काही चित्रपटलं आहेत ज्यांवर श्रीशिव आणि शिवगण ह्यांच्या पुराणातल्या कथा चित्रित केल्या आहेत. ह्यामध्ये शिवगणांच्या हातामध्ये संगीत वाद्य दिसतात. हे शिव मंदिर असून पण, येथील काही पटलांवर रामायण, विष्णू पुराण ह्यातील कथा तसेच कृष्ण लीला कथा पण चित्रित केल्या आहेत.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव
पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव
वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव
मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment