हे मंदिर तंजावूर - कुंभकोणम मार्गावर पापनाशम गावाच्या जवळ वसलेलं आहे. १२०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध समूहांमध्ये समाविष्ट आहे. चक्रपल्ली च्या आसपास असणाऱ्या सप्तस्थानांपकी हे एक मंदिर. तसेच सप्त-मंगई ह्या सात मंदिरांच्या समुहामधलं हे एक मंदिर आहे. सप्त-मंगई स्थानं हि सात मंदिरे आहेत जिथे श्री पार्वती देवीने सप्त मातृकांसहित शरद नवरात्रीची पूजा केली. त्या सप्त मातृकांपैकी श्री कौमारी ह्या मातृकादेवीशी निगडित हे मंदिर आहे.
मुलवर (मुख्य देवता): श्री कीर्तीवागीश्वरर (श्री करीउरैथ्थनायनार, देव ज्याने हत्तीचं कातडं सोलून परिधान केलं).
देवी: श्री अलंकारवल्ली
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: शूळतीर्थ
पुरातन नाव: शूळमंगई
तालुका: पापनाशम
जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)
ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे.
क्षेत्र पुराण:
असा समज आहे कि येथे श्री शिवांनी गजासुराचा वध केला आणि त्याचं कातडं सोलून परिधान केलं म्हणून इथे श्री शिवांना श्री कीर्तिवागीश्वरर (करीउरैथ्थ नायनार) असं नाव आहे.
देवांसाठी अस्त्र बनविणारे श्री अस्त्रदेव ह्यांनी येथे श्री शिवांची आराधना केली आणि त्यांना बरीच वरदाने मिळाली.
असा समज आहे कि शरद नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी श्री पार्वती देवींनी, सप्त मातृकांपैकी श्री कौमारी ह्या मातृकादेवीसह, श्री शिवांची आराधना केली. त्यांना श्री शिवांच्या त्रिशुळाचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला त्रिशुळदर्शन असं नाव आहे. आणि त्रिशूळाला तामिळ मध्ये शूळ म्हणतात, म्हणून ह्या स्थानाला शूळमंगलम असं पण नाव आहे.
पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि तामिळ दिनमानाच्या थै ह्या महिन्याच्या अमावास्येला श्री विष्णूंनी येथे श्री शिवांची आराधना केली आणि कालनेमी ह्या राक्षसाबरोबरच्या युद्धामध्ये विजय मिळवला.
तसेच त्याच दिवशी श्री ब्रह्मांनी पण श्री शिवांची आराधना केली आणि त्यांची पोटशुळीमधून मुक्तता झाली. म्हणून येथे अमावास्येला शुळव्रत पाळलं जातं.
श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचं कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं.
ह्या मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:
श्री अलंकारवल्ली (श्री पार्वती देवी) ह्यांचं इथे स्वतंत्र देवालय आहे. येथील शिवलिंग कवचाधित आहे. गजासुर वधाचं हे प्रतीक आहे.
शिवमंदिराच्या परंपरेनुसार इथे विविध कोष्टमूर्त्या आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे कोष्टमूर्त्यांमधील श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती हि वैशिष्ट्यपूर्ण आहे जे वैशिष्ट्य इतर मंदिरातल्या श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये आढळत नाही. येथे श्री दक्षिणामूर्ती जटाधारी आहेत आणि ते कल्लाळ (वडाचं झाड) झाडाखाली बसले आहेत.
प्रवेशद्वाराजवळ श्री अस्त्रदेवांची मूर्ती ते उभे असलेल्या मुद्रेमध्ये आहे आणि ते शिवांची आराधना करत आहेत.
श्री मुरुगन ह्यांचं श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्या त्यांच्या पत्नींसहित स्वतंत्र देवालय आहे. त्याचबरोबर श्री नृत्यविनायक ह्यांचं पण स्वतंत्र देवालय आहे.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव
पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव
वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव
मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment