नवरात्रीच्या निमित्ताने श्री पार्वती देवीने नवरात्रीमध्ये तामिळ नाडूमधल्या ज्या मंदिरांमध्ये पूजा केली त्या मंदिरांची माहिती देण्याचा आम्ही नम्र प्रयत्न करत आहोत.
तामिळ नाडूमध्ये अशी सात (किंबहुना नऊ) मंदिरे आहेत आहेत जी प्राचीन आहेत (जवळ जवळ १५०० वर्षे जुनी) ज्या मंदिरामध्ये श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांसहित नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी पूजा केली. ह्या मंदिरांना एकत्रित सप्तमंगई स्थळं असं संबोधलं जातं. ह्या मंदिरांना वैदिक, पौराणिक आणि स्थापत्य शास्त्रानुसार पण महत्व आहे. ही मंदिरे तामिळ नाडू राज्यातल्या तंजावूर जिल्ह्यातील पापनाशम तालुक्यातील अय्यमपट्टई/पशुपती ह्या मंदिरांच्या क्षेत्रामध्ये वसलेली आहेत. हे क्षेत्र तंजावूर-कुंभकोणम मार्गावर आहे.
देवी भागवत पुराणानुसार चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, रक्तबीज आणि इतर असुरांचा वध करण्यासाठी नवरात्रीमध्ये श्री पार्वती देवी श्री कालिका देवीच्या रूपामध्ये हिमपर्वतावर अवतरल्या. श्री कालिकादेवींना सहाय्य करण्यासाठी इतर देवांच्या शक्ती त्या त्या देवांपासून निघून श्री कालिका देवींमध्ये विलीन झाल्या. त्या शक्तींची नावे अशी
१) श्री ब्राह्मी देवी: श्री ब्रह्मदेवांची शक्ती. तिचे श्री अभिरामी असे पण नाव आहे. ती चतुर्मुख असून तिच्या हातांमध्ये अक्षमाला आणि कमंडलू आहेत. तिचे वाहन हंस आहे.
२) श्री माहेश्वरी देवी: श्री महेश्वर (भगवान शिव) ह्यांची शक्ती. तिच्या हातात त्रिशूळ आहे आणि कपाळावर चंद्रकोर धारण केली आहे.
३) श्री कौमारी देवी: श्री कुमार (श्री कार्थिकेय / श्री सुब्रमण्यम) ह्यांची शक्ती. तिच्या हातामध्ये वेल (म्हणजेच भाला) आहे.
४) श्री वैष्णवी देवी: भगवान श्री विष्णूंची शक्ती. तिच्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा व कमळ आहे.
५) श्री वाराही देवी: श्री वराहांची शक्ती. तिचे मुख वराहाचे आहे. तिच्या हातांमध्ये तिची शस्त्रे म्हणजेच हल आणि मुसळ आहे.
६) श्री इंद्राणी देवी: श्री इंद्रदेवांची शक्ती. तिचे श्री माहेन्द्री असे पण नाव आहे. तिला सहस्र नयन आहेत आणि तिचे वाहन चार दंत असलेला ऐरावत (पांढरा हत्ती) आहे. तिचा रंग निळा (इंद्रनीळ) आहे. तिच्या हातांमध्ये पाश, अंकुश, कमळ आणि एक हात अभयमुद्रा दाखवत आहे. तिचे मुख्य शस्त्र वज्र आहे आणि तिच्या बरोबर वज्रसेना आहे.
७) श्री चामुंडा देवी: श्री भीषण भैरव देवांची शक्ती. तिचा रंग काळा आहे. तिने गळ्यामध्ये मुंडमाला (मानवी कवट्यांची माळ) धारण केली आहे. तिच्या हातांमध्ये डमरू, त्रिशूळ, तलवार आणि पानपात्र आहे. तिला तीन नेत्र आहेत. ती मानवी शवावर आरूढ झाली आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ स्थळे जिथे श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांसह नवरात्रीमध्ये पूजा केली
तिथी: प्रतिपदा, स्थळ: श्री चक्रमंगई
इथे श्री पार्वती देवींनी श्री ब्राह्मी देवींसह नवरात्रीच्या प्रतिपदेला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्राचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला शिवनेत्रचक्र दर्शन असे नाव आहे.
तिथी: द्वितीया, स्थळ: श्री हरिमंगई (अरियामंगई)
इथे श्री पार्वती देवींनी श्री माहेश्वरी देवींसह नवरात्रीच्या द्वितीया तिथीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या जटेतील श्री गंगेचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला दिव्यगंगा दर्शन असे नाव आहे.
तिथी: तृतीया, स्थळ: श्री शूळमंगई
इथे श्री पार्वती देवींनी श्री कौमारीदेवींसह नवरात्रीच्या तृतीया तिथीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या त्रिशूळाचे दर्शन झाले. ह्या दर्शनाला शिवत्रिशूळ दर्शन असे नाव आहे.
तिथी: चतुर्थी, स्थळ: नंदीमंगई
इथे श्री पार्वती देवींनी श्री वैष्णवीदेवींसह नवरात्रीच्या चतुर्थीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या पायांचं आणि पायांपाशी श्री नंदीदेवांचं दर्शन झालं. भगवान शिवांच्या पायात त्यांना पैंजणांचं (तामिळ मध्ये कयल) दर्शन झालं. म्हणून ह्या दर्शनाला शिव-कयल दर्शन असं नाव आहे.
तिथी: पंचमी, स्थळ: पशुमंगई
इथे श्री पार्वती देवींनी श्री वाराहीदेवींसह नवरात्रीच्या पंचमी तिथीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या हातातल्या डमरूचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला शिव डमरुक दर्शन असे नाव आहे.
तिथी: षष्ठी, स्थळ: थाळमंगई
इथे श्री पार्वतीदेवींनी श्री इंद्राणीदेवींसह नवरात्रीच्या षष्ठी तिथीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या शिरावरील चंद्रकोरीचे (तामिळ मध्ये पीराई चंद्र) दर्शन झाले. ह्या दर्शनाला पीराईचंद्र दर्शन असे नाव आहे.
तिथी: सप्तमी, स्थळ: पुल्लमंगई
इथे श्री पार्वतीदेवींनी श्री चामुंडादेवींसह नवरात्रीच्या सप्तमी तिथीला पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या गळ्यातील दैवी सर्पाचे दर्शन झाले. म्हणून ह्या दर्शनाला शिव-नाग-भूषण दर्शन असे नाव आहे.
तिथी: अष्टमी, स्थळ: थिरुसेलूर
इथे श्री पार्वतीदेवींनी त्यांच्या अंगरक्षक देवी (ज्यांना आदिमूळद्वारपालकी असं पण म्हणतात) श्री वज्रेश्वरींसह नवरात्रीच्या अष्टमीला पूजा केली.
तिथी: नवमी, स्थळ: मेलत्तूर
इथे श्री पार्वतीदेवींनी त्यांच्या अंगरक्षक देवी (ज्यांना आदिमूळद्वारपालकी असं पण म्हणतात) श्री मकुटेश्वरींसह नवरात्रीच्या नवमीला पूजा केली.
असा समज आहे कि अजूनही श्री पार्वती देवी प्रत्येक नवरात्रीला सप्त मातृकांसहित ह्या स्थळांमध्ये नवरात्रीला पूजा करतात.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment