हे मंदिर तंजावूर-कुंभकोणम मार्गावरील पापनाशम गावाजवळ कल्लर पशुपतिकोविल (पशुमंगई) गावामध्ये वसलेलं आहे. कावेरी नदीची उपनदी कुडमुरुट्टीच्या तीरावर हे मंदिर आहे. १८०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध समूहांमध्ये समाविष्ट आहे. चक्रपळ्ळीच्या आसपास असणाऱ्या सप्तस्थानांपैकी हे एक मंदिर. तसेच सप्त-मंगई ह्या सात मंदिरांच्या समुहामधलं हे एक मंदिर आहे. सप्त-मंगई स्थानं हि सात मंदिरे आहेत जिथे श्री पार्वती देवीने सप्त मातृकांसहित शरद नवरात्रीची पूजा केली. त्या सप्त मातृकांपैकी श्री वाराही ह्या मातृकादेवीशी हे मंदिर निगडित आहे.
मुलवर (मुख्य देवता): श्री पशुपतीश्वरर
देवी: श्री पाल वल नायकी, श्री लोग नायकी (विश्वाची सम्राज्ञी)
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: कामधेनू तीर्थ
पुरातन नाव: पशुमंगई
तालुका: पापनाशम
जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये चोळा राजाने बांधलेलं हे मंदिर ७० मद कोविल पैकी एक आहे.
ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. राजगोपुरावर मार्कंडेय ऋषी आणि शैवसंत कन्नपा नायनार ह्यांची जीवनपटले चित्रित केली आहेत. इथे भगवान शिवांची एक अद्वितीय अशी अष्टभुजा मूर्ती आहे ज्यामध्ये भगवान शिवांच्या प्रत्येक हातामध्ये एक आयुध आहे. भगवान शिवांचा गाभारा उंच स्तरावर आहे. ह्या गाभाऱ्याच्या शेजारी श्री उच्छिष्ठ गणपतींची अतिशय सुंदर मूर्ती पण उंच स्तरावर आहे.
परिक्रमेमध्ये श्री शनीश्वर, श्री भैरव, श्री दुर्गा, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री गजलक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आहेत.
मंदिराच्या नैऋत्य दिशेला श्री मंथन आणि श्री मंथिनी ह्यांच्या मुर्त्या आहेत तर वायव्य दिशेला श्री ब्रह्मदेवांची मूर्ती आहे.
चोळा राजघराण्याने पुजलेली श्री ज्येष्ठादेवीची मूर्तीपण इथे आहे.
मुस्लिम राजे मलिक काफूर आणि अर्कोट नवाबांनी ह्या मंदिराची नासधूस केली. तसेच कावेरी नदीच्या पुरामुळे पण ह्या मंदिराची बरीच नासधूस झाली. कालांतराने चोळा, विजयनगर आणि मराठा साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
क्षेत्र पुराण:
असा समज आहे कि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी इथे श्री पार्वती देवींनी श्री कामधेनू आणि सप्त मातृकांमधल्या श्री वाराही देवी ह्यांच्या समवेत नवरात्रीची पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या डमरूचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला शिव डमरुक दर्शन म्हणतात.
पुराणांनुसार जेंव्हा भगवान शिव डमरू वाजवतात तेव्हा त्यातून निर्माण झालेले ध्वनी हे बीजाक्षरे असतात ज्यातून सर्व जीवांना भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
डमरूची एक बाजू जीवात्मा म्हणजेच पशु दर्शवते तर दुसरी बाजू पशूंचा पती म्हणजेच पशुपती दर्शवते. पशु म्हणजेच बद्ध जीव, भगवान शिवांच्या प्रेमामध्ये बद्ध झालेले जीव आणि भगवान शिव हे ह्या जीवांचे पती म्हणूनच त्यांना पशुपती असे नाव आहे. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव पशुपतीश्वरर असं आहे.
पशु ह्या शब्दाचा अजून एक अर्थ आहे गाय. इथे दैवी गाय म्हणजेच श्री कामधेनूंनी भगवान शिवाची आराधना केली म्हणून ह्या स्थळाला पशुमंगई असं नाव आहे.
इथे भक्तगण श्री पशुपतीश्वरर ह्यांची आराधना करतात ज्यामुळे भगवान शिवांशी एकरूपता प्राप्त होण्यासाठी लागणाऱ्या बीजवेदज्ञानाची प्राप्ती होते.
इथे अगस्त्य मुनींनी पण भगवान शिवांची आराधना केली. तसेच इथे एक कोळी आणि हत्ती ह्यांनी पण भगवान शिवाची आराधना केली.
श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचे कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव
पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव
वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव
मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment