Thursday, October 7, 2021

नवरात्रीतील देवीची उपासना

 “सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, गोप्त्री गोविन्दरुपिणी, संहारिणी रुद्ररूपा” 

- श्री ललितासहस्रनाम 


ह्या विश्वामध्ये तीन मूलभूत क्रिया आहेत ज्या सर्व चराचरामध्ये समाविष्ट आहेत आणि त्या म्हणजे निर्मिती (ह्या क्रियेला सृष्टीनिर्माण, उत्पत्ती असं पण संबोधलं जातं), निर्वाह (ह्या क्रियेला स्थिती किंवा लालनपालन असं पण संबोधलं जातं) आणि संहार (ह्या क्रियेला लय असं पण संबोधलं जातं). कुठलीही वस्तू, मनुष्य, प्राणी, वनस्पती, इतर जीव, खनिज, अगदी सूक्ष्म विचार, देवदेवता, एवढंच काय तर हे अखिल विश्व असो. ह्या सर्वांना ह्या तीन स्थितींतून किंवा तीन क्रियांतून जावंच लागतं. वरील प्रत्येक क्रियेला एक अधिष्ठान देवता आहे म्हणजेच ह्या प्रत्येक क्रियांची जबाबदारी त्या त्या देवतांवर सोपवली आहे. सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवाची आहे, सृष्टीपालनाची जबाबदारी भगवान विष्णूंकडे आहे तर सृष्टीसंहाराची जबाबदारी भगवान शंकरांची आहे. पण हे सगळे देव आपापली कार्य करण्यासाठी त्यांच्या शक्तिंवर अवलंबून आहेत. ह्या शक्तिंशिवाय ही कार्यं करण्यास ते असमर्थ ठरतात. म्हणूनच एखादा माणूस कुठलं कार्य करू शकत नसेल तर तो शक्तिहीन आहे असा वाक्प्रचार आहे. आपण कधी तो ब्रह्महीन आहे, विष्णूहीन आहे, किंवा शंकरहीन आहे असे शब्द वापरत नाही. म्हणजे कुठल्याही क्रियेमध्ये शक्तिंचं महत्व ह्या देवतांपेक्षाही अधिक आहे. म्हणूनच शक्तिहीन वस्तू प्रेतरूप होते. 


मनुष्यदेह ह्याच सृष्टीमधील पंचमहाभूतांपासून बनल्यामुळे सृष्टीचे सारे नियम आणि क्रिया (निर्माण, पालनपोषण आणि संहार) ह्या मनुष्यदेहाला पण लागू पडतात. त्यामुळे आपण दिवसा उठून रात्री झोपेपर्यंत, इतकंच काय तर झोपेत सुद्धा निर्मिती, निर्वाह आणि संहार शक्ति आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. अगदी आपले विचारच घ्या. ते निर्माण होतात, स्थित राहतात आणि नंतर लय पावतात. ह्या विचारांच्या सकारात्मकतेप्रमाणे त्या त्या क्रिया आपल्याला सकारात्मक फळं देतात. तसेच नकारात्मक विचारांमुळे ह्या क्रिया नकारात्मक फळं देतात. आपले विचार सकारात्मक होण्यासाठी त्या त्या शक्तिंची उपासना मदत करते. आणि म्हणूनंच आपल्या थोर ऋषीमुनींनी ह्या शक्तिंची उपासना केली आणि अत्यंत प्रेमभावनेने आपल्या सर्व मानवजातीला ह्या शक्ति अनुकूल व्हाव्यात म्हणून ह्या उपासनांना प्रचलित पण केलं. 


देवि शक्तिरूप असल्यामुळे नवरात्रीमधील देविची उपासना ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. नवरात्रीमध्ये ह्या तीनही शक्तिंची म्हणजेच दुर्गा देवि (संहारिणी रुद्ररूपा), लक्ष्मी देवि (गोप्त्री गोविन्दरुपिणी) आणि सरस्वती देवि (सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा) ह्यांची उपासना केली जाते. ह्या उपासनेमुळे आपल्यातील सृजनशक्ति, पालनपोषण शक्ति आणि संहारशक्ति ह्या तीनही शक्ति आपल्याला सकारात्मक आणि अनुकूल होण्यास मदत होते. नवरात्रीनंतर जो दिवस येतो तो म्हणजे विजयादशमी. म्हणजेच थोडक्यात नऊ दिवस ह्या तीन शक्तिंची उपासना केल्यामुळे आपण शक्तिपूर्ण बनतो आणि विजय प्राप्त करू शकतो. असं म्हणतात की राम-रावण युद्ध चालू असताना जेव्हा प्रभू श्रीरामांना आपल्या शक्ति रावणावर काम करत नाहीत हे जेव्हा प्रतीत झालं त्यावेळी ते काही क्षण हतबल झाले. त्यावेळी अगस्त्य मुनींनी प्रभू श्रीरामांना आठवण करून दिली की विधिलिखित नियमांनुसार रावणवधाचा काळ खूप जवळ आला आहे आणि त्यांनी प्रभू श्रीरामांना देविची उपासना करायला सांगितली. प्रभू श्रीरामांनी अगस्त्य मुनींच्या सल्ल्यानुसार देविची उपासना केली आणि दशमीच्या दिवशी रावणावर विजय प्राप्त केला. म्हणुनच ह्या दशमीला विजयादशमी असं संबोधलं जातं. 


स्वतः मच्छिन्द्रनाथांनीपण  शाबरीविद्येतील काव्य रचण्यासाठी देविची (शक्तिची) उपासना केली होती. 


नवरात्रीमधील सर्वात प्रचलित, सुलभ आणि सोपी उपासना म्हणजे श्रीदेविमहात्म्याचं पारायण. पारायणाची सुरुवात श्रीचंडीकवच, श्रीअर्गलास्तोत्र आणि श्रीकीलकस्तोत्र ह्यांचं पठण करून करावी असा प्रचलित नियम आहे. आणि पारायणाच्या शेवटी शंकराचार्यकृत देविअपराधक्षमापन स्तोत्र म्हणायचा प्रघात आहे. प्रतिपदेला चालू करून नवमी पर्यंत पारायण संपवावे असा नियम आहे. साधकांनी यथाशक्ति श्री देविमाहात्म्याचे १६ अध्याय ९ दिवसात वाचावेत ते असे १) तीन स्तोत्रे व अध्याय १, २) अध्याय २ व ३, ३) अध्याय ४ व ५, ४) अध्याय ६ व ७, ५) अध्याय ८ व ९, ६) अध्याय १० व ११, ७) अध्याय १२, ८) अध्याय १३ व १४, ९) अध्याय १५ व १६


समजा काही अडचणींमुळे आपल्याला पारायण जमलं नाही तर पुढील ९ श्लोक असलेल्या स्तोत्राचं पठण किंवा वाचन केल्याने पण देविमहात्म्य पारायणाचे फळ मिळते असं देविमहात्म्यामध्येच उल्लेखिले आहे. ते स्तोत्र असे 


या माया मधुकैटभप्रमथनी या महिषोन्मूलिनि,

या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथनी या रक्तबीजाशनी || 

शक्ति: शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मी: परा,

सा चण्डी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी || १ ||

स्तुता सुरै: पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ||

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: || २ ||

या सांप्रतं चॊद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ||

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: || ३ ||

या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति न: सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभि: || 

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: || ४ ||

सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी || 

एवमेव त्वयाकार्यमस्मद्वैरिविनाशनम् || ५ ||

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ||

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि  नमोऽस्तु ते || ६ ||

सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ||

गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते  || ७ ||

शरणागत दीनार्त परित्राणापरायणे  ||

सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते  || ८ ||

सर्वस्वरूपे सर्वेशे  सर्वशक्तिसमान्विते ||

भयेभ्यास्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते || ९ ||


वरील उपासना करीत असताना खास ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व जीवमात्रांमधील शक्तिची जाणीव ठेवून त्यांच्या मधील देवत्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न सतत ठेवावा. वरील वृत्ती कायम ठेवण्यासाठी सात्विक आहाराची नक्कीच मदत होते.