Friday, October 20, 2023

श्री चंद्रमौळीश्वरर मंदिर

हे मंदिर तंजावूर-कुंभकोणम मार्गावरील पापनाशम गावाजवळ थाळमंगई गावामध्ये वसलेलं आहे. कावेरी नदीची उपनदी कुडमुरुट्टि च्या तीरावर हे मंदिर आहे. १५०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर विविध समूहांमध्ये समाविष्ट आहे. चक्रपळ्ळीच्या आसपास असणाऱ्या सप्तस्थानांपैकी हे एक मंदिर. तसेच सप्त-मंगई ह्या सात मंदिरांच्या समुहामधलं हे एक मंदिर आहे. सप्त-मंगई स्थानं हि सात मंदिरे आहेत जिथे श्री पार्वती देवीने सप्त मातृकांसहित शरद नवरात्रीची पूजा केली. त्या सप्त मातृकांपैकी श्री इंद्राणी ह्या मातृकादेवीशी हे मंदिर निगडित आहे. 


मुलवर (मुख्य देवता): श्री चंद्रमौळीश्वरर

देवी: श्री राजराजेश्वरी  

क्षेत्र वृक्ष: केतकी (तामिळ मध्ये थाळै)  

पवित्र तीर्थ: कावेरी नदी 

पुरातन नाव: थाळमंगई

तालुका: पापनाशम 

जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)


हे मंदिर खूप छोटं मंदिर आहे ज्याला एकच परिक्रमा आहे. इथे बलीपीठ आहे, श्री नंदी आहे. पण इथे ध्वजस्तंभ नाही. श्री राजराजेश्वरी देवीची खूप कमी मंदिरे आहेत. त्यापैकी हे एक आहे. 


मूळ मंदिर कावेरी नदीच्या पुरामध्ये उध्वस्त झालं. चोळा आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 


एके काळी ह्या ठिकाणी केतकीची खूप झाडं होती. केतकीला तामिळ मध्ये थाळै म्हणतात. म्हणून ह्या स्थळाला थाळमंगई किंवा थाळैवन असं नाव आहे. 


क्षेत्र पुराण: 


असा समज आहे कि श्री पार्वती देवी आणि श्री इंद्राणी देवी, सप्त मातृकांपैकी एक, ह्यांनी इथे शरद नवरात्रीच्या सहाव्या दिवशी श्री शिवांची पूजा केली आणि त्यांना श्री शिवांच्या शिरावरील चंद्रकोरीचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला पीराईचंद्र दर्शन असं नाव आहे. तामिळ मध्ये थळै म्हणजे नमणे. श्री इंद्राणी देवी श्री शिवांच्या समोर इथे नमल्या म्हणून ह्या स्थळाला थाळमंगई नाव पडलं असा पण समज आहे. 


अजून एका आख्यायिकेनुसार प्रजापती दक्ष राजाने आपल्या २७ कन्यांचा विवाह श्री चंद्राबरोबर केला. पण ह्या २७ कन्यांमध्ये चंद्र मात्र फक्त रोहिणीशीच जास्त आकर्षित झाला आणि तिच्या बरोबरच जास्तीतजास्त वेळ व्यतीत करत होता. उरलेल्या २६ पत्न्यांनी आपल्या पित्याकडे ह्याची तक्रार केली. तेव्हा राजा दक्षाने चिडून चंद्राला शाप दिला कि त्याच्या तेजाचा प्रत्येक दिवशी क्षय होईल आणि असं करत त्याचं सगळं तेज लोप पावेल. ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी चंद्र आपली पत्नी रोहिणीसह थाळैवनांत आला. आणि इथे त्याने आपल्या पत्नीसह श्री शिवांची तपश्चर्या केली. रोहिणीच्या तपश्चर्येने श्री शिव प्रसन्न झाले. जरी ते पूर्ण शापापासून चंद्राची मुक्ती करू शकले नाहीत तरी त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि प्रत्येक दिवसाकाठी लोप पावून पूर्ण लोप पावलेलं चंद्राचं तेज हे परत प्रत्येक दिवसाकाठी दृश्य होऊन पौर्णिमेला पूर्ण दृश्य होईल. तसेच तेज वाढत असताना तिसऱ्या दिवशीचं चंद्राचं रूप (शुक्ल पक्षातील तृतीयेची चंद्रकोर) त्यांनी आपल्या शिरावर धारण केलं. म्हणूनच इथे श्री शिवांचं नाव श्री चंद्रमौळीश्वरर आहे. 


ह्या ठिकाणी श्री चंद्र आणि त्यांची पत्नी श्री रोहिणी, अगस्त्य ऋषी, चोळा साम्राज्याचा राजराज राजा ह्यांनी श्री शिवांची तपश्चर्या केली. 


जेव्हा राजराज राजाला इथल्या मंदिरामध्ये श्री नंदींच्या मूर्तीची स्थापना करताना अडथळे आले तेव्हा करुवू सिद्ध मुंनींनी राजाला इथे श्री शिवांची चंदनाच्या लेपानी शतभिषा नक्षत्रावर पूजा करण्याचा सल्ला दिला. राजाने त्या सल्ल्यानुसार पूजा केल्यावर ते श्री नंदींच्या मूर्तीची स्थापना निर्विघ्नपणे करू शकले. म्हणूनच इथे असा समज आहे कि जे कोणी शतभिषा नक्षत्रावर श्री शिवांची चंदनाच्या लेपाने पूजा करतील त्यांच्या तीन पिढ्यांना समाधान आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. 


तसेच डोळ्यांच्या समस्यांचं परिहार स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.  


श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचे कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं. 


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment