Sunday, October 15, 2023

श्री चक्रवागीश्वरर मंदिर

१५०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यातील पापनाशम तालुक्यातील अय्यमपेट्टई ह्या गावाजवळ थिरुचक्रपळ्ळी गावात, ज्याला चक्रमंगई असं पण म्हणतात, वसलेलं आहे.

हे विविध मंदिरांच्या समूहांशी निगडीत आहे. पाडंळ पेथ्र स्थळं, म्हणजे अशी स्थळं किंवा मंदिरं जिथे श्रेष्ठ शिव भक्त नायनमारांनी शिव स्तुती गायली, जी एकूण २७६ आहेत, त्यांपैकी एक आहे. चक्रपळ्ळी सप्त स्थानांपैकी पण हे एक स्थान आहे. सप्तमंगई, म्हणजे अशी सात स्थानं जिथे श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांसोबत शरद नवरात्रीची पूजा केली, त्या सात स्थानांपैकी पण एक आहे. ह्या स्थानामध्ये श्री पार्वती देवीने श्री ब्राह्मी देवी (सप्त मातृकांपैकी एक) समवेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री शिवांची पूजा केली. त्यांना श्री शिवांच्या तिसऱ्या नेत्राचं दर्शन झालं. ह्या दर्शनाला शिव-नेत्र-चक्र-दर्शन असे नाव आहे. 


मुलवर (मुख्य देवता): श्री चक्रवागीश्वरर

देवी: श्री देवनायकी

क्षेत्र वृक्ष: बिल्व 

पवित्र तीर्थ: कावेरी नदी, काक तीर्थ

पुरातन नाव: चक्रमंगई, अय्यमपेट्टई

शहर: चक्रपळ्ळी 

जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू)


येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे व ते उंच आणि आकर्षक आहे. ह्या पूर्वाभिमुख मंदिरामध्ये गाभारा पश्चिमेस आहे. 

श्री गणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री दुर्गा देवी आणि श्री मुरुग ह्यांची देवालये (मुर्त्या) आहेत. 

महामंडपामध्ये श्री सूर्य, श्री चंद्र, श्री भैरव आणि नालवर (चार श्रेष्ठ शिव भक्त) ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

ह्या स्थळाला चक्रवागीश्वरर नाव कसं पडलं ह्याबद्दल दोन आख्यायिका आहेत. 

एका आख्यायिकेनुसार श्री विष्णूंनी इथे श्री शिवांची आराधना करून सुदर्शन चक्र प्राप्त केलं म्हणून ह्या स्थळाला चक्रवागीश्वरर असं नाव प्राप्त झालं. 


दुसऱ्या आख्यायिकेनुसार श्री पार्वती देवींनी इथे चक्रवाक पक्ष्याच्या रूपामध्ये श्री शिवांची आराधना केली म्हणून ह्या स्थळाला चक्रवागीश्वरर असं नाव पडलं. 


ह्या स्थळी श्री इंद्रदेव आणि त्यांचा पुत्र जयंत, सप्त मातृका देवी, इतर देव ह्यांनी श्री शिवांची आराधना केली. 


श्री शिवांचे निस्सीम भक्तदांपत्य श्री नादशर्मा आणि श्री अनविद्या ह्यांना येथे श्री आदिपराशक्तीचे कुमारिका रूपात दर्शन प्राप्त झालं.


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment