Sunday, August 25, 2024

सप्त मातृका - श्री वैष्णवी - अरुलमीगु परमकल्याणी समेध अरुलमीगु पशुपतीश्वरर

ह्या ठिकाणी श्री नारायणी (श्री वैष्णवी) म्हणजेच श्री विष्णूंची शक्ती, ह्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेवरून त्यांची आराधना केली. 


श्री नारायणी:

ह्या श्री विष्णूंच्या शक्ती आहेत. श्री अंबिका देवींच्या हातामधून त्या प्रकट झाल्या. त्यांना एक मुख, चार किंवा सहा हात आणि त्यांचा वर्ण पीत आणि निळा आहे. त्यांचे वाहन गरुड आहे. त्या तुलसी माळा परिधान करतात. त्यांच्या ध्वजावर गरुडाचे प्रतीक आहे. त्यांचे नेत्र कमळासमान विशाल आहेत. त्या खूप शक्तिमान आहेत. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र आहेत आणि दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. 


श्री वैष्णवी:

ह्या पण श्री विष्णूंच्या शक्ती आहेत. त्या श्री महालक्ष्मीदेवींमधून प्रकट झाल्या. त्यांना एक मुख आणि चार हात आहेत. त्यांच्या वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र आहेत तर खालचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. 


मुलवर: श्री पशुपतीश्वरर 

देवी: श्री परमकल्याणी

क्षेत्र वृक्ष: बिल्व

स्थळ: पशुपतीश्वरम


क्षेत्र पुराण:

थिरुचेनकट्टकुडी ह्या गावात भगवान शिवांचा शिरुथोंडर नावाचा कट्टर भक्त होता. एकदा भगवान शिवांच्या आज्ञेवरून त्याने स्वतःच्या मुलाला शिजवून भगवान शिवांना नैवेद्य अर्पण केला. त्याच्या मध्ये अशी भावना निर्माण झाली कि तोच एकमेव आहे ज्याने आपल्या मुलाचा भगवान शिवांसाठी त्याग केला आणि त्यामुळे त्याला खुप अहंकार निर्माण झाला. तो जेव्हा कैलासावर भगवान शिवांचे दर्शन घ्यायला गेला त्यावेळी श्री नंदीदेवांनी त्याचा अहंकार जाणून त्याला प्रवेश दिला नाही. श्री नंदीदेवांनी भगवान शिवांना ह्याची माहिती दिली. भगवान शिव शिरुथोंडर धडा शिकवण्यासाठी शक्तिपुरी (करूनकुईल नदन पेट्टई) येथे शैव संताच्या रूपात प्रकट झाले. शिलवती अम्मईयार ह्या भगवान शिवाच्या भक्त कळूक्कनीमुट्टम ह्या गावी राहत होत्या आणि त्या आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सात गावात जाऊन काम करायच्या. ह्या कमाईतून अन्न धान्य विकत घेऊन अन्न तयार करून त्या प्रथम शैव संताला (म्हणजेच शैव संताच्या रूपात आलेल्या भगवान शिवांना) नैवेद्य दाखवायच्या आणि मगच आपल्या पुत्राला त्या जेवायला द्यायच्या. त्यांचा एकमेव पुत्र रोज गाईंना चरायला गावात घेऊन जायचा. एकदा चैत्र महिन्यामध्ये भरणी नक्षत्र दिवस असताना शैव संताच्या रूपात असलेले भगवान शिव शिलवती अम्मईयार ह्यांची भक्ती जगापुढे आणण्यासाठी आणि त्याचबरोबर शिरुथोंडर ह्यांना धडा शिकविण्यासाठी शिलवती अम्मईयार ह्यांचा पुत्र जेथे गाईंना चरायला घेऊन आला होता त्या ठिकाणी आले. त्यांनी आपल्या योगशक्तीने त्या पुत्रामध्ये खूप अन्नाची क्षुधा (भूक) निर्माण केली आणि त्याला घरी जाऊन जेवण करायला सांगितले. ते स्वतः गाईंची काळजी घेतील असे आश्वासन पण दिले. पण त्या मुलाने घरी जाण्यास नकार दिला. त्यावेळी जवळच असलेल्या भगवान विष्णूंच्या मंदिरातून स्वतः भगवान विष्णू म्हणजेच परिमल रंगनाथर त्या मुलाच्या एका ओळखीच्या माणसाच्या रूपात तेथे आले आणि त्यांनी त्या मुलाला आपल्या घरी निःशंक जाण्यासाठी परावृत्त केले. तो मुलगा आपल्या घरी गेला आणि त्याने आई दिसली नाही म्हणून स्वतःच जेवण केले. त्याच्या आईला म्हणजेच शिलवती अम्मईयार ह्यांना भांड्यांचे आवाज ऐकायला आले म्हणून त्यांना कोणीतरी जेवत ह्याची शंका येऊन त्या घरात आल्या आणि भगवान शिवांना नैवेद्य दाखविण्याच्या आधी जेवण घेतल्याबद्दल जवळच असलेल्या लाकडी काठीने आपल्या पुत्राला मारलं ज्यामुळे तो मरण पावला. त्यांनी आपल्या पुत्राचे शरीर लपवले आणि त्या शैव संत येण्याची वाट पाहत बसल्या. जेव्हा शैव संत आले तेव्हा त्या शैव संतांनी म्हणजेच भगवान शिवांनी सांगितलं कि ते त्यांच्या म्हणजेच शिलवती अम्मईयार ह्यांच्या पुत्राबरोबरच भोजन करतील. शिलवती अम्मईयार ह्यांनी सांगितलं कि त्यांचा पुत्र आता येणार नाही. शैव संतांनी शिलवती अम्मईयार ह्यांना त्यांच्या पुत्राला तीन वेळा हाक मारायला सांगितली आणि काय आश्चर्य त्यांचा पुत्र तिथे उपस्थित झाला आणि त्याने शैव संतांबरोबर भोजन केले. त्यानंतर भगवान शिव आपल्या मूळ स्वरूपात आले आणि त्यांनी शिलवती अम्मईयार ह्यांना दर्शन दिले आणि त्यांची भक्ती जगासमोर आणली. आणि त्याच बरोबर शिरुथोंडर ह्यांना जाणीव करून दिली कि भगवान शिवांची भक्ती करण्यासाठी आपल्या पुत्राचा त्याग करणारे ते एकटे नाहीत आणि अशा प्रकारे त्यांना धडा शिकवून त्यांचा अहंकार घालवला. भगवान शिवांनी इथे गाईंची काळजी घेतली म्हणून त्यांचे श्री पशुपतीश्वरर असे नाव प्रसिद्ध झाले. शिलवती अम्मईयार ह्यांच्या विनंतीवरून भगवान शिव आणि श्री पार्वती देवी जवळच असलेल्या आनंदतांडवपुरम मध्ये श्री कैलासनाथर ह्या नावाने स्थित झाले.   


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर तामिळ नाडूमधल्या मयीलादुथुराई जिल्ह्यामध्ये सेंथनकुडी-वल्लाळकरम पुम्पूहार मार्गावर आहे. हे खूप छोटं मंदिर आहे. ह्या मंदिरात एक परिक्रमा आहे. इथली मूर्तींची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथले राजगोपुर तीन स्तरांचे आहे. मुख्य मंदिराच्या गोपुरामध्ये अष्टदिक्पाल, श्री गुरुवायूर अप्पन, श्री आंजनेय, भगवान विष्णू, श्री लक्ष्मी नरसिंह ह्यांच्या मुर्त्या तसेच पूर्वाभिमुख असलेली श्री कालभैरवांची मूर्ती आहे. श्री देवींच्या देवालयाच्या गोपुरामध्ये श्री अंबिका ह्यांच्या निगडित कथांचे देखावे कोरलेले आहेत. श्री वैष्णवी देवींच्या देवालयाच्या गोपुरामध्ये सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत. श्री षण्मुख ह्यांच्या देवालयाच्या गोपुरामध्ये त्यांच्या सहा मंदिरांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. श्री कालभैरवाच्या देवालयाच्या गोपुरामध्ये श्री अष्टभैरव, श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला सिंहावर आरूढ झालेले पंचमुखी श्री गणेश ह्यांची मूर्ती आहे. त्यांचे नाव श्री हेरंब गणपती आहे. उजव्या बाजूला सहसा असलेल्या श्री सुब्रमण्यम ह्यांच्या मूर्तीच्या ऐवजी श्री हनुमानाची भगवान शिवांचे पुत्र म्हणून मूर्ती आहे. ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही पण त्याऐवजी श्री महेश्वर गणपती, श्री ब्रह्म गणपती आणि श्री विष्णू गणपती ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे बलीपीठ आहे. ह्या बलीपीठाला भद्रलिंग, बलीनादर, मायाचक्र अशी तीन नावे आहेत. शिव लिंगासमोर इथे श्री नंदीदेवांची भव्य मूर्ती आहे. कोष्टामध्ये दक्षिणाभिमुखी श्री गणपती, दक्षिणाभिमुखी श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री कोष्ठ अर्धनारीश्वरर, पाश्चिमाभिमुखी श्री लिंगोद्भवर, उत्तराभिमुखी श्री ब्रह्मदेव, उत्तराभिमुखी श्री विष्णुदूर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत.


ह्याशिवाय इथे श्री द्वापारयुग गणपतींची मूर्ती पण आहे. विनायक पुराणानुसार प्रत्येक युगामध्ये श्री गणपतींचं वाहन वेगळं असतं. कलियुगामध्ये त्यांचं वाहन अश्व आहे, कृतयुगामध्ये त्यांचं वाहन सिंह होतं, त्रेतायुगामध्ये मोर तर द्वापारयुगामध्ये त्यांचं वाहन मुशिक होतं. 


इथे श्री अरुणाचलेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. असा समज आहे कि पौर्णिमेला केलेली त्यांची आराधना खूप हितकारक असते. श्री सुब्रमण्यम ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत स्वतंत्र देवालय आहे. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असे आहे कि सहसा त्यांच्या पत्नी बाजूला असतात पण ह्या मूर्तीमध्ये त्या त्यांच्या समोर आहेत. 


श्री वैष्णवी देवींचे स्वतंत्र देवालय आहे. श्री वैष्णवी देवी श्री अंबिका देवींच्या हातामधून प्रकट झाल्या. त्या भगवान विष्णूंच्या शक्तिरूप आहेत. त्या नीलवर्ण आहेत. त्यांच्यासाठी विशेष नैवेद्य म्हणजे चित्रान्न (इंग्लिश मध्ये लेमन राईस). त्या श्री क्रोधन भैरव ह्यांच्यापण शक्ती आहेत. त्यांचे वाहन गरुड आहे. बुधवारी आणि शुक्रवारी तुलसी मालाने त्यांची आराधना केल्यास ती खूप हितकारक असते. 


श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांचे देवालय:

श्री सूर्य हे श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांचे नवग्रह आहेत. जी वरदाने श्री सूर्यांची आराधना करून मिळतात तीच वरदाने श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांची आराधना करून पण मिळतात. श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांच्या पत्नी म्हणजे श्री भैरवी. पुराणांनुसार श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव हे भगवान शिवांचे प्रतिबिंब मानले जातात. श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्याचा अर्थ ते कोणालाही सहजरित्या आकर्षित करतात. ते रक्तवर्ण आहेत. त्यांचे मुख पूर्ण उमललेल्या कमळासारखे आहे. त्यांच्या जटा स्वर्णवर्ण आहेत आणि त्यांच्या शिरावर चंद्रकोर आहे. त्यांच्या हातांमध्ये कमळ, अमृत कलश, मण्यांनी मढवलेला शंख, अभय मुद्रा, वरद मुद्रा, चषक ज्यातून वितळलेलं स्वर्ण खाली पडत आहे आणि एका हाताने त्यांनी श्री आदिशक्तींना धरलेलं आहे. त्यांच्या बाजूला श्री अंबिका आहेत ज्या वरदान देत आहेत आणि त्यांचे नाव श्री महास्वर्णआकर्षणभैरवी आहे. त्यांच्या एका हातात स्वर्णचषक आहे तर बाकीचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची आराधना उत्तराभिमुख राहून केल्यास ती हितकारक असते. त्यांची आराधना आर्द्र नक्षत्र असताना केल्यास भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. त्यांची आराधना कमळ आणि तुलसी माळेनी केल्यास ती सर्वात हितकारक असते. त्यांचा नैवद्य - गूळ मिसळून केलेली खीर, उडीद वडा, दूध, मध आणि फळे. 


श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा करण्याच्या पद्धती:

श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा करताना शक्यतो पश्चिमाभिमुख बसावं. 

१. कृष्णाष्टमीच्या दिवशी पूजा करताना त्यांना लाल वस्त्र परिधान करावं, तुपाचा दिवा लावावा, त्यानां उडीद वड्यांची माला परिधान करावी आणि लाल फुलांनी अर्चना करावी. तुपाचा दिवा पांढऱ्या भोपळ्यावर लावल्यास तो जास्त हितकारक असतो. 

२. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा रविवारी राहू काळामध्ये पण करतात. ह्या पूजेमध्ये ११ तुपाचे दिवे लावतात, रुद्राभिषेक करतात, श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांना उडीद वड्यांची मला अर्पण करतात आणि सहस्रार्चना अर्पण करतात. अशा पद्धतीने पूजा केल्यास विवाहातल्या अडचणींचा परिहार होतो असा समज आहे. ३. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास विविध फळे प्राप्त होतात जसे - शत्रूंवर मात करता येते, अष्ट-महा-ऐश्वर्यांची प्राप्ती होते, धनप्राप्ती होते, उद्योग/व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच व्यावसायिक कर्म करण्याच्या ठिकाणी सर्व अडचणींचा परिहार होतो. 

४. भैरव गायत्री आणि भैरवी गायत्री ह्यांच्या पठणाने भरपूर धनप्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत. 

५. सोमवारी आणि शुक्रवारी सूर्यास्ताच्या वेळी भैरव अष्टक आणि भैरवी अष्टक पठण करावं

६. भक्तजन श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची ९ पौर्णिमांना पूजा करतात. प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी ७ वाजता तुपाचा दिवा लावून भैरव अष्टकाचे १८ वेळा पठण केल्यास दारिद्र्य हरण होते. नवव्या पौर्णिमेला पोह्याची खीर अर्पण करण्याची पद्धत आहे.

७. कार्तिक ह्या तामिळ महिन्याची कृष्णाष्टमी हि श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. 

८. प्रत्येक महिन्याची कृष्णाष्टमी पण भैरव अष्टमी म्हणून साजरी केली जाते. 

९. असा समज आहे कि श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची ३० दिवस प्रामाणिक पणे पूजा केल्यास धर्माला अनुसरून असणाऱ्या सर्व इच्छांची पूर्ती होते.


श्री क्रोधन भैरव ह्यांचे देवालय:

अष्टभैरवांमधले हे चतुर्थ भैरव आहेत. शनी हे त्यांचे नवग्रह आहेत. श्री वैष्णवी देवी ह्या त्यांच्या शक्ती आहेत. त्यांचे वाहन गरुड आहे आणि त्यांचे मुख नैऋत्य दिशेला आहे. त्यांची पूजा केल्याने शनी दोषांचा परिहार होतो.


श्री क्रोधन भैरव ह्यांची पूजा करण्याच्या पद्धती:

एका केळ्याच्या पानावर तांदूळ पसरावेत. तुटलेल्या नारळाचे काही तुकडे ठेवावेत आणि त्यांमध्ये तुपाचा दिवा लावावा. 


ज्यांनी मांसाहार आणि मद्याचे सेवन केले आहे त्यांना श्री क्रोधन भैरव ह्यांचे दर्शन घेण्याची परवानगी नाही.  


श्री क्रोधन भैरव ह्यांच्या गायत्री मंत्राचा ९ च्या पटीच्या संख्येमध्ये जप केल्यास सर्व अडचणींचा परिहार होऊन ऐश्वर्यप्राप्ती होते असा समज आहे.


विशेष माहिती:

१. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांचे नवग्रह श्री सूर्य आहेत आहेत तर श्री क्रोधन भैरव ह्यांचे नवग्रह श्री शनैश्वर आहेत. ह्याशिवाय ईशान्य दिशेला हे नवग्रह त्यांच्या वाहनांसमवेत आहेत हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. येथे नवग्रहांची पूजा केल्यास नवग्रह दोषांचा परिहार होतो.

२. कळूकन्नीमुट्टम नावाचे अजून एक स्थळ आहे जिथे श्री वैष्णवी देवींनी भगवान शिवांची पूजा केली. तसेच श्री वैष्णवी देवींनी नवरात्रीमध्ये श्री पार्वती देवींसमवेत पापनाशम-अय्यमपेट्टई मार्गावरील श्री जम्बुकेश्वरर ह्या मंदिरामध्ये भगवान शिवाची पूजा केली. ह्या स्थळाला नंदीमंगई असे पण नाव आहे. (ह्या मंदिराची माहिती इंग्लिश मध्ये आधीच प्रकाशित केली आहे - Nandi Mangai - October 2 2019. ह्याची मराठीमध्ये माहिती आम्ही पुढील काही महिन्यांमध्ये प्रकाशित करू). 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेला भगवान शिवांवर अभिषेक, श्री हनुमान जयंतीला श्री हनुमानांवर अभिषेक. ह्या अभिषेकाला रुद्रवीरसमुधन असं म्हणतात. 

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): थिरुवोनं. मराठीतल्या श्रवण नक्षत्रावर भगवान शिवांवर अभिषेक

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कृष्णाष्टमीला भैरवांवर अभिषेक

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): भगवान शिव आणि श्री पार्वती देवींवर अभिषेक, वैकुंठ एकादशी

थै (जानेवारी-फेब्रुवारी): शुक्रवारी श्री अरुणाचलेश्वरर, श्री अर्धनारीश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री लक्ष्मी देवी, श्री वैष्णवी देवी ह्यांच्यावर अभिषेक

मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव, महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): श्री परमकल्याणी ह्यांच्यावर अभिषेक


ह्याशिवाय प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोषकाळी पूजा, संकटहर चतुर्थीला संध्याकाळी ५ वाजता विशेष पूजा, प्रत्येक कृष्णाष्टमीला श्री भैरवांवर अभिषेक, प्रत्येक अमावास्येला श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्यावर अभिषेक, प्रत्येक शुक्रवारी श्री विष्णू दुर्गा देवी ह्यांच्यावर अभिषेक



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment