थिरुनीलकुडी ह्या स्थळाशी संबंधित असलेल्या सप्त स्थानांपैकी हे एक मंदिर आहे. कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणमपासून १५ किलोमीटर्स वर तर आडूथुराई-थिरुवारुर मार्गावर आडूथुराईपासून ३ किलोमीटर्स वर हे मंदिर स्थित आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. वर्तमान मंदिर हे चोळा राजांनी बांधलं आणि कालांतराने इतर राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मूळ मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या स्थळाला पंचबिल्व क्षेत्र असं पण म्हणतात.
मूलवर: श्री नीळकंठेश्वरर, श्री मनोक्कीयानाथर स्वामी, श्री बिल्वारण्येश्वरर, श्री जांबनायकर, श्री कामधेनुपूरीश्वरर
देवी: श्री थवक्कोल अंबिका, श्री भक्ताभीष्टप्रदायिनी, श्री अळगाम्बिका, श्री अनुपमस्थानी
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, देवी तीर्थ, क्षीर तीर्थ, भारद्वाज तीर्थ, मार्कंडेय तीर्थ
क्षेत्र वृक्ष: पंच दळे असलेल्या बिल्व पत्रांचे वृक्ष, फणस, पंचलिंग
पुराणिक नाव: थेननालकुडी, थेननीलकुडी
क्षेत्र पुराण:
१. समुद्र मंथनसमयी जेव्हां विष उत्पन्न झालं तेव्हां भगवान शिवांनी ते प्यायलं. त्याच वेळी श्री पार्वती देवींनी भगवान शिवांच्या कंठाशी ते विष थांबवून ठेवलं जेणेकरून ते पोटात जाऊ नये म्हणून. भगवान शिवांचा कंठ विषामुळे निळा झाला. म्हणून इथे भगवान शिवांना श्री नीळकंठेश्वरर असं म्हणतात आणि ह्या स्थळाला थिरुनीलकुडी असं म्हणतात. भगवान शिवांना विषामुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळावा म्हणून श्री पार्वती देवींनी त्यांच्या कंठाला तिळाचं (जिंजेली) तेलाचा लेप लावला. म्हणून इथे शिव लिंगावर तिळाच्या तेलाचा अभिषेक केला जातो.
२. चिरंजीवपद प्राप्त करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी इथे भगवान शिवांची त्यांची पालखी वाहून पूजा केली. त्यांना ह्या मंदिरामध्ये चिरंजीव पद प्राप्त झालं.
३. अप्पर ह्यांनी रचलेल्या स्तोत्रामध्ये अप्पर ह्यांच्याबद्दलच्या एका घटनेचा उल्लेख आहे. एकदा अप्पर ह्यांना काही जणांनी त्यांना ग्रॅनाईट स्लॅबला बांधून समुद्रात फेकून दिलं. अप्पर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांना त्यांची स्तोत्रे म्हणून प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना पाण्यावर तरंगत ठेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर आणून सोडले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्म, श्री पार्वती देवी, श्री कात्यायनी देवी, श्री वरुण, वसिष्ठ ऋषी, रोमेश ऋषी, भारद्वाज ऋषी, मार्कंडेय ऋषी, दुर्वास ऋषी, स्वर्गीय गाय कामधेनू, पांडव आणि देवकन्या.
वैशिष्ट्ये:
१. इथले क्षेत्र वृक्ष विशेष आहे. बिल्व वृक्षाला सहसा तीन दळाची पाने असतात. पण इथे पांच दळाची पाने आहेत. म्हणून ह्या स्थळाला पंचबिल्वारण्य क्षेत्र असं म्हणतात.
२. इथल्या शिव लिंगाला तेलाचा अभिषेक केल्यावर ते लिंग सर्व तेल शोषून घेतं.
३. इथल्या परिक्रमेमधील फणसाचे झाड हे खूप शुभ आहे. इथल्या ऐकीव गोष्टींनुसार ह्या झाडाचे फळ भगवान शिवांना नैवेद्य म्हणून अर्पण केल्याशिवाय कोणी घेऊन जाऊ शकत नाही. तसे केल्यास ते फळ खराब होते.
४. इथे परिक्रमेमध्ये एक चित्र आहे ज्यामध्ये श्री पार्वती देवी शिव लिंगावर तेलाचा अभिषेक करत आहेत.
५. इथे परिक्रमेमध्ये एक दगड, खळ आणि मुसळ बघायला मिळते. असा समज आहे की पूर्वी तिळाची (जिंजेली) बीजे खळायला हे वापरले जायचे.
६. इथला गाभारा अर्धवर्तुळाकार खंदकाच्या आकाराचा आहे.
७. जे योगमार्गाचे अनुसरण करतात त्यांच्यामते थिरुनीलकुडीला मूलाधार स्थळ समजलं जातं. कुंडलिनी जागृत करण्याच्या प्रक्रियेमध्ये मूलाधारापासून सुरुवात केली जाते.
८. मार्कंडेय ऋषींनी श्री नीळकंठेश्वरर ह्यांची पालखी वाहून त्यांची पूजा केली आणि चिरंजीव पद प्राप्त केलं. भगवान शिवांच्या आदरार्थ मार्कंडेय ऋषींनी थिरुनीलकुडीच्या आसपासच्या सात मंदिरांमध्ये, ज्यांना सप्त स्थानं म्हणतात, तिथे भेट देऊन पूजा केली. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ चित्राई महिन्याच्या वार्षिक महोत्सवात भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि मार्कंडेय ऋषी ह्यांच्या रथयात्रा निघून ती बाकीच्या सहा मंदिरांना भेट देते.
९. ब्रह्मदेवांना उर्वशी ह्या अप्सरेबरोबरच्या संबंधामुळे शाप मिळाला होता. त्या शापाचे निरसन इथे पूजा करून झाले.
१०. स्वर्गीय गाय कामधेनू हिला पण शाप मिळाला होता. त्या शापाचे निरसन इथे पूजा केल्यावर झाले.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून ह्याला एक स्तरीय राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. जसे आपण मंदिरात प्रवेश करतो तसे आपल्याला ध्वजस्तंभ, बलीपिठ आणि नंदि ह्यांचे दर्शन होते. गाभाऱ्याच्या प्रवेशावर एक सुंदर कमान आहे. इथले शिव लिंग स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. शिव लिंग दोन फूट उंच असून त्याचा पृष्ठभाग खडबडीत असून चौकोनी आहे. रोज इथे शिवलिंगावर तेलाचा अभिषेक केला जातो आणि विशेष म्हणजे शिव लिंग हे सगळं तेल शोषून घेतं. जरी शिव लिंग खडबडीत असलं तरी ते कधी ओलं रहात नाही. गाभारा खंदकाच्या आकाराचा आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी. श्री चंडिकेश्वर आणि श्री चंडिकेश्वरी देवी हे त्यांच्या नेहमीच्या जागी एका स्वतंत्र देवलयामध्ये आहेत. इथे श्री पार्वती देवींची दोन स्वतंत्र देवालये आहेत. एका देवालयामध्ये श्री थवक्कोला अंबिका / श्री तपस पार्वती / श्री भक्ताभीष्ट प्रदायिनी ह्यांची मूर्ती आहे तर दुसऱ्या देवालयामध्ये श्री अळगाम्बिका / श्री अनुपमास्थानी / श्री ओप्पीलामूलयाल ह्यांची मूर्ती आहे. पहिल्या देवालयात श्री थवक्कोला अंबिका ह्यांना तपश्चर्या करताना चित्रित केले आहे. पुराणानुसार त्यांनी इथे भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी म्हणून तपश्चर्या केली. हि मूर्ती चार फूट उंच आहे. दुसऱ्या देवालयामध्ये श्री अनुपमास्थानी देवींची चार फूट उंच मूर्ती आहे. पुराणानुसार त्यांनी भगवान शिवांची शुश्रूषा करून त्यांना पूर्ववत केलं.
मुक्तीमंडप नावाच्या मंडपामध्ये श्री ब्रह्मदेवांनी पुजीलेलं शिव लिंग आहे.
परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: मार्कंडेय ऋषींनी पुजीलेलं शिव लिंग, नवग्रह देवालय जिथे सर्व ग्रह सुर्याभिमुख आहेत, श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री कन्नीमूल गणपती (आग्नेय दिशेला असलेले गणपती), श्री शनीश्वरर, श्री बालसुब्रमण्य, श्री नीलकंठ नायनार, श्री काशीविश्वनाथ आणि श्री विशालाक्षी देवी, श्री सरस्वती देवी, श्री महालक्ष्मी देवी, श्री नर्थनविनायकर, शैव संत नालवर, मार्कंडेय ऋषी, श्री सूर्य आणि श्री भैरव.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे मृत्यूचे भय घालविण्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी भगवान शिवांवर तेलाचा अभिषेक करतात.
२. हे राहू परिहार स्थळ आहे. इथे भाविक जन राहू ग्रहाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान शिवांची पूजा करतात. अभिषेक झाल्यावर अभिषेक केलेल्या तेलामधून थोडंसं तेल भक्षण करतात. असा समज आहे की त्यामुळे दीर्घकालीन रोगांपासून मुक्ती मिळते.
पूजा:
नियमित प्रदोष पूजा, तामिळ आणि इंग्लिश नववर्ष दिवशी आणि दिवाळीला विशेष अभिषेक केला जातो. प्रत्येक सोमवारी चार विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १८ दिवसांचा ब्रह्मोत्सव. हा उत्सव मार्कंडेय ऋषींनी चालू केला. भगवान शिवांची रथयात्रा थिरुनीलकुडीच्या आसपासच्या १८ गावातून फिरते आणि शेवटी एलनथुराई इथे समाप्त होते.
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर -जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, संध्याकाळी ५ ते ८
मंदिराचा पत्ता: श्री नीलकंठेश्वरर मंदिर, ऍट पोस्ट थिरुनीलकुडी, थिरुविडाईमरुथुर तालुका, तामीळनाडू ६२११०८
दूरध्वनी: +९१-४३५२४६०६६०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment