Sunday, August 4, 2024

थिरुक्कडयूर येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे आठवं मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींना मृत्यूपासून वाचविण्यासाठी भगवान शिवांनी श्री यमदेवांचा वध केला त्या घटनेशी हे मंदिर निगडित आहे. 

मंदिराचे नाव श्री अमृतघटेश्वरर आहे. मयीलादुथुराई पासून साधारण ३२ किलोमीटर्स वर मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर थिरुक्कडैयुर ह्या गावात हे मंदिर स्थित आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांमधलं पण एक स्थळ आहे. श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी इथे भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे शक्ती पीठांपैकी पण एक पीठ आहे. 

मुलवर: श्री अमृतघटेश्वरर 

देवी: श्री अभिरामी अम्मन

क्षेत्र वृक्ष: बिल्व, गुलाबी चमेली (पिंजलम किंवा तमिळ मध्ये जथी मल्ली)

पवित्र तीर्थ: अमृत पुष्करिणी, गंगा तीर्थ, शिव गंगा तीर्थ, मार्कंडेय तीर्थ आणि कला तीर्थ

पुराणिक नाव: थिरुक्कडैयुर, बिल्ववनं, पिंजलवनं

वर्तमान नाव: थिरुक्कडैयुर

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

एकदा ज्ञानोपदेश मिळविण्यासाठी श्री ब्रह्मदेव भगवान शिवांकडे गेले. तेव्हां भगवान शिवांनी त्यांना काही बिल्वझाडाची बीजे दिली आणि सांगितलं कि ज्या ठिकाणी हि बीजे पेरल्यावर एक प्रहरामध्ये ती उगवतील त्या ठिकाणी ते उपदेश देतील. जेव्हा श्री ब्रह्मदेव इथे आले आणि त्यांनी बीजे पेरली त्यावेळी एक प्रहरामध्ये तिथे बिल्वाचे झाड उगवले. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना इथे ज्ञानोपदेश दिला. ह्या जागेला बिल्ववनम म्हणतात आणि येथील शिव लिंगाला बिल्ववननादर असं म्हणतात. 


अजून एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस भगवान शिवांनी देवांना अमृत कलश दिला. देव अमृत प्राशन करण्याच्या आधी श्री गणेशांचं स्मरण करण्यास विसरले. श्री गणेशांनी तो अमृत कलश देवांकडून घेतला आणि ह्या जागी तो लपवून ठेवला. तो अमृत कलश बराच खोलवर गेला जिथून तो काढता आला नाही. कालांतराने त्या अमृत कलशाचे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले ज्याचे नाव श्री अमृतघटेश्वरर असे प्रसिद्ध झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार मृकण्डु ऋषी आणि त्यांची पत्नी मरुद्मति ह्यांना तपश्चर्येनंतर पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव त्यांनी मार्कंडेय असे ठेवले. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला होता कि त्यांना ज्ञानी पुत्र होईल पण तो १६ वर्षेच जगेल. जेव्हां मार्कंडेयांना आपल्या प्रारब्धाचं ज्ञान झालं ते शैव स्थळांच्या तीर्थयात्रेला गेले. ते ह्या स्थळी आले जे त्यांच्या यात्रेतलं शेवटचं म्हणजेच एकशे आठाव्व स्थळ होतं आणि त्याच दिवशी त्यांच्या आयुष्याची १६ वर्षे पूर्ण झाली होती. ते जेव्हा भगवान शिवांची पूजा करत होते तेव्हा श्री यमदेव त्यांना नेण्यासाठी आले. तेव्हा मार्कंडेयांनी शिव लिंगाला आलिंगन देऊन त्याला घट्ट धरून ठेवले. जेव्हां श्री यमदेवांनी त्यांचा पाश मार्कंडेयांवर फेकला तेव्हा त्याने शिव लिंग पण आच्छादलं गेलं. भगवान शिव लिंगातून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने श्री यमदेवांचा वध केला. त्यांनी मार्कडेयांना दीर्घायुष्याचे वरदान दिलं. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री मृत्युंजय मूर्ती तसेच श्री कालसंहार मूर्ती असे आहे. 


श्री यमदेवांचा संहार झाल्यामुळे पृथ्वीवर कोणी मृत्यू पावणं बंद झालं. श्री भूदेवींनी ह्याबद्दल भगवान शिवांकडे समस्या बोलून दाखवली आणि श्री यमदेवांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी श्री भूदेवींच्या विनंतीला मान देऊन श्री यमदेवांना पुनर्जीवित केलं. जेव्हां आपण भगवान शिवांचं श्री यमदेवांशिवाय दर्शन घेतो तेव्हां त्या दर्शनाला संहार दर्शन असं म्हणतात तर जेव्हा श्री यमदेवांसमवेत दर्शन घेतो त्या दर्शनाला जीवित दर्शन असं म्हणतात (तामिळ मध्ये उईरपीठ). 


अजून एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंना समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत प्राशन करण्याआधी भगवान शिवांची पूजा करायची इच्छा होती. पूजा करण्याच्या वेळेस आपले अलंकार काढून ठेवावेत अशी प्रथा आहे. त्या प्रमाणे भगवान विष्णूंनी आपले अलंकार काढून ठेवले. त्या अलंकारांतून श्री अंबिका देवी श्री अभिरामी देवींच्या रूपात प्रकट झाल्या. असा समज आहे कि भगवान विष्णूंच्या अलंकारांमध्ये श्री महालक्ष्मी निवास करतात. श्री अंबिका देवी भगवान विष्णूंच्या अलंकारांमधून प्रकट झाल्या म्हणून इथे भगवान विष्णू श्री अंबिका देवींचे पिता म्हणून पुजले जातात.


अजून एका आख्यायिकेनुसार सुब्रमण्यम नावाचा श्री अभिराम देवीचा भक्त होता. एकदा तो श्री अभिराम देवींच्या पूजेमध्ये मग्न असताना त्याने तो दिवस अमावास्येच्या ऐवजी पौर्णिमा आहे असे उच्चारण केले. तंजावूरचे राजे सरभोजी महाराज ह्यांना ह्याचा खूप राग आला. त्यांनी सुब्रमण्यमला आव्हान केलं कि त्याने तो दिवस पौर्णिमा आहे असे सिद्ध करावं नाहीतर मृत्यूला सामोरं जावं. सुब्रमण्यम, ज्याला अभिरामभट्टर असे पण म्हणायचे, त्याने अभिराम अंतादी हे स्तोत्र म्हणायला चालू केलं. ह्या स्तोत्रामध्ये एका श्लोकाच्या अंतिम अक्षराने पुढील श्लोकाची सुरुवात होते. सुब्रमण्यम जेव्हा ह्या १०० श्लोकांच्या स्तोत्रातील ७९वा श्लोक म्हणत होते त्यावेळी श्री अभिराम देवीने आपल्या कानातील कुंडल आकाशामध्ये फेकले ज्याच्या प्रकाशामुळे तो दिवस पौणिमा भासू लागला. थै ह्या तामिळ महिन्यातल्या ह्या अमावास्येच्या दिवशी इथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. 


क्षेत्राचे महत्व:

१) पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या अश्विनी नक्षत्र दिवशी जवळच असलेल्या श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्या मायनं मंदिरातल्या तीर्थामध्ये गंगा देवी प्रकट होते. हा दिवस सोडून बाकीच्या दिवशी ह्या तीर्थातले पाणी येथील शिवलिंगावर अभिषेक करण्यास वापरले जाते. पण ह्या दिवशी सर्व भाविक जनांना ह्या तीर्थामध्ये स्नान करण्याची परवानगी दिली जाते.

२) जर भगवान शिवांची पिंजलवनामधल्या एका पुष्पाने पूजा केली तर १००८ वेळा पूजा केल्याचे फळ मिळते.

३) पुराणानुसार इथे श्री पापकारेश्वर ह्यांची पूजा प्रथम केली जाते आणि मग श्री पुण्यकारेश्वरर ह्यांची पूजा होते. जेणेकरून सर्वे पापे प्रथम धुतली जातात आणि पुण्य प्राप्त होते.

४) ६३ नायनमारांपैकी करी नायनार आणि कुंगीला कलय नायनार ह्यांनी इथे वास्तव्य केलं आणि शेवटी मुक्ती प्राप्त केली. 

५) श्री सुब्रमण्यम ह्यांनी अभिराम अंतादी स्तोत्र रचलं म्हणून त्यांना श्री अभिराम भट्टर असं नाव प्राप्त झालं. त्यांनी पण इथे वास्तव्य केलं. 


मंदिराबद्दल माहिती:

ह्या पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिरामध्ये पांच प्रकारम, पांच परिक्रमा आणि सात स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. इथे जवळ जवळ ५४ शिलालेख आहेत ज्यावर चोळा, पांड्य आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत. येथील क्षेत्र वृक्ष पिंजलं हे २००० वर्षे जुनं आहे. त्याला वर्षभर फुले येतात आणि ह्या वृक्षाची फुले फक्त भगवान शिवांच्या पूजेसाठीच वापरली जातात. हे वृक्ष आतल्या परिक्रमेमध्ये आहे.


मंदिरातील इतर देवता आणि देवालये:

बाहेरील परिक्रमेमध्ये श्री नंदिदेवांच्या उजव्या बाजूला श्री गणेशांचे देवालय आहे. श्री गणेशांचे नाव श्री कल्लवरण विनायक असे आहे. जशी श्री मुरुगन ह्यांची सहा स्थळे आहेत तशीच श्री विनायकांची पण सहा स्थळे आहेत. हे स्थळ त्या सहा स्थळांपैकी तिसरं स्थळ आहे. श्री गणेश हे आपल्या सोंडेमध्ये अमृत कलश नेत आहेत अशी मूर्ती आहे. ह्या मंदिरामधल्या उत्सवमूर्तीचे नाव श्री काल संहारमूर्ती असे आहे. परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवींचे देवालय आहे. त्यांच्या मांडीवर श्री मुरुगन बसले आहेत अशी मूर्ती आहे. श्री पार्वती देवींचे इथे श्री गुहांबिका असे नाव आहे.


ह्या शिवाय श्री गणेशांची अजून एक मूर्ती, श्री मुरुगन ह्यांची त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसमवेत मूर्ती, तसेच श्री सोमस्कंद आणि श्री शिवगामी देवींसमवेत श्री नटराजांची मूर्ती पण आहे. परिक्रमेमध्ये श्री महालक्ष्मी देवी, श्री बिल्ववनेश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री अर्धनारीश्वरर, श्री भैरवर ह्यांच्या मुर्त्या आणि कोष्ठ मुर्त्या आहेत. ह्या मंदिरामध्ये नवग्रह संनिधी नाही. परिक्रमेमध्ये ह्या शिवाय श्री अगस्त्य मुनींनी पूजिलेली श्री पापकारेश्वरर मूर्ती आहे. तसेच श्री पुलस्ती ऋषींनी पूजिलेली श्री पुण्यवरदानर ही मूर्ती आहे. 


गाभाऱ्याच्या आतील बाजूस उजवीकडे यंत्र आहे. त्या यंत्राचे नाव थिरुकडीयुर रहस्य असे आहे. असा समज किंवा प्रथा आहे कि प्रथम श्री पापकारेश्वरर ह्यांचं दर्शन घ्यायचं मग भगवान शिव आणि शेवटी यंत्र. असं केल्याने आयुष्य वृद्धी होते. श्री कालसंहार मूर्तीच्या समोर श्री यमदेवांची विनम्र मुद्रेतील मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांचे वाहन पण आहे. 


इथे श्री कालसंहार म्हणजेच भगवान शिव ज्यांनी श्री मार्कंडेय ऋषींचे श्री यमदेवांपासून रक्षण केले त्यांची भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा डावा पाय श्री आदिशेषांवर आहे, त्यांचे त्रिशूल हे श्री यमदेवांच्या दिशेने आहे आणि दुसऱ्या पायाखाली श्री यमदेव आहेत. ह्या मूर्तीच्या बाजूला भूत गण आहेत जे श्री यमदेवांना खेचत आहेत. भगवान शिवांच्या पायाखालची श्री यमदेवांची मूर्ती ही सहसा लोखंडी पट्टीने झाकलेली असते जी फक्त पूजेच्या समयी काढली जाते. श्री पार्वती देवी ह्या श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवींच्या समवेत लहान मुलीच्या रूपात आहेत. त्यांचे इथे श्री बालांबिका असे नाव आहे. येथील शिवलिंगावर एक व्रण आहे जो फक्त अभिषेकाच्या समयीच दिसतो. हा व्रण जेव्हा लिंगाला आलिंगन देऊन पकडून ठेवलेल्या मार्कंडेय ऋषींना नेण्यासाठी जेव्हा श्री यमदेवांनी त्यांचा पाश फेकला त्यावेळी उमटला आहे असा समज आहे.         


वैशिष्ट्ये:


१) जेव्हां आपण इथल्या शिवलिंगाकडे निरखून बघतो त्यावेळी त्याच्या मागे अजून एक लिंग दिसतं. 

२) मार्कंडेय ऋषींनी स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यासाठी शैव स्थळांची तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेतील हे शेवटचं म्हणजे १०८व स्थळ आहे. 

३) असा समज आहे की बऱ्याच सिद्ध मुनींचं ह्या स्थळा जवळ वास्तव्य होतं उदाहरणार्थ पम्बट्टी सिद्धर.


मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री यमदेव, श्री दुर्गा देवी, श्री वासुकी, श्री अगस्त्य मुनी, श्री पुलस्ती मुनी, श्री मार्कंडेय ऋषी, सप्त मातृका आणि शैव संत श्री अप्पर आणि श्री संबंधर.


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): माघ नक्षत्र उत्सव, १८ दिवसांचा यमसंहार उत्सव. ह्यातील सहाव्या दिवशी श्री कालसंहार मूर्तीची मिरवणूक निघते.

आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरं

पूरत्तासी ( सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम. दर सोमवारी १००८ शंखांचा शंखाभिषेक, पौर्णिमेला प्रदोष पूजा

थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावास्येला पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं


तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्ष दिनी विशेष पूजा केली जाते. भाविक जन इथे साठाव्वा वाढदिवस म्हणजेच षष्ट्यपूर्ती, सत्तराव्वा वाढदिवस म्हणजेच भीमरथी शांती, ऐंशीव्वा वाढदिवस म्हणजेच शताभिषेक शांती तसेच नव्वदाव्वा वाढदिवस म्हणजेच कनकभिषेक साजरे करतात. तसेच जन्मनक्षत्र शांती आणि अडचणींवर मात करण्यासाठी आयुष्य होम आणि महामृत्युंजय होम करतात. ह्या शिवाय इथे अपत्य प्राप्ती आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी पण पूजा केली जाते.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment