Saturday, August 17, 2024

सप्त मातृका - श्री ब्राह्मी - श्री थानतोंड्रीश्वरर

हे मंदिर मयीलादुथुराई-निडूर मार्गावर आहे. पुराणांनुसार ह्या स्थळी सप्त मातृकांमधल्या श्री ब्राह्मी देवींनी भगवान शिवांची आराधना केली. 

श्री ब्राह्मी देवी ह्या श्री ब्रह्मदेवांच्या शक्ती रुप आहेत. पौराणिक कथेनुसार त्या श्री अंबिका देवींच्या मुखातून प्रकट झाल्या. त्यांचे नेत्र आणि बाहू विशाल आहेत आणि त्या स्वर्णवर्ण आहेत. त्यांना चार मुखे आणि चार हात आहेत. त्यांच्या दोन हातांमध्ये कमंडलू आणि अक्षमाला आहेत तर उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांनी जटामुकुट परिधान केले आहे. त्यांच्या ध्वजामध्ये हंसाचे प्रतीक आहे. त्या पद्मासनात बसल्या आहेत.

त्या श्री ब्रह्मदेवांच्या शक्ती असल्या कारणाने त्या सृष्टीनिर्माणकारक आहेत. त्यांनी स्फटिकाचा हार परिधान केला आहे. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केले आहे आणि हंस ह्या आपल्या वाहनावर त्या आरूढ झाल्या आहेत. त्या कला आणि विद्या ह्यांच्या अधिष्ठान देवता असल्या कारणाने त्यांची आराधना करणाऱ्यांना त्या कला आणि विद्या प्राप्तीचे वरदान देतात आणि तसेच अपत्यप्राप्तीचे पण वरदान देतात. 

मुलवर: श्री थानतोंड्रीश्वरर (तामिळ मध्ये थान म्हणजे स्वतःहून, तोंड्री म्हणजे प्रकट होणे, थानतोंड्रीश्वरर म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले भगवान शिव)

देवी: श्री ओप्पीला नायकी

स्थळ: थिरुइण्डलुर, पल्लवरयण पेट्टई, मयीलादुथुराई जिल्हा, तामिळनाडू

हे माड कोविल शैलीचे मंदिर आहे. माड कोविल शैलींच्या मंदिराची रचना अशा प्रकारे असते कि त्यामध्ये हत्ती प्रवेश करू शकत नाहीत. चोळा साम्राज्यातल्या चेनकन्नोत्तयन ह्या राजाने ह्या शैलीची ७० मंदिरे बांधली त्यातील हे एक आहे. चेनकन्नोत्तयन ६३ नायनमारांपैकी एक आहेत.

पश्चिमाभिमुख असलेलं हे मंदिर खूप जुनं आहे आणि विस्कळीत स्थितीमध्ये आहे. ह्या जागेवर सध्या खटला चालू आहे. सध्या इथे फक्त दैनंदिन पूजा केल्या जातात. 

प्रवेशद्वाराजवळ ऋषभावर आरूढ असलेले भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची मूर्ती आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. परिक्रमेमध्ये ६३ नायनमारांच्या मुर्त्या, वरुण लिंग, वायू लिंग, श्री महाविष्णू ह्यांची मूर्ती तसेच चिदंबरम ह्यांची समाधी आहे. 

उत्तर प्रदेशातील श्री नाद शर्मा आणि त्यांची पत्नी श्री अनाम्बिका हे दाम्पत्य शिव मंदिरांना भेट देत देत दक्षिणेकडे आले. श्री नाद शर्मा त्यांना भगवान शिवांचं दर्शन मिळावं म्हणून प्रार्थना करत होते. ते जेव्हा ह्या स्थळी आले त्यावेळी त्यांना भगवान शिवांकडून शिव लिंगाची प्राप्ती झाली. हे शिव लिंग इथे आपल्याला बघायला मिळतं. हे शिव लिंग एका वस्त्राने आच्छादित आहे. असा समज आहे कि हे वस्त्र श्री नाद शर्मा ह्यांच्या पत्नी श्री अनाम्बिका ह्यांचे आहे. 

इथे श्री बालत्रिपुरसुंदरी ह्यांची पण मूर्ती आहे. 

श्री ब्राह्मीदेवींनी चक्रमंगई येथे श्री पार्वतींसमवेत भगवान शिवांच्या श्री चक्रवागीश्वरर ह्या रूपाची पूजा केली.

ह्या मंदिराला आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हां इथे कोणी उपस्थित नव्हते त्यामुळे ह्या मंदिराबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.     

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.



No comments:

Post a Comment