Sunday, June 2, 2024

कडैयुर मयानं

तामीळनाडू मधल्या नागपट्टीनं ह्या जिल्ह्यात थिरुकडैयुर ह्या गावात हे मंदिर आहे. मईलादुथुराई-करैक्कल मार्गावर थिरुकडैयुर विराट्टेश्वरर मंदिरापासून २ किलोमीटर्स वर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक मंदिर आहे. शैव संत श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्यांनी ह्या मंदिरात भगवान शिवांची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री पेरूमन अडिगल

देवी: श्री अमलगुजनायकी, श्री वाधुमुळै अंबिका, श्री मलरलुळल मिन्नअम्माई

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, अस्वथी तीर्थ, काशी तीर्थ

क्षेत्र वृक्ष: बिल्व, बहावा (तामिळ मध्ये कोण्ड्रै)

पौराणिक नाव: थिरुकडैयुर मयानं

वर्तमान नाव: थिरुकडैयुर नागपट्टीनं, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार असा समज आहे कि प्रत्येक युगाच्या अंती भगवान शिव विश्वाचा अंत करण्यासाठी प्रलय घडवून आणतात. ह्या प्रलयक्रियेमध्ये वर्तमान ब्रह्माचा पण नाश म्हणजेच लय होतो. जेव्हा नवीन युग चालू होतं तेव्हा भगवान शिव ब्रह्मदेवाची पुनर्निर्मिती करतात. अशाच एका युगाच्या अंती ब्रह्मदेवाचा लय झाला आणि त्यांचं पुनर्निर्माण ह्या स्थळी झालं. निर्मिती झाल्यावर श्री ब्रह्मदेवांना भगवान शिवांनी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी शिवज्ञानोपदेश दिला. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री ब्रह्मपुरीश्वरर असे आहे. ह्या प्रकारचं हे तिसरं स्थळ आहे जिथे भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना शिवज्ञानोपदेश दिला.


क्षेत्रपुराणांनुसार भगवान शिवांनी मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या चालू राहावी म्हणून गंगेचं पाणी येथे आणून एक तीर्थ बनवलं. हे तीर्थ मंदिराच्या मुख्य तीर्थाच्या जवळ आहे. अजून सुद्धा प्रत्येक दिवशी श्री अमृतकडेश्वरर मंदिरातील शिवलिंगावरील अभिषेकासाठी ह्या तीर्थातून पाणी नेले जाते.


अजून एका आख्यायिकेनुसार एमाकेरिदन ह्या चालुक्य साम्राज्यातील राजाने युद्धामध्ये आपलं राज्य गमावल्यावर शिव मंदिरांमध्ये आराधना करण्यासाठी तो इथे आला आणि त्याने श्री मुरुगन ह्यांची आराधना केली. श्री मुरुगन त्याच्या आराधनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाचे रूप घेऊन त्या राजाच्या शत्रूंचा पराभव करून राजाला परत त्याचे राज्य मिळवून दिले. म्हणून श्री मुरुगन (म्हणजेच श्री सिंगारवेळार) ह्यांची मूर्ती योध्याच्या रूपात आहे. राजाने श्री सिंगारवेळार ह्यांच्या मंदिरासाठी ५३ एकर जमीन भेट दिली ज्याला सिंगारवेळी असे नाव आहे. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून इथे राजगोपुर नाही. मंदिराच्या आवारामध्ये एक तीन स्तरांचं गोपुर आहे. भगवान शिव स्वयंभू लिंगरूपात आहेत. 


वैशिष्ट्ये, मंदिरातील देवता आणि इतर देवालये:


प्रलयामध्ये लय पावून परत निर्माण झालेल्या श्री ब्रह्मदेवांना इथे भगवान शिवांनी शिवज्ञानोपदेश केला म्हणून ह्या स्थळाला ब्रह्मपुरी, थिरुमेईज्ञानं आणि कडैयुर मयानं अशी नावे आहेत. भगवान शिवांना येथे श्री ब्रह्मपुरीश्वरर असे नाव आहे. 


कोष्ठामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री विष्णू, श्री विष्णूदुर्गादेवी, श्री भैरव, श्री चंडिकेश्वर, श्री नर्दन विनायक ह्या मुर्त्या आहेत. श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे सहा शिष्य बसले आहेत. पण सहसा ते जसे वटवृक्षाखाली बसलेले असतात तसे नसून ह्या मूर्तीमध्ये ते कल्लाळ (पैर, कल्लाळेश्वत्थ, मराठी मध्ये औदुंबर) झाडाखाली बसले आहेत. 


श्री मुरुगन ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री दैवनै आणि श्री वल्ली समवेत स्वतंत्र देवालय आहे. इथे श्री मुरुगन ह्यांना श्री सिंगारवेळार असे नाव आहे आणि ह्या मूर्तीमध्ये ते एका योध्याच्या रूपात असून त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि ते जणू काही युद्धाला निघण्याच्या मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षमाला आहे आणि पायामध्ये खडावा (तमिळमध्ये कुर्राडू) आहेत. त्यांची मूर्ती थोडी डावीकडे कलली आहे. ह्यामुर्तीमध्ये श्री मुरुगन प्रभू श्रीरामांसारखे भासतात. श्री सिंगारवेळार हे त्यांच्या मामांचे म्हणजेच भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. जसे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये श्री चंडिकेश्वरांची मूर्ती असते तसेच श्री मुरुगन ह्यांच्या देवालयामध्ये पण श्री चंडिकेश्वर मूर्ती आहे. इथे ह्या मूर्तीला श्री गुहचंडिकेश्वर असं नाव आहे. 


श्री विनायकांना इथे श्री प्रणव विनायक असे नाव आहे. ह्या मूर्ती मध्ये त्यांचे उदर (पोट) सपाट आहे. असा समज आहे कि भगवान शिव जेव्हा श्री ब्रह्मदेवांना शिवज्ञानोपदेश देत होते त्यावेळी श्री विनायकांनी पण तो उपदेश हात जोडून अति एकाग्रतेमध्ये ऐकला. म्हणून त्यांचे उदर इथे सपाट दाखवले आहे. 


परिक्रमेमध्ये श्री नटराज, श्री कल्याण सुंदरर, नालवर (चार श्रेष्ठ शैव संत), भगवान विष्णू (श्री पिल्लई पेरुमल), श्री गजलक्ष्मी देवी, श्री चंडेश्वरी, श्री भिक्षाटनर आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या आहेत. १८ महासिद्धांपैकी एक श्री पांबाट्टी सिद्धर ह्यांचे इथे वास्तव्य होते.     


मंदिरात साजरे होणारे सण:

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवधीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि

पंगूनी (मार्च-एप्रिल): अश्विनी नक्षत्रावर तीर्थवारी सण साजरा होतो. असा समज आहे कि श्री गंगा देवी प्रत्येक वर्षी इथे भेट देते. भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची रथयात्रा तीर्थापर्यंत (विहीर) जाते. 


इथे प्रदोष पूजा नियमित पणे केली जाते. 


भाविक जन इथे ज्ञानप्राप्ती, विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment