Monday, June 10, 2024

थिरुकंडीश्वरर येथील श्री ब्रह्मकंडिश्वरर मंदिर

साधारण १८०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर अष्टविराट्ट स्थलंगल मधलं हे पहिलं मंदिर आहे. तसेच हे मंदिर इतर मंदिर समूहांशीपण निगडीत आहे. उदाहरणार्थ सप्त स्थानं, पाडळ पेथ्र स्थळे, सप्त मातृका स्थळे.


मुलवर: श्री ब्रह्मकंडिश्वरर, श्री विराट्टेश्वरर, श्री बृहद्नादर, श्री आदिबिल्वनादर

उत्सवर मूर्ती: श्री सोमस्कंदर

देवी: श्री मंगलांबिका

क्षेत्रवृक्ष: बिल्व

पवित्र तीर्थ: नंदी तीर्थ, कुडमूर्ती तीर्थ (नदी), दक्ष तीर्थ, ब्रह्म तीर्थ

पौराणिक नाव: कंडपूरम, थिरुकंडीयुर, आदिबिल्वारण्य, विराट्टं, त्रिमूर्तीस्थळ

शहर: कंडीयुर

जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:


श्री ब्रह्मदेवांना पूर्वी भगवान शिवांसारखीच पांच मुखे होती. एकदा श्री ब्रह्मदेवांना चुकून भगवान शिव समजून श्री पार्वती देवींनी त्यांची पाद्य पूजा केली. श्री ब्रह्मदेवांचं हे कर्तव्य होतं कि त्यांनी श्री पार्वती देवींना त्यांच्या चुकीच्या समजुतीची जाणीव करून देणे. पण तसं न करता त्यांनी श्री पार्वती देवींना त्यांची पाद्य पूजा करू दिली. भगवान शिवांना ह्याचा राग आला आणि त्यांनी ह्या ठिकाणी श्री ब्रह्मदेवांचं एक शिर छेदून टाकलं. म्हणून ह्या स्थळाला कंडीयुर किंवा कंडणपुरम असं नाव प्राप्त झालं. पण ह्यामुळे भगवान शिवांना ब्रह्महत्येचा दोष लागला आणि  त्याचा परिणाम म्हणून श्री ब्रह्मदेवांचं शिर त्यांच्या तळहाताला चिकटलं. ह्या पापाचं विमोचन करण्यासाठी भगवान शिवांनी थिरुकरम्बूर येथे भगवान विष्णूंची आराधना केली आणि त्यांना त्यांच्या पापापासून आंशिक विमोचनाचं समाधान मिळालं. नंतर जेव्हा भगवान शिवांनी ह्या स्थळी कमलपुष्करिणी ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्यांना त्यांच्या पापापासून पूर्ण विमोचनाचं समाधान मिळालं. भगवान विष्णूंनी येथे भगवान शिवांचं पापविमोचन केलं म्हणून त्यांना येथे शापविमोचन पेरुमल असं म्हणतात. कालांतराने भगवान शिवांनी ह्या मंदिराजवळ भगवान विष्णूंचं मंदिर बांधलं ज्याचं नाव आहे हरशापविमोचन मंदिर. कमलपुष्करिणी तीर्थाला पुढे कपालतीर्थ असं नाव प्राप्त झालं. 


अजून एका आख्यायिकेनुसार श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना भगवान विष्णूंचं पूर्ण लक्ष प्राप्त करण्यासाठी श्री ब्रह्मदेवांचं एक शिर छेदण्याची सूचना दिली. 


राजा महाबली, श्री चंद्र ह्यांना इथे उपासना केल्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या पापांपासून मुक्तता मिळाली. भृगु ऋषींना त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारल्यामुळे पाप लागलं. त्यांनी इथे उपासना केल्यावर त्यांची ह्या पापापासून मुक्तता झाली. श्री चंद्रदेवांना त्यांनी गुरुपत्नींशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे जे पाप लागलं त्या पापाचं विमोचन त्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केल्यामुळे झालं.


शतपाद ऋषी दर प्रदोषाला कालहस्तीला जाऊन भगवान शिवांची आराधना करायचे. एका प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांनी ऋषींची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या कालहस्तीच्या वाटेवर मुसळधार पाऊस पाडला ज्यामुळे ऋषी कालहस्तीला पोचू शकले नाहीत. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून ऋषींनी स्वतःला कंडीयुर येथे अग्निकुंडात उडी मारून आत्मसमर्पण केले. भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या कालहस्तीतील रूपाचे दर्शन ऋषींना इथे प्राप्त करून दिले. त्या शिवाय भगवान शिवांनी कैलास पर्वतावरून ऋषींच्या आराधनेसाठी बिल्वपत्राचे झाड आणून दिले. म्हणून ह्या स्थळाला आदिबिल्ववन असं पण म्हणतात. 


ह्या स्थळी भगवान शिव, भगवान विष्णू आणि श्री ब्रह्मदेव हे तीनही असल्याकारणाने ह्या स्थळाला त्रिमूर्ती स्थळ असं पण नाव आहे. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर कूडमुरुत्ती ह्या नदीच्या काठावर आहे. वैष्णव भक्त ज्या स्थळांमध्ये भगवान विष्णूंना पूजतात त्या १०८ दिव्य देशम स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शिव मंदिरासमोर भगवान विष्णूंचे मंदिर आहे ज्याचे नाव हरशापविमोचन किंवा हरविमोचन पेरुमल कोविल असे आहे. स्थळपुराणानुसार हे मंदिर राजा महाबलीने कूडमुरुत्ती आणि वेण्णार नदींच्या मध्ये बांधलं. 


हे पश्चिमाभिमुख मंदिर असून ह्या मंदिराला ५ स्तरांचं राजगोपुर आहे. इथे नंदी, बलीपीठ तसेच ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या बाजूला श्री विनायकांची मूर्ती आहे. शिलालेखावर भगवान शिवांचा श्री थिरुविराटमहादेवर, श्री थिरुकंडीयुर महादेवर असा उल्लेख केला आहे. येथील लिंग स्वयंभू असून उंच पीठावर आहे. 


मंदिरातील इतर मुर्त्या आणि देवालये

भगवान दंडपाणींचे स्वतंत्र देवालय आहे ज्याला एक मंडप पण आहे. श्री देवी दक्षिणाभिमुख असून त्या चतुर्भुज आहेत ज्यातील एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. श्री विनायकांच्या देवालयामध्ये श्री मुरुगन त्यांच्या श्री वल्ली आणि दैवनै ह्या पत्नींसह आहेत. श्री महालक्ष्मी देवी, श्री नटराज, श्री विष्णुदूर्गा देवी, श्री भैरव, श्री सप्तविनायक आणि श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्या मुर्त्या बसलेल्या मुद्रेमध्ये आहेत. कोष्टामध्ये श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर, श्री भिक्षाटनर, श्री नर्तनविनायक आणि श्री अर्धनारीश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री चंडिकेश्वर आणि श्री कालहस्तीनादर ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. द्वारपालकांच्या जवळ शतपाद मुनी, श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या तसेच सप्त स्थाने आणि पंच भुते ह्यांची शिव लिंगे आहेत. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्य त्यांच्या पत्नींसह आहेत आणि बाकी सगळे ग्रह सुर्याभिमुख आहेत. भगवान शिवांच्या गाभाऱ्याजवळ श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री ब्रह्मदेव बसले आहेत आणि भगवान शिवांची आराधना करत आहेत. त्यांच्या एका हातात जपमाळ तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. बिल्व वृक्षाच्या खाली श्री राजगणपती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री ब्रह्मदेवांच्या देवालयाजवळ भगवान शिवांची एका शिकाऱ्याच्या (वदुगर) रूपात म्हणजेच श्री ब्रह्मदेवांचं शीर छेदण्याच्या रूपातली एक मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री मुरुगन ह्यांच्या दोन मुर्त्या आहेत. एका मूर्तीमध्ये त्यांच्या हातात जपमाळ आहे ज्याचे नाव श्री ज्ञानस्कंदर असे आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातामध्ये कमळ आहे ज्याचे नाव श्री वीरस्कंदर असे आहे.  दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या वरती भगवान शिव आणि श्री पार्वती देवी हे कैलास पर्वतावर बसले आहेत आणि श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवी त्यांची पूजा करत आहेत असे शिल्प आहे. 


ज्यांनी इथे उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री सरस्वती देवी, श्री सूर्य, शतपाद मुनी, श्री द्रोणाचार्य, श्री दक्ष आणि राजा भगीरथ 


वैशिष्ठ्य:

मासी (फेब्रुवारी-मार्च) ह्या तामिळ महिन्याच्या १३, १४ आणि १५ तिथीला संध्याकाळी ५.४५ ते ६.१० मध्ये सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. असा समज आहे कि श्री सूर्यदेव त्यावेळी भगवान शिवाची आराधना करतात. ब्रह्महत्या दोष तसेच कलत्र दोषांचे हे परिहार स्थळ आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): सप्तस्थान सण

आनी (जून-जुलै): भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये थिरुमंजनं

आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर पुरम उत्सव

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पंगूनी उत्तरम उत्सव    


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment