Sunday, June 23, 2024

श्री थिरुकोविलूर विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्टस्थळांपैकी हे दुसरं मंदिर आहे. विल्लूपुरम ह्या तामिळनाडूतल्या जिल्ह्यामध्ये थिरुकोविलूर मध्ये किळुर (किंवा किळैउर) ह्या ठिकाणी हे मंदिर वसलं आहे. हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक मंदिर आहे. अनेक नायनमारांनी ह्या ठिकाणी भगवान शिवांची स्तुती गायली आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर अंधकासूर ह्या राक्षसाच्या संहाराशी हे स्थळ निगडित आहे.      


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री अंधकांतनाथर

उत्सवर: श्री अंधकासूर संहार मूर्ती

देवी: श्री शिवांथवल्ली, श्री पेरियानायकी

क्षेत्र वृक्ष: बहावा, बिल्व

क्षेत्र तीर्थ: थेनपेन्नाई नदी

पौराणिक नाव: थिरुकोविलूर, अंधकापूरम

जिल्हा: विल्लूपुरम, तामिळनाडू


क्षेत्र पुराण

एकदा श्री पार्वती देवींनी खेळीमेळीमध्ये भगवान शिवांच्या डोळ्यावर आपले हात ठेऊन ते बंद केले. भगवान शिवांचे डोळे म्हणजेच सूर्य आणि चंद्र हे झाकले गेल्यामुळे सगळीकडे अंधकार झाला म्हणजेच अज्ञान पसरलं. त्यातूनच अंधकासूर नावाचा राक्षस जन्माला आला. भगवान शिवांनी आपल्याकडील दंडाने त्या राक्षसाच्या डोक्यावर प्रहार केला. राक्षसाच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. जसं जसं रक्ताचा थेट जमिनीवर पडत होता तसं तसं  प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता. श्री पार्वती देवींनी कालीमातेचं रूप घेऊन आपल्याकडील कपालामध्ये (कवटी) ते रक्त गोळा केलं आणि पिऊन टाकलं जेणेकरून रक्ताचा थेट जमिनीवर पडणार नाही. जे रक्त जमिनीवर सांडलं होतं त्यातून आठ आडव्या आणि आठ उभ्या रेषा निर्माण झाल्या ज्यातून ६४ चौकोन निर्माण झाले. ह्या प्रत्येक चौकोनातून एक नवीन राक्षस निर्माण झाला. भगवान शिवांनी प्रत्येक चौकोनासाठी एक भैरव असे ६४ भैरव निर्माण केले जेणेकरून नवीन राक्षस निर्माण होणं थांबलं. कालांतराने ह्या ६४ भैरवांची पूजा म्हणजेच वास्तुशांती पूजा म्हणून प्रसिद्ध झाली. हि घटना हेच सूचित करते कि अज्ञानाचा नाश ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. 


मंदिराबद्दल माहिती:


येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. ह्या लिंगाचा पाया शोधण्यासाठी इथे जवळ जवळ २५ फूट खनन केले गेले पण तरी ह्याचा पाय सापडला नाही. ह्या मंदिराला दोन राजगोपुरं आहेत. दोन्ही राजगोपुरं पश्चिमाभिमुख असून ७० फूट उंच आणि तीन स्तरांचे आहेत. ह्या मंदिरामध्ये दोन परिक्रमा आहेत. मुलवर म्हणजे भगवान शिवांचे देवालय तसेच देवीचे देवालय पश्चिमाभिमुख आहेत. देवीची मूर्ती ५ फूट उंच आहे. ह्या स्थळी भगवान शिव हे स्वतःच भैरवर आहेत. चोळा आणि पल्लव साम्राज्याचे बरेच शिलालेख इथे बघावयास मिळतात. 


मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:

इथे पुढील देवांची आणि देवींची देवालये आहेत: श्री पेरियानायकी, श्री गणपती, श्री मुरुगन त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासह, श्री नर्दन गणपती, श्री मीनाक्षी देवी आणि श्री सुन्दरेश्वर, श्री विशालाक्षी देवी आणि श्री काशी विश्वनाथ, श्री अभिजित गुजांबल देवी आणि श्री अरुणाचलेश्वर. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी श्री मेइप्पोरूल ह्या नायनमारांचे देवालय आहे. इथे पांच शिव लिंगे आहेत ज्यांचं दर्शन घेतलं कि पंच भूत लिंगांचे दर्शन घेतल्याचे फळ मिळते. त्या पांच लिंगांची नावे - श्री चिदंबरेश्वरर, श्री अगस्तीश्वरर, श्री कालहस्तीश्वरर, श्री जम्बुकेश्वरर आणि श्री एकांबरेश्वरर. परिक्रमेमध्ये श्री नटराज, श्री वरदराज पेरुमल, श्री गजलक्ष्मी देवी आणि ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. नवग्रह, श्री सूर्य आणि श्री चंद्र ह्यांचीपण देवालये इथे आहेत. कोष्टामध्ये श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर, श्री अष्टभुजादुर्गा देवी, श्री चंडिकेश्वरर, श्री विष्णू आणि श्री दक्षिणामूर्ती ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मुरुगन ह्यांची मोरावर आरूढ असलेली मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांना सहा मुखे आणि बारा हात. 


वैशिष्ट्ये:

१) शैव संत अव्वईयार ह्यांनी श्री गणेशाची स्तुती गायली आहे. 

२) इथे भगवान शिव भैरव रूपात असल्यामुळे त्यांची आराधना केल्याने अभिचाराच्या परिणामांपासून (करणी, जादूटोणा वगैरे) मुक्ती मिळते असा समज आहे. 

३) ह्या ठिकाणी वास्तुशास्त्राचा उगम झाला असा समज आहे. 

४) श्री शुक्रदेवांना इथे शापापासून मुक्ती मिळाली. 

५) ह्या ठिकाणी सप्तमातृका देवी, श्री महात्रिपुरसुंदरी (श्री भैरवी) आणि ६४ भैरव प्रकट झाले.


मंदिराची महती:

इथे एक खडक आहे ज्यावर संगम काळातील प्रसिद्ध कवि श्री कपिलर ह्यांना उपवास करून निर्वाणप्राप्ती झाली. ते इथून जवळच असलेल्या पेरूर गावाचे रहिवासी होते. 


इथे दानशूर म्हणून प्रसिद्ध राजा परीच्या पूत्रींचा दैविकन राजाबरोबर विवाह झाला.


ह्या ठिकाणी श्री अरूणागिरीनादर ह्यांनी श्री मूरूगन ह्यांच्या स्तूतीपर भजने गाईली आहेत. ६३ नायनमारांपैकी श्री मैप्पोरूल नायनार आणि श्री नरसिंग मूनय नायनार ह्यांचे हे जन्मस्थान आहे.


येथील श्री अष्टभूजा देवींचे मूख अतिशय सुंदर असून शांत भाव आहे. डोळे काळेभोर आहेत. असा समज आहे कि ह्या देवीच्या आराधनेने विवाहातल्या अडचणी दूर होतात.


पेरीयायनै गणपती:

अशी आख्यायिका आहे कि ६३ नायनमारांपैकी श्री अव्वैयर ह्या श्री गणपतींची पूजा करत होत्या. त्याचवेळी श्री सूंदरर आणि श्री चेरमान (हे पण नायनारच होते) कैलास यात्रेवर निघाले होते. ते श्री अव्वैयर यांना आपल्याबरोबर यात्रेला नेण्यासाठी आले. श्री अव्वैयर यांना श्री गणपतींनी आज्ञा केली कि पूजेमध्ये त्वरा करायची नाही. त्यामुळे श्री अव्वैयर यांनी श्री सूंदरर आणि श्री चेरमान यांना आपण पूजा संपवून मगच येवू असे सांगितले. श्री सूंदरर आणि श्री चेरमान हे पुढे गेले. श्री अव्वैयर यांनी यथासांग पूजा केली. श्री गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री अव्वैयर यांना आपल्या योग सामर्थ्याने त्वरित कैलासावर नेले. श्री सूंदरर आणि श्री चेरमान हे जेव्हा कैलासावर पोचले तेव्हा तिथे श्री अव्वैयर या त्यांच्या आधीच पोचल्या आहेत हे बघून आश्चर्य वाटले. इथे श्री गणपतींचे श्री पेरीयायनै असे नाव आहे.


श्री मूरुगन यांना एका राक्षसाला मारल्यामूळे ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला हो दोषाचं निवारण करण्यासाठी त्यांनी श्री अंबिका देवींना शिव पूजा करण्यासाठी योग्य स्थळ सूचविण्याची विनंती केली. ते स्थळ सूचविण्यासाठी श्री  

अंबिकादेवींनी पृथ्वीच्या दिशेने एक भाला फेकला. तो भाला जिथे पडला त्या जागेला थिरूकैवलूर असं नाव पडलं जे कालांतराने थिरूकोविलूर असं झालं. 


हे स्थळ १०८ दिव्य देशम् (श्री महाविष्णूंची मंदिरे) पैकी पण एक आहे.


ह्या मंदिराच्या जवळच एक विष्णू मंदिर आहे जिथे श्री महाविष्णूंना श्री उल्गनादर पेरूमल असे नाव आहे.


ज्यांनी इथे आराधना केली त्यांची नावे:

श्री गणपती, श्री मूरूगन, प्रभु श्रीराम, श्री परशुराम, भगवान श्रीकृष्ण, श्री इंद्र, श्री यमदेव, श्री सूर्य, श्री कूबेर, श्री आदिशेष, श्री काली देवी, रोम ऋषी, कण्व ऋषी, पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी आणि सप्त ऋषी.


मंदिरात साजरे होणारे सण:

आनी (जून-जूलै): थिरूमंजनं

आडी (जूलै-ॲागस्ट): दर शूक्रवारी शुक्रवार पूजा नावाची विशेष पूजा केली

पूरत्तासी (सप्टेंबर-ॲाक्टोबर): १९ दिवसांचा नवरात्र उत्सव

ऐप्पासी (ॲाक्टोबर-नोव्हेंबर):अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी, सूर संहार

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम, तिसऱ्या सोमवारी विशेष पूजा केली जाते.

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन, माणिकवासगर उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मघा नक्षत्रावर १३ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. १३व्या दिवशी श्री अंधकासूर संहार मूर्तीची मिरवणूक काढली जाते. 


पूजाः

दैनंदिन तसेच साप्ताहिक पूजा नियमित केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा पण नियमित केल्या जातात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment