Sunday, July 9, 2023

श्री श्वेतारण्येश्वरर मंदिर - थिरुवेंकाडू - बुध ग्रहाचे मंदिर

हे मंदिर बुध ग्रहाचे मंदिर आहे आणि नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे.

मुलवर (मुख्य दैवत): श्री श्वेतारण्येश्वरर
देवी: श्री ब्रह्मविद्याम्बिका
क्षेत्र वृक्ष: पीपल (वडवानल), कोंद्रेई (बहावा), बिल्व
पौराणिक नाव: थिरुवेंकाडू, आदी चिदंबरम, श्वेतारण्य
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, अग्नी तीर्थ, चंद्र तीर्थ
पत्ता: थिरुवेंकाडू, तामिळनाडू ६०९११४, इंडिया

वैशिष्ठ्ये:
१) येथील शिवलिंग स्वयंभू आहे
२) जशा काशीमध्ये विष्णू पादुका आहेत, त्याचप्रमाणे इथे वडवानल वृक्षाच्या खाली रुद्र पादुका आहेत. म्हणूनच इथे भगवान शंकरांना थिरुवेंकदर किंवा थिरुवेंकट्टूदेवर असं संबोधलं जातं.
३) येथील स्फटिक लिंगावर दिवसातून चार वेळा तर नटराजाच्या मूर्तीवर सहा वेळा अभिषेक केला जातो.
४) हे स्थळ म्हणजे शक्ती पीठ पण मानलं जातं. आणि येथील शक्ती पीठाचे प्रणव शक्तीपीठ असे नाव आहे.
५) काशी एवढेच पवित्र मानले जाणाऱ्या सहा क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. बाकीच्या पांच क्षेत्रांची नावे - १. थिरुवयरू, २. मैलादुथुराई, ३. छायावन, ४. थिरुवडुमैथुर, ५. थिरुवणचिअम
६) वाल्मिकी रामायणामध्ये ह्या स्थळाचा उल्लेख सापडतो

श्वेतारण्याचा अर्थ: श्वेत म्हणजे पांढरा (तामिळ मध्ये वेनमै). अरण्यम म्हणजे जंगल (तामिळ मध्ये काडू). आणि म्हणूनच ह्या स्थळाला श्वेतारण्य किंवा वेंगाडू असं म्हणलं जातं.

आख्यायिका:
१) एकदा भगवान मुरूगांनी ब्रह्मदेवाला प्रणव मंत्राचे स्पष्टीकरण देता आलं नाही म्हणून बंदिस्त केलं. पण ह्यामुळे ब्रह्मसृष्टीचं कार्य स्तंभित झालं आणि म्हणून भगवान शिवांनी मध्यस्थी करून ब्रह्मदेवाला मुक्त केलं. काही काळ बंदिस्त राहिल्यामुळे ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञानाचं विस्मरण झालं आणि ब्रह्मदेवांनी इथे येऊन तपश्चर्या केली. त्यांनी जी तपश्चर्या इथे केली त्याला समधूनीलै (तामिळ), म्हणजे श्वास राखून धरणे, असं म्हणतात. भगवान शिवांनी दक्षिणामूर्तींच्या रूपात येऊन ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञान प्रदान केलं तर देवी पार्वतींनी त्यांना ब्रह्मकलेचं ज्ञान दिलं. म्हणून इथे देवी पार्वतींना ब्रह्मज्ञानाम्बिका असं संबोधलं जातं. ही घटना दर्शविण्यासाठी इथे स्वतंत्र देवस्थान आहे.

२) असं समजलं जातं की भगवान शिवांची ६४ रूपे आहेत आणि पांच मुखे आहेत. ती पांच मुखे अशी - ऊर्ध्वमुखी ईशान (पवित्रतेचं प्रतीक), उत्तरमुखी वामदेव (उदरनिर्वाहाचं प्रतीक), पूर्वमुखी तत्पुरुष (अध्यात्म आणि अहंकार निर्मुलनाचं प्रतीक), दक्षिणमुखी अघोर मूर्ती (संहार आणि पुनरुत्थान ह्यांचं प्रतीक), पश्चिममुखी सदाशिव (शाश्वत आनंदाचं प्रतीक).

३) एका आख्यायिकेनुसार मरुत नावाच्या दैत्याने (सालीन्द्र चा पुत्र) इथे भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान म्हणून त्रिशूल प्राप्त केलं. पण ह्या प्राप्त झालेल्या त्रिशुळाने त्याने देवांना त्रास द्यायला चालू केलं. भगवान शिवांनी मरुताला शिक्षा देण्यासाठी नंदीदेवाला पाठवलं. पण नंदीदेवाबरोबरच्या युद्धात मरुताने नंदीदेवाच्या शरीरावर त्रिशुळाने वार केले आणि त्यामुळे नंदीदेवाच्या शरीरावर नऊ ठिकाणी जखमा झाल्या. भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी अघोरमूर्ती रूप घेऊन मरुत दैत्याला एका वृक्षाखाली मारले. (हे वृक्ष अजूनही ह्या ठिकाणी आहे असा समज आहे). येथील नंदीदेवाच्या मूर्तीवर नऊ जखमा दिसून येतात. असा उल्लेख आहे कि भगवान शिवांनी मरुत्वाला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असताना मारले आणि त्यावेळी रविवार होता.

४) एका आख्यायिकेनुसार यमदेवाला भगवान शिवांनी श्वेतकेतु राजाचा जीव हरण केल्याबद्दल शिक्षा केली. आणि ह्या ठिकाणी यमदेवाने भगवान शिवांना क्षमायाचना करण्यासाठी तपश्चर्या केली.

५) असा उल्लेख आहे की भगवान शिवांनी येथे नऊ तांडव नृत्ये केली - आनंद तांडव, कली तांडव, गौरी तांडव, मुनी तांडव, संध्या तांडव, त्रिपुर तांडव, भुजंग तांडव, संहार तांडव आणि भिक्षाटन तांडव. देवीपार्वती साठी त्यांनी आनंद तांडव केले आणि ते तांडव करताना त्यांच्या नेत्रातून अश्रुंचे तीन थेंब पडले आणि त्यातून तीन तीर्थे निर्माण झाली.

६) इंद्र, ऐरावत, महाविष्णू, सूर्य, चन्द्र आणि अग्नी ह्यांनी येथे भगवान शिवांची उपासना केली.
७) पत्तीनाथर नावाच्या संतांना येथे शिवदीक्षा प्राप्त झाली.

ह्या ठिकाणच्या इतर देवता

१) भगवान विनायक देवस्थान
२) भगवान वल्लभ गणपती आणि त्यांची पत्नी श्री वल्लभ देवी ह्यांचे देवस्थान
३) श्वेतवनपेरूमल, पंचलिंग, नागेश्वर आणि वीरभद्र ह्यांची देवस्थाने
४) काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी
५) भगवान विष्णूंचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे.

ह्याशिवाय इतर देवतांच्या त्यांच्या त्यांच्या स्थानी कोष्ट मुर्त्या आहेत.

ह्या स्थळाचं एक अद्वितीय वैशिष्ठ्य असं आहे की इथे - तीन देवांच्या मुर्त्या आहेत - स्वयंभू लिंग, नटराज आणि अघोर मूर्ती. तीन देवींच्या मुर्त्या आहेत - ब्रह्मविद्याम्बिका, काली आणि दुर्गा. तीन तीर्थे आहेत - सूर्य, चंद्र आणि अग्नी, आणि तीन क्षेत्र वृक्ष आहेत - बिल्व, कोंद्रेई (बहावा), वडवानल

इथे साजरे केले जाणारे सण:

१) मासी (फेब - मार्च) महिन्यात साजरा होणारा ब्रह्मोत्सव ज्याला इंद्राचा सण असं पण म्हणतात
२) आडी (जुलै - ऑगस्ट) महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर साजरा होणारा दहा दिवसांचा सण
३) आवनी (ऑगस्ट - सप्टेंबर) मध्ये गणेश चतुर्थी
४) ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) मध्ये साजरे होणारे स्कंद षष्ठी आणि अन्नाभिषेक सण
५) मार्गळी (डिसेंबर - जानेवारी) महिन्यात आर्द्रा नक्षत्रावर साजरा होणारा आरुद्र दर्शन सण
६) पंगूनी (मार्च - एप्रिल) महिन्यामध्ये अघोर मूर्तीवर लक्षार्चना
७) कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अघोर पूजा
८) इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीचा वैकासि सण. ह्या ठिकाणी ऐरावताला त्याच्या शापातून मुक्ती मिळाली.
९) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा
१०) शरद ऋतू मध्ये दहा दिवसाचा नवरात्र सण

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment