Sunday, July 23, 2023

श्री थिरुअग्नीश्वरर - कंजनूर - शुक्र ग्रहाचे मंदिर

हे मंदिर शुक्र ग्रहाचे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे २००० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातल्या कंजनूर गावामध्ये हे मंदिर आहे. 

मुलवर: श्री अग्निश्वरर् 
देवी (अम्मन): श्री कर्पगम् अम्बाळ 
क्षेत्र वृक्ष: पळस, फणस 
पवित्र तीर्थे: अग्नी तीर्थ, पराशर तीर्थ, ब्रह्म तीर्थ (कावेरी), चंद्र तीर्थ, अंजनेय तीर्थ आणि मणिकर्णिका तीर्थ 
ऐतिहासिक / पौराणिक नांवे: पळस अरण्य, पळसापुरम, ब्रह्मपुरी, अग्निपुरम, कंसपूरम 

येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 

ह्या क्षेत्राची वैशिष्ठ्ये

हे नवग्रहांमधील शुक्रदेवाचं स्थळ आहे आणि शुक्रदेवाने तपश्चर्या केलेल्या स्थळांपैकी एक आहे. इथे शुक्रदेवाचे स्वतंत्र देवस्थान आहे. ह्या मंदिराचं एक वैशिष्ठय म्हणजे इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांचं एकत्र देवस्थान आहे. ब्रह्मदेवाला त्यांनी वधूवरांच्या रूपात ह्या ठिकाणी दर्शन दिलं असा समज आहे. आणि म्हणूनच जसं विवाहाच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूला असते, त्याप्रमाणे पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहेत. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी तांडव नृत्य करत पराशर ऋषींना मुक्ती दिली म्हणून येथील नटराजांच्या मूर्तीला मुक्ती तांडव मूर्ती म्हणतात. भगवान शुक्रांना इथे कंजन असे नाव आहे. आणि म्हणूनच ह्या गावाचे नाव कंजनूर आहे. 

शुक्रदेवांना अनेक नावे आहेत. इथे त्यांना अजून दोन नावांनी ओळखले जाते - एक म्हणजे कवि आणि दुसरे म्हणजे भार्गव. ऋषी भृगु आणि देवी पुलोमजा ह्यांचे ते पुत्र म्हणून त्यांना भार्गव असे म्हणले जाते. 

चंद्रदेवाला ह्या ठिकाणी त्याच्या शापातून मुक्ती मिळाली. ऋषी व्यासांच्या सल्ल्यानुसार अग्निदेवाने ह्या ठिकाणी तपश्चर्या केल्याने त्याचे रोगनिवारण झाले. म्हणूनच इथे भगवान शिवांना अग्नीश्वरर् असे नाव आहे. 

मथुराधिपती कंस राजाने पण ऋषी शुक्राचार्यांच्या सल्ल्याने इथे तपश्चर्या केल्याने त्याचे पण रोगनिवारण झाले. म्हणूनच ह्या स्थळाला कंसपूरम असं पण नाव आहे. 

हरदत्तशिवाचार्य ह्यांनी “ॐ नमः शिवाय” ह्या पंचाक्षरी मंत्राचं महत्व ह्याच ठिकाणी प्रस्थापित केले. 

मंदिरातील मुर्त्या

१) कोष्टम् मध्ये, म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, श्री नर्तन गणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री दुर्गा देवी आणि श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
२) श्री पार्वती देवीच्या देवस्थानाच्या बाजूला श्री आदि कर्पगम्बाळ ह्यांची मूर्ती आहे. 
३) परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री मयूर सुब्रह्मण्य आणि श्री महालक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
४) पळस वृक्षाच्या खाली श्री अग्नीश्वरर लिंग आहे. 
५) शिव लिंगा जवळ श्री मनकंचनारर, श्री कुलिकमर, श्री सुरैकाय भक्तर आणि त्याची पत्नी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
६) महामंडपामध्ये श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र, नवग्रह आणि नालवार (श्रेष्ठ शैव संत) ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

आख्यायिका

१) पुराणांनुसार शुक्राचार्यांनी त्यांच्या पत्नीची हत्या केल्याबद्दल भगवान विष्णूंना शाप दिला. त्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान विष्णूंनी ह्या ठिकाणी श्री हरदत्तशिवाचार्य नावाच्या शिवभक्ताच्या रूपात भगवान शिवांची उपासना केली. 

२) कट्टर वैष्णव वासुदेवाचा सुदर्शन नावाचा पुत्र होता. वैष्णव कुटुंबात जन्म घेऊन पण सुदर्शन भगवान शिवांची भक्ती करीत होता. ह्या ठिकाणी तापलेल्या लोखंडी खुर्चीवर बसून भगवान शिवांचं नाव घेत असलेल्या सुदर्शनची मूर्ती आहे. अजून एक मूर्ती आहे जिथे श्री हरदत्तशिवाचार्य दक्षिणामूर्तींच्या रूपात आहेत. 

३) एक ब्राह्मण होता ज्याला एका वासरूच्या हत्येसाठी जबाबदार धरलं गेलं होतं. बाकीच्या ब्राह्मणांनी ह्या ब्राह्मणाला गोहत्येचा आरोप लावून जातीबाहेर काढलं होतं. श्री हरदत्तशिवाचार्यांनी आरोप लावलेल्या ब्राह्मणाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्याला परत जातीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साक्ष म्हणून एका नंदीच्या दगडी मूर्तीकडून गवताचं सेवन केलं. 

४) श्री ब्रह्मदेवांनी येथे त्यांना श्री शिवपार्वतींच वधुवर रूपामध्ये दर्शन व्हावं आणि ह्या दर्शनाचा लाभ इतरांना पण व्हावा म्हणून तपश्चर्या केली. आणि म्हणूनच इथे भगवान शिवांचं देवस्थान उजव्याबाजूला (दर्शन घेणाऱ्याच्या) तर देवी पार्वतींचं देवस्थान डाव्याबाजूला आहे. 

५) पुराणांनुसार शुक्र (शुक्राचार्य) हे दैत्यगुरू होते आणि त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता ज्याच्या सहाय्याने ते युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना परत जिवंत करू शकत होते. 

६) असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं. 

७) असा समज आहे की श्री चंद्र, श्री पराशर मुनी आणि श्री कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत. 

८) ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. श्री ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. श्री अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना श्री अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव श्री अग्निश्वरर् असे आहे), ३. श्री पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ 

शुक्र ग्रहाचा इतिहास

पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे. 

शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली. 

शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले. 

शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति. 

शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं. 

मंदिरात साजरे होणारे सण

आडी (जुलै -ऑगस्ट): पुरम (पुर्वा फाल्गुनी) नक्षत्रावर इथे आडीपुरं  सण साजरा केला जातो 
मासी (फेब-मार्च) मासी मघा सण साजरा केला जातो. 
थाई (जानेवारी-फेब्रुवारी) श्री हरदत्तशिवाचार्यांचा सण साजरा केला जातो 
पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) नवरात्री सण साजरा केला जातो. 

ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा आणि अंजनेय पूजा पण इथे केली जाते

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment