Sunday, July 16, 2023

श्री थिरुआपत्सहायेश्वरर - आलंगुडी - श्री गुरु ग्रहाचे मंदिर

कुंभकोणम पासून मन्नारगुडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १७ किलोमीटरवर हे मंदिर आहे. नवग्रहस्थळांपैकी गुरुग्रहाचे हे स्थान आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायनमार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. 

मुलवर (मुख्य दैवत): श्री आपत्सहायेश्वरर, श्री काशीनारायणेश्वरर 
देवी (अम्मन): श्री एलवरकुळाली, श्री उमाई अम्मन 
उत्सव मूर्ती: भगवान दक्षिणामूर्ती 
क्षेत्र वृक्ष: रेशीमसूत (तामिळ मधे पुलै) 
पवित्र तीर्थ: ब्रह्मतीर्थ, अमृत पुष्करिणी आणि १३ इतर तीर्थे 
पौराणिक नाव: विरूमपुल्लै 
स्थळांचं नाव: आलंगुडी 
जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू) 

वैशिष्ठ्ये: 
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य देवस्थान (शिवलिंग) हे स्वयंभू आहे. हे स्थळ गुरु स्थळ किंवा दक्षिणामूर्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुदोषांचं परिहारस्थळ म्हणून पण प्रसिद्धआहे. 

ठळक वैशिष्ठ्ये: 
प्रत्येक वर्षी मासी महिना (तामिळ) (फेब-मार्च) मध्ये भगवान दक्षिणामूर्तींच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो. गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस शुभ मानला जातो. पण मासी महिन्यातला हा दिवस त्याहीपेक्षा शुभ मानला जातो. गुरु देवाचं प्रत्यक्ष दर्शन इथे नाही. पण भगवान दक्षिणामूर्तींना इथे गुरु म्हणून मानलं जातं कारण ह्या ठिकाणी त्यांनी सनकादि मुनींना उपदेश दिला. किंबहुना गुरुपरंपरेमध्ये दक्षिणामूर्तींना आदिगुरु मानलं जातं. 

दोन कारणांमुळे ह्या स्थळाला आलंगुडी म्हणलं जातं. १) काळं रेशीमसूत हे इथलं क्षेत्र वृक्ष आहे २) समुद्रमंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन केल्यावर भगवान शिव इथे येऊन बसले. 

हे पंचारण्य स्थळांपैकी एक आहे. थिरुवदैमुरुथुर येथील भगवान महालिंगेश्वरांचे हे परिवार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे एका स्वतंत्र देवस्थानामध्ये शेळीचे शिर असलेल्या दक्षाची (श्री पार्वती देवीचे पिता) मूर्ती आहे. दक्षाने केलेल्या यज्ञावेळी आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने जेव्हा श्री सतीने (दक्षाची पुत्री) यज्ञकुंडात उडी घेऊन आपली आहुती दिली त्यावेळी भगवान शिवांचे सेनापती श्री वीरभद्र ह्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला. श्री पार्वती देवीच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शेळीचे शिर लावून दक्षाला जीवदान दिले. 

श्री अंबिका (म्हणजेच श्री पार्वती देवी) हिचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. शुक्रवारी येथे विशेष पूजा केली जाते. 

हिंदू धर्मानुसार माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्याची माता, दुसरा गुरु म्हणजे पिता आणि तिसरा गुरु म्हणजे गुरु (जो गुरुकुलात शिकवतो म्हणजेच भगवान दक्षिणामूर्ती). म्हणूनच इथे ह्याच क्रमाने पार्वती (माता), भगवान शिव (पिता) आणि भगवान दक्षिणामूर्ती (गुरु) ह्यांची देवस्थाने आहेत. 

आख्यायिका: 

१) अमूथोहर ह्या मुकुंद चक्रवर्ती राजाच्या मंत्र्याने हे मंदिर बांधलं, पण आपलं पुण्य मात्र त्याने आपल्याकडेच ठेवलं. राजाला हे न रुचल्याने त्याने मंत्र्याचा शिरच्छेद केला. राजसभेमध्ये मंत्र्याच्या नावाचा प्रतिसाद उमटला. राजावर ब्रह्महत्येचा दोष आला. ह्या मंदिरात उपासना करून त्याने ह्या दोषाचे निवारण केले. 

२) येथील सुंदर मूर्ती नायनार ह्यांच्या मूर्तीवर चेचक रोग (स्मॉल पॉक्स) झाल्याची चिन्हं आहेत. त्याची आख्यायिका अशी आहे. अन्य मूर्तींसमवेत ही मूर्ती पण थिरुवरुर येथील राजाने आलंगुडीवरून थिरुवरुरला नेली आणि तो परत द्यायला तयार नव्हता. आलंगुडी येथील पुजाऱ्याने युक्ती लढवली. त्याने मूर्तीला एका कापडात बांधलं आणि जेव्हा द्वारपालांनी अडवलं त्यावेळी त्याने आपण चेचक रोग झालेल्या लहान मुलाला घेऊन जात आहोत असे सांगितले. आलंगुडी मध्ये आल्यावर जेव्हा त्या पुजाऱ्याने ते कापड उघडलं त्यावेळी त्या मूर्तीवर चेचक रोगाची चिन्हं दिसली. 

३) संतान प्राप्ती साठी श्री महालक्ष्मी देवीने येथे भगवान शिवांची उपासना केली. 

४) आलंगुडीच्या जवळ थिरूमनमंगला ह्या ठिकाणी भगवान शिवांशी विवाहबद्ध होण्याआधी श्री पार्वती देवीने येथे (आलांगुडीमध्ये) तपश्चर्या केली. विवाहाच्या वेळी भगवान महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री लक्ष्मी देवी, श्री अष्टदिक्पाल आणि श्री वीरभद्र उपस्थित होते. 

५) संत सुंदरर ह्यांना येथे भगवान दक्षिणामूर्तींकडून पंचाक्षर मंत्राचा उपदेश मिळाला. 

६) आदि शंकराचार्यांना इथे भगवान दक्षिणामूर्तींकडून महावाक्याचा उपदेश मिळाला. 

७) श्री वीरभद्र, कश्यप ऋषी, विश्वामित्र ऋषी, मुचगंद राजा ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. 

८) एकदा श्री पार्वती देवी फुलांच्या चेंडूबरोबर खेळत असताना तिनें चेंडू उंच उडवला आणि तो झेलण्यासाठी तिने आपले हात वरती केले. श्री सूर्य देवाला वाटले की हा आपल्यासाठी थांबण्याचा संकेत आहे म्हणून तो थांबला. पण ह्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरचं जीवन, जे सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे, ते विस्कळीत झालं. जेव्हां भगवान शंकरांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी श्री पार्वतीदेवीला पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितले. असा समज आहे की ह्या ठिकाणी श्री पार्वती देवीने भगवान शंकरांना परत प्रसन्न करून त्यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. आणि तो विवाह येथून जवळ असलेल्या थिरूमनमंगला ह्या ठिकाणी संपन्न झाला. ह्या विवाहाच्या वेळेस सर्व देव उपस्थित होते. हे मंदिर स्वतः श्री पार्वती देवीने निर्माण केले आहे असा समज आहे. ह्या स्थळाला पूर्वी काशीअरण्य असे म्हणत आणि म्हणूनच ह्या स्थळाला काशी इतकेच महत्व आहे. 

९) गजमुख नावाचा असुर होता जो देव आणि मानवांना खूप कष्ट देत होता. भगवान शंकरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच श्री गणपतीला गजमुखाला शिक्षा देण्यासाठी पाठवले. म्हणूनंच ह्या स्थळी गणपतीचे मंदिर आहे आणि इथल्या गणपतीला कात्त-विनायगर (कात्त = (रक्षणकर्ता) + विनायक (गणपती) + आकार) असे नांव आहे. 

इतर देवस्थाने: 

श्री विनायक, श्री वळ्ळी आणि श्री दैवनै ह्या दोन पत्नींसमवेत श्री मुरुगन, श्री शिवकामी समवेत श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री सूर्य, श्री चंद्र, विशालाक्षी समवेत श्री काशी विश्वनाथ, सप्तलिंग (सूर्येश्वरर, सोमेश्वरर, घृष्णेश्वरर, सोमनाथ, सप्तऋषीनादर, विश्वनाथ, ब्रह्मेश्वर), श्री वरदराज पेरुमल आणि श्रीदेवी, नालवर, श्री शनि, श्री भैरव, श्री सप्तमाता, ऋषी विश्वामित्र आणि ऋषी अगस्त्य ह्यांच्या मुर्त्या परिक्रमेमध्ये दिसतात. 

गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, म्हणजेच कोष्टम् मध्ये, कोष्ट मुर्त्या आहेत. भगवान दक्षिणामूर्तींचे स्वतंत्र देवस्थान आहे आणि त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते. 

मंदिरातील अजून काही वैशिष्ठ्ये: 

१) इथे भगवान दक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी केली जाते. अन्य देवांची नाही. 
२) इथे स्वतंत्र नागसंनिधी आहे. नागदोषाचे निवारण होण्यासाठी इथे पूजा करतात. ह्या गावी कधी नागदंशामुळे मृत्यू होत नाही. 
३) इथे सायंकाळी भगवान शिवांची पूजा केली जाते. 
४) भगवान मुरुगन ह्यांची पूजा करण्याआधी ऋषी अगस्त्य ह्यांची पूजा केली जाते. 
५) श्री महालिंगेश्वर ह्यांच्या परिवार स्थळांमध्ये पुढील देवस्थाने आहेत: १) श्री थिरुवलमचुळी विनायक देवस्थान, २) श्री स्वामी मलय देवस्थान, ३) आलंगुडी भगवान दक्षिणामूर्ती देवस्थान, ४) श्री थिरुवडुदुराई नंदी देवस्थान, ५) श्री सूर्यनार कोविल नवग्रह स्थळ, ६) श्री थिरुवप्पडी चंडिकेश्वर देवस्थान, ७) श्री चिदंबरम नटराज देवस्थान, ८) सिरकाळी श्री भैरव देवस्थान, ९) थिरुवरुर श्री सोमस्कंद देवस्थान 

हे मंदिर पवित्रतीर्थ, पवित्रस्थळ आणि मूर्ती स्थळ (देव गौरव स्थळ) म्हणून पुजलं जातं. 

साजरे होणारे सण: 
गुरु भ्रमण (तामिळ मध्ये गुरु पेयार्ची) -गुरु ग्रह जेव्हा एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, तो दिवस इथे साजरा केला जातो

चित्राई (एप्रिल-मे):  चैत्र पौर्णिमा 

पंगूणी (मार्च-एप्रिल): उत्तरम् रथयात्रा

थाई (जानेवारी-फेब्रुवारी): थाई पुसम - तामिळ थाई महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा पुष्य (तामिळ मध्ये पुसम) नक्षत्र असतं त्यावेळी हा सण साजरा केला जातो.   
  
प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment