Sunday, July 30, 2023

श्री दर्भारण्येश्वरर मंदिर थिरुनळ्ळारू, शनि ग्रहाचे मंदिर

हे मंदिर पॉंडिचेरी मधल्या कारैक्कल जिल्ह्यातल्या थिरुनळ्ळारू गावात आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे जरी शिव मंदिर असलं तरी नवग्रहांपैकी शनि स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 


मुख्य दैवत: श्री दर्भारण्येश्वरर, श्री थिरुनळ्ळार-इश्वरर्

देवी: श्री प्राणांबिका, श्री भोगमार्ता - पुण्मुलैयाल, श्री प्राणेश्वरी

क्षेत्र वृक्ष: दर्भ

पवित्र तीर्थ: नळ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. अन्न तीर्थ आणि गंगा तीर्थ ही तीर्थे नळविनायक मंदिराच्या जवळ असलेल्या एका विहिरी मध्ये आहेत. ह्या शिवाय इथे अष्ट दिक्पालांपैकी  प्रत्येक दिक्पालाचं एक अशी आठ तीर्थे आहेत. 


वैशिष्ठ्य: पुराणांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे हे स्वयंभू शिवलिंग दर्भ गवतामध्ये सापडलं हे दर्शवणाऱ्या दर्भ गवताच्या खुणा ह्या शिवलिंगावर दिसतात. 


हे स्थळ सप्त विडंग स्थळांपैकी एक आहे. ५१ शक्तीपीठांपैकी पण हे एक पीठ समजलं जातं.


आख्यायिका

पुराणांनुसार, सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली. 


शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यां लिंगांची तपश्चर्या केली. 


ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नळ्ळार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नळ्ळेश्वर आहे.  


अजून एका पुराणांतील आख्यायिकेनुसार पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूंनी इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांची उपासना केली आणि त्यांना मन्मथ हा पुत्र झाला. ह्याची परतफेड म्हणून भगवान विष्णूंनी इथे सोमस्कंद मूर्तीची (भगवान शिव आणि माता पार्वती आणि त्यांच्यामध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय) स्थापना केली. पुढे काही काळानंतर भगवान विष्णूंनी ही मूर्ती इंद्र देवाला दिली. इंद्रदेवाने ह्या मूर्तीची उपासना केल्याने त्याला जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री ह्यांची प्राप्ती झाली. इंद्रदेवाने नंतर ह्या मूर्तीच्या अजून सहा प्रतिकृती केल्या आणि त्या सर्व त्याने मुचगंद राजाला दिल्या. मुचगंद राजाने त्याला मिळालेल्या सात मुर्त्यांची सात ठिकाणी स्थापना केली आणि ह्या सर्व सात स्थळांना सप्तविडंग असं संबोधलं जातं. हे सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाला त्यागराज विडंग असं पण संबोधलं जातं.


ह्या मंदिरातील इतर देवस्थाने:

मुख्य देवस्थानाच्या दक्षिण दिशेला मेंढपाळ, त्याची पत्नी आणि लेखापाल (अकाउंटंट) ह्यांच्या मुर्त्या आहेत. आख्यायीका अशी आहे की मंदिराला दूध पुरविण्याच्या हिशोबावरून लेखापालाने मेंढपाळाला फसविले. गावाच्या राजाकडून मेंढपाळाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालाचा आपल्या त्रिशुळाने वध केला. भगवान शिवांनी लेखापालावर फेकलेल्या त्रिशुळाला मार्ग देण्यासाठी नंदी आणि बलीपीठ थोडे बाजूला झाले. म्हणूनच नंदी आणि बलीपीठ हे आजही शिवलिंगाच्या सरळ रेषेमध्ये नाहीये. 


आख्यायिकेनुसार भगवान विष्णू, ब्रह्म देव, इंद्र देव, सरस्वती देवी, अष्टदिक्पाल, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस आणि अर्जुन ह्यांनी पण इथे शिवाची उपासना केली. 


आणखी काही वैशिष्ट्ये:

राजगोपुरमला नमस्कार करून मंदिरामध्ये शिरताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या चौकटीला शनिदेव लपलेले आहेत. आख्यायिकेनुसार शनिदेवांनी नळ राजाला त्रास दिल्याने भगवान शिव त्यांच्यावर क्रोधीत झाले आणि ह्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते ह्या प्रवेशद्वारामध्ये येऊन लपले. 


येथील इतर देवस्थाने:

श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री आदिशेष, श्री नायन्मार, श्री महालक्ष्मी, श्री सूर्य आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या पण येथे दिसतात. नळ राजा आणि त्याने पुजलेलं शिव लिंगपण येथे आहे. शिव मंदिरामध्ये सहसा असणाऱ्या कोष्ट मुर्त्या पण इथे दिसतात.  त्यागराज विडंग म्हणजे हिरव्या पाचूच्या विडंगाचे इथे स्वतंत्र देऊळ आहे.


मंदिरात साजरे होणारे सण:

१) शनी संक्रमण 

२) शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा असते 

३) पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): हिरव्या पाचूच्या लिंगाची विशेष पूजा केली जाते 

४) वैकासि (मे-जून): १० दिवस ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment