Wednesday, October 17, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ५

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ५" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे


देवीचे आठव्या दिवशीचे रुप

८. देवी महागौरी

श्र्वेते वृषे समारूढा श्र्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।

चंद्र किंवा शंखाप्रमाणे गौरवर्ण असलेली देवी महागौरी. देवी शुभ्र वस्त्रे परिधान करून तीचे वाहन असणार्या  पांढर्या  बैलावर स्वार आहे.

अती गौर वर्णामुळे हिचे नाव महागौरी पडले आहे. अशी आख्यायिका आहे की अती कठोर तपाने काळ्या पडलेल्या देवीँला श्रीशंकरानी गंगाजलाने धुवून स्वच्छ केले. तेंव्हा विद्युल्लतेप्रमाणे प्रकाशमान असा हा गौरवर्ण तीला प्राप्त झाला. 

हे देवीचे रुप आठ वर्षीय बालिकारुप मानले गेले आहे. देवीच्या विविध रुपांत हे बालिकारूप समाविष्ट केले आहे. सर्वच वयातील आणि सर्व रुपातील स्त्रीशक्तीचेच महत्त्व नाही का ?

नवरात्राच्या आठव्या दिवशी हिची उपासना होते. देवीच्या अमोघ शक्तीने भक्तांचे जन्मजन्मांचे पापक्षालन होते. भविष्यातही कुठल्या प्रकारच्या पाप,  संताप किंवा दुःखाची बाधा भक्तांना होत नाही. देवीच्या क्रुपेने अलौकीक सिद्धींची प्राप्ती होवून साधक सर्व प्रकारे पुण्यवान आणि पवित्र होतो. त्याला सदैव सत्याचीच प्रेरणा मिळून असत्याचा विनाश होतो.

देवीचं हे रुप बालिकेचं आहे. लहान मुलीसारखच पवित्र आणि निर्मळ. शुभ्र वस्त्रे, शुभ्र व्रुषभ हे वाहन, शुभ्र गौरवर्ण ही सर्व ह्या निर्मळतेचीच प्रतिके.

देवी महागौरीच्या क्रुपेने आपणासही शुचीपूर्ण जीवन लाभो आणि आपणास सर्व प्रकारच्या पुण्यांची प्राप्ती होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment