Monday, October 15, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ३

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग ३" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीचे सहाव्या दिवशीचे रुपे 

६. देवी कात्यायनी

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यादेवि दानवघातिनी॥॥

देवीचे सहावे रूप आहे कात्यायनीकत नामक ऋषीकुलात कात्यायन ऋषींची प्रार्थना स्विकारुन त्यांची पुत्री म्हणून जन्म घेणारी - कात्यायनी.

कालिन्दी तटावर श्रीक्रुष्णाकडून आपला उद्धार व्हावा ह्या हेतूने गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली. तेव्हापासून ब्रजवासींची ईष्टदेवता म्हणून हिची स्थापना झाली. देवीचे रूप अतिशय भव्य-दिव्य असे आहे. देवीची कांती सुवर्णासमान प्रकाशमान आहे. चतुर्भुजा देवीच्या चार हातांपैकी उजवा एक हात वरमुद्रेत आणि एक अभय मुद्रेत आहे. तर डाव्या एका हातात तलवार आणि एका हातात कमळ आहे.

देवीचे वाहन सिंह आहे. देवी कात्यायनीची पूजा नवरात्राच्या सहाव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन आज्ञा चक्रावर स्थीर असावे. ह्या चक्राचे योगसाधनेतील महत्त्व अनन्य साधारण आहे. आज्ञा चक्रावर स्थीर अवस्थेत साधक देवीला सर्वस्व अर्पण करून संपूर्ण शरणागतीने स्वतःला समर्पित करतो. आणि ह्या साधनेचे फळ म्हणजे साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अश्या चारही फळांची प्राप्ती होते. 
देवी कात्यायनीच्या भक्तांची रोग, चिंता आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता होते.

सिंहावर आरुढ झालेली देवी कात्यायनी भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करुन भक्तांना निर्भय करतेच आणि संपन्नतेसाठी वर प्रदान करते. देवी कात्यायनीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना निर्भयता आणि संपन्नता लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment