Sunday, October 14, 2018

नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - 2

"नवरात्री: नऊ रात्रींचा उत्सव - भाग २" - सौ. उत्तरा धनंजय गोगटे

देवीची चौथ्या आणि पाचव्या दिवशीची रुपे 

४. देवी कूष्माण्डा

सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तु मे।।

स्रुष्टीच्या निर्मितीच्याही आधी हिचे अस्तित्व मानले जाते. आपल्या मंद हास्यातून संपूर्ण स्रुष्टी निर्माण करणारी आदिमाया आदिशक्ती - देवी कूष्माण्डा. 

आठ हात असलेली ही अष्टभूजा. आठ हातात अनुक्रमे कमण्डलु, धनुष्य, बाण, कमळ, अम्रुतकलश, चक्र, गदा आणि जपमाळ आहे.

किती परिपूर्ण असं हे रूप आहे नाही का? एकाच वेळी विविध शस्त्रे - शौर्याचं प्रतिक, कमलपुष्प - कोमलता आणि सम्रूद्धीचं प्रतिक, कलश - दीर्घायुष्य आणि मांगल्याचं प्रतिक, आणि जपमाळ हे योगाचं प्रतिक. 

देवीचे तेज अतुलनीय आहे.  ब्रम्हांडातील सर्वच तेजाचा स्त्रोत कूष्माण्डादेवी आहे. असं म्हणतात की प्रत्यक्ष सूर्यमंडलाचा गाभा हीचे  निवासस्थान आहे. येवढे तेज इतर कुणाचेही अगदी सूर्याचेही नाही.

नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिची उपासना होते आणि साधक आपले मन अनाहत चक्रावर एकाग्र करतात. अत्यंत तेजोमयी असणारी कूष्माण्डा भक्तांचे मनोरथही अती शिघ्रतेने पुरवते. आई कूष्माण्डेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व रोग आणि दुःखांचा विनाश होतो. हीची उपासना आयुरारोग्य, यश आणि बल, शक्ती असे  फळ देणारी आहे. देवी कूष्माण्डेच्या क्रुपेने आपले आयुष्य सर्व व्याधिमुक्त आणि सुखसम्रुद्धीने युक्त होवो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

५. देवी स्कन्दमाता

सिंहासनगता नित्यम् पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।

स्कंद म्हणजे कार्तिकेय. अत्यंत पराक्रमी,  देवगणांचा सेनापती स्कंद. आणि त्याची माता म्हणून स्कंदमाता. स्वतःच्या  मुलाच्या नावाने प्रसिध्द असे हे मात्रुरुप. ह्या मात्रुरुपात देवी चतुर्भुजा असून आपल्या एका हाताने बालस्कंदाला धरले आहे. दुसऱ्या आणि आणि तिसऱ्या हातात कमलपुष्प असून एक हात वरमुद्रा स्थितीत आहे. ही पद्मासना असून सिंह हे देवीचे वाहन आहे.

स्कन्दमातेची पूजा नवरात्राच्या पाचव्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी साधकाचे मन विशुध्द चक्रावर स्थीर  असावे. ह्या अवस्थेतील साधकाच्या समस्त चित्तव्रुतींचा लोप होवून मन विशुध्द आणि सर्व बंधनातून मुक्तीचा अनुभव घेते.

अशी ही सिंहासनी, पराक्रमी रणरागिणी, हातातील कमळाने कोमलतेची आणि बालस्कंदाच्या अस्तित्वाने हळव्या तरीही कर्तव्यकठोर आणि वत्सल मात्रुशक्तीची प्रत्यक्ष मूर्ती नव्हे का?

स्कन्दमातेच्या उपासनेने भगवान कार्तिकेयाचीही उपासना आपसूकच घडते आणि हा घोर भवसागर पार करण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो.

देवी स्कन्दमातेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण होवून सर्वांना शांती आणि सुखसमाधान लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment