Sunday, July 14, 2024

थिरुवीरुकुडी येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे पाचवं मंदिर आहे. तामिळनाडूमधल्या थिरुवरुर जिल्ह्यामध्ये थिरुवीरकुडी ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. ह्या ठिकाणी जालंधरसंहार ही घटना घडली. 

मुलवर: श्री विराट्टेश्वरर 

देवी: श्री परिमल नायकी, श्री एळवरकुळली 

उत्सवर: श्री जालंधरसंहार मूर्ती

क्षेत्र वृक्ष: तुलसी

पवित्र तीर्थ: चक्र तीर्थ, शंख तीर्थ

पुराणिक आणि वर्तमान नाव: थिरुवीरकुडी

जिल्हा: थिरुवरुर, तामिळनाडू 

क्षेत्र पुराण:

एकदा श्री इंद्रदेव अहंकारी भावनेने भगवान शिवांचे दर्शन घेण्यासाठी कैलासावर गेले. भगवान शिवांना हे ज्ञात झालं तेव्हां भगवान शिव स्वतः द्वारपालाचे रूप घेऊन कैलासाच्या प्रवेशद्वारी थांबले आणि कैलासामध्ये प्रवेश करणाऱ्या श्री इंद्रदेवांना त्यांनी अडवले. तेव्हां श्री इंद्रदेवांना राग येऊन त्यांनी आपले वज्रास्त्र द्वारपालावर फेकले. भगवान शिवांनी क्रोधाने आपले तिसरे नेत्र उघडले. श्री इंद्रदेवांना जेव्हा कळलं की द्वारपाल हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत तेव्हां आपल्या भावनेची आणि कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. 

अजून एका आख्यायिकेनुसार भगवान शिव एकदा तपश्चर्येमध्ये ध्यानमग्न असताना त्यांच्या घामाचा एक थेम्ब सागरामध्ये पडला. ह्या थेंबातुन एक मुलगा जन्माला आला. ह्या मुलाने श्री ब्रह्मदेवांची दाढी ओढण्याचा प्रयत्न केला. श्री ब्रह्मदेवांच्या नयनातून अश्रू आले आणि त्यातील एक थेम्ब ह्या मुलावर पडला. हा मुलगा सागरामध्ये जन्माला आला म्हणून त्याचे नाव जालंधर असे पडले. मोठा झाल्यावर त्याने श्री ब्रह्मदेवांकडे वर मागितला ज्यामुळे त्याला मृत्यूचे भय राहणार नाही  आणि तो त्रैलोक्यावर राज्य करू शकेल. त्याच्या प्रयत्नांनी शेवटी त्याला असा वर मिळाला की जोपर्यंत त्याची पत्नी वृंदा हिचे पावित्र्य टिकेल तोपर्यंत त्याला मृत्यूचे भय राहणार नाही आणि तो त्रैलोक्यावर राज्य करू शकेल. हा वर मिळाल्यामुळे जालंधर खुप उन्मत्त झाला आणि त्याने देवांना त्रास द्यायला चालू केलं. त्याची उन्मत्तता एवढी वाढली कि त्याने भगवान शिवांचा नाश करायचं ठरवलं. भगवान शिव जालंधरासमोर एका ब्राह्मणाच्या वेशात आले. आणि त्यांनी आपल्या उजव्या पायाने जमिनीवर एक वर्तुळ काढले. त्या ब्राह्मणाने जालंधराला सूचित केले की जेव्हां हे चक्र त्याच्या (जालंधराच्या) डोक्यावर ठेवलं जाईल तेव्हा त्याचा (जालंधराचा) मृत्यू होईल. जालंधराने त्यांना उन्मत्तपणाने सांगितले की हे शक्य होणार नाही कारण त्याची पत्नी वृंदा तिचे पावित्र्य टिकवून आहे. वृंदा हि भगवान विष्णूंची भक्त होती. भगवान शिवांनी भगवान विष्णूंना वृदांकडे जालंधराचे रूप घेऊन पाठवलं. जालंधर रूपातल्या भगवान विष्णूंना पाहून आपला पतीच आला आहे असे समजून वृंदाने त्याची सेवा केली ज्यामुळे तिचे पावित्र्य भंग पावले. आणि त्याच वेळी जालंधराने भगवान शिवांनी बनवलेले चक्र आपल्या डोक्यावर ठेवले आणि त्याचा मृत्यू झाला. जेव्हां वृंदाला हे कळले कि भगवान विष्णूंनी तिच्या पतीचे रूप घेऊन तिचे पावित्र्य भग्न केले तेव्हां तिने भगवान विष्णूंना शाप दिला की त्यांना त्यांच्या पत्नीला गमवावे लागेल. तिने अग्नी मध्ये आत्मसमर्पण केले. ह्या घटनेमुळे भगवान विष्णूंचे मानसिक संतुलन बिघडले. अग्निमध्ये जळालेल्या वृंदेच्या शरीराच्या भस्मामध्ये भगवान शिवांनी एक बीज टाकले ज्यामुळे त्यातून एक वनस्पती उगवली ज्याला तुलसी असे नाव प्राप्त झाले. जेव्हां तुळशीचा हार भगवान विष्णूंच्या कंठामध्ये घातला तेव्हांकुठे भगवान विष्णूंचे मानसिक संतुलन मूळ स्तिथी मध्ये आले. 

भगवान विष्णूंना भगवान शिवांकडून जालंधराच्या मृत्यूला कारणीभूत झालेले चक्र मिळविण्याची इच्छा झाली. त्यांनी १०० कमळांनी भगवान शिवांची आराधना केली आणि ते चक्र प्राप्त केलं. 

भगवान शिवांचे येथे जालंधरसंहार मूर्ती असे नाव प्रसिद्ध झाले. 

श्रेष्ठ नायनमार श्री अप्पर यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ ह्या मंदिराची देखभाल करण्यात घालवला असा समज आहे. 

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर १५०० वर्षे जुने आहे. ह्या मंदिराला पांच राजगोपुरें आहेत आणि दोन परिक्रमा आहेत. एका राजगोपुराच्या समोर असलेलं चक्र तीर्थ हे खूप भव्य आहे. ह्या तीर्थाच्या बाजूला श्री विनायकांचं देवालय आहे. येथील शिव लिंग स्वयंभू असून चौकोनी वेदिवर आहे. हे पश्चिमाभिमुख मंदिर. श्री देवींची मूर्ती उत्तराभिमुख आहे. 


मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:

मंदिरात प्रवेश केल्यावर एक नागलिंग आहे. बाहेरच्या परिक्रमेमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती आहे. जिथे भगवान शिवांनी वृंदा म्हणजेच जालंधराच्या पत्नीला जिथे तुळशीच्या रूपात पुनरुज्जीवित केलं ती जागा येथून जवळच आहे. बाहेरील परिक्रमेमध्ये श्री गणेश, श्री महालक्ष्मी, दैवनै आणि वल्लींसमवेत श्री मुरुगन, श्री भैरव, नालवर, श्री सोमस्कंदर आणि नवग्रह संनिधी आहे. ज्ञान तीर्थ नावाची एक विहीर ह्या मंदिरात आहे. कोष्टामध्ये श्री ब्रह्मदेव, श्री दक्षिणामूर्ती, श्री विष्णू, श्री नर्दन गणपती आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. 

वैशिष्ट्ये:

हे स्थळ वास्तुदोष परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. असा समज आहे की ह्या मंदिरातला एखादा छोटासा दगड नवीन घर बांधताना त्यामध्ये वापरला तर वास्तूमधले सर्व दोष निघून जातात. हे स्थळ पितृदोष परिहार स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहे तसेच श्री मारुतींच्या आराधनेसाठी पण प्रसिद्ध आहे. 

मंदिरात साजरे होणारे सण:

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम्

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरूद्र दर्शन

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि

ह्याशिवाय श्रेष्ठ नायनमार श्री अप्पर ह्यांचा उत्सव पण इथे साजरा होतो.

पूजा:

दैनंदिन, साप्ताहिक आणि पाक्षिक पूजा केल्या जातात. 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment