अष्टविराट्ट स्थळांमधलं हे चौथं मंदिर आहे. मयीलादुथुराई-सेंबनार कोविल मार्गावर किळ परसलूर ह्या गावामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. श्री संबंधर ह्या नायनमारांनी ह्या मंदिराची स्तूती केली आहे. दक्ष संहार ह्या पौराणिक घटनेशी हे स्थळ निगडीत आहे.
मूलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री दक्षपूरीश्वरर, श्री यागसंहारमूर्ती
उत्सव मूर्ती: श्री दक्षसंहारमूर्ती
देवी: श्री बालांबिका, श्री इलम्कोम्बन्याल
क्षेत्र वृक्ष: फणस, बिल्व, पारिजात (तामीळमध्ये पवळमल्ली)
पवित्र तीर्थ: उत्तरवेदिका, होमकूंड, चंद्रपूष्करिणी
पौराणिक नाव: थिरूपरीयालूर
वर्तमान नाव: कुळ परसलूर
जिल्हा: नागपट्टिणम्, तामिळनाडू
क्षेत्र पूराण:
श्री पार्वती देवींचे एक नाव आहे दाक्षायणी म्हणजेच दक्ष राजाची पूत्री. दाक्षायणीने पित्याच्या इच्छेविरूद्ध जाऊन भगवान शिवांशी विवाह केला. दक्ष राजाला हे पसंत नव्हतं. त्यांना गोसावी रूप असलेल्या भगवान शिवांबद्दल काही आदर नव्हता. दक्ष राजाने ह्या ठिकाणी एक यज्ञ आयोजित केला. ह्या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवदेवतांना निमंत्रण दिलं. पण भगवान शिवांना त्यांनी वगळलं. असं असूनही श्री पार्वती देवींना यज्ञामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली. त्या भगवान शिवांच्या म्हणजेच त्यांच्या पतीच्या इच्छेविरूद्ध त्या यज्ञात सहभागी झाल्या. दक्ष राजाने भर यज्ञसभेमध्ये त्यांचा अपमान केला आणि सर्वांसमक्ष भगवान शिवांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं. श्री पार्वती देवींनी आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न होऊन यज्ञकुंडात आत्मसमर्पण केलं. जेव्हां भगवान शिवांना ह्या घटनेची माहिती झाली तेव्हां त्यांनी क्रोधित होऊन श्री वीरभद्र आणि श्री कालीदेवींना यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी धाडलं. श्री वीरभद्रांनी यज्ञस्थळी येऊन यज्ञाचा विध्वंस केला. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या श्री विष्णू, श्री ब्रम्हदेव, श्री चंद्र, श्री सूर्य आणि इतर सर्व देवदेवतांना शिक्षा दिली. दक्ष राजाचा शिरच्छेद केला. श्री पार्वती देवींना आपल्या पित्याच्या अवस्थेची दया आली आणि भगवान शिवांना दक्ष राजाला क्षमा करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी श्री पार्वती देवींच्या विनंतीस मान देऊन दक्ष राजाच्या धडाला मेंढीचे शिर जोडले. दक्ष राजाला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. ही प्रार्थना मेंढीच्या हंबरण्यासारखी भासली. त्यांच्या प्रार्थनेच्या प्रत्येक वाक्याचा शेवट “च मे” “च मे” असा मेंढीच्या हंबरण्यासारखा ऐकू येत होता. म्हणून ह्या प्रार्थनेला चमक असं नाव प्राप्त झालं. भगवान शिवांच्या आज्ञेनूसार ही प्रार्थना रूद्रसूक्तामध्ये समाविष्ट केली गेली.
येथील यज्ञकुंड पुढे जाउन ह्या मंदिराचे तीर्थ (तलाव) बनला. इथे दक्ष राजाने यज्ञ केला म्हणून ह्या स्थळाला दक्षपूरी असं नाव प्राप्त झालं.
मंदिराबद्दल माहिती:
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक लोखंडाचा मंडप आहे. २००० वर्ष जूनं असलेलं हे छोटं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आहेत. इथे ध्वजस्तंभ नाही. भगवान शिवांच्या लिंगासमोर श्री नंदि आणि बलीपीठ आहे.
मंदिरातील इतर मूर्त्या आणि देवालये:
श्री देवीचे देवालय दक्षिणाभिमुख आहे. इथल्या मंडपामध्ये श्री वीरभद्रांची सहा हात असलेली मूर्ती आहे. अर्धजाम पूजा ही फक्त श्री वीरभद्रांचीच केली जाते. ह्या मूर्तीच्या मागल्या बाजूला एक यंत्र आहे. श्री दक्षसंहार मूर्ती श्री देवींच्या मूर्तीशेजारी श्री देवी आणि भगवान शिवांच्या देवालयांच्या मधे आहे. परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री विश्वनाथ, श्री भैरव आणि श्री सूर्य यांच्या मूर्त्या आहेत. कोष्ठामध्ये श्री दुर्गा देवी, श्री ब्रम्हदेव, श्री लिंगोद्भवर, श्री दक्षिणामूर्ती, श्री चंडीकेश्वर ह्यांच्या मूर्त्या आहेत. श्री सुब्रमण्यम्, ज्यांचे इथे श्री सेंथील आंडवर असे नाव आहे, त्यांची आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर एका पायावर उभे असलेली मूर्ती आहे.
इथे ध्वजस्तंभाच्या जागी श्री सिद्धिविनायकांची मूर्ती आहे. श्री सूर्यांचे स्वतंत्र देवालय आहे. पण इथे नवग्रह सन्निधी नाही. श्री दक्षपूरीश्वरर ह्यांच्या पायाशी दक्ष राजाची मूर्ती आहे. ह्याशिवाय इथे श्री महागणपती, श्री कर्पग विनायक, श्री महालक्ष्मी, श्री क्षेत्रपाल, श्री शिवसूर्य आणि चार महान शैव संत ज्यांना नालवर असं संबोधले जातं, त्यांच्या मूर्त्या आहेत.
मूख्य मंडपामध्ये श्री विनायक, श्री वीरभद्र, श्री नटराज आणि श्री सोमस्कंध ह्यांच्या उत्सव मूर्त्या आहेत. श्री वीरभद्र ह्यांच्या मूर्तीसमोर दक्ष राजा (मेंढीचे शिर असलेले) आणि त्यांची पत्नी ह्यांची मूर्ती आहे. श्री काशी विश्वनाथ ह्यांच्या मूर्तीसमोर श्री काळभैरव आणि श्री नर्दन विनायक ह्यांच्या मूर्त्या आहेत.
वैशिष्ट्य:
रूद्राभिषेक हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे कारण रूद्राभिषेकाची प्रथा ह्याच मंदिरातून सूरू झाली असा समज आहे. श्री वीरभद्रांचं हे पहिले मंदिर आहे. श्री वीरभद्रांनी दिलेल्या शिक्षेमूळे श्री सूर्यांनी आपला एक दात गमावला. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस भगवान विष्णू आणि श्री ब्रम्हदेव ह्यांच्या विनम्र मूद्रा असलेल्या मूर्त्या आहेत. श्री अरूणागिरीनाथर ह्यांनी इथे भगवान शिवांच्या स्तूतीपर स्तोत्रे गायली आहेत. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी दक्ष राजाची सर्व वरदाने काढून घेतली म्हणून ह्या स्थळाला परीयालूर असं नाव प्राप्त झालं.
ज्यांनी इथे उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, श्री ब्रम्हदेव, श्री इंद्रदेव, श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती, श्री अग्नीदेव, श्री यमदेव, श्री वायुदेव, श्री वरूण देव, श्री कूबेर आणि सप्त ऋषी
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): तामीळ नववर्षदिनी ईथे दिवसभरात सहावेळा अभिषेक केला जातो.
वैकासी (मे-जून): श्रवण नक्षत्रावर विशेष अभिषेक होतो
आनी (जून-जूलै): अश्विनी नक्षत्रावर विशेष पूजा केली जाते
आडी (जुलै-ॲागस्ट): ह्या महिन्याच्या पहिल्या दिवशी श्री दक्षसंहार मूर्तीवर अभिषेक होतो. तसेच पूर्वा फाल्गूनी नक्षत्रावर उत्सव साजरा होतो.
पुरत्तासी (सप्टेंबर-ॲाक्टोबर): श्री विनायक चतुर्थी आणि नवरात्र हे उत्सव साजरे होतात
ऐप्पासी (ॲाक्टोबर-नोव्हेंबर): अष्टमी पूजा, अन्नाभिषेक
कार्थिगाई (नोव्हेंबर-डिसेंबर): ह्या महिन्याच्या शेवटच्या शूक्रवारी भगवान शिवांची मिरवणूक काढली जाते.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरूद्र दर्शन
थै (जानेवारी-फेब्रूवारी): मकर संक्रांत, अमावास्येला अभिषेक, रूद्राभिषेक
पूजा:
दैनंदिन आणि पाक्षिक पूजा केल्या जातात
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment