अष्टविराट्ट स्थळांमधलं हे सातवं मंदिर आहे. हे पुराणातील मन्मददहन (कामदेव) कथेशी निगडित आहे. मयीलादुथुराई-मनलमेडू मार्गापासून १२ किलोमीटर्स अंतरावर आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. थिरुनवुक्करसर ह्या नायनमारांनी ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची स्तुती गायली आहे. कावेरी नदीच्या उत्तरेकडील काठावर साधारण २.५ एकर वर हे मंदिर पसरलेलं आहे.
मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री योगेश्वरर
देवी: श्री ज्ञानांबिका
क्षेत्र वृक्ष: हरितागी (मराठी मध्ये हरडा वृक्ष)
पुराणिक नाव: कामदहनपुरं, कंपक्कपुरं, योगेश्वरपुरं, थिरुकुरक्कई
वर्तमान नाव: कुरक्कई
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
पुराणांनुसार कामदेवदहन ह्या कथेशी हे स्थळ निगडित आहे. पौराणिक कथेनुसार सुरपद्मन आणि धारकन हे दोन राक्षस देव, ऋषी, गंधर्व, मनुष्य ह्यांच्यावर अत्याचार करत होते. त्यांना वरदान मिळालं होतं कि त्यांचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल. ध्यानमग्न असलेल्या भगवान शिवांकडें सर्व देव मदतीसाठी धावले. पण त्यांना भीती होती कि भगवान शिवांच्या ध्यानामध्ये व्यत्यय आल्यास त्यांच्या क्रोधाला त्यांना सामोरं जायला लागेल. शेवटी त्यांनी श्री कामदेवांची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी श्री कामदेवांना भगवान शिवांना ध्यानामधून बाहेर काढण्याची विनंती केली जेणेकरून भगवान शिवांमध्ये काम जागृत होऊन त्यांना पुत्र होईल जो राक्षसांचा वध करू शकेल. कामदेवांनी त्यांचे मदन बाण भगवान शिवांवर सोडले. भगवान शिव ध्यानामधून बाहेर आले. पण ते कामदेवांवर क्रोधीत झाले आणि त्यांनी आपले तिसरे नेत्र उघडून कामदेवांना भस्मसात केले. श्री कामदेवांच्या पत्नी श्री रतीदेवी ह्यांना खूप शोक झाला. त्यांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांना श्री कामदेवांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊ भगवान शिवांनी श्री कामदेवांना पुनर्जीवित केलं पण ते फक्त रतीदेवींनाच दिसतील असं सांगितलं.
येथील शिवलिंगावर अजूनही पांच बाणांची चिन्हे दिसतात. म्हणूनच इथे भगवान शिवांचे नाव श्री कामांगनाशन तसेच श्री कामदहनमूर्ती असे आहे. ह्या मंदिराच्या आजूबाजूला अजूनही काही अशा जागा आहेत ज्या ह्या कथेशी निगडित आहेत.
जिथे श्री कामदेवांनी भगवान शिवांना ध्यानामधून बाहेर काढण्यासाठी बाण सोडायचं ठरवलं त्या जागेचं नाव कनंगपुथूर असे आहे. जिथे श्री कामदेवांनी दूध प्यायलं त्या जागेचं नाव पलकुडी असे आहे. जिथे श्री कामदेवांनी हातामध्ये बाण घेतला त्या जागेचं नाव विल्लीनूर असे आहे. जिथे त्यांनी बाण धनुष्याला लावला त्या जागेचं नाव कवलमेडू असे आहे. जिथे सर्व जणांनी बाण घ्यायला जमले त्या जागेचं नाव आहे जवनल्लूर. जिथे त्यांनी शेवटी बाण धनुष्यातून सोडला त्या जागेचं नाव मेट्टूकुरुक्काई असं आहे.
असा समज आहे की भगवान शिवांनी इथे हरितागी ह्या झाडाखाली ध्यान केलं. मराठीमध्ये ह्या झाडाला हरडा झाड म्हणतात. तमिळमध्ये ह्या झाडाला कडुक्कई म्हणतात. म्हणून भगवान शिवांचं येथे श्री योगेश्वरर असे नाव आहे. असा समज आहे की भगवान शिव ध्यानात असताना त्याच्या नयनांतून आनंदाश्रू बाहेर पडले आणि ते पळवरु नदीत मिसळले. ह्या नदीला आता ज्ञानतीर्थ असे नाव आहे.
श्री कुरुक्कई विनायकांचे पुराण:
तामिळ मध्ये कई म्हणजे जमीन आणि कुरुकी म्हणजे आकसणे. तिर्थवाहू नावाचे ऋषी श्री गंगेला आवाहन करून विविध शिव मंदिरांमध्ये भगवान शिवांची आराधना करायचे. ते जेव्हां इथे आले तेव्हां त्यांना गंगा प्राप्त नाही झाली कारण इथे शुलतीर्थ हे जास्त पवित्र मानलं जात होतं. जेव्हां त्यांनी गंगेचे पाणी आणण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्यांचे हात आकसले. जेव्हां त्यांनी श्री विनायकांच्या कृपाप्रसादाने भगवान शिवांची आराधना केली तेव्हां त्यांचे हात मूळ स्थितीमध्ये आले. म्हणून ह्या स्थळाला कुरुक्कई नाव प्राप्त झालं. आणि श्री विनायकांना श्री कुरुक्कई असं नाव प्राप्त झालं कारण त्यांचे हात खूप छोटे आहेत. श्री विनायकांच्या मूर्ती शेजारी तीर्थवारू ऋषींची मूर्ती आहे.
मंदिराबद्दल माहिती:
साधारण १५०० वर्षे जुनं असलेलं येथील शिव लिंग स्वयंभू आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आणि पांच स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिलालेखांमध्ये चोळा आणि विजयनगर साम्राज्यातल्या राजांनी केलेल्या कामाची माहिती आढळते. गाभारा अर्धवर्तुळाकार तलावाच्या रूपात आहेत. तामिळ मध्ये ह्याला अगळी असं म्हणतात. गाभाऱ्यासमोर असलेल्या मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे. तामिळ मध्ये वटवाघूळाला वव्वल असं म्हणतात तर कपाळाला नेथी असं म्हणतात. म्हणून ह्या मंडपाला वव्वल-नेथी-मंडप असे म्हणतात.
मंदिरामधल्या मुर्त्या आणि इतर देवालये:
शिव लिंगाच्या मुळाला कमळ पुष्प स्थापित केले आहे.
श्री मन्मद (कामदेव) आणि त्यांच्या पत्नी श्री रतीदेवी ह्यांच्या इथे उत्सवमुर्त्या आहेत. श्री गणेशांना इथे कुरुंगाई (छोटे हात असलेला) असे नाव आहे. भगवान शिवांची इथे श्री कामदहन नावाची मूर्ती आहे. त्यांचा उजवा पाय मोकळा आहे तर डावा पाय मांडीवर दुमडलेला आहे. उजवा हात अभय मुद्रेमध्ये आहे तर डावा हात डाव्या पायावर स्थित आहे. भगवान शिव येथे अनुग्रह मूर्ती आहेत. श्री कामदहन मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये आहे. श्री पार्वती देवींचे पण स्वतंत्र देवालय आहे. श्री गणेशांच्या देवालयावर गजपृष्ठ गोपुरं (विमान) आहे. भगवान विष्णूंचे इथे श्री सोहा हरेश्वरर (सोहा म्हणजे दुःख) असे नाव आहे. असा समज आहे की भगवान विष्णू त्यांच्या पुत्राचे म्हणजेच श्री कामदेवांचे दहन झाल्याने शोकमग्न झाले. भगवान विष्णूंचे इथे स्वतंत्र देवालय आहे. ह्याशिवाय इथे श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत, श्री महालक्ष्मी, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री भैरवर ह्यांच्या मुर्त्या आहेत.
कोष्टामध्ये श्री महागणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री दुर्गा देवी, आणि श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत.
परिक्रमेमध्ये नालवर ह्यांच्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्याच्या मागे श्री अन्नमलै ह्यांची मूर्ती आहे. श्री अन्नमलै ह्यांच्या दोन्ही बाजूला श्री भैरव आणि श्री विष्णू ह्यांच्या विनम्र मुद्रेमध्ये मुर्त्या आहेत. मुख्य मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर्स वर विभूतीकुट्टाई नावाची जागा आहे. असा समज आहे की ह्यां स्थळी श्री कामदेवांचे दहन झाले. भगवान शिवांनी श्री नटराज रूपामध्ये इथे वीरतांडव नावाचे नृत्य केले. म्हणून इथल्या सभेला कामनाशनसभा आणि शंभूविनोथासभा अशी नावे आहेत.
ह्या मंदिरामध्ये ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री लक्ष्मी देवी, श्री मुरुगन आणि श्री रतीदेवी
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): ३ दिवसांचा अरुद्र उत्सव
मासी(फेब्रुवारी-मार्च): १० दिवसांचा कामदहन उत्सव, माघ नक्षत्र उत्सव, महाशिवरात्री उत्सव, पंच मूर्तींची रथयात्रा
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): सोमवारी रात्री विशेष पूजा केली जाते आणि गाभाऱ्यामध्ये यंत्र पूजा केली जाते.
आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव
पंगूनी (मार्च-एप्रिल): उथिरम उत्सव, महाशिवरात्री, अमावास्येची प्रदोष पूजा
पोंगल, तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्ष ह्या दिवशी विशेष पूजा केली जाते.
भाविक जन येथे अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करतात.
हे वर्गदोषांसाठी परिहार स्थळ आहे.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.