अष्टविराट्ट स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. ७ एकर वर पसरलेलं हे मंदिर तामिळनाडू राज्यातील कूड्डलोर जिल्ह्यामध्ये पनृती गावापासून २ किलोमीटर वर थिरूवडिगाई ह्या गावामध्ये वसलेलं आहे. शैवसंत श्री संबंधर, श्री अप्पर, श्री सूंदरर ह्यांनी त्यांच्या काव्यरचनांमध्ये ह्या मंदिराची स्तूती केली आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे.
मूलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री विराट्टनर, श्री अथिगाइनादर, श्री थिरूकेडीवनर
देवी: श्री पेरीयनायकी, श्री त्रिपूरसूंदरी, श्री उमयअम्मन
उत्सवर: श्री चंद्रशेखर
क्षेत्र वृक्ष: बहर (तामिळ मध्ये सारा कोण्ड्रै)
पवित्र तीर्थ: शूल तीर्थ, कडीला नदी, चक्र तीर्थ
पौराणिक नाव: अहिगापूरी, थिरीअडिगाइ विरट्टनम्
वर्तमान नाव: थिरूवाडीगाइ, कडलूर जिल्हा
क्षेत्र पुराण:
त्रिपूरसंहार ह्या घटनेशी निगडीत हे स्थळ आहे. तारकासूर, कमलाक्ष आणि विद्यूनमाळी ह्या तीन दैत्यांनी प्रखर तपश्चर्या करून श्री ब्रम्हदेवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून वरदान प्राप्त केलं ज्यामुळे त्यांना मृत्यूचं भय उरलं नाही आणि त्यामुळे ते खूप शक्तिशाली झाले आणि देव आणि ऋषींवर अत्याचार करू लागले. ह्या अत्याचाराला कंटाळून देव आणि ऋषी भगवान शिवांकडे गेले आणि त्यांना ह्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्या दैत्यांचा नाश करण्याचं ठरवलं. त्यांनी पृथ्वीला रथ बनवलं, सूर्य आणि चंद्र यांना रथाची चाके बनवलं, श्री ब्रम्हदेवांना रथाचा सारथी बनवलं, देवांना आपलं सैन्य बनवलं, मेरू पर्वताला धनुष्य बनवलं, वासूकीला प्रत्यंचा आणि भगवान विष्णूंना बाण बनवलं. जेव्हां भगवान शिव रथावर आरूढ झाले तेव्हां रथाची धरा मोडली कारण ते भगवान विनायकाला नमस्कार करायला विसरले. नमस्कार केल्यानंतर ते रथावर यशस्वीरित्या आरूढ झाले. भगवान शिव मोठ्याने हसायला लागले आणि त्यांच्या मुखातून एक अग्नीचा गोल बाहेर आला. त्या अग्नीमध्ये ते तिघेही दैत्य भस्मसात झाले. त्या दैत्यांना भगवान शिवांनी माफ केलं. त्यातील दोन दैत्यांना त्यांनी आपले द्वारपाल बनवलं आणि एकाला आपल्या कूडमूळ ह्या संगीत वाद्याचं वादक बनवलं.
दुसऱ्या आख्यायिकेनूसार ह्या जागेमध्ये भगवान शिवांनी तीन दैत्य आणि त्यांच्या तीन नगरांचा नाश केला. ह्या कार्यामध्ये मदत म्हणून श्री सरनारायण पेरूमल ह्या रूपात श्री महाविष्णूंनी त्यांना बाण भेट दिला.
शिव पूराणानूसार त्रिपूरन दैत्य आणि त्रिपूर ह्या त्याच्या नगराचा भगवान शिवांनी संहार केला. म्हणूनच भगवान शिवांना त्रिपूरांतक हे नाव प्राप्त झालं. भस्मसात झालेल्या नगरांचं भस्म भगवान शिवांनी आपल्या तीन अंगूलींनी आपल्या कपाळावर धारण केलं. इथूनच कपाळावर भस्माच्या तीन रेखा धारण करण्याच्या प्रथेचा उगम झाला.
थिरूनवूक्कूरसर ह्याचे आधीचं नाव वागीसर होतं. ते जैन धर्माचे अनुसरण करत होते. त्यांची भगिनी भगवान शिवांची भक्त होती. वागीसर हे शिवभक्त व्हावेत अशी तिची प्रबळ इच्छा होती. वागीसर ह्यांना एक असाध्य रोग जडला होता. त्यांच्या बहिणीने त्यांना विश्वास दिला कि ह्या स्थळी येउन भगवान शिवांची आराधना केल्यावर भगवान शिव त्यांना रोगापासून मूक्ती देतील. वागीसरांनी इथे येउन भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना इथल्या तीर्थामध्ये स्नान करण्याची आणि ह्या तीर्थाचं पाणी प्राशन करण्याची आज्ञा केली. वागीसरांनी ह्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांची ह्या रोगांतून मूक्तता झाली. भगवान शिवांनी त्यांना नवूक्करसर असं नाव प्रदान केलं. पुढे जाउन ते थिरूनवूक्करसर म्हणून प्रसिद्ध झाले.
भगवान शिवांनी येथे श्री अप्पर ह्यांना वराच्या पोषाखामध्ये दर्शन दिलं. श्री अप्पर आणि श्री सूंदरर हे दोघेही दर्शनासाठी आले होते. पण श्री सूंदरर बाहेर थांबले. मंदिराच्या बाजूला ते झोपले होते. त्यावेळी एका म्हाताऱ्या माणसाचा त्यांच्या हातावर पाय पडला. त्याकडे दुर्लक्ष करून श्री सूंदरर दुसऱ्या कूशीवर वळले. पण परत त्या म्हाताऱ्या माणसाचा पाय त्यांच्या हातावर पडला. त्यानंतर तो म्हातारा माणूस अदृश्य झाला आणि त्यांच्या जागी भगवान शिवांनी श्री सूंदरर ह्यांना दर्शन दिलं.
ह्या मंदिराला श्री सिद्धपूरीश्वरर असं पण नाव आहे.
जमीनीवर आपटून नारळ फोडण्याची प्रथा (तामीळ मध्ये ज्याला सिथरथेंगाइ म्हणतात) ह्या स्थळी चालू झाली असा समज आहे.
मंदिराबद्दल माहिती:
१५०० वर्षे जूनं असलेल्या ह्या मंदिरामध्ये दोन राजगोपुर आणि दोन परिक्रमा आहेत. राजगोपुर सात स्तरांचं असून त्यावर भरतनाट्यम् मूद्रा दाखवणाऱ्या १०८ मूर्त्या कोरलेल्या आहेत. दूसरं गोपूर पांच स्तरांचं असून ते दूसऱ्या परिक्रमेसाठी प्रवेशद्वार आहे. भगवान शिवांचा गाभारा आणि श्री पार्वती देवींचे देवालय दूसऱ्या परिक्रमेमध्ये आहे. इथे १६ स्तंभांचा सभागृह आहे ज्याचं नाव थिरूनित्रू मंडप असं आहे. शैव संत अप्पर ह्यांचं जैन संप्रदायामधून बाहेर पडून शैव संप्रदाय अंगिकारल्याचं हे प्रतिक आहे. बाहेरील परिक्रमेमध्ये एक बाग आहे ज्यामध्ये नक्षत्रे आणि राशी दर्शविणारी झाडे आणि वनस्पती आहेत. मंदिराचं तीर्थ (तलाव) दूसऱ्या गोपूराच्या दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. दूसऱ्या परिक्रमेच्या प्रवेशाच्या जवळून श्री नंदिंचं दर्शन घडतं.
मंदिरातल्या इतर मूर्त्या आणि देवालये:
गाभाऱ्यामधे भव्य शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगावर भस्माची १६ पवित्र निशाणे आहेत. गाभाऱ्याच्या आवारात श्री अय्यर अप्पर ह्यांची मूर्ती आहे. मंदिराचा प्रवेश दक्षिणेकडील प्रवेशद्वारामधून आहे. गाभाऱ्याच्या विमानावर बारा हात असलेले श्री त्रिपूरसंहार ह्यांचं शिल्प आहे. इथलं एक वैशिष्ट्य असं कि मुख्य दैवत म्हणजेच भगवान शिव ह्यांच्या गाभाऱ्यावरील गोपूराची सावली जमीनीवर पडत नाही. अशी स्थीती तंजावूर आणि कांचीपूरम् मधल्या मंदिरांमधे पण आहे.
गाभाऱ्याच्या भोवती तिन्ही बाजूला मूर्त्या आणि गोपूर ह्यामूळे गाभारा रथाच्या आकाराचा भासतो.
कोष्ठ मुर्त्या: श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गा देवी, श्री चंडिकेश्वरर, श्री अर्धनारीश्वरर. श्री पार्वती देवींच्या देवालयामध्ये श्री विष्णूंनी पुजलेलं शिव लिंग आहे. श्री पार्वती देवींचे देवालय भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहे. श्री मुरुगन ह्यांचे देवालय श्री पार्वती देवींच्या देवालयाच्या मागच्या बाजूला पश्चिमेकडच्या कोपऱ्यामध्ये आहे. आतल्या परिक्रमेमध्ये श्री थीलकवथीयर (श्री अप्पर ह्यांच्या भगिनी), ६३ नायनमार, श्री शनीश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री सिद्धिविनायक, श्री मुरुगन, शिव लिंगे, श्री नटराज, आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. मंदिराचे तीर्थाचे (तलाव) नाव चक्र तीर्थ आहे. ह्या तीर्थाच्या उत्तरेला मंडप आहे ज्याचे नाव वसंत मंडप आहे. मूळ मंदिर पल्लव साम्राज्याचा राजा महेंद्र वर्मा १ ह्याने बांधले. महेंद्र वर्मा आधी जैन सम्प्रदायाचे अनुसरण करत होता. नंतर त्याने शैव संप्रदायाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने आधी अस्तित्वात असलेल्या जैन मंदिराच्या जागी हे शिव मंदिर बांधले. जैन मंदिराच्या उर्वरित भागाचे साहित्य वापरून त्याने अजून एक शिव आणि विष्णूंचे मंदिर बांधले. राजा कलिंगरायन ह्याने ह्या मंदिराला बऱ्याच देणग्या दिल्या आणि काही अतिरिक्त बांधकाम पण केले.
थेवरं (पवित्र तामिळ स्तोत्रे) प्रथम ह्या मंदिरात गायली गेली. सर्व शिव आगमे इथे सूत्रबद्ध झाली. रथयात्रा आणि रथांची रचनाशैली ह्यांचा उगम पण इथेच झाला.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री इंद्र देव, श्री ब्रह्म देव, भगवान विष्णू, पांडव, सप्तऋषी, श्री वायुदेव, श्री वरुणदेव, श्री यमदेव. हे सगळे देव त्यांच्या रथांमधून इथे उपासनेसाठी आले. म्हणून हे मंदिराचा आकार रथासारखा आहे.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा वसंतोत्सव. ह्या उत्सवामध्ये मुलवर मूर्तीची विविध वाहनांवरून (देवांची वाहने) यात्रा काढली जाते. शतभिषा नक्षत्रावर श्री अप्पर ह्यांच्या मुक्तीचा उत्सव साजरा केला जातो.
वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव. पंचमुर्तींची विविध वाहनांवरून (देवांची वाहने) यात्रा काढली जाते.
आडी (जुलै-ऑगस्ट): १० दिवसांचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्सव, कृत्तिका नक्षत्रावर विशेष पूजा
मरगळी (डिसेंबर-जानेवारी): १ दिवसाचा अरुद्र दर्शन उत्सव, १० दिवसांचा माणिकवासगर उत्सव
ह्याशिवाय दैनंदिन पूजा, पाक्षिक पूजा (पौर्णिमा / अमावस्या), प्रदोष पूजा तसेच चतुर्थी पूजा साजऱ्या होतात. सोमवार आणि शुक्रवारी विशेष पूजा साजऱ्या होतात.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.