Sunday, April 21, 2024

श्री कुत्रालनाथर

पंचसभई स्थळांपैकी एक दुसरं मंदिर आहे. ह्या मंदिराचे नाव चित्रसभई आहे. हे मंदिर २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकीपण एक आहे. श्री थिरुनवूक्कुरसर, श्री संबंधर, श्री माणिकवचगर ह्या तीन नायनमारांनी येथे भगवान शिवाची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री कुत्रालनाथर

देवी: श्री पराशक्ती, श्री कुळालवैमोळी (ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत).

क्षेत्रवृक्ष: नीर फणस (तामिळ मध्ये कुरुंपाला)

क्षेत्रतीर्थ: शिवमधूगंगा, चित्रा नदी, वडारुवी)

पुराणिक नाव: त्रिकुटमलई, कुत्त्रालम


क्षेत्र पुराण:


जेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या विवाहासाठी ऋषी, मुनी, देव आणि इतर लोक कैलास पर्वतावर गोळा झाले, तेव्हा पृथ्वीचा उत्तरभाग म्हणजेच कैलास पर्वताचा भाग खाली जाऊ लागला. त्यामुळे पृथ्वी थोडी तिरकी झाली. भगवान शिवांनी अगस्त्य मुनींना दक्षिण दिशेला जाण्याची आज्ञा केली जेणेकरून पृथ्वी संतुलित राहील. अगस्त्य मुनींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहामध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. भगवान शिवांनी त्यांना सांगितलं कि जेव्हा अगस्त्य मुनी कुत्त्रालम मध्ये येऊन भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवतील, त्यावेळी ती मूर्ती शिवलिंगामध्ये रूपांतरित होईल. आणि त्यानंतर त्या स्थानावरून ते भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहाचे दर्शन घेऊ शकतील. अगस्त्य मुनी जेव्हा कुत्त्रालम मध्ये आले तेव्हा येथील भगवान विष्णूंच्या मंदिरातील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. अगस्त्य मुनी तिथून निघून जवळच्या गावामध्ये आले जिथे त्यांनी पांढऱ्यामातीचे शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा केली. त्यांनी भगवान शिवांना भगवान विष्णूंच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा तिथे भगवान मुरुगन प्रकट झाले आणि त्यांनी अगस्त्य मुनींना भगवान विष्णूंच्या मंदिरात विष्णुभक्ताचे रूप घेऊन जाण्यास सांगितले. अगस्त्य मुनी भगवान विष्णूंच्या मंदिरात आले आणि त्यांनी भगवान विष्णूंची पूजा केली आणि भगवान शिवांनी सांगितल्या प्रमाणे तेथे रूपांतर दिसायला लागले. भगवान विष्णूंचे शंख, तुलसी माला आणि इतर अलंकार ह्यांचे रूपांतर रुद्राक्षमाला, चंद्रकोर, नाग, डमरू आणि त्रिशूल ह्यांमध्ये झाले. अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवताच त्या मूर्तीचे शिवलिंगामध्ये रूपांतर झाले. आणि त्याचवेळी अगस्त्य मुनी तिथून भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहसोहळ्याचे दर्शन घेऊन शकले. ह्या घटनेच्या म्हणजेच अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवल्याच्या ठळक खुणा म्हणजेच शिवलिंगावर अंगुली छाप बघायला मिळतात. असा समज आहे कि अजून पण दिवसा देव भगवान शिवांची पूजा करतात तर रात्री अगस्त्य मुनी भगवान शिवांची पूजा करतात. 


ह्या मंदिराचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम जवळच्या गावातल्या मंदिराचे म्हणजेच जिथे अगस्त्य मुनींनी पांढऱ्या मातीचे शिव लिंग बनवून त्याची पूजा केली त्या मंदिराचे दर्शन घेतात.


मंदिराबद्दल महिती:

१५०० वर्षे जुनं असलेलं सध्याचे मंदिर हे राजराजर चोळा राजाने बांधले आहे. कालांतराने पांड्य आणि नायकर राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते इथे आधी भगवान विष्णूंचे मंदिर होते. 


इथले राजगोपुर तीन स्तरांचे आहे. प्रवेशद्वाराजवळ वसंत मंडप आहे ज्यावर तीन कलश आहेत आणि त्याचबरोबर बरीच शिल्पे आहेत. ह्या मंडपाच्या जवळ अजून एक मंडप आहे ज्यामध्ये ध्वजस्तंभ, श्री नंदि आणि बलीपीठ आहे. हे मंदिर शंखाच्या आकाराचे आहे ज्याला संगूकोणम. शंख हे श्री लक्ष्मीदेवींची शक्तीचे प्रतीक आहे. भगवान शिव हे स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात आहेत. ह्या शिवलिंगावर अगस्त्य मुनींचे अंगुलीछाप बघायला मिळतात. येथील पराशक्ती देवींचे देवालय हे ६४ शक्ती पीठांपैकी एक मानले जाते. श्री पराशक्ती श्री चक्रावर आहेत. ह्या स्थळाला पराशक्ती पीठ तसेच धरणी पीठ असं पण म्हणतात. पौर्णिमेला नऊ अंबिकांच्या आदरार्थ नवशक्ती पूजा केली जाते. (हे पीठ श्री अंबिका देवींच्या कृपा आणि शक्तीचे प्रतीक आहे). 


वैशिष्ट्य:


ह्या मंदिराला पाच प्रवेशद्वारे आहेत. ह्यातील चार प्रवेशद्वारे चार वेद दर्शवतात तर एक प्रवेशद्वार पिलवंधन ह्यांच्या आदरार्थ आहे. पिलवंधन इथे भगवान शिवांच्या वराच्या पोषाखामधील (मनकोलमनादर) नृत्य पाहायला आले. 


श्री पराशक्ती देवींचा भाव उग्र असल्याकारणाने त्यांना शांत करायला म्हणून त्यांच्या समोर श्री कामकोटीश्वर (शिव लिंग) स्थापन केले आहे. त्यांच्या देवालयासमोर श्री अन्नाविपिल्लै आणि इतर देवतांची पीठे आहेत. ह्या देवालयाच्या दक्षिण दिशेला श्री कैलासनाथर ह्यांचे देवालय आहे. आणि उत्तरेला श्री दुर्गा देवी आणि श्री वल्लभ गणपती ह्यांची देवालये आहेत. श्री मुरुगन ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत स्वतंत्र देवालय आहे. तसेच एक शिव लिंग आणि श्री अगस्त्य मुनींचे देवालय आहे. श्री अगस्त्य मुनींच्या पायाशी त्यांचा शिष्य शिवलायमुनी ह्यांची मूर्ती आहे. 


प्रकारामध्ये भगवान शिव विवाह पोषाखामध्ये आहेत. भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी श्री अंबिका देवींचे कन्यादान करत आहेत अशी मूर्ती आहे. श्री ब्रह्म ह्या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करत आहेत आणि अगस्त्य ऋषी व भृंगी ऋषी विवाहसोहळ्याचे साक्षित्व निभावत आहेत. इथे भगवान विष्णूंच्या श्री नन्नागम आणि भगवान कृष्ण ह्या रूपांची देवालये आहेत. कुरुंपाला (नीर फणस) फळे शिव लिंगाच्या रूपात आहेत. नीर फणसाचे झाड खूप जुने (१००० वर्षे) आहे ज्याची पूजा साक्षात भगवान शिवांनी केली असा समज आहे. प्रवेशद्वाराजवळील द्वारपालक एकमेकांशी संवाद साधत आहेत अशा मुद्रेतल्या त्यांच्या मुर्त्या आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला पंच भूत लिंगांचे दर्शन एकत्रित दर्शन घेता येते. श्री नटराज इथे चित्र स्वरूपात राहून ह्या सभेला शोभा देतात.


अर्जुन नेहमी आपल्याबरोबर एक संदुक ठेवायचा ज्यामध्ये शिव लिंग असायचं. ह्याची तो रोज पूजा करायचा. एकदा तो काशी मध्ये असताना हे संदूक हरवलं. तो जेव्हा ह्या स्थळी आला तेव्हा त्याला ते संदूक मिळालं. त्याने ते इथेच ठेवलं. हे संदूक इथे परिक्रमेमध्ये एका स्वतंत्र देवालयामध्ये आहे. इथे आपल्याला पश्चिमाभिमुख श्री विनायक, तसेच श्री कैलासकुत्रालनाथर, त्रिकुट मलई आणि कुत्रालम झरा ह्यांचं दर्शन एकाच बिंदूपासून घेता येतें. 


चित्रसभई:

ही सभा मंदिराच्या उत्तरेला एका स्वतंत्र देवालयामध्ये आहे. ह्या सभेच्या आतल्याबाजूला रामायण, महाभारत, पुराणांमधल्या कथां दर्शविणारी भित्तिचित्रे आहेत. सभेचं छत तांब्याच्या पत्र्याचे आहे. ह्यावर श्री नटराज त्रिपुर तांडव करत आहेत असं चित्र आहे. ह्याशिवाय इथे अजून पण चित्रे आहेत ज्यामध्ये पुढील घटनांचं चित्रीकरण केले आहे - अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवल्यानंतर त्याचे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले, भगवान शिवांनी मदुराई मध्ये केलेले चमत्कार. तसेच इथे श्री दक्षिणामूर्तींच्या विविध रूपांची पण चित्रे आहेत. ही चित्रे औषधी वनस्पतींपासून बनवलेले रंग वापरून केली आहेत. ह्या सभेच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडामध्ये कोरलेल्या मुर्त्या तसेच काही घटना पण ह्या कोरीव कामामध्ये चित्रित केल्या आहेत - शक्ती पीठ, श्री पार्वती देवी भरवण्याचा मुद्रेमध्ये, भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत, दक्षिण दिशेचे अधिपती श्री एकपादमूर्ती, श्री वीरभद्र, श्री गणेश, श्री मीनाक्षी देवी, श्री वृषभारूढर, श्री कंगलर, रावण अनुग्रह मूर्ती तसेच भगवान शिव यमदेवावर लथप्रहार करताना. मंदिराच्या तलावाच्या मध्यभागी गोपुर असलेला एक मंडप आहे. ह्या मंडपाच्या छतावर ८ कलश आहेत. ह्या सभेची द्वारे, तुळया तसेच छत हे कोरीव काम केलेल्या लाकडी फळ्या वापरून केले आहे. तामिळ मारगळी महिन्यात श्री नटराजांचा १० दिवसांचा थिरुवदुराई हा सण साजरा होतो ज्यामध्ये रथयात्रा पण साजरी होते. ह्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी विशेष पूजा होते ज्यामध्ये श्री नटराजांच्या नृत्याचे प्रतीक म्हणून दीप वरखाली केला जातो. ह्याला पांडव दीपाराधना असं नाव आहे. चित्राई महिन्यातील ब्रह्मोत्सवामध्येपण पांडव दीपाराधना केली जाते. 


कुत्रालं मध्ये कु हे भूत आणि वर्तमान जन्मामध्ये केलेल्या पापांचं प्रतीक आहे तर त्रालं हे पापविमोचनाचे प्रतीक आहे. म्हणजेच श्री कुत्रालनाथर ह्यांची आराधना केल्याने आपण आपल्या पापांचं विमोचन करू शकतो.


मंदिरात साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा भगवान विष्णूंचा उत्सव 

आडी (जुलै-ऑगस्ट): अमावास्येच्या दिवशी १ लाख दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा होतो. त्याच दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये १००८ दीप प्रज्वलित करून पत्रदीप उत्सव साजरा होतो.  

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ नक्षत्रावर विशेष पूजा साजरी होते.  

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): श्री पराशक्तीचा १० दिवसांचा नवरात्री उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): १० दिवसांचा भगवान विष्णूंचा उत्सव, थिरुकल्याणम् (विवाह सोहळा), १० दिवसांचा ब्रह्मोत्सव, स्कंदषष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम्

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): १० दिवसांचा थिरुवदुराई  उत्सव (अरुद्रदर्शन)

थै (जानेवारी-फेब्रुवारी): माघ नक्षत्रावर थेप्पोत्सव (तराफांचा उत्सव) साजरा होतो. तसेच महादीप पूजा पण साजरी होते. 

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्रि

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उथिरं, ब्रह्मोत्सव


ह्याशिवाय प्रत्येक दिवशी ८ वेळा मुकुट पूजा साजरी होते. 


मंदिराचा पत्ता:

श्री कुत्रालनाथर मंदिर, कौत्रालं, थिरुनेलवेली जिल्हा, तामिळनाडू ६२७८०२


दूरध्वनी: ९१-४६३३२८३१३८/४६३३२८३३९८, ९१-९४८८३७४०७७


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment