Sunday, April 14, 2024

थिरुनेलवेली येथील श्री नेल्लैअप्पर मंदिर

तामिळनाडू राज्यातल्या थिरुनेलवेली येथे हे शिव मंदिर स्थित आहे. आणि सर्व मंदिरात हे भव्य मंदिर मानलं जातं. थमीरा बरणी ह्या नदीच्या उत्तरेकडील काठावर हे मंदिर वसलेलं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळं ह्या नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी केली आहे. हे पंचसभई स्थळांपैकी पण एक स्थळ आहे जिथे भगवान शिवांनी तांडव नृत्य केले. पंचसभई मध्ये ह्या स्थळाला थमीरासभई (थमीरा म्हणजे तांबे) असं संबोधलं जातं. हे मंदिर १५०० वर्षे जुनं आहे. पूर्वी इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची स्वतंत्र मंदिरे होती. सतराव्या शतकामध्ये इथे संगिली (साखळी किंवा जोडणारा मंडप) बांधला गेला. इथे भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री गणेश, श्री मुरुगन आणि श्री चंडिकेश्वरर ह्यांचे स्वतंत्र रथ आहेत. भगवान शिवांचा रथ हा तामिळनाडूमधल्या भव्य रथांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. संगीली म्हणजेच जोडणाऱ्या मंडपामध्ये भव्य शिल्पे आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. नंदि मंडपातील श्री नंदिंची मूर्ती रामेश्वरम आणि तंजावूर येथील मुर्त्यांसारखीच भव्य आहे. मुख्य मंडपाच्या जवळच्या मंडपामध्ये दोन भव्य स्तंभ आहेत आणि त्या प्रत्येक स्तंभाच्या बाजूला ४८ छोटे स्तंभ आहेत. अजून एक मंडप आहे ज्याचे नाव उंजल (झुला असलेला मंडप) मंडप आहे. ह्याशिवाय इथे १००० स्तंभांचा एक मंडप आहे जिथे दर वर्षी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह सोहळा साजरा होतो. हे मंदिर साधारण १४ एकरवर पसरलेलं आहे. 


मुलवर: श्री नेल्लैअप्पर, श्री वेळूवननादर, श्री निळवेल्लीनादर, श्री चालीवादिश्वरर, श्री वेंदवलरनादर

देवी: श्री कांथीमथी, श्री वडीउदैअम्मन

क्षेत्रवृक्ष: बांबू

पवित्र तीर्थ: स्वर्णपुष्करिणी, करुमरी तीर्थ, सिंधूपुंदुरै तीर्थ


क्षेत्र पुराण

पौराणिक काळामध्ये ह्या स्थळांचं नाव वेणूवलं असे होते. भगवान शिवांनी वेदपट्टर ह्या आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या सगळ्या संपत्तीचा नाश होईल अशी परिस्थिती निर्माण केली. पण वेदपट्टरने भगवान शिवांची भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही. एकदा वेदपट्टरने थोडे तांदूळ भगवान शिवांच्या मंदिरामध्ये ठेवले आणि तो नदीवर स्नानासाठी गेला. पण तेवढ्यात पाऊस चालू झाला. म्हणून तो तांदूळ वाचवण्यासाठी धावत मंदिरात आला. तेव्हा त्याने बघितले कि तांदुळावर पाऊसाचा एक थेंबही पडला नव्हता. भगवान शिवांनी त्या तांदुळांना आच्छादन (कुंपण) घालून त्यांचं रक्षण केलं होतं. वेदपट्टरने धावत जाऊन राजाला ह्या चमत्काराची माहिती दिली. तेव्हापासून या स्थळाला नेलवेली (तमिळमध्ये नेल म्हणजे तांदूळ आणि वेली म्हणजे कुंपण). कालांतराने त्याचे नाव थिरुनेलवेली असं प्रसिद्ध झालं. 


अनवर्त खान:

मंदिराच्या आग्नेय दिशेला एक शिव लिंग आहे ज्याचे नाव अनवर्त खान असे आहे. इथल्या नवाबाच्या पत्नीला असाध्य रोग जडला होता. तिने एका ब्राह्मणाच्या सल्ल्यावरून श्री नेल्लैअप्पर ह्यांची आराधना केली. त्या आराधनेचे फळ म्हणून ती रोगातून बरी झालीच पण शिवाय तिला एक पुत्ररत्न पण प्राप्त झाले. त्या पुत्राचे नाव अनवर्त खान असे ठेवण्यात आले. तिने ह्या स्थळामध्ये एक देवालय बांधून त्यात शिव लिंगाची स्थापना केली आणि त्या लिंगाचे नाव अनवर्त खान असे ठेवले. नवाब आणि त्यांचे पुत्र ह्यांना शिव लिंगाचे दर्शन घेता यावे म्हणून ह्या देवालयाच्या परिक्रमेच्या एका भिंतीवर एक खिंडार आहे.


वेळूवननादर: भगवान शिव इथे लिंगरूपात आले. त्याचबरोबर चार वेद पण इथे वेळूवनम (बांबूचे वन) रूपात येऊन लिंगाला आच्छादन बनले. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री वेळूवननादर असे आहे. 


अगस्त्य ऋषींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचा विवाह सोहळा बघण्याची खूप इच्छा होती. ती त्यांची इच्छा इथे पूर्ण झाली. ह्या स्थळाशिवाय थिरुमरईकाडू, थिरुनल्लूर आणि पापनाशम ह्या स्थळांमध्येपण अगस्त्य ऋषींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या विवाह सोहळ्याचे दर्शन मिळाले. 


भगवान विष्णू श्री नेल्लैगोविंद ह्या रूपात इथे आले आणि त्यांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाह सोहळ्याचे पुरोहितपद निभावले. 


असा समज आहे कि इथून साधारण १८ किलोमीटर्सवर मनूर नावाचं गाव आहे जिथे प्रभू श्रीरामांनी मारीच राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर त्यांनी श्री नेल्लैअप्पर म्हणजेच भगवान शिवांची आराधना केली. ह्या शिवाय त्यांनी इथे पशुपतास्त्राची प्राप्ती करण्यासाठी पण श्री नेल्लैअप्पर ह्यांची आराधना केली. 


मंदिराबद्दल माहिती:

भगवान शिवांच्या मंदिराच्या दक्षिण परिक्रमेमध्ये नायकर राजे ज्यांनी ह्या मंदिराच्या उभारणीसाठी मदत केली त्या राजांच्या मुर्त्या आहेत.


पूर्वेकडील परिक्रमेमध्ये बरीच सभागृहे आहेत ज्यांना ओलांडून भगवान शिवांच्या गाभाऱ्यापर्यंत आपण पोचतो. दक्षिणेकडल्या परिक्रमेमधून आपण श्री कांथीमती अम्मनच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोचतो. ह्या मार्गावर भगवान विष्णूंचे पण देवालय आहे. असा समज आहे कि भगवान विष्णू येथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह साजरा करण्यासाठी येथे आले. 


इथे १७५६ साली निर्माण केलेलं सुंदर फुलांचं वन आहे. 


आख्यायिकेनुसार रावणाच्या मूर्तीमागे एक बोगदा आहे जो मदुराईपर्यंत जातो. 


ह्या मंदिराच्या भोवताली तीन वर्तुळाकार परिक्रमा आहेत. पहिल्या परिक्रमेमध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री भिक्षाटनर, श्री भैरव, श्री चंडिकेश्वरर, श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री दुर्गा देवी आणि श्री महिषासुरमर्दिनी देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. दुसऱ्या परिक्रमेमध्ये ६३ नायनमार, अष्ट लक्ष्मी आणि श्री शनीश्वरर ह्यांच्या मुर्त्या आहेत आणि त्या शिवाय शास्ता लिंग पण आहे. तिसऱ्या परिक्रमेमध्ये श्री सुब्रमण्यम आणि त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या मुर्त्या आहेत. मदुराई आणि कांचीपुरम मधल्या परंपरेसारखंच इथे पण आधी श्री कांथीमती अम्मन ह्यांची पूजा होते. देवीची मूर्ती खूप सुंदर आहे. तिच्या एका हातात फुले आहेत. देवीचे अजून एक नाव श्री वडीवन्नई असे आहे. असा समज आहे की भगवान शिव इथे तलावाच्या रूपात आले आणि श्री ब्रह्म हे त्या तलावातील कमळाच्या रूपात आले. इथे ध्वजस्तंभ आहे. इथे अर्जुन, कर्ण आणि वीरभद्र ह्यांची शिल्पे पण आहेत. श्री मूळनादर, श्री अनंतशयनं (भगवान विष्णू), श्री नटराज आणि श्री शिवगामी ह्यांची इथे स्वतंत्र देवालये आहेत. श्री नटराज आणि श्री शिवगामी ह्यांच्या मुर्त्या तांब्याच्या आहेत. 


थमीरा सभेच्या जवळ श्री चंदनसभापती नावाचे देवालय आहे. श्री नटराजांना श्री पेरियासभापती असं पण म्हणतात. मुख्य परिक्रमेमध्ये श्री कन्नी विनायक, श्री नंदिदेव आणि पांड्य राजा ह्यांची देवालये आहेत. 


ह्या मंदिरातले मंडप:


  • उंजल मंडप. ह्या मंडपामध्ये ९६ स्तंभ आहेत. 

  • महामंडप 

  • नवग्रह मंडप

  • सोमवार मंडप

  • संगीली मंडप

  • वसंत मंडप 

  • १००० स्तंभ मंडप


ह्या शिवाय इथे बरीच शिल्पे पण बघावयास मिळतात. ह्या मंदिरातील रथयात्रेचा रथ हा देशातला भव्य रथांच्या क्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


इथली श्री विनायकांची मूर्ती पांड्य राजानी घडवली आहे. ह्या मूर्तीला श्री पिल्लथंडूपिल्लैयार आणि श्री पोल्लपिल्लैयार अशी पण नावे आहेत. ह्या मंदिरामध्ये एक दगडाची खिडकी आहे ज्याला १२ छिद्रे आहेत. ह्या खिडकीतून ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा असते ते प्रार्थना करतात.


मुर्त्यांबद्दल माहिती:


श्री नेल्लैअप्पर: हे देवालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे. ह्याला राजगोपुर आहे. ह्या देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री पवळकोडी, श्री अल्ली ह्यांच्या मुर्त्या आहेत. सोमवार मंडपामध्ये मन्मद आणि रतीदेवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. ह्याशिवाय सोमवार मंडपामध्ये भव्य ध्वजस्तंभ आणि पांढऱ्या रंगाची श्री नंदिंची मूर्ती आहे. 


ह्या शिवाय इथे श्री वीरभद्र, श्री अर्जुन, श्री भीम, श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


नंदि मंडप: ह्या मंडपामध्ये ६३ नायनमार, तमिळ कवी सेक्कीळर आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. मुख्य मंडपामध्ये संगीतमय स्तंभ आहेत आणि ह्या प्रत्येक स्तंभाभोवती ४८ छोटे स्तंभ आहेत. ह्या स्तंभांवर थाप मारल्यावर स्वर उमटतात. शिव लिंग बांबूच्या वनात असल्याकारणाने इथे भगवान शिवांना श्री वेळूवननादर असे नाव आहे. 


प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री नेल्लैगोविंदा (भगवान विष्णू) ह्यांची पहुडलेल्या मुद्रेतील मूर्ती आहे. 


इथे श्री थिरूमुळनादर ह्यांचे छोटे देवालय आहे जे श्री नेल्लैअप्पर ह्या देवालयापेक्षा जुने आहे. परिक्रमेमध्ये श्री नेल्लैअप्पर, श्री कांथीमथी अम्मन, श्री दुर्गा देवी, श्री भैरव, सप्त कन्नीका, सप्त ऋषी, ६३ नायनमार आणि श्री गणपती ह्यांच्या उत्सवमुर्त्या आहेत. रावण कैलास पर्वत उचलत आहे अशी एक मूर्ती पण येथे आहे. रावणाच्या शिरावर भगवान शिवांची मूर्ती आहे. प्रकारामध्ये अष्टलक्ष्मी, श्री शनैश्वर, चक्र लिंग (१००० शिव लिंगे), कुबेर लिंग, श्री नटराज आणि भक्त रामकोण ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


श्री कांथीमथी देवालय: ह्या देवालयाला राजगोपुर आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. ह्या देवालयामध्ये ध्वजस्तंभ आणि श्री नंदिंची मूर्ती आहे. डाव्याबाजूला १००० स्तंभांचा मंडप आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री गंगा आणि श्री कावेरी ह्यांच्यापण मुर्त्या आहेत. प्रकारामध्ये श्री गणेश, श्री मुरुगन, श्री चंडिकेश्वरर आणि श्री षण्मुख ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


दोन मंदिरांच्या मार्गामध्ये करुमरी तीर्थ आहे. एका राजाला दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे हत्तीचा जन्म मिळाला. ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यामुळे त्याला परत मनुष्य रूप आणि तसेच राज्यपद परत मळले. ह्या तीर्थाच्या जवळ श्री गणेश ह्यांची मूर्ती आहे. 


थमीरा अंबळ (म्हणजेच थमीरा सभा) मध्ये लाकडाचे क्लिष्ट कोरीवकाम बघायला मिळते. श्री दक्षिणामूर्ती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री मुरुगन देवालयाला श्री षण्मुख (तमिळ मध्ये अरुमुगम) असे पण नाव आहे.


एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री कुबेरांची लिंगरूपातली मूर्ती आहे. ह्याचा पूर्ण गाभारा सोन्याचा आहे. 


वैशिष्ट्ये:


अर्धजाम पूजेच्या वेळेस श्री कांथीमथी अम्मन ह्यांना पांढरी साडी नेसवली जाते. दुसऱ्यादिवशीच्या सकाळी ७ पर्यंत ह्या पोषाखामध्ये राहून त्या सर्व भक्तांना आशिर्वाद देतात. असा समज आहे कि ह्या प्रकारे आशीर्वाद देण्याचे कारण असे आहे कि जे कोणी आशीर्वादासाठी येतील त्यांना मोक्ष प्राप्त होईल.


ह्या मंदिरामध्ये श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांसाठी एक स्वतंत्र राजगोपुर आहे. देवी आणि भगवान शिव ह्या दोघांच्या देवालयामध्ये स्वतंत्र रित्या पूजा साजऱ्या होतात.  

   

विवाहाच्या भेटवस्तू: परंपरेनुसार वराला म्हणजेच श्री नेल्लैअप्पर ह्यांना वधूच्या बाजूने, म्हणजेच श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्या बाजूने विवाहाच्या वेळेस मिळालेल्या भेटवस्तू विवाहानंतर श्री कांथीमथी अम्मन स्वतः पतीच्या घरी घेऊन जातात. 


ऎप्पासी महिन्यातील १० दिवसाच्या ब्रह्मोत्सवामध्ये श्री कांथीमथी अम्मन भगवान शिवांशी विवाह होण्यासाठी तपश्चर्या करतात. दहाव्या दिवशी त्या नदी काठावर जातात. अकराव्या दिवशी भगवान विष्णू श्री नेल्लैअप्पर ह्यांना आपल्या भगिनीबरोबर म्हणजेच श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्याबरोबर विवाह करण्याची विनंती करतात. बाराव्या दिवसापासून ३ दिवस पर्यन्त उंजल सण साजरा होतो. 


असा समज आहे कि श्री कांथीमथी अम्मन माध्यान्ह समयी आपल्या पतीला म्हणजेच श्री नेल्लैअप्पर ह्यांना भोजन अर्पण करतात. हे दृश्य ह्या मंदिरामध्ये विविध वाद्यांच्या गजरामध्ये अभिनय करून साजरे केले जाते. श्री नेल्लैअप्पर ह्यांना भोजन अर्पण केल्यानंतर ते भोजन श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्या देवालयामध्ये जाऊन त्यांना अर्पण केले जाते. 


ह्या मंदिरामध्ये मारगळी महिन्यात पूजा होत नाही. 


ह्या मंदिरामध्ये श्री वनदुर्गा देवी ह्या हरणावर आरूढ झाल्या आहेत अशी मूर्ती आहे. 


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): वसंतोत्सव (१६ दिवस)

वैकासि (मे-जून): वैकासि विशाखं थिरुविळा उत्सव (१ दिवस)

आनी (जून-जुलै): ब्रह्मोत्सवम (१० दिवस)

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम् थिरुविळा (१० दिवस)

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ थिरुविळा (११ दिवस)

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री विळा (१५ दिवस - लक्षार्चना)

ऐप्पासि (ऑक्टोबर-नोव्हेंबर): थिरुकल्याणं (१५ दिवस)

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपं आणि सोमवार थिरुविळा (१ दिवस)

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथिराई (१० दिवस)

थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम थिरुविळा (१० दिवस)

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री (१ दिवस)

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उथिरा थिरुविळा (१० दिवस)



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment