श्री मीनाक्षी अम्मन मंदिराचा आवाका खूप मोठा असल्याकारणाने ह्या मंदिराची माहिती दोन भागामध्ये विभागली आहे. मागच्या भागामध्ये क्षेत्र पुराण, मंदिराची माहिती दिली. आता ह्या भागामध्ये मंदिराची अजून काही वैशिष्ट्ये, मंदिरातील विविध मंडप, ह्या स्थळाची विविध नावे ह्यांची माहिती देत आहोत.
ह्या मंदिरातले मंडप:
१. किळी कुण्ड (पोपटाचा पिंजरा) मंडप.
२. कंबाटडी: ह्या मंडपामध्ये श्री नंदीदेवांची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. तसेच ह्या मंडपामध्ये भगवान शिवांच्या विविध अवतारांची शिल्पे आणि चित्रे आहेत. तसेच भगवान शिव आणि श्री कालीदेविंची पण चित्रे आहे. इथे एक सोन्याचा ध्वजस्तंभ आहे ज्याच्या ३२ भागांमध्ये विविध देव, श्री दुर्गा देवी आणि सिद्धांची शिल्पे आहेत.
३. वीरवसंत्रय मंडप: हा मंडप खूप भव्य आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या परिक्रमा आहेत.
४. कल्याण मंडप: हा मंडप वीरवसंत्रय मंडपाच्या दक्षिणेला आहे. ह्या मंडपामध्ये चित्राई सणामध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह साजरा केला जातो.
५. ऊंजल मंडप: हा मंडप मंदिराच्या पश्चिमेला आहे.
६. कोलू मंडप: हा मंडप श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाच्या पश्चिमेला आहे.
७. नूरुकल मंडप (१०० स्तंभांचा मंडप): हा मंडप मीनाक्षी नायकरांनी १७०८ साली बांधला. ह्या मंडपामध्ये सर्व राशींची चिन्हे कोरलेली आहेत. इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये भगवान शिव हे पारधी आहेत तर श्री मीनाक्षी देवी त्यांच्या पत्नी आहेत.
८. मुथूपिल्लई मंडप: ह्याला इरुट्टू मंडप (इरुट्टू म्हणजे अंधार) असे पण नाव आहे. येथील भगवान शिवांच्या देवालयाच्या कोष्टामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या आहेत. तसेच श्री दुर्गा मंडप पण आहे.
९. दिव्य विवाह मंडप: हा मंडप वीरवसंत्रय मंडपाच्या दक्षिणेला आहे. ह्या मंडप मध्ये स्वर्णरथ आहे.
१०. मंगयारकन्नी मंडप
११. सेर्वईकर्रर मंडप
१२. मुथुरयार मंडप
१३. नगर मंडप
१४. पुथू मंडप: हा मंडप थिरूमलै नायकर ह्यांनी बांधला. पूर्वेकडील राजगोपुराच्या समोर हा मंडप आहे. ह्या मंडपामध्ये १० प्रसिद्ध नायकरांची शिल्पे तसेच इतर अनेक शिल्पे आहेत.
१५. थेरादि मंडप: हा मंडप ईस्ट मसी मार्गावर आहे.
१६. अष्टशक्ती मंडप: ह्या मंडपाला अष्टमातृका मंडप असं पण नाव आहे. ह्या मंडपातल्या स्तंभांवर श्री शक्ती देवीच्या आठ रूपांची म्हणजेच अष्टमातृका देवींची शिल्पे कोरलेली आहेत. ह्या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी श्री वल्लभ विनायक आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाच्या प्रवेशमार्गावरील हा पहिला मंडप आहे.
१७. पंच पद मंडप: हा १००० स्तंभ असलेला मंडप श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाजवळ ईस्ट आदी मार्गाच्या जन्क्शनवर आहे. भाग १ मधल्या क्षेत्र पुराण विभागात “१००० स्तंभांची आख्यायिका” ह्या शीर्षकाखाली ह्या स्तंभांची आख्यायिका दिली आहे.
ह्याशिवाय ह्या मंडपामध्ये रती देवी (कामदेवाची पत्नी), श्री कार्थिकेय, श्री गणेश, संन्यासी रुपातले भगवान शिव, अनेक पौराणिक सिंह (ज्यांना याली म्हणतात), एक वीणा वाजवणारी स्त्री, श्री नर्दन गणपती आणि एक भटक्या जमातीतला मनुष्य जो माकडाला हाकत आहे ह्यांची शिल्पे आहेत.
संगीत युक्त स्तंभ: इथे पांच स्तंभ आहेत. ह्यातील प्रेत्यक स्तंभ हा प्रत्येकी एका दगडामध्ये कोरलेला आहे. ह्या स्तंभावर प्रहार केल्यावर त्यातून संगीताचे स्वर्गीय स्वर उमटतात जे ऐकायला खूप मधुर वाटतात. प्रत्येक स्तंभावर शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार आयताकृती दगडांनी आच्छादित आहे. ह्यातील काही दगडांवर कमळे कोरलेली आहेत. ह्यातील काही दगडांवर थाप मारल्यास ते दगड पोकळ आहेत हे कळतं. असा समज आहे कि हे दगड तळघराकडे जाणारे गुप्त मार्ग आहेत.
विशेष लिंगाचे चित्र: श्री सुन्दरेश्वर आणि श्री मीनाक्षी देवीच्या मंदिराच्या छतावर एक विशेष चित्र आहे जे शिव लिंगाचे आहे. ह्या चित्राकडे कुठूनही बघितलं तरी त्या लिंग आपल्यादिशेकडे असा भास होतो.
श्री मीनाक्षी देवीची अजून काही नावे अशी आहेत - श्री पच्चई (हिरवी) देवी, श्री मरगदवल्ली, श्री अभिरामवल्ली
असा समज आहे की भगवान शिवांची १६ मुख्य क्षेत्रे आहेत. ह्यापैकी चिदंबरम, काशी, काळहस्ती आणि मदुराई ह्या क्षेत्रांचं महत्व विशेष आहे. असा समज आहे कि ह्या क्षेत्रांची नुसती नवे कानावर पडल्यामुळे मोक्ष मिळू शकतो. मदुराई मंदिरामध्ये श्री मीनाक्षी देवी हि राज्ञी आहे म्हणजेच ती इथे राज्य करते. म्हणून तिचा अभिषेक चालू असताना तिचे कोणीही दर्शन घेऊ शकत नाही. तिचे अलंकार पूर्ण झाल्यावरच भाविक तिचे दर्शन घेऊ शकतात.
वैशिष्ट्ये:
१. पुराणांनुसार श्री सुंदरेश्वरर च्या गाभाऱ्याच्या शिखरावरील विमान हे प्रत्यक्ष श्री इंद्रदेवाने दान केले आहे. आपल्या पापांचे क्षालन करण्यासाठी श्री इंद्रदेव विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत होते. ते ज्यावेळी कदंबवनात आले आणि त्यांना श्री सुन्दरेश्वरांच्या स्वयंभू लिंगाचे दर्शन झाले त्याच क्षणी त्यांच्या पापांचे क्षालन झाले. एक कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांनी इथे शिव मंदिर निर्माण केले.
२. श्री मीनाक्षी अम्मन ह्यांची मूर्ती शुद्ध पाचूची आहे.
३. १८ सिध्दांपैकी श्री सुंदरनादर ह्यांनी इथे वास्तव्य केलं
४. हे स्थळ भूलोकीचे कैलास आहे असं समजलं जातं. पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो कि केवळ ह्या स्थळाच्या उच्चारणाने म्हणजेच मदुराई ह्या उच्चारणाने मोक्ष मिळू शकतो.
५. संत कुमारगुरुपरन ह्यांनी ह्या स्थळाची शिव राजधानी असं कौतुक केलं आहे.
६. पुराणांनुसार श्री नंदि देव आणि इतर देवांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी इथे आपलं त्रिशुल पृथ्वीवर आपटून सुवर्णकमळांचा तलाव निर्माण केला. मंदिराच्या परिसरातील दैवी तीर्थांपैकी हे पहिलं तीर्थ आहे. ह्या तीर्थाचं नाव शिव गंगा आहे. श्री इंद्रदेवांनी भगवान शिवांची आराधना करण्यासाठी ह्याच तीर्थातून सुवर्णकमळ घेतलं होतं. ह्या तलावाच्या भिंतींवर भगवान शिवांनीं आपल्या भक्तांसाठी केलेल्या ६४ लीला चित्रित केल्या आहेत.
७. ह्या ठिकाणी एक स्फटिक लिंग पण आहे.
८. तामिळनाडूमध्ये श्री विनायकांची सहा पीठे आहेत. त्यातील हे चौथं पीठ आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
१. साधारणतः भगवान शिवांच्या नृत्य मध्ये त्यांचा डावा पाय उचललेला दिसतो पण इथे राजशेखर पांड्य राजा, जो स्वतः श्रेष्ठ नर्तक होता, त्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी आपला उजवा उचलून नृत्य केले.
२. स्वतः भगवान शिव इथे एका सिद्धाच्या रूपात प्रकट झाले.
३. श्री इंद्रदेव आणि श्री वरुण देव ह्यांनी येथे भगवान शिवांची आराधना केली.
४. शैव संत कुमारगुरूपरन हे जन्माने मुके होते पण श्री मुरुगन ह्यांच्या कृपेने त्यांना वाचा प्राप्त झाली.
५. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली.
६. पंचसभइ स्थळांमधे ह्या स्थळाला रजत सभा म्हणतात.
ह्या स्थळाची विविध नावे:
१. मदुराई: सर्पाच्या विषाचं शमन करण्यासाठी भगवान शिवांनी इथे अमृत शिंपडलं म्हणून ह्या स्थळाला मदुराई असं नाव पडलं.
२. अळवाई: भगवान शिवाच्या गळ्यातील सर्पाने इथे दिशा दाखवली म्हणून ह्या स्थळाला अळवाई असं नाव पडलं.
३. कदंबवन: इथे कदंबाची भरपूर झाडे होती म्हणून ह्या स्थळाला कदंबवन असे नाव आहे.
४. नन्मडैकुडळ: श्री वरुण देवांनी ह्या स्थळाचा नाश करण्यासाठी सात मेघांना पाठवून आक्रमण केलं. भगवान शिवांनी ह्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी ह्यातील चार मेघांना आच्छादनांमध्ये (तामिळ मध्ये मडै) रूपांतरित केलं.
दिवसाकाठी ह्या मंदिरात आठ वेळा पूजा करण्याचे महत्व: असा समज आहे कि ह्या स्थळी श्री मीनाक्षी देवी दिवसाकाठी आठ वेळा आठ विविध रूपात प्रकट होतात. ती रूपे अशी - १) श्री महाशोडषी, २) श्री भुवना, ३) श्री मातंगी, ४) श्री पंचदशाक्षी, ५) श्री बाला,६) श्री श्यामला, ७) श्री शोडाक्षी, ८) श्री मीनाक्षी. म्हणून इथे दिवसाकाठी आठ वेळा पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १२ दिवसांचा थिरुकल्याणं उत्सव. पहिल्या दिवशी ध्वजारोहण, आठव्या दिवशी श्री मीनाक्षी देवीचा राज्याभिषेक, नवव्या दिवशी श्री मीनाक्षी देवीची मिरवणूक, दहाव्या दिवशी श्री मीनाक्षी देवी आणि श्री सुन्दरेश्वरर ह्यांचा विवाह, अकराव्या दिवशी रथयात्रा उत्सव, बाराव्या दिवशी तीर्थ उत्सव (ह्या दिवशी भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवी मासी मार्गावर भ्रमण करतात).
वैकासि (मे-जून): मूळ नक्षत्रावर १० दिवसांचा उत्सव. ह्या उत्सवामध्ये ६३ नायनमारांची मिरवणूक निघते.
आनी (जून-जुलै): १० दिवसांचा उंजल उत्सव. ह्या उत्सवाच्या दहाव्या दिवशी फळांची पूजा होते. उत्तरा नक्षत्रावर श्री नटराज आणि श्री शिवकामी ह्यांचा अभिषेक होतो आणि श्री नटराजांच्या पंच सभा मूर्तीची मिरवणूक निघते.
आडी (जुलै-ऑगस्ट): मुलईकोट्टु नावाचा १० दिवसांचा उत्सव. हा उत्सव फक्त देवीचा उत्सव असतो. ह्या उत्सवामध्ये श्री देवींची आडी मार्गावरून संगीत वाद्यांच्या गाजरामध्ये मिरवणूक निघते.
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): ह्या महिन्यात १८ दिवसांचा उत्सव साजरा होतो. ह्यातील ६ दिवस श्री चंद्रशेखरांना समर्पित असतात. उरलेले १२ दिवस पंचमूतींना समर्पित होतात. सातव्या दिवशी श्री सुन्दरेश्वरांचा राज्याभिषेक साजरा होतो. ह्या दिवसांमध्ये भगवान शिवांनी केली १० चमत्कार येथील शिवाचार्य अभिनय करून सादर करतात.
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री उत्सव. प्रत्येक दिवशी कल्प पूजा आणि श्री देवींची लक्षार्चना होते. सर्व दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ६ दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव. दिवाळीच्या दिवशी विशेष उत्सव साजरा होतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर श्री मीनाक्षी देवींना झुल्यावर बसवून उत्सव साजर होतो.
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): १० दिवसांचा दीपोत्सव. आडी मार्गावरून भगवान शिवांची मिरवणूक निघते. कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी १ लाख दीप प्रज्वलित होतात.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): नऊ दिवसांचा अभिषेक उत्सव. चित्र मार्गावरून श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक निघते. अरुद्रदर्शन उत्सव. मासी मार्गावरून श्री नटराजांच्या पंच सभा मूर्तींची मिरवणूक निघते. अष्टमीच्या दिवशी भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवींची बैलगाडीतून मिरवणूक निघते. ह्या महिन्यात १० दिवसांचा थिरुवेमपवई उत्सव पण साजरा होतो.
थै (जानेवारी-फेब्रुवारी): १२ दिवसांचा थेप्पोत्सवं उत्सव. चित्रा मार्गावरून श्री सुन्दरेश्वरर आणि श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक निघते.
मासी (फेब्रुवारी-मार्च): ४८ दिवसांची मंडळ पूजा. ६ दिवस श्री विनायकांची पूजा होते, ६ दिवस श्री कार्थिकेयांची पूजा होते, ३ दिवस श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शंकर ह्यांची पूजा होते, ६ दिवस श्री चंद्रशेखरांची पूजा होते. ह्या दिवसांमध्ये मुर्त्यांची मिरवणूक निघते. १० दिवसांचा पंचमुखी उत्सव. ९ दिवसांचा मौन उत्सव - ह्यामध्ये ३ दिवस श्री चंद्रशेखरांना समापीत होतात, ३ दिवस भगवान शिवांना आणि ३ दिवस श्री चंडिकेश्वरांना समर्पित होतात. दहाव्या दिवशी ध्वज अवरोहण म्हणजेच ध्वज खाली केला जातो आणि जमाखर्च सांगितले जातात.
पंगूनी (मार्च-एप्रिल): ९ दिवसांचा वसंतोत्सव. भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक चित्रा मरगावरून निघते. ह्याशिवाय उत्तरं उत्सव (उत्तरा नक्षत्र) साजरा होतो.
धार्मिक वैशिष्ट्य: येथील श्री नटराजाची मूर्ती एका भव्य चांदीच्या वेदीवर स्थित आहे. ह्या वेदीला वेल्ली अंबलं म्हणतात.
मंदिराच्या वेळा: सकाळी ५ ते दुपारी १२.३०,संध्याकाळी ४ ते रात्री १०
पत्ता: अरुलमिगु मीनाक्षी सुन्दरेश्वरर कोविल, मदुराई ६२५००१, तामिळ नाडू
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment