Sunday, March 31, 2024

श्री मदुराई मीनाक्षी अम्मन कोविल - मदुराई भाग १

पंचसभइ स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. ह्या सभेचं नाव रजतसभइ असं आहे. २५०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री संबंधर, श्री माणिकवाचगर आणि श्री थिरुनवूक्करसर ह्या नायनमारांनी केली आहे. तामिळनाडूमधल्या मदुराई ह्या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर जवळ जवळ ४५ एकर मध्ये व्यापलेला आहे. असा समज आहे कि हे मंदिर इसवीसन पूर्व १६०० पासून अस्तित्वात आहे. आणि त्या नंतर बऱ्याच वेळेला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. सर्वात अलीकडील जीर्णोद्धार इसवीसन १६०० मध्ये झाला असा समज आहे. ह्या मंदिरामध्ये दिवसाकाठी साधारण २०००० दर्शनार्थी भेट देतात. दक्षिण भारतातल्या सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर मानलं जातं. ३००० वर्षांपूर्वी उगम पावलेल्या वैगई नदीच्या काठाशी हे मंदिर स्थित आहे. 


मुलवर: श्री मीनाक्षी सुंदरेश्वरर, श्री चोक्कनाथर, श्री सोमसुंदरर

देवी: श्री मीनाक्षी, श्री अंगईयारकन्नई

क्षेत्र वृक्ष: कदंब आणि बिल्व वृक्ष

पौराणिक नाव: अळवाईकुडल, नन्मदकुडळ, कदंबवनं

वर्तमान नाव: मदुराई, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:


एका पांड्य राजाने अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये श्री उमादेवी प्रकट झाल्या आणि त्यांनी त्या राजाला तीन स्तने असलेली एक कन्या प्रदान केली. त्याचवेळी आकाशवाणी झाली कि ह्या कन्येचा होणारा पती जेव्हा ह्या स्थळी येईल त्यावेळी तिचे तिसरे स्तन आपोआप गळून पडेल. राजाच्या निधनानंतर त्याची कन्या राज्य करू लागली. म्हणून ह्या स्थळाला कन्निनाडू असं नाव प्राप्त झालं. तिच्या कारकिर्दीमध्ये आजूबाजूच्या राज्यांना जिंकून ती दिग्विजयी झाली. त्यानंतर ती कैलासावर दर्शनासाठी गेली असताना भगवान शिवांसमोर गेल्यावर तिचे तिसरे स्तन गळून पडले. तिथे उपस्थित असलेल्या ऋषीमुनी आणि देवांना कळून चुकलं कि हि स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात श्री पार्वती देवींच आहेत. त्यांनी भगवान शिव आणि त्या स्त्रीचा म्हणजेच श्री पार्वती देवींचा विवाह साजरा केला. त्या वेळेपासून श्री पार्वती देवींचे नाव श्री मीनाक्षी देवी म्हणून प्रसिद्ध झाले. 


मूर्ती नायनार:

हे ६३ नायनमारांपैकी एकाहित. ते जन्माने वैश्य वर्णाचे होते. मदुराई मंदिरासाठी चंदनाचा लेप तयार करून देणे हा त्यांचा व्यवसाय होता. एकदा मदुराईच्या शेजारच्या राजाने मदुराईच्या राजाला हरवून विजय मिळवला. त्याने ह्या नायनमारांना त्यांचा व्यवसाय करता येऊ नये म्हणून त्यांना अपंग केलं. पण ह्या नायनमारांनी आपल्या कामात म्हणजेच मंदिरासाठी चंदनाचा लेप करण्याच्या कामात खंड पडू नये म्हणून आपले बाहू वापरून चंदनाचा लेप करण्याचे काम चालू ठेवलं. भगवान शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी नायनमारांना आशीर्वाद दिला त्यांना ह्या राज्याचे राज्यपद  मिळेल. त्यावेळी मदुराईच्या सद्य राजाला अपत्य नव्हते. त्यामुळे त्या राजाच्या निधनानंतर परंपरेनुसार नव्या राजाला निवडण्यासाठी हत्तीच्या सोंडेत एक माळ ठेवून त्याला राज्यामध्ये मिरवत नेले आणि त्या हत्तीने ह्या नायनमारांच्या गळ्यात ती माळ घातली त्यामुळेही नायनमार मदुराईचे राजा बनले. एक विशेष म्हणजे त्यांनी राजाचा नेहेमीचा पोशाख न घालता शिवयोगीच्या वेशात राज्य केले. 


सिद्धरूपातले भगवान शिव:

भगवान शिवांच्या मंदिरातील परिक्रमेमध्ये श्री दुर्गा देवींच्या देवालयाजवळ भगवान शिव सिद्ध रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद देतात. त्याच्यामागील आख्यायिका अशी आहे. भगवान शिव एकदा मदुराई मध्ये सिद्ध रूपामध्ये फिरत होते आणि आपल्या सिद्धी वापरून चमत्कार करत होते. जेव्हा राजाला हे कळलं तेव्हा राजाने त्याच्या सेवकांतर्फे ह्या सिद्ध पुरुषाला राजासमोर उपस्थित होण्यासाठी पाचारण केलं. पण सिद्ध रूपातल्या भगवान शिवांनी राजाची आज्ञा पाळण्यास नकार दिला आणि त्यांनी त्या सेवकांतर्फे राजाला निरोप दिला कि राजाला त्यांना भेटण्याची इच्छा असल्याने राजाने त्यांच्याकडे यावं. त्यानंतर राजाच्या आगमनाचा अंदाज घेऊन भगवान शिव श्री दुर्गा देवीच्या मंदिराजवळ योगनिष्ठेच्या मुद्रेमध्ये बसले. राजाला ह्या सिद्ध पुरुषाची परीक्षा घ्यावीशी वाटली म्हणून त्याने त्या सिद्ध पुरुषाला म्हणजेच भगवान शिवांना राजाच्या हातातील दगडी हत्तीला ऊस खाऊ घालण्यास सांगितले. भगवान शिवांनी आपल्या नेत्रांनी त्या दगडी हत्तीला ऊस खाण्यास आज्ञा केली आणि त्या दगडी हत्तीने तो ऊस खाल्ला. एवढेच नव्हे तर त्या हत्तीने भगवान शिवांच्या आज्ञेने राजाच्या गळ्यातील मोत्यांची माळ पण ओढून घ्यायला सांगितली आणि हत्तीने ती पण आज्ञा पूर्ण केली. राजाला सिद्ध पुरुषाच्या सिद्धींची प्रचिती आल्यावर त्याने क्षमा मागितली. सिद्ध पुरुषाने म्हणजेच भगवान शिवांनी राजाची क्षमायाचना मान्य केली आणि राजाला अपत्य प्राप्त होण्याचं वरदान पण दिलं. 


श्री मीनाक्षी देवींच्या हातातील पोपटाचे रहस्य:

आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी एकदा श्री इंद्रदेव मदुराईला आले. त्यावेळी त्यांनी इथे बरेच पोपट श्री चोक्कनाथर म्हणजेच भगवान शिवांच्या लिंगाभोवती भगवान शिवांचे नाव घेत घिरट्या मारताना बघितले. श्री इंद्र देवांना तिथे भगवान शिव उपस्थित असल्याचा संकेत मिळाला आणि त्यांनी भगवान शिवांची आराधना केली ज्यामुळे त्यांच्या पापाचं क्षालन झालं. श्री इंद्र देवांच्या ह्या कृत्यामुळे येथील पोपटांना महत्व प्राप्त झाले. असा समज आहे कि श्री मीनाक्षी देवींच्या हातातील पोपट भक्तांच्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचवतात. 


मंदिराच्या परिसरामध्ये १४ गोपुरे आहेत. ह्या गोपुरांची उंची १५० पासून ते १७० फूट आहे. दक्षिण दिशेचे गोपुर सर्वात उंच म्हणजे १७० फुट उंच आहे. मुख्य देवतांच्या गाभाऱ्यावर दोन सुवर्ण शिखरे (कलश) आहेत. पांड्य साम्राज्याच्या विविध राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. भगवान शिवांच्या आराधनेमध्ये ह्या मंदिराला उच्च स्थान आहे. 


१००० स्तंभांची आख्यायिका:

पुराणांनुसार एकदा एका ठेंगू योध्याने श्री मीनाक्षी देवीला तलवारद्वंद्वासाठी आव्हान दिलं. पण श्री मीनाक्षी देवीने हसत हसत त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या योध्याने आव्हान केलं तो कोणालाही तलवारद्वंद्वामध्ये पराभूत करू शकतो. श्री मीनाक्षी देवीने आपल्या सेनापतीला ह्या योध्याबरोबर द्वंद्व करण्यास धाडलं. पण योध्याने त्या सेनापतीला पराभूत केलं. श्री मीनाक्षीदेवीला त्या योध्याच्या मायावी शक्तीची प्रचिती आली. तिने त्या योध्याला एका दिवसाच्या आत म्हणजेच पुढच्या दिवसाचा सूर्योदय होण्याआधी १००० स्तंभ निर्माण करण्याचं आव्हान केलं. आणि समजा तो यशस्वी झाला तर आपण स्वतः पण तसेच १००० स्तंभ निर्माण करू असं आव्हान देवीने केलं. त्या योध्याने मंदिराच्या रचनेचा अभ्यास केला आणि जवळील पर्वतावरून दगड आणून स्तंभ निर्मितीला सुरुवात केली. पहाटेपर्यंत त्याने ९८५ स्तंभ निर्माण केले. त्याच्याकडे माध्यान्हापर्यंत वेळ असल्यामुळे त्याने थोडी विश्रांती घेऊन उजाडल्यावर परत स्तंभ बांधायला चालू करू असं ठरवून तो झोपून गेला. श्री मीनाक्षी देवीने आपले कर्ण कुंडल आकाशात फेकले ज्यामुळे सूर्य झाकला गेला. जेव्हा तो योद्धा झोपेतून उठला तेव्हा माध्यान्ह वेळ उलटून गेली होती. त्यामुळे त्याने आपली हार मान्य केली आणि स्वतःला अग्नी मध्ये जाळून स्वतःला भस्मसात केलं. म्हणून ह्या मंडपामध्ये १००० च्या ऐवजी ९८५ स्तंभच आहेत. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर ६५ शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. ह्या पीठाला राजमातंगी श्यामला पीठ असे नाव आहे. ह्या मंदिराच्या परिसराभोवती चार मुख्य मार्ग  आहेत ज्यांची नावे तामिळ महिन्यांची नावे आहेत - आडी, चित्राई, मासी आणि अवनी

हे मंदिर दोन मंदिरांमध्ये विभागलेलं आहे. एक श्री मीनाक्षी देवीचे मंदिर आणि दुसरे श्री सुंदरेश्वरर मंदिर. ह्या दोन्ही मंदिरांमध्ये बरीच कोरीव कामे, चित्रे आणि शिल्पं आहेत. ह्या दोन्ही मंदिरांच्या शिखरांवर सोन्याचा मुलमा दिलेली विमाने आहेत. 


साधारणपणे शिव मंदिराला १ ते ४ प्रवेशद्वारे असतात. पण ह्या मंदिराला ५ प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वार हे मुलवर म्हणजेच भगवान शिवांसाठी आहे. भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींच्या गाभाऱ्यावरील राजगोपुरं हे सोन्याचे आहेत. उत्तरेकडे सुवर्णकमळाच्या तलावाजवळ सात स्तरांचं गोपुर आहे. ह्या मंदिराच्या परिसरात जवळजवळ ३ कोटी शिल्पे आहेत. श्री मीनाक्षी देवींची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे आणि त्यांच्या हातामध्ये पोपट आहे. जणूकाही त्या आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करत आहे असा त्यांचा भाव आहे. भगवान शिव हे स्वयंभू लिंगरूपात असून त्यांचे इथे श्री सुन्दरेश्वरर असे नाव आहे. इथे श्री मीनाक्षी देवी ह्या सर्वोच्च स्थानी आहेत हे दर्शविण्यासाठी भगवान शिव हे श्री मीनाक्षी देवींच्या डाव्याबाजूला आहेत. येथील रथयात्रेसाठी १९८१ मध्ये इथला सुवर्ण रथ बांधला. 


मंदिराचे आवार आणि त्यातील देवालये:

ह्या मंदिरामध्ये चार समकेंद्री परिक्रमा आहेत. भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवी ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. ह्या प्रत्येक देवालयामध्ये दोन परिक्रमा आहेत. ही देवालये चार छोटे मनोरे आणि तीन भिंतींच्या आवरणाने वेढलेली आहेत. श्री मीनाक्षी देवीच्या उजव्या हातामध्ये हिरवा पोपट आहे. हा पोपट श्रेष्ठ वैष्णव संत श्री अंडाळ ह्यांचं प्रतीक दर्शवतो. गाभाऱ्याच्या भोवती एक मंडप आहे ज्याचे नाव किळी कुण्ड मंडप (किळी म्हणजे पोपट आणि कुण्ड म्हणजे पिंजरा) असे आहे. 


इथली राजगोपुरें पांच स्तरांची आहेत. ह्या मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर श्री विनायक आणि श्री सुब्रह्मण्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मीनाक्षी देवींची मूर्ती पाचूची असल्याकारणाने ह्या मूर्तीला श्री मरगदवल्ली असे पण नाव आहे. श्री मीनाक्षी देवीचे डोळे मोठे आहेत आणि ते मत्स्यासारखे भासतात. श्री मीनाक्षी देवीची इतर नावे अशी आहेत - श्री पंकजवल्ली, श्री कल्याणसुंदरी, श्री पेरियानायकी, श्री ज्ञानाम्बिका. 


श्री सुंदरेशाचे (म्हणजेच भगवान शंकरांचे) देवालय हे ह्या मंदिराच्या आवाराच्या मध्यभागी आहे. ह्या देवालयाच्या शिखराला सोन्याचा मुलामा दिलेला आहे.  ह्या देवालयामध्ये पांच गोपुरे आहेत. एक तीन स्तरांचे गोपुर गाभाऱ्याच्या मध्यभागी आहे तर बाकी गोपुरे बाहेरील भिंतींच्या बाजूला आहेत. हि गोपुरे चार आणि पांच स्तरांची आहेत. ह्या देवालयामध्ये भगवान शिवांची चार शिल्पे आहेत ज्यावर पुराणांमधल्या काही कथा कोरीव काम करून चित्रित केल्या आहेत. ह्या आवाऱ्यामध्ये श्री नटराजांचीपण मूर्ती आहे. ह्या मंडपाचे नाव रजतसभा (वेल्ली अंबलं) असे आहे. श्री मीनाक्षी देवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या नैऋत्येला आहे. इथे श्री सुन्दरेश्वरांचे (भगवान शिव) लिंग आहे जे स्वयंभू आहे. श्री मीनाक्षी आणि श्री सुन्दरेश्वरांच्या विवाहामुळे ह्या लिंगाला श्री सुन्दरेश्वर असं नाव प्राप्त झालं. श्री सुन्दरेश्वरांच्या देवालयासमोर श्री गणेशाची उंच मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे श्री मुक्कुरुनि असे नाव आहे. सतराव्या शतकामध्ये एका उत्खनन प्रकल्पामध्ये मंदिराजवळच्या तलावामध्ये ह्या मूर्तीचा शोध लागला.


श्री मीनाक्षी अम्मन मंदिराचा आवाका खूप मोठा असल्याकारणाने ह्या मंदिराची माहिती दोन भागामध्ये विभागली आहे. पुढल्या भागामध्ये मंदिराची अजून काही वैशिष्ट्ये, मंदिरातील विविध मंडप, ह्या स्थळाची विविध नावे ह्यांची माहिती देऊ.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment