Sunday, March 17, 2024

थिरुवालंकाडू येथील श्री वडारण्येश्वरर मंदिर

तामिळनाडू मध्ये थिरुवल्लूर-अरक्कोणं मार्गावर थिरूवालंकाडू ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. पंचसभई स्थळंगल मध्ये ह्या स्थळाचे रत्नसभइ असं नाव आहे. थोंडईनाडू मधल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. अशी जी पांच ठिकाणे आहेत जिथे भगवान शिव आणि श्री काली देवी ह्यांची नृत्य स्पर्धा झाली त्या पांच स्थळांपैकीपण हे स्थळ आहे. ज्या मंडपामध्ये हे नृत्य घडलं त्या मंडपाला रत्नसभइ असं नाव आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री संबंधर, श्री थिरुनवक्करसू आणि श्री करैक्कल अमैयार ह्या नायनमारांनी केली आहे. 


मुलवर: श्री वडारण्येश्वरर, श्री देवसिंग पेरूमन, श्री अलवंथर, श्री उर्थवननाथर

देवी: श्री अलवनायकी, श्री भ्रमराम्बा, श्री वंदारकुळली

क्षेत्रवृक्ष: फणस, वड

पवित्र तीर्थ: मुक्ती तीर्थ, शिवकर तीर्थ

पौराणिक नाव: आलंकाडू, पळयनुर

जिल्हा: थिरुवल्लूर, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार येथील वनामध्ये कुशल आणि निशूल नावाचे दोन राक्षस वास्तव्य करत होते. ते येथील ऋषीमुनींचा छळ करून त्यांना खूप यातना देत होते. ऋषीमुनींनी श्री पार्वती देवींकडे ह्याबद्दल तक्रार केली. श्री पार्वती देवींनी स्वतःच्या नेत्रांमधून श्री काली देवीला प्रगट केलं आणि ह्या राक्षसांचा संहार केला. त्यानंतर श्री पार्वती देवींनी श्री काली देवींची ह्या वनाची राज्ञी म्हणून नियुक्ती केली. श्री काली देवींनी असुरांचं रक्त चाखलं असल्यामुळे त्या उन्मत्त आणि विस्कळीत मनःस्थिती मध्ये गेल्या. त्यामुळे त्या सगळ्यांशी भांडू लागल्या आणि उद्धटपणे वागू लागल्या. त्यावेळी मुनिकेश कर्कोटक नावाच्या ऋषींनी भगवान शिवांची प्रार्थना करून त्यांना श्री काली देवींना नियंत्रणामध्ये आणण्याची विनंती केली. भगवान शिवांनी अघोर रूप धारण केलं आणि ते ह्या वनात आले. श्री काली देवींनी भगवान शिवांना तांडव नृत्याच्या स्पर्धेसाठी आव्हान केलं. त्या आव्हानामध्ये त्यांनी भगवान शिवांना सांगितलं कि भगवान शिव जर ह्या स्पर्धेमध्ये जिंकले तर त्यांना ह्या वनाचे राज्यपद प्राप्त होईल. ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी १७ प्रकारचे नृत्य केले. ह्या सर्व नृत्यांना श्री काली देवींनी बरोबरीचा प्रतिसाद दिला. पण भगवान शिवांनी केलेल्या ऊर्ध्व तांडवाची मात्र श्री काली देवी बरोबरी करू शकल्या नाहीत. श्री पार्वती देवी हे ऊर्ध्व तांडव नृत्य पाहून आश्चर्यचकित झाल्या. किंबहुना इथे श्री पार्वती देवींना भगवान शिवांचे नृत्याची साक्षी म्हणून संबोधलं जातं (तामिळ मध्ये अरूगील इरुंथु बियंथ नायकी). ह्या नृत्यामध्ये भगवान शिवांनी आपल्या डाव्या कानातले कुंडल जमिनीवर पाडले आणि ते कुंडल आपल्या डाव्या पाउलांनी उचलून परत कानामध्ये स्थित केले. श्री काली देवींनी हे नृत्य बघून आपला पराभव स्वीकारला कारण त्यांना कळून चुकले कि त्या हे नृत्य करू शकणार नाहीत म्हणून. पराभूत झालेल्या श्री काली देवींना शांत करण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना थिरुवीरकोलम येथे आपण करणार असलेल्या रक्षा नावाच्या सुखकारक नृत्याची माहिती दिली आणि तेथे येऊन त्यांचे दर्शन घ्यावयास सांगितले. भगवान शिवांनी श्री काली देवींना त्या आपल्याशी तुल्यबळ आहेत असं प्रेरणादायी वक्तव्य केलं. त्यांनी श्री काली देवींना वरदान दिलं की जे कोणी इथे भगवान शिवांचं दर्शन घेण्यास येतील त्यांना आधी श्री काली देवींचं दर्शन घेऊन मग भगवान शिवांचं दर्शन घेतल्यानंतरच दर्शनाचे फळ मिळेल. त्या घटनेपासून इथे श्री काली देवींचे स्वतंत्र मंदिर आहे आणि भाविक प्रथम तिचे दर्शन घेऊन मगच भगवान शिवांचे दर्शन घेतात. 


श्री पार्वती देवी, श्री नारद मुनी, श्री कर्कोटक ऋषी, श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे भगवान शिव आणि श्री काली देवींच्या नृत्यस्पर्धेचे साक्षीदार होते. 


भगवान शिवाचे हे ऊर्ध्व तांडव नृत्य करैक्कल अमैयार ह्या स्त्री नायनमारांनी पण बघितलं. असा समज आहे कि त्या कैलास पर्वतावर आपल्या हातांवर चालत (म्हणजेच शिर खाली आणि पाय वरती) गेल्या. त्या जेव्हा पोचल्या त्यावेळी भगवान शिवांनी त्यांना माता असं संबोधलं. भगवान शिवांनी त्यांना थिरूवालंकाडू येथे येऊन ऊर्ध्व तांडवाच्या दर्शनाचा लाभ घेण्याची आज्ञा केली. जेव्हा त्या येथे आल्या त्यावेळी त्या जिथे जिथे पाऊल ठेवत होत्या तेथे तेथे शिव लिंग उत्पन्न होत होते. नंतर त्यांनी ऊर्ध्व तांडव नृत्याच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि भगवान शिवांची आपल्या गाण्यातून स्तुती केली. त्यांना ह्याच मंदिरामध्ये मोक्षाची प्राप्ती झाली. असा समज आहे कि त्या श्री नटराजांच्या पायाशी विलीन झाल्या आणि तेथेच त्यांना कायमचं स्थान प्राप्त झालं.


श्री करैक्कल अमैयार आपल्या शिरावर चालल्या म्हणून श्री संबंधर ह्या नायनमारांना इथल्या जमिनीवर पाय ठेवण्याचा संकोच वाटला. त्यामुळे ते मंदिरात न येता जवळच्या गावात राहिले. भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री संबंधरांना ते त्यांची स्तुती करायचे विसरले आहेत ह्याची जाणीव करून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री संबंधर मंदिरात गेले आणि त्यांनी भगवान शिवांची स्तुती केली. 


अजून एका आख्यायिकेनुसार नीली नावाच्या स्त्रीची तिच्या नवऱ्याने तिच्यावर व्यभिचाराचा संशय घेऊन हत्या केली. मृत्यूनंतर तिची पुढच्या योनीमध्ये प्रगती झाली नाही आणि त्यामुळे ती इथे भूत बनून राहिली आणि लोकांना त्रास देऊ लागली. जेव्हा तिचा नवरा त्याच्या पुढच्या जन्मात ह्या गावात आला त्यावेळी तिनें तिच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले. तिने तिच्या नवऱ्याच्या वर्तमान जन्मातल्या पत्नीचे रूप घेतले आणि रडून  त्याला तिच्याबरोबर येण्यासाठी विनंती केली. तिच्या नवऱ्याला ह्या त्याच्या सध्याच्या जन्मातल्या पत्नीच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले आणि शंका पण आली त्यामुळे त्याने तिच्या बरोबर येण्यास नकार दिला. मनुष्य रूप धारण केलेल्या नीलीने गावाच्या मुख्याकडे (वेलवर) ह्याबद्दल तक्रार केली. गावाच्या मुख्याने त्याला तिच्या बरोबर जवळपासच्या जागेमध्ये राहायला सांगितले आणि त्याला आश्वासन दिले कि त्याचे काही बरेवाईट झाल्यास ते स्वतःच्या जीवाचं बलिदान करतील. दुसऱ्या दिवशी त्यांना तो मृतावस्थेत सापडला. त्यामुळे गावाच्या मुख्याने काही गावकऱ्यांबरोबर आपल्या शब्दाला जागून  स्वतःला जाळून घेतले. भगवान शिवांनी त्या सगळ्यांना मोक्षदान दिले. ज्या मंडपामध्ये गावाच्या मुख्याने आणि गावकऱ्यांनी स्वतःला जाळून घेतले तो मंडप ह्या मंदिरापासून साधारण १ किलोमीटर वर आहे. 


अजून एका आख्यायिकेनुसार श्री शनीश्वरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच श्री मांदीश्वराला दोषनिवारणासाठी इथे भगवान शिवांची उपासना करावयास सांगितले. त्याच्या अंगावर पाल पडल्यामुळे त्याच्यामध्ये काही दोष उत्पन्न झाले होते. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याला भगवान शिवांनी दोषमुक्त केले. 


मंदिराबद्दल आणि त्यातील मुर्त्यांबद्दल माहिती:


पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर साधारण १७०० वर्षे जुने आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चोळा, विजयनगर आणि पल्लव साम्राज्याच्या राजांनी वेळोवेळी केला. येथील शिलालेखांमध्ये ह्या जिर्णोद्धारांचा उल्लेख आढळतो. ह्या मंदिराचा आवारा खूप मोठा आहे. आणि मंदिर पण खूप भव्य आहे. ह्या मंदिरामध्ये दोन गोपुरे आहेत आणि येथील राजगोपुर ५ स्तरांचं आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री कर्पग विनायकांचे देवालय आहे. ह्या मूर्तीला १२ हात आहेत आणि बरोबर त्यांची पत्नी श्री सिद्धी आहेत. दुसऱ्या देवालयामध्ये श्री षण्मुख ह्यांची त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत मूर्ती आहे. ह्या मंदिराला तीन परिक्रमा आहेत. पहिल्या परिक्रमेमध्ये अन्नदान आणि प्रसादालय आहे. श्री वल्लभ विनायक आणि श्री मुरुगन व त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या मुर्त्या गोपुराच्या समोरील बाजूस आहेत. श्री वल्लभ विनायकाच्या मांडीवर त्यांची पत्नी श्री सिद्धी आहेत. दुसऱ्या परिक्रमेमध्ये प्रवेश केल्यावर डावीकडे श्री करैक्कल अमैयार ह्यांचे देवालय आहे. उजव्या बाजूला श्री मीनाक्षी सुन्दरेश्वर ह्यांचे देवालय आहे. परिक्रमेच्या टोकाला श्री वंदारकुळली अम्मन ह्यांचे देवालय आहे. 


मुख्य परिक्रमेमध्ये गाभारा आणि त्यावरील विमान (शिखर किंवा गोपुर) गजपृष्ठ शैलीचे आहे. शिव लिंग स्वयंभू आहे आणि पूर्वाभिमुख आहे. हे लिंग खूप उंच आणि रुंद आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ श्री गणेश आणि द्वारपालकांच्या मुर्त्या आहेत. शिवलिंगावर रुद्राक्षांचे पंडाल आहे. 


कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा परमेश्वरी, श्री चंडिकेश्वरर आणि श्री दुर्गा देवी. श्री दुर्गा परमेश्वरींची मूर्ती विलक्षण आहे. 


श्री देवींच्या देवालयाबद्दल:


देवी दक्षिणाभिमुख आहे. ती चतुर्भुज असून तिच्या दोन हातांमध्ये कमळ आहे तर उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेत आहेत. देवीच्या देवालयाजवळ यागशाळा आहे. हे ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. ह्या पीठाचे नाव श्री कालीपीठ आहे. 


अर्थमंडप नावाचा मंडप इथे आहे. ह्या मंडपामध्ये श्री नटराज, श्री गणेश, श्री शनी आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत तसेच शिवलिंग आणि त्यासमोर नंदि आहेत. 


नंदि मंडप, बलीपीठ आणि ध्वजस्तंभ हे दक्षिणाभिमुख आहेत. महामंडप म्हणजेच नटराज सभा आहे ज्याचे नाव रत्नसभा असे आहे. 


ह्या ठिकाणी भगवान शिवांचे नाव श्री रत्नासभापती ईश्वरर असे आहे. त्यांची पत्नी म्हणजेच श्री शिवकामसुंदरी ह्यांचे नाव श्री समिसनम्बिका असे आहे. ह्या मूर्तीचा डावा पाय उचललेल्या स्तिथीमध्ये असून तो डाव्या कानाला स्पर्श करत आहे. ही तांडव मुद्रा आहे आणि ह्या तांडवाचे नाव ऊर्ध्व तांडव असे आहे. श्री पार्वती देवींच्या चेहऱ्यावर ऊर्ध्व तांडव पाहून झालेली आश्चर्य भावना दिसते. ह्या ठिकाणी दोन शिव लिंगे आहेत. एक स्फटिक लिंग आहे आणि दुसरे मरगद म्हणजेच पाचूचे लिंग आहे. ह्या मंडपावर तांब्याचे छप्पर असून त्यावर पांच कलश आहेत जी पंच महाभुतांची प्रतीके आहेत. 


मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:

श्री सूर्य, श्री चंद्र, श्री नंदि, श्री विजयराघव पेरुमल त्यांच्या पत्नी श्री श्रीदेवी आणि श्री भूदेवी ह्यांच्या समवेत, श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत, श्री अघोर वीरभद्र, श्री मरूंथेईश्वरर, श्री गणेश, श्री सप्त मातृका, श्री शास्ता, नालवर, श्री करैक्कल अमैयार, श्री कर्कोटक, श्री पातंजली ऋषी, श्री मूनिकेश, श्री आनंदन, श्री चंडेश, श्री अनुग्रह मूर्ती. श्री वडारण्येश्वरर ह्यांची एक छोटी मूर्तीपण येथे पाहावयास मिळते. ह्या शिवाय परिक्रमेमध्ये शिव लिंगे पाहायला मिळतात ज्यांची नावे अशी आहेत - श्री अगथीश्वरर, श्री कैलासनाथर, श्री रामेश्वरर, श्री वाल्मिकनाथर, श्री काशी विश्वनाथ, श्री कामाक्षी समवेत श्री एकाम्बरनाथर. तीन शिव लिंगे सर्पराज आणि नागराजांसमवेत आहेत. तसेच इथे श्री गणेशांच्या आठ रूपांच्या मुर्त्या, श्री उपासना दक्षिणामूर्ती आणि श्री गजलक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आतल्या परिक्रमेमध्ये आहेत. ह्याशिवाय इथे पुढील देवांची स्वतंत्र देवालये आहेत - श्री गणेश, सप्त लिंगे, श्री सौंदर्यनायकी समवेत श्री कुळंदैश्वरर लिंग, सहस्रलिंग आणि श्री उमादेवी, श्री सत्यज्योती मुनी, श्री भैरव, श्री भद्रकाली, श्री अघोर वीरभद्र ह्यांच्या उत्सव मुर्त्या आहेत. आतल्या परिक्रमेमध्ये पंच लिंग, नालवर, नवग्रह ह्यांच्या मुर्त्या आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये शिवलिंग, नंदि आणि स्थळवृक्ष आहेत. एके काळी ह्या स्थळी वट आणि फणस वृक्षांचे वन होते. म्हणून ही वृक्षे इथली स्थळ वृक्षे आहेत. 


इथे अजून एक मंडप आहे ज्याचे नाव राशीमंडप आहे. ह्या मंडपामध्ये श्री थिरूमुलनायकी समवेत श्री मुक्तिश्वरर ह्यांचे देवालय आहे. ह्या मंडपातले १२ स्तंभ हे १२ राशींचे प्रतीक आहेत. इथे श्री काली देवींचे मंदिर आहे ज्याचं दर्शन सर्वप्रथम घेतलं जातं आणि मग भगवान शिवांचं दर्शन जातं. श्री काली देवींची मूर्ती नृत्य मुद्रेमध्ये आहे. ह्या मंदिरातला रथ कमळाच्या आकाराचा आहे. 


वैशिष्ट्ये:


श्री भद्रकाली देवींच्या मंदिराजवळ श्री करैक्कल अमैयार ह्यांची जीवसमाधी आहे. विवाहामधले अडथळे, शनिदोष तसेच भरणी नक्षत्र दोषांसाठी हे परिहार स्थळ आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव (१० दिवस)

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवधिरै उत्सव. हा इथला सर्वात महत्वाचा उत्सव आहे. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): दर सोमवारी इथे रात्री विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर यंत्राची पूजा पण केली जाते. 

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तिरं उत्सव, महाशिवरात्री, अमावस्या प्रदोष पूजा


दैनंदिन पूजा: दिवसातून ६ वेळा नित्य पूजा केली जाते. 

साप्ताहिक पूजा: सोमवारी आणि शुक्रवारी

पाक्षिक पूजा: प्रदोष पूजा

मासिक पूजा: अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, कृत्तिका नक्षत्र


पत्ता

श्री वडारण्येश्वरर कोविल, ऍट पोस्ट थिरूवालंकाडू, थिरुथनी तालुका, थिरुवल्लूर जिल्हा, तामिळ नाडू ६३१२१०


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment