Sunday, March 3, 2024

श्री विल्ववनेश्वरर थिरुक्कोलुपंथुर

पंचारण्य स्थळ यात्रेमधले हे शेवटचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या दर्शनाची वेळ संध्याकाळी ८ आहे. १८०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळं म्हणजेच नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ मंदिरांपैकीपण एक आहे.


मुलवर: श्री विल्वरण्येश्वरर

देवी: श्री सौंदर्यनायकी

क्षेत्रवृक्ष: बिल्व

विशेष देवता: श्री नटराज

पवित्र तीर्थ: अग्नी आणि गंगा तीर्थ

दर्शनाची वेळ: संध्याकाळी ८


क्षेत्र पुराण

६३ नायनमारांपैकी श्रेष्ठ नायनमार थिरुज्ञानसम्बन्धर एकदा आपल्या भक्तगणांसह ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते. ह्या मंदिराच्या गावाच्या बाजूला असलेल्या वेत्तरु नदीच्या विरुद्ध काठावर ते येऊन पोहोचले. तेथल्या नौकेचा नावाडी नाव सोडून निघून गेला होता आणि त्या नौकेमध्ये वल्ही पण नव्हती. पण थिरुज्ञानसम्बन्धरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दिवशी मंदिराचं दर्शन घ्यायचंच होतं. ते आपल्या भक्तगणांसह नौकेत बसले आणि त्या सर्वांनी मिळून भगवान शिवांची भजने गाण्यास चालू केला आणि त्याचा परिणाम म्हणजे नौका वल्हवल्याशिवाय मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन पोचली आणि त्या सर्वांनी ठरवल्याप्रमाणे भगवान शिवांच्या कृपेने दर्शन घेता आले आणि दर्शन घेऊन त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केला. 


असा समज आहे की श्री ब्रह्मदेव आणि श्री अर्जुन ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. विशेषकरून श्री ब्रह्मदेवांनी इथे त्यांना प्राप्त झालेल्या ब्रह्महत्येच्या दोषाचे निवारण करण्यासाठी इथे आराधना केली. 


मंदिराबद्दल माहिती:

पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिराचे राजगोपुर ७५ फूट उंच असून ते पांच स्तरांचे आहे. 


स्वामी मलई येथे मुक्काम करून पंचारण्य यात्रेतील पांचही मंदिरांचं एकाच दिवसात दर्शन घेणं शक्य आहे. हि यात्रा चालू करण्यापूर्वी स्वामी मलई च्या जवळ असलेल्या श्री श्वेतविनायक मंदिराचं दर्शन घ्यावं अशी प्रथा आहे. 


ह्या मंदिरामधल्या इतर मुर्त्या अशा:


१. श्री गणेश

२. श्री वळंपुरी विनायक (उजव्या सोंडेचा)

३. श्री मुरुगन

४. श्री आदिविश्वनाथ

५. श्री गजमुक्तीश्वरर

६. श्री गजलक्ष्मी

७. श्री पंचलिंग  



मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): ह्या महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर थैपुसम हा सण साजरा होतो  

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमा

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नौका उत्सव साजरा होतो, स्कंद षष्ठी सण इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): प्रदोष पूजा, प्रत्येक सोमवारी विशेष पूजा



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment