ही दोन्ही मंदिरे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि जवळ जवळ २००० वर्षे जुनी आहेत. शिव मंदिराचे नाव श्री वेदपुरीश्वरर आहे तर विष्णू मंदिराचे नाव श्री देवादिराजापेरुमल असे आहे.
ही दोन्ही मंदिरे तामिळ नाडूमधल्या नागपट्टीनं जिल्ह्यामध्ये मयीलादुथुराई-कुंभकोणम मार्गावर (कुथालम मार्गे) मयीलादुथुराईपासून १२ किलोमीटर्सवर थेराझुंदूर ह्या गावात आहेत. मुळतः हे मंदिर माड कोविल शैलीचे विटांचं मंदिर कोचेंगट चोळा राजाने बांधलं. चोळा साम्राज्याच्या काळाचे इथे सहा शिलालेख आहेत.
मूलवर: श्री वेदपुरीश्वरर, श्री अर्थ्यबाकेसर
देवी: श्री सुंदराम्बिका, श्री सौंदर्यनायकी
स्थळ वृक्ष: बिल्व, चंदन
पुराणिक नाव: चंद्र अरण्यं
पवित्र तीर्थ: वेद तीर्थ
क्षेत्र पुराण:
१. शिव मंदिर: हे शिव मंदिर नायनमारांनी स्तुती केलेल्या कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील मंदिरांतील अडतिसाव्व मंदिर आहे. ६३ नायनमारांपैकी श्रेष्ठ नायनमार थिरुज्ञानसंबंधर हे जेव्हां बालवयात इथे आले त्यावेळी ते शिव मंदिर ओळखू शकले नाहीत. तेव्हां श्री विनायकांनी त्यांना शिव मंदिर ओळखायला मदत केली. म्हणून इथे श्री विनायकांना श्री ज्ञानसंबंधर विनायकर असे नाव आहे. पूर्वी ह्या स्थळाला कृष्णारण्यं असे नाव होते.
२. शिव मंदिर: एकदा कैलासावर भगवान शिव आणि भगवान विष्णू हे द्यूत खेळत होते. श्री पार्वती देवींनी पंचाची भूमिका वठवली. ह्या मनोरंजक खेळामध्ये शेवटी भगवान विष्णू जिंकले. पार्वती देवी संभ्रमात पडल्या कारण एका बाजूला त्यांचे पती होते तर दुसऱ्या बाजूला भाऊ. शेवटी न्याय्यरित्या त्यांनी भगवान विष्णूंना विजयी घोषित केले. भगवान शिवांना ह्यामुळे खुप राग आला आणि त्यांनी पार्वतीदेवींना त्यांच्या भावाची बाजू घेतल्यावरून खूप सुनावले. त्यांनी श्री पार्वती देवींना शाप दिला आणि पृथीवर धाडून गाय बनून भटकायला लावलं. पार्वती देवी गाय बनून भूलोकावर आल्या आणि दक्षिण भारतामध्ये भटकत होत्या. भगवान विष्णूंना वाटले की आपल्या बहिणीची ही परिस्थिती आपल्यामुळे झाली आहे म्हणून ते आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी गोपाळ बनून पृथ्वीवर आले. भगवान शिवांना पण पार्वती देवींचा विरह सहन झाला नाही म्हणून ते पण एका ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्या गायीची म्हणजेच पार्वती देवींची काळजी घ्यायला लागले. ह्या मंदिरात भगवान विष्णू आमरुविअप्पन (गोपाळ) म्हणून, भगवान शिव वेदपुरीश्वरर म्हणून आणि पार्वती देवी भक्तांवर कृपावर्षाव करतात. भगवान शिवांना वेदपुरीश्वरर म्हणतात कारण ब्राह्मणाच्या रूपात त्यांनी वेद शिकवले. पार्वती देवी गायीच्या रूपात बऱ्याच पवित्र स्थानी गेल्या आणि शेवटी इथे त्यांनाआपलं मूळ सुंदर रूप प्राप्त झालं.
३. विष्णू मंदिर: ह्या स्थळाला निगडित अजून एक पुराण आहे जे विष्णू मंदिराशी संबंधित आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या काठावर गायींना चरायला घेऊन गेले होते. जेव्हा ते त्यांची तहान भागविण्यासाठी यमुना नदीमध्ये गेले त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्या गायींना ह्या ठिकाणी आणलं. गोपांनी हे वृत्त श्रीकृष्णांना सांगितलं. श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांनी नेलेल्या गायिंसारख्या गायी निर्माण केल्या. श्रीकृष्ण गायींना घ्यायला आले नाहीत म्हणून ब्रह्मदेवांना निराश झाले. आपली चूक मान्य करून ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांकडे क्षमायाचना केली. भगवान श्रीकृष्णांनी इथे गायींना चारले म्हणून इथे आपल्याला गाय आणि तिचे वासरू अशी मूर्ती उत्सव मूर्तीच्या मागे बघायला मिळते.
४. विष्णू मंदिर: उपरिचर वसू राजाने प्रखर तपश्चर्या केली आणि एक वरदान मिळवलं ज्यामुळे त्याचा रथ जेव्हा पृथ्वीवर किंवा आकाशात भ्रमण करेल त्यावेळी त्या रथाच्या मार्गामध्ये कुठलाही अडथळा आल्यास तो अडथळा नाश पावेल. एकदा राजा आणि त्याची राणी आकाशातून भ्रमण करीत होते त्यावेळी राणीने भगवान विष्णूंच्या मंदिराला भेट द्यायची इच्छा प्रकट केली. राजाने ती विनंती तर मान्य केलीच नाही वरती असा शाप दिला की त्या रथाच्या सावली मध्ये जे अडथळे येतील ते सगळे नाश पावतील. जेव्हां त्या रथाची सावली पृथ्वीवर गुरंढोरं चरत होती त्यांवर पडली, ती गुरंढोरं मरण पावली. गुरंढोरं पाळणारे गोप खूप अस्वस्थ झाले. पण राजा ते सगळं पाहून हसत होता आणि त्या दृश्याचा आस्वाद घेत होता. जेव्हां भगवान विष्णूंनी हे राजाचं अहंकारी वर्तन पाहिलं तेव्हां ते आपल्या गरुडावर आरूढ झाले आणि त्यांनी राजाच्या रथाची सावली आपल्या पायाच्या बोटाने दाबली. त्यामुळे तो रथ राजा आणि राणीसकट एका पवित्र तलावामध्ये पडले. राजा आणि राणी पोहत पोहत काठावर आले जिथे अगस्त्य ऋषी ध्यान करत होते. राजाला वाटलं की अगस्त्य ऋषींचा शापच ह्या घटनेला कारणीभूत आहे. अगस्त्य ऋषींना ज्ञात झालं कि ही घटना कशामुळे घडली आहे ते. त्यांनी राजाला भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांची क्षमायाचना करण्यास सांगितले. जेव्हा राजा भगवान विष्णूंकडे आला त्यावेळी भगवान विष्णू गोपाळांच्या रूपात गुराढोरांना चारत होते. राजाने गोपाळाला तलावात बुडालेला आपला रथ परत मिळवून देण्याची विनंती केली. गोपाळ रुपातले भगवान राजाला म्हणाले की राजाने १००० लोण्याने भरलेले घट जर दिले तर ते राजाला मदत करतील. राजाने प्रयन्त करून ९९९ घट जमवले पण त्याला १०००वा घट लोण्याने भरता आला नाही म्हणून राजाने त्यात पाणी भरले आणि १००० घट गोपाळाला दिले. गोपाळाने पहिलाच जो घट हातात घेतला त्यात पाणी होते पण गोपाळाने मात्र त्यातून लोणीच काढले. तसेच पुढच्या सर्व ९९९ घटातून गोपाळाने म्हणजेच भगवानांनी लोणी काढले. ते पाहून राजा भगवानांच्या पाया पडला आणि त्याने क्षमायाचना केली. भगवानांनी त्याला क्षमा करून आपल्या पायाशी जागा दिली आणि त्याला विश्वरूपदर्शन घडवले. म्हणून ह्या विष्णू मंदिरामध्ये भगवान विष्णूंची पूर्ण वैभवामध्ये पूजा होते.
५. वाथापी असुराचा वध केल्याने प्राप्त झालेल्या पापाचं क्षालन करण्यासाठी अगस्त्य ऋषींनी इथे तपश्चर्या केली.
६. मार्कंडेय ऋषींनी इथे तपश्चर्या केली. त्यांनी भगवान विष्णूंची मुक्तीसाठी उपासना केली आणि त्यांना मुक्ती प्राप्त झाली.
७. इथे कावेरी नदीची मूर्ती आहे. हि मूर्ती एक महत्वाची घटना दर्शविण्यासाठी आहे. एकदा अगस्त्य ऋषींनी कावेरी नदीशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली पण कावेरीने ती नाकारली. अगस्त्य ऋषींनी तिला कमंडलूमध्ये बंद केलं. नंतर श्री गणेशांनी तो कमंडलू पाडून तिला मुक्त केलं. जेव्हां कावेरी वाहायला लागली तेव्हा अगस्त्य ऋषींनी तिला शाप दिला. त्या शापाचं निरसन कावेरी नदीने इथे भगवान विष्णूंची पूजा करून केलं.
८. जेव्हा शैव संत संबंधर ह्या जागी आले ते एका चौकात आले. त्यांना मंदिराकडे जाण्याचा रस्ता सापडत नव्हता. तेव्हां श्री विनायकांनी त्यांना रस्ता दाखवला.
९. जेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी विभक्त झाले तेव्हा इंद्रदेव, इतर देव आणि अष्टदिक्पाल त्यांना भेटायला आले. नंदिदेवांनी त्यांना भगवान शिव आणि पार्वती देवींना भेटण्याची परवानगी दिली नाही. म्हणून अष्टदिक्पालांनी इथे आठ शिव लिंगे स्थापन करून त्यांची पूजा केली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
देव, वेद, अष्ट दिक्पाल, इंद्र देव, पार्वती देवी, अगस्त्य ऋषी, कावेरी नदी, मार्कंडेय ऋषी, शैव संत संबंधर
वैशिष्ट्ये:
१. इथला गाभारा अर्धवर्तुळाकार खंदकासारखा आहे.
२. इथे एक मंडप आहे. असा समज आहे की ह्या मंडपामध्ये भगवान शिव आणि पार्वती देवी द्यूत खेळले. हे दृश्य इथल्या चित्रांमध्ये चित्रित केले आहे.
३. मासी ह्या तामिळ महिन्याच्या २३व्या, २४व्या आणि २५व्या दिवशी संध्याकाळी ५.५० ते ६.१८ सूर्याची किरणे इथल्या शिव लिंगावर पडतात.
४. एके काळी हे माड शैलीचे मंदिर होते.
५. श्री कंबर ह्या तामिळ कवींचे हे जन्मस्थान आहे.
६. हे स्थळ चंदनाचे वन होते.
७. आधीच्या लेखात उल्लेखलेल्या प्रमाणे हे स्थळ थिरुक्कोळंबुर, थिरूवदुराई, कुथालम, एथिरकोळपडी, थिरुवेलवीकुडी आणि थिरुमनंचेरी ह्या स्थळांशी निगडित आहे.
८. शिव लिंगावरचे छत रुद्राक्षाचे आहे.
९. जेव्हां पार्वती देवी इथे गायीच्या रूपात तपश्चर्या करायला आल्या त्यावेळी लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी पण गायीच्या रूपात त्यांच्याबरोबर आल्या.
१०. पार्वती देवींचे देवालय इथे बाहेर आहे कारण इथे त्यांचा भगवान शिवांशी विवाह झाला नाही.
११. अगस्त्य ऋषी आणि कावेरी नदींनी इथे भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांना त्यांच्या शापातून मुक्ती मिळाली. त्यांची स्वतंत्र देवालये आहेत.
१२. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे.
१३. इथे भगवान शिवांनी ब्राह्मणांना वेद आणि त्यातील बारकावे शिकवले म्हणून भगवान शिवांना इथे वेदपुरीश्वरर असे संबोधले जाते.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या मंदिराचा चोळा राजांनी जीर्णोद्धार केला. पण नवीन मंदिर बांधताना त्यांनी हे मंदिर माड शैलीचे बांधले नाही. कालांतराने विजयनगर राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. बलीपीठ, नंदि आणि ध्वजस्तंभ हे राजगोपुराच्या पुढे आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि महामंडप आहे. इथला गाभारा अर्धवर्तुळाकार खंदकाच्या आकाराचा आहे. इथले शिव स्वयंभू आहे आणि ह्या लिंगाच्या छत रुद्राक्षाचे आहे. मुख्य देवालयाच्या मागे इथे रुद्राक्षाचे झाड आहे.
कोष्टामध्ये श्री गणेश, श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि चतुर्भुज दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथल्या अर्थ मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळाच्या आकाराचा आहे (तामिळ मध्ये वोव्वेळ). श्री महादेवेश्वरर ह्यांचे देवालय परिक्रमेमध्ये डाव्या बाजूला आहे तर श्री महादेवेश्वरी ह्यांचे देवालय उजव्याबाजूला आहे. ह्या देवालयांमध्ये द्वारपालकांची स्टुक्को चित्रे आहेत.
आतल्या परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री सुब्रह्मण्य, नवग्रह, क्षेत्र लिंग, कदंबवनेश्वरर लिंग, वळंचुळी विनायकर, कावेरी देवी, अगस्त्य ऋषी, चंडिकेश्वरर, मार्कंडेय ऋषी आणि स्वर्णाकर्ष भैरव. नवग्रह संनिधीमध्ये सूर्य पश्चिमाभिमुख आहे आणि सगळे ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत. क्षेत्र वृक्षाच्या जवळ आपल्याला श्री गणेश आणि नंदिदेवांच्या मुर्तींबरोबरच क्षेत्र लिंग पण पाहावयास मिळते. सुरुवातीला इथे फक्त श्री महादेवेश्वरर आणि श्री महादेवेश्वरी ह्यांची देवालये होती. इतर देवालये नंतर बांधली गेली. ह्या मंदिराकडे मुख करून एक स्वतंत्र महाविष्णूंचं मंदिर आहे. अष्टदिक्पालांनी इथे आठ लिंगे स्थापन केली जी अजूनही अस्तित्वात आहेत.
मंदिरामधली इतर देवालये:
इथे भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मीदेवींची स्वतंत्र देवालये आहेत. इथे चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांचे पण देवालय आहे ज्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रुक्मिणी आणि सत्यभामा आणि त्याचबरोबर एक वासरू पण आहे.
इथे उपरिचर वसू राजाचा रथ थांबवला गेला म्हणून ह्या स्थळाला थेराझुंदूर असे नाव प्राप्त झाले.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे चांगला विवाह व्हावा म्हणून भगवान शिवांची प्रार्थना करतात.
२. विभक्त दांपत्ये इथे पुनर्मीलन व्हावं म्हणून प्रार्थना करतात.
३. स्त्रिया त्यांचे सौंदर्य वाढावे म्हणून इथे श्री पार्वती देवींची पूजा करतात.
पूजा:
रोज दिवसभरात चार पूजा केल्या जातात. तसेच नियमितपणे प्रदोष पूजा, तसेच इतर साप्ताहिक आणि पाक्षिक पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): २३व्या, २४व्या आणि २५व्या दिवशी सूर्य पूजा केली जाते, महाशिवरात्री
चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेचा १० दिवस अगोदर १० दिवसांचा उत्सवाची सुरुवात दर्शविण्यासाठी ध्वजारोहण केले जाते. हा उत्सव रथयात्रेनी सम्पन्न होतो.
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी आणि आवनी मुलम
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरु कार्थिगई दीपम
ह्या शिवाय इथे नवरात्री उत्सव १० दिवस भव्य प्रमाणावर साजरा केला जातो.
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते ११.३०, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता: श्री वेदपुरीश्वरर मंदिर, ऍट पोस्ट थेराझुंदूर, कुथालम तालुका, तामिळ नाडू ६०९८०५
दूरध्वनी: +९१-४३६४२३७६५०
मंदिराचे पुजारी: श्री राजमोहन शिवम, ९८४२१५३९४७, ९४८६४५७१०३
श्री देवादिराजपेरुमल मंदिर
मूलवर: श्री देवादिराजपेरुमल, श्री अमरुविअप्पन
देवी: श्री सेंगमअलवल्ली
हे विष्णू मंदिर पंचारण्यकृष्ण क्षेत्रांपैकी एक आहे.
ह्या मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
वैकासि (मे-जून): ब्रह्मोत्सव
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुओनम आणि एकादशी