हे शिव मंदिर मयीलादुथुराई-पोरायूर मार्गावर मयीलादुथुराई पासून १० किलोमीटर्स वर असलेल्या सेंबरनारकोविल ह्या गावामध्ये स्थित आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी स्तुती केलेल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. हे मंदिर साधारण ३००० वर्षे जुनं असावं असा अंदाज आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या ब्रह्मक्षेत्र खंडामध्ये ह्या मंदिराचा उल्लेख स्वर्णस्थळ ह्या शीर्षकाखाली आढळतो. ह्यामध्ये असा उल्लेख आहे की नैमिषारण्यामध्ये शुक मुनींनी इतर ऋषींना ह्या क्षेत्राचं माहात्म्य सांगितलं. वर्तमान मंदिर माड शैलीचे आहे. हे माड कोविल चोळा साम्राज्याच्या कोचेंगट चोळा ह्या राजाने बांधले.
मूलवर: श्री स्वर्णपुरीश्वरर, श्री सेंम्पोनपल्लियार
उत्सव मूर्ती: श्री सोमस्कंदर, श्री नटराज आणि श्री चंद्रशेखर
देवी: श्री सुगंधाकुंदलांबिका, श्री सुगंधानायकी, श्री मरुवारकुळलीअम्मन, श्री पुष्पलांगी, श्री दाक्षायणी, श्री सुगंधावननायकी
पूजा / आगम: कारण आगम
क्षेत्र वृक्ष: बिल्व, शमी (तामिळ मध्ये वन्नी)
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, कावेरी नदी
पुराणिक नाव: लक्ष्मीपुरी, स्कंदपुरी, इंद्रपुरी
क्षेत्र पुराण:
१. ह्या स्थळापासून २ किलोमीटर्स वर पश्चिमेकडे असलेल्या दक्षमहापुरी (वर्तमान नाव परसालूर) ह्या स्थळी दक्ष राजांनी आयोजित केलेल्या यज्ञासाठी दाक्षायणी म्हणजेच पार्वती देवी आल्या. आपल्या पित्याने आपल्या पतीचा केलेला अपमान सहन न झाल्याने दाक्षायणीने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केलं. भगवान शिव ह्या घटनेनंतर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांनी श्री वीरभद्र आणि श्री भद्रकाली ह्यांना पाठवून यज्ञाचा आणि दक्ष राजाचा संहार केला. वीरभद्रांनी दक्ष राजांचा शिरच्छेद केला. नंतर जेव्हा दाक्षायणिनीं भगवान शिवांना दक्षराजाप्रती दयाभावना दाखवण्याची विनंती केली तेव्हा भगवान शिवांनी दक्ष राजाला पुनर्जीवित केले आणि त्यांच्या धडाला मेंढीचे शिर लावले. भगवान शिवांचा अपमान करणाऱ्या दक्ष राजाची पुत्री अशी आपली कुकिर्ती होऊ नये म्हणून पार्वती देवींनी ह्या स्थळी म्हणजेच चेंपोनपल्ली ह्या ठिकाणी पंचाग्नीमध्ये एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना स्वर्णपुरीश्वरर ह्या रूपांत दर्शन दिलं आणि पार्वती देवींना सुगंधावल्ली ह्या नावाने त्यांची पत्नी म्हणून इथे राहण्याची आज्ञा केली.
२. स्थळ पुराणानुसार दक्ष यज्ञाच्या घटनेनंतर भगवान शिवांनी पार्वती देवींचा स्वीकार करण्यास नकार दिला. श्री मुरुगन भगवान शिवांच्या रूपांत आले आणि त्यांनी पार्वती देवींना उपदेश दिला. ह्या घटनेला सिद्ध करण्यासाठी इथे श्री मुरुगन ह्यांच्या हातामध्ये अक्षमाला आहे.
३. स्थळपुराणानुसार एके काळी इथे राजा ब्रिदू होता ज्याला इथे एक ब्राह्मणांचे गाव (अग्रहार) वसवायचे होते. ह्या जागेत त्या वेळी घनदाट वन असल्याकारणाने राजाने येथील झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आकाशवाणी झाली ज्यातून राजाला सूचित केले गेले की त्याने इथली झाडे तोंडाने थांबवावे कारण ही झाडे नसून तपश्चर्या करणारे ऋषी आहेत. आकाशवाणीने असे पण सूचित केले की ह्या ठिकाणी सूर्यपुष्करिणी नावाचे पवित्र तीर्थ आहे आणि पश्चिमेच्या काठी शिव लिंग आहे ज्यामध्ये कुठलीही सिद्धी प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे. जेव्हां राजाला शिव लिंग सापडले तेव्हा ते शिव लिंग सुवर्ण रंगाने झळकत होते. राजाने रोज सूर्यपुष्करिणी मध्ये स्नान करून शिव लिंगाची पूजा करण्यास प्रारंभ केला. एकदा अगस्त्य ऋषींबरोबर भेट झाली. त्यांनी राजाला ह्या शिव लिंगाचे माहात्म्य निरूपण केले. कालांतराने राजाने इथे शिव लिंग भोवती मंदिर बांधले.
४. ह्या ठिकाणी लक्ष्मीदेवींनी महाविष्णूंबरोबर विवाह व्हावा म्हणून तपश्चर्या केली. म्हणून ह्या स्थळाला लक्ष्मीपुरी असे नाव आहे.
५. इंद्रदेवांनी इथे सूर्य तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली. ह्या ठिकाणी त्यांना वृद्धसुराचा वध करण्यासाठी वज्रायुधाची प्राप्ती झाली. म्हणून ह्या स्थळाला इंद्रपुरी असे नाव प्राप्त झाले.
६. मुरुगन देवांनी इथे भगवान शिवांची पूजा केली आणि त्याच्या प्रभावाने तारकासुराचा वध केला.
७. दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी इथे वीरभद्र प्रकट झाले.
८. भगवान शिवांनी कामदेवाचे दहन केल्यावर रतीदेवींनी इथे तपश्चर्या करून कामदेवांना म्हणजेच त्यांच्या पतींना पुनर्जीवित केलं.
९. भगवान विष्णूंनी इथे शिव लिंगाची पूजा केली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान महाविष्णू, श्री वीरभद्र, श्री इंद्रदेव, श्री महालक्ष्मी देवी, अगस्त्य ऋषी, वसिष्ठ ऋषी, कावेरी नदी, नाग-कन्या, श्री कुबेर आणि अष्टदिक्पाल
वैशिष्ट्ये:
१. हे चोळा साम्राज्याच्या कोचेंगट ह्या राजाने बांधलेल्या ७० माड शैलीच्या शिव मंदिरांपैकी एक मंदिर आहे. ह्या मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार लहान आहे जेणेकरून हत्ती इथे प्रवेश करू शकत नाही.
२. चित्राई (एप्रिल-मे) ह्या तामिळ महिन्याच्या ७व्या दिवसापासून ते १८व्या दिवसापर्यंत म्हण्जेच १२ दिवस इथे सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
३. इथले शिव लिंग कमळाच्या आकाराच्या पिठावर (अवूदयार) १६ कमलपटलांच्या २ रांगांमध्ये स्थित आहे.
४. इथे एक उठावदार चित्र आहे ज्यामध्ये राजा शिव लिंगाची पूजा करीत आहे आणि त्याच्या दोन बाजूंना एका बाजूला एक संन्यासी आहे तर दुसऱ्या बाजूला एक मंत्री आहे.
५. सेंम्बिअन नावाच्या चोळा राजाने हे मंदिर बांधले म्हणून ह्या स्थळाला सेंबरनारकोविल असे नाव प्राप्त झाले.
६. तामिळ मध्ये सेम्पॉन म्हणजे सुवर्ण. असा समज आहे कि इथल्या गाभाऱ्याचे शिखर हे मूलतः सुवर्णाचे होते.
७. इथल्या भिंतींवर सुंदर उठावदार चित्रे आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथे राजगोपुर नाही पण प्रवेशद्वारावर एक सुंदर कमान आहे. इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या मूर्ती आहेत आणि त्याच बरोबर श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नींसमवेत, मूषिक वाहनावर श्री गणेश आणि मोरावर श्री मुरुगन अश्या मूर्ती आहेत. इथे एकच परिक्रमा आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. हे माड शैलीचे मंदिर असल्याकारणाने हे मंदिर थोडे उंचावर बांधले आहे. इथले छत सुवर्णाचे (सेंपोन) आहे. म्हणून ह्या स्थळाला सेंपोनर कोविल असे नाव आहे. इथले शिव लिंग स्वयंभू असून १६ कमालपाटलांच्या दोन रांगा असलेल्या पिठावर स्थित आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री इंद्र गणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री दुर्गादेवी. श्री चंडिकेश्वरर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहेत.
इतर मूर्ती आणि देवालये: मंडपाच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या स्थितीमध्ये द्वारपाल आहेत. मंडपामध्ये उत्सव मूर्ती आहेत. इथे भिक्षाटनर ह्यांची खूप जुनी मूर्ती आहे. महामंडपामध्ये श्री गणेश, सूर्य लिंग, चंद्रलिंग तसेच श्री सुब्रमण्यम त्यांच्या मूर्तींसमवेत अशा मूर्ती आहेत. श्री सुब्रमण्यम ह्यांच्या उजव्या बाजूला श्री पार्वती देवींचे पश्चिमाभिमुख देवालय आहे ज्यामध्ये वरती उल्लेखलेल्या विविध नावांनी त्यांना संबोधले जाते. आख्यायिकेनुसार त्यांचं मुख पश्चिमेकडे परसालूर ह्या स्थळी त्यांच्या पितांच्या राजवाड्याकडे आहे असा समज आहे. नैऋत्येकडे सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. परिक्रमेमध्ये प्रसन्न विनायक, महागणपती, सूर्यलिंग, चंद्रलिंग, सूर्य, चंद्र, वनदुर्गा, काशी विश्वनाथ, भैरव आणि चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत आणि कुलोत्तम चोळा राजा आणि त्यांच्या मंत्रींच्या पण मूर्ती आहेत. तसेच श्रीनिवास पेरुमाळ (भगवान विष्णू), बालसुब्रमण्यम, गजलक्ष्मी देवी आणि वीरभद्र ह्यांच्यापण मूर्ती आहेत. ज्येष्ठा देवींचे स्वतंत्र देवालय आहे. इथे एक मूर्ती आहे ज्यामध्ये भगवान शिव शिबी राजाला दर्शन देत आहेत. भगवान शिवांच्या हातांमध्ये हरीण आणि एक शस्त्र आहे ज्याला तामिळ मध्ये मळू असं म्हणतात.
प्रार्थना:
१. भाविक जनांचा असा समज आहे कि चित्राई आणि वैकासि ह्या तामिळ महिन्यांच्या अमावास्येला इथल्या तीर्थामध्ये स्नान केल्यास सर्व पापांचं क्षालन होतं.
२. भाविक जनांचा असा समज आहे कि इथे सप्तमातृकांची पूजा केल्यास विवाहातल्या सर्व अडचणींचा परिहार होतो.
३. स्त्रिया जेव्हा अलंकार खरेदी करतात ते अलंकार परिधान करण्याआधी त्या ते अलंकार सुगंधाकुंदलांबिका देवीला प्रथम अर्पण करतात. असा समज आहे कि असे केल्याने त्यांना अजून सुवर्ण अलंकारांची प्राप्ती होते.
पूजा:
१. कारण आगमानुसार दैनंदिन पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा तसेच साप्ताहिक आणि मासिकपूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
आनी (जून-जुलै): थिरुमंजनं
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई, दर सोमवारी भगवान शिवांवर १०८ शंखांनी अभिषेक केला जातो.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
चित्राई (एप्रिल-मे): ज्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात त्या दिवशी विशेष सूर्यपूजा केली जाते.
मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री स्वर्णपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट सेंबरनारकोविल,
तालुका तरंगमपडी,
तामिळनाडू ६०९३०९
दूरध्वनी: +९१-९९४३७९७९७४
No comments:
Post a Comment