Sunday, October 19, 2025

थिरुविल्लनगर येथील श्री थुरैकट्टूम वल्ललर

हे मंदिर मयीलादुथुराई-सेम्बलरकोविल मार्गावर सेम्बलर कोविलपासून ५ किलोमीटर्स वर, मयीलादुथुराईपासून १२ किलोमीटर्सवर तर थरंगबडीपासून २३ किलोमीटर्सवर आहे. ह्या स्थळाला अरुपथी असं पण म्हणतात. हे मंदिर मयीलादुथुराईच्या वल्लाळ मंदिरांपैकी एक आहे तसेच मयीलादुथुराईच्या पंच-दक्षिणामूर्तीस्थळांपैकी पण एक आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर सहाव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा राजांनी नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पांड्या आणि तंजावूर नायक राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. ह्या मंदिरामध्ये तीन शिलालेख आहेत. सध्या हे मंदिर श्री धर्मपूर आधिनम ह्या संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या २७ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. प्राचीनकाळी हा प्रदेश विळल नावाच्या गवताने भरला होता. म्हणून ह्या स्थळाचे नाव विळलनगर असे होते जे कालांतराने ते विल्लनगर असे झाले.           

मूलवर: श्री थूरैकट्टूम वल्ललर, श्री उचिरवनीश्वरर, श्री वज्रवनीश्वरर 
देवी: श्री थूरैकट्टूमवल्ली, श्री वेयुरुथोलीअम्मन
पवित्र तीर्थ: कावेरी नदी, मेईग्यान तीर्थ
क्षेत्र वृक्ष: विळल
पुराणिक नाव: विळलनगर
वर्तमान नाव: विल्लनगर

क्षेत्र पुराण:

१. क्षेत्र पुराणानुसार प्राचीन काळी इथे अरुलविथन नावाचा कट्टर शिवभक्त होता. तो रोज सकाळी मंदिरातल्या सकाळच्या पहिल्या पूजेसाठी टोपली भरून फुले आणायचा. ह्यासाठी त्याला कावेरी नदी पार करायला लागायची. भगवान शिवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एकदा अरुलविथन नदी पार करत असताना भगवान शिवांनी नदीला पूर आणला. अरुलविथनने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही पण फुलांची टोपली वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टोपली वर ठेऊन तो स्वतः त्याच्याखाली गेला. तो दुसऱ्या काठावर पोचण्याचा अतोनात प्रयत्न करीत होता आणि मनामध्ये सकाळच्या पूजेला तो वेळेवर पोचणार नाही ह्याची त्याला चिंता होती. त्याने भगवान शिवांना मंदिरात वेळेवर पोचण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आणि त्याला वेळेवर पोचवले. भगवान शिवांनी आपल्या भक्ताला वाचवले म्हणून त्यांना इथे थूरैकट्टूम वल्ललर असं म्हणतात (तमिळमध्ये थूरै म्हणजे काठ, कट्टूम म्हणजे मदत आणि वल्ललर म्हणजे भगवान शिव).

२. अजून एक स्थळ पुराण शैव संत संबंधर ह्यांच्याशी निगडित आहे. एकदा संबंधर मयीलादुथुराई आणि कडैमुडी ह्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करत होते. ते ह्या स्थळी आले पण इथून नदीला पूर आलेला असल्याकारणाने पुढे जाऊ शकले नाहीत. त्यांनी भगवान शिवांना मदतीसाठी प्रार्थना केली. असा समज आहे की भगवान शिव एका शिकारीच्या रूपात आले आणि त्यांनी संबंधर ह्यांना मंदिरात जाण्यास मदत केली. जेव्हां तो शिकारी पाण्यात शिरला त्याचबरोबर नदीने त्या दोघांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी मार्ग खुला करून दिला. दुसऱ्या काठावर पोचल्यावर संबंधर ह्यांनी त्या शिकाऱ्याला धन्यवाद देण्यासाठी आजूबाजूला पाहिलं तर तो शिकारी कुठेही दिसला नाही.  तेव्हा संबंधरांना कळून चुकलं कि तो शिकारी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शिवच होते.

३. स्थळ पुराणानुसार कपीथन नावाच्या असुराने इथे भगवान शिवांची पूजा आणि त्या पूजेच्या प्रभावाने त्याची ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्तता झाली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

शैव संत संबंधर, अरुलविथन, आणि कपीथन असुर. 

वैशिष्ट्ये:

१. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे.

२. श्री वेयुरुअम्मन ह्यांना इथे एका हातात शंख तर दुसऱ्या हातात चक्र असे चित्रित केले आहे. पार्वती देवींचे असे चित्रीकरण खूप दुर्मिळ आहे.

३. हे स्थळ विळल नावाच्या गवताने भरले आहे. अजूनही मंदिराच्या आसपास हे गावात दिसतं.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर साधारण २.५ एकरवर पसरलेलं आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. मंदिराच्या दक्षिणेलापण एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशावर एक सुंदर कमान आहे ज्यावर पार्वती देवींसमवेत सरस्वती आणि महालक्ष्मी देवींची स्टुक्कोची चित्रे आहेत. ह्या शिवाय इथे अजून एक प्रवेशकमान आहे ज्यावर नंदिवर आरूढ झालेले भगवान शिव आणि पार्वती देवी, श्री विनायकर आणि श्री कार्थिकेय ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत. 

गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्थमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्यावर दोन स्तरांचं विमान (शिखर) आहे. राजगोपुरानंतर बलीपीठ आणि नंदि गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभारा लिंगाच्या आकाराचा आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. 

कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू (लिंगोद्भवरांच्या ऐवजी), श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी.

परिक्रमेमध्ये पुढल्या मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायकर, श्री सोमस्कंदर, श्री अरुमुगनार, नालवर, श्री अरुणाचलेश्वरर, श्री गजलक्ष्मी, श्री शनीश्वरर, नवग्रह, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री भैरवर. गाभाऱ्याच्या डावीकडे महामंडपामध्ये अंबिका देवींचे देवालय आहे. त्या दक्षिणाभिमुख असून उभ्या मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या हातात शंख आणि चक्र आहे. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे श्री नटराज आणि नवग्रह ह्यांची देवालये आहेत.

प्रार्थना:

१. भाविकांचा असा समज आहे इथे भगवान शिवांची पूजा केल्याने आपापल्या समस्यांचे चिरस्थायी उपाय मिळतात.

२. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी तसेच मुक्तीसाठी प्रार्थना करतात.

पूजा:

इथे कामीय आगमानुसार दैनंदिन पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा पण नियमित केल्या जातात. 

मंदिरात साजरे होणारे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी 

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकरसंक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम, पेरुक्कू

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): अरूद्र दर्शन

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, संध्याकाळी ५.३० ते रात्री ८

मंदिराचा पत्ता: श्री थूरैकट्टूम वल्ललर  / श्री उचिरवनीश्वरर मंदिर, थिरुविल्लनगर, ऍट पोस्ट - अरुपथी, तामिळ नाडू ६०९३०९

दूरध्वनी: +९१-३६४२८२१२९


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment