Sunday, October 12, 2025

मयीलादुथुराई येथील श्री मयूरनाथर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराईशी निगडित सप्त स्थानांपैकी एक आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. कावेरी नदीच्या काठावर अशी सहा क्षेत्रे आहेत ज्यांना काशी क्षेत्राशी तुल्यबळ मानलं जातं. हे क्षेत्र त्या सहा क्षेत्रांपैकी एक आहे. तसेच मयीलादुथुराईच्या आसपास असणाऱ्या पंच दक्षिणामूर्ती क्षेत्रांपैकी पण एक आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. ह्या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, शिव पुराण, ब्रह्माण्ड पुराण आणि चिदम्बर पुराण ह्या पुराणांमध्ये आढळतो. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. कालांतराने चोळा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि विजयनगर राजांनी ह्याचा विस्तार केला. ह्या मंदिरात १६ शिलालेख आहेत ज्यांमध्ये चोळा आणि पांड्या राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचा आणि देणग्यांचा उल्लेख आहे. 

मूलवर: श्री मयूरनाथर, श्री गौरीतांडवेश्वरर, श्री गौरीमयूरनाथर
देवी: श्री अभयाम्बिका, श्री अंजलनायकी
पवित्र वृक्ष: आंबा, शमी
पवित्र तीर्थ: ऋषभ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, अगस्त्य तीर्थ आणि कावेरी नदी
पुराणिक नाव: मयुरम, थिरुमयीलादुथुराई, मायावरम, सुंदरवनम, ब्रह्मपुरम, शिखंडीपूरम आणि थेनमयिलै

क्षेत्र पुराण

१. आधीच्या लेखांमध्ये आम्ही दक्ष यज्ञाबद्दल उल्लेख केला होता. जेव्हां श्री वीरभद्र आणि श्री काली देवी यज्ञाचा विध्वंस करत होते त्यावेळी ज्या लांडोरीला यज्ञामध्ये बळी देणार होते त्या लांडोरीने श्री पार्वती देवींकडे आपला जीव वाचविण्याची प्रार्थना केली. पार्वती देवींनी तिचं रक्षण केलं आणि तिला अभयदान दिलं. म्हणून पार्वती देवींना इथे श्री अभयाम्बिका असं संबोधलं जातं. भगवान शिवांनी पार्वती देवींना दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञाला न जाण्याचा सल्ला दिला होता. पण पार्वती देवींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज्ञा न पाळण्याबद्दल प्राप्त झालेल्या दोषांचे निवारण करण्यासाठी पार्वती देवींना भगवान शिवांनी मैलापुर येथे येऊन प्रार्थना करून मग ऎप्पासी ह्या तामिळ महिन्यामध्ये पूर्ण महिना ह्या ठिकाणी राहून तपश्चर्या करण्यास सांगितले. म्हणून पार्वती देवींनी लांडोर म्हणून जन्म घेऊन ह्या ठिकाणी प्रखर तपश्चर्या केली. हे तपश्चर्या करताना त्यांनी फक्त आंब्याची पाने भक्षण केली. भगवान शिवांनी मोराचं रूप घेतलं आणि त्यांनी नृत्य करून श्री पार्वती देवींचं मनोरंजन केलं. ह्या तांडव नृत्याला गौरीतांडव / मयूरतांडव असं म्हणतात आणि हे नृत्य ऎप्पासी ह्या तामिळ महिन्याच्या २५व्या दिवशी घडलं. म्हणून इथे भगवान शिवांना मयूरनाथर असं म्हणलं जातं आणि ह्या स्थळाला मयीलादुथुराई असं म्हणलं जातं. भगवान शिवांनी इथे श्री पार्वती देवींना दर्शन दिलं आणि त्यांना परत मूळ रुपात आणलं. असा समज आहे की ऎप्पासी ह्या महिन्याच्या २७व्या दिवशी ऋषी आणि देवांच्या दिव्य सभेमध्ये भगवान शिवांनी श्री पार्वती देवींशी विवाह केला.

  २.तूला स्नान: ऎप्पासी ह्या तामिळ महिन्याला तुला मास असं पण म्हणतात कारण सूर्य ह्यावेळी तूळ राशीत असतो. एकदा गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांनी लोकांनी त्यांच्यामध्ये स्नान केल्याने त्यांची जी पापं शोषली आहेत त्यांचं क्षालन कसं करावं हा प्रश्न कण्व ऋषींना विचारला. कण्व ऋषींनी त्यांना इथे ऎप्पासी (तुला) महिन्यामध्ये कावेरी नदीमध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करण्यास सांगितले. त्यांनी तसे करून पापांचं क्षालन करून घेतलं. म्हणून तुला (ऎप्पासी) महिन्यामध्ये कावेरी नदीमध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. ह्या स्नानाला तूला स्नान असं म्हणतात. 

३. कडैमुगम (मुझुक्काई) स्नान: तुला महिन्याच्या शेवटच्या दिवशी कावेरी नदीमध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करणे ह्याला कडैमुगम (महिन्यातली शेवटचं स्नान) असं म्हणलं जातं. हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि असा समज आहे कि हे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते.

४. मूडूवन मुझुक्कु: नादशर्मा आणि त्यांची पत्नी अनविद्याम्बिका हे भगवान शिवांचे कट्टर भक्त होते. आपलं जीवन भगवान शिवांच्या पायांशी अर्पण करावं अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून ते विविध शिव स्थळांना भेट देत होते. शेवटी ते तुलास्नानासाठी तुला महिन्याच्या शेवटच्या दिवशी इथे येऊन पोचले. पण ते जेव्हां पोचले त्यावेळी कडैमुगम चा समय टळला होता. ते रात्रभर शिवभक्ती करत नदीच्या किनाऱ्यावर थांबले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतरले. त्यांनी त्या दाम्पत्याला सांगितलं की त्यांनी कडैमुगम चा अवधी वाढवून तो पुढच्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत वाढवला आहे. त्यांनी त्या दाम्पत्याला सूर्योदय होण्यापूर्वी नदीमध्ये स्नान घेण्यास सांगितलं जेणेकरून त्यांना तुला स्नानाचं फळ प्राप्त होईल. म्हणून कार्थिगई महिन्याच्या पहिल्या दिवसाला मूडूवन मुझुक्कु असं म्हणतात. म्हणून कार्थिगई महिन्याचा पहिला दिवस पण खूप शुभ मानला जातो. भगवान शिवांनी तुला स्नान रोखून धरलं म्हणून त्याला मूडूवन मुझुक्कु असं म्हणतात. नादशर्मा आणि अनविद्याम्बिका हे दोघेही श्री अंबिका देवींच्या डाव्या बाजूला असलेल्या शिव लिंगामध्ये विलीन झाले. म्हणून इथे शिव लिंगाला लाल साडी वस्त्र म्हणून अर्पण केलं जातं.

५. ऋषभ तीर्थ: एकदा भगवान शिव, श्री ब्रह्म आणि श्री विष्णू हे त्यांच्या त्यांच्या वाहनांवरून म्हणजेच ऋषभ (नंदि), हंस आणि गरुड ह्यांच्यावर   आरूढ होऊन मयीलादुथुराई इथे चालले होते. नंदि हंस आणि गरुड ह्यांच्या पुढे चालला होता म्हणून त्याला वाटले तो भगवान शिवांना बाकीच्यांपेक्षा पुढे नेत आहे. भगवान शिवांना नंदिच्या ह्या अहंकारी भावनेची जाणीव झाली आणि म्हणून त्यांनी आपल्या जटांमधला एक केस नंदिच्या शिरावर ठेवला. नंदि त्या केसाचं वजन पेलवू शकला नाही. नंदिला आपल्या चुकेची जाणीव झाली आणि त्याने भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्याला मयीलादुथुराई येथे कावेरी नदीच्या मध्यभागी राहून तपश्चर्या करावयास सांगितले. नंतर त्यांनी नंदिला मेधा दक्षिणामूर्ती रूपात उपदेश दिला. कावेरी नदीतल्या ह्या भागाला ऋषभ तीर्थ असं म्हणतात. पुढे सप्त मातृका आणि पवित्र नद्यांना पण भगवान शिवांनी ऋषभ तीर्थामध्ये स्नान करण्यास सांगितलं.

६. एकदा थिरुज्ञानसंबंधर ह्या स्थळ येण्यासाठी निघाले होते कारण त्यांना इथे येऊन भगवान शिवाची पूजा करायची होती. त्यावेळी ते कावेरी नदीच्या उत्तर काठावर होते आणि त्यांना दक्षिण काठावर येण्यासाठी त्यांना नदी पार करायला लागणार होती. पण त्याच वेळी नदीला पूर आला होता. नदी पार करण्यासाठी संबंधरांनी भगवान शिवांची स्तोत्रे गाऊन त्यांना प्रर्थाना केली. भगवान शिवांनी कावेरी नदीला संबंधरांना वाट देण्याची आज्ञा केली जेणेकरून संबंधर ह्या मंदिरात पोचतील. संबंधर ह्यांनी इथे येऊन भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांची स्तोत्रे गायली.

७. साधारण ३०० वर्षांपूर्वी इथून जवळ असलेल्या गावामध्ये कृष्णस्वामी नावाचा एक मुलगा रहात होता. तो एकटा होता. त्याच्याकडे अन्नधान्य नव्हतं पण त्याचं मन श्री अभयाम्बिका देवीच्या ध्यानामध्ये मग्न होतं. अभयाम्बिका देवी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होती. एका साधारण स्त्रीचे रूप घेऊन त्या एका स्वर्णपात्रामध्ये त्याच्यासाठी अन्न घेऊन आल्या आणि त्यांनी त्याला जेऊ घातलं. अभयाम्बिका देवींच्या आशीर्वादाने त्याला चांगलं शिक्षण, ज्ञान आणि कविता करण्यामध्ये प्राविण्य प्राप्त झालं. त्या दिवसापासून तो सकाळी मंदिरात जाऊन रात्री अर्धजाम पुजेपर्यंत थांबू लागला. एकदा तो रात्री मंदिरातून परत येत असताना एका दगडावर अडखळून पडला आणि जखमी झाला. त्याने मनोमन अभयाम्बिका देवींना दिवा देण्याची प्रार्थना केली. असा समज आहे कि अभयाम्बिका देवीने एक कंदील घेऊन त्याला घरी पोंचवलं. कृष्णस्वामीला खूप आनंद झाला आणि त्याने अभयाम्बिका देवीची स्तुती केली. असा समज आहे कि त्यानंतर प्रत्येक दिवशी एक अर्धजाम पूजा संपल्यावर घरी येताना कृष्णस्वामीच्या बरोबर एक कंदील त्याला घरापर्यंत आणून सोडायचा. गावकऱ्यांना हा अधांतरी कंदील बघून खूप आश्चर्य वाटलं. एकदा तो जेव्हा अभयाम्बिका देवींची पूजा करत होता त्यावेळी अभयाम्बिका देवींनी आकाशवाणीने त्याला देवींच्या स्तुतीपर १०० कडव्यांचं स्तोत्र रचायला सांगितलं. कृष्णस्वामीला आपल्या स्तोत्रे रचण्याच्या क्षमतेवर खात्री नसल्याने त्याने देवींकडे आपली अडचण व्यक्त केली. अभयाम्बिका देवींनी त्याला स्तोत्रे रचण्याची क्षमता प्रदान केली. कृष्णस्वामीने अभयाम्बिका अष्टकम रचले. त्या दिवसापासून कृष्णस्वामीला मयीलादुथुराईचा अभयाम्बिका भट्टर अशी प्रसिद्धी मिळाली. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:  

श्री पार्वती देवी, श्री विष्णू, श्री लक्ष्मी देवी, श्री ब्रम्ह, श्री इंद्र, श्री सरस्वती देवी, सप्तमातृका, श्री मुरुगन, नंदि, श्री बृहस्पती, श्री धर्म, अगस्त्य ऋषी आणि पवित्र नद्या (गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी)

वैशिष्ट्ये:

१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. 

२. गाभाऱ्यावरचे विमान हे त्रिदल विमान आहे.

३. इथल्या क्षेत्र विनायकांना श्री अगस्त्यविनायक असे नाव आहे. 

४. भगवान शिवांनी इथे गौरीतांडव / मयूरतांडव नृत्य केले. 

५. मूलवरांच्या जवळ श्री पार्वती देवी लांडोरीच्या रूपात भगवान शिवांची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे. 

६. संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातल्या श्री मुरुगन ह्यांची स्तुती गेली आहे.

७. श्री पार्वती देवींच्या समोर श्री नटराज ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. संध्याकाळची प्रथम पूजा हि श्री नटराजांची केली जाते.

८. ह्या मंदिरात भगवान शिव आणि पार्वती देवी ह्या दोघानांही मोर आणि लांडोर ह्या रूपात चित्रित केले आहे.

९. कोष्टामध्ये वटवृक्षाच्या खाली श्री दक्षिणामूर्ती ह्यांची मूर्ती आहे. वृक्षावर दोन वानरांसमवेत मोर आणि लांडोर आहेत. वृक्षाखाली नंदिंची मूर्ती आहे.

१०. असा समज आहे की नादशर्मा आणि त्यांची पत्नी ह्या ठिकाणी शिव लिंगामध्ये विलीन झाले. इथे पश्चिमाभिमुख शिव लिंग आहे ज्याचे नाव नादशर्मा आहे. अंबिका देवींच्या जवळ अजून एक शिव लिंग आहे ज्याचे नाव अनविद्याम्बिका असे आहे.

११. इथे वटवृक्षाखाली श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांचा डावा पाय दुमडला आहे आणि ते थोडे डावीकडे कलंडले आहेत.

१२. इथे नवग्रह संनिधीमध्ये श्री शनीश्वरांच्या माथ्यावर अग्नीच्या ज्वाला आहेत. म्हणून इथे शनीश्वरांना श्री ज्वालाशनीश्वरर असे संबोधले जाते. त्यांच्या बाजूला अजून एक श्री शनीश्वरांची मूर्ती आहे ज्यामध्ये ते कावळा ह्या आपल्या वाहनावर उत्तराभिमुख आहेत.

१३. श्री नटराजांच्या पायांशी ज्वरदेवांची मूर्ती आहे. असं दृश्य कुठे पाहायला मिळत नाही.

१४. श्री नटराजांच्या मूर्तीजवळ भगवान शिव आणि पार्वती देवींची मूर्ती आहे ज्याला आलिंगनमूर्ती म्हणतात.

१५. श्री दुर्गादेवींच्या पायांशी महिषासुर आहे. ह्या शिवाय त्यांच्या बाजूला अजून दोन असुर आहेत. हे दृश्य क्षुप दुर्मिळ आहे. 

१६. इथे चंडिकेश्वरांच्या एकाच देवालयात दोन मूर्ती आहेत. एका मूर्तीचे नाव शिवचण्डिकेश्वरर आहे तर दुसऱ्या मूर्तीचे नाव तेजसचण्डिकेश्वरर आहे.     

मंदिराबद्दल माहिती:

वर्तमान मंदिर हे ३०० वर्षे जुनं आहे. इथे साधारण १७ शिलालेख आहेत ज्यामध्ये विविध चोळा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामाचे उल्लेख आहेत. 

हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. इथले राजगोपुर साधारण १६५ फूट उंच आहे. मंदिराचे आवार साधारण ३.५ लक्ष स्क्वेअर फूटवर पसरले आहे. मंदिरामध्ये पांच परिक्रमा आहेत. मंदिराच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांच्या प्रवेशावर राजगोपुर नाही. आतल्या परिक्रमेच्या प्रवेशाला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या प्रवेशाजवळ आपल्याला गाभाऱ्याकडे मुख करून असलेले नंदि, बलीपीठ आणि ध्वजस्तंभ पाहायला मिळतात. महामंडपामध्ये श्री नटराजांची मूर्ती आहे ज्यामध्ये श्री नटराज गौरीतांडव मुद्रेमध्ये आहेत. ह्या तांडवाला मयूरतांडव असं पण म्हणतात. संध्याकाळची पहिली पूजा श्री नटराजाची केली जाते.

गाभाऱ्यामध्ये शिव लिंग पूर्वाभिमुख आहे. हे शिव लिंग स्वयंभू आहे. गाभारा लिंगाच्या आकाराचा आहे  आणि लिंगावरच्या विमानाला (छत) त्रिदल विमान असं म्हणतात.

कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री नर्थन विनायकर, श्री नटराज, श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री आलिंगनमूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री भिक्षाटनर, श्री ब्रह्म, श्री दुर्गा देवी, श्री गंगा विसर्जन मूर्ती आणि श्री नंदि.

श्री दक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली त्यांच्या शिष्यांसह पद्मासनात बसले आहेत. ह्या वटवृक्षावर दोन वानर, एक मोर आणि एक लांडोर आहेत.

श्री नटराजांच्या पायाखाली ज्वरदेव आहे.

श्री दुर्गादेवींच्या पायाखाली महिषासुर आहे आणि अजून २ राक्षस तिच्या बाजूला उभे आहेत.

श्री चंडिकेश्वरांच्या देवालयात श्री शिव चंडिकेश्वरर आणि श्री तेजस चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. 

परिक्रमेमधली देवालये आणि मूर्ती: सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी पुजीलेलं शिव लिंग, पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, सेक्कीळर, सहस्रलिंग, पंचलिंग, श्री महाविष्णू, श्री महालक्ष्मी, अरुणाचलेश्वरर, नटराज सभा आणि श्री ब्रह्म.

आतल्या परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - श्री चंद्र, श्री मयीलअम्मन (श्री पार्वती देवी), श्री शैव संत नालवर, सप्त मातृका, ६३ नायनमार, श्री सोमस्कंद मूर्ती, श्री विनायकर, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत, श्री महालक्ष्मी देवी, श्री अष्ट लक्ष्मी, नवग्रह आणि श्री सूर्य. 

श्री मयीलअम्मन ह्यांची मूर्ती श्री नटराजांच्या समोर आहे. इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या मोर आणि लांडोर रूपातल्या मूर्ती आहेत. त्यांच्या देवालयाजवळ एक शिव लिंग आहे ज्याचे नाव अनविद्याम्बिका असे आहे. ह्या शिव लिंगाला साडी नेसवली आहे.

नवग्रह संनिधीमध्ये श्री शनीश्वरांच्या शिरावर अग्नी आहे आणि दुसऱ्या मूर्ती मध्ये ते वाहनावर म्हणजेच कावळ्याच्या रथावर बसले आहेत.

ह्या शिवाय आपल्याला परिक्रमेमध्ये पुढल्या मूर्ती पण बघायला मिळतात - श्री सट्टाईनाथर, पतंजली ऋषी, श्री भैरव आणि अनेक शिव लिंगे. 

कुथंबै सिद्ध ह्यांना इथे मुक्ती प्राप्त झाली. 

देवींची मूर्ती पूर्वाभिमुख देवालयात आहे. त्या चतुर्भुज असून उभ्या मुद्रेमध्ये आहेत. त्यांनी एका हातात शंख आहे तर दुसऱ्या हातात चक्र आहे. डावीकडचा खालचा हात मांडीवर आहे तर उजवीकडच्या खालच्या हातामध्ये पोपट आहे. त्यांच्या समोर नंदि आणि बलीपीठ आहे.

उत्सव मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. ह्या परिक्रमेमध्ये आपल्या पुढल्या  मूर्ती बघायला मिळतात - श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रमण्यम, श्री वरसिद्धी विनायकर, श्री चंडिकेश्वरर. श्री मुरुगन ह्यांच्या देवालयाचे नाव श्री कुमारकट्टलै असे आहे. 

नादशर्मा गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या लिंगामध्ये विलीन झाले. 

बाहेरच्या परिक्रमेमध्ये एक पूर्वाभिमुख देवालय आहे ज्यामध्ये श्री आदि मयूरनाथर ह्यांची मूर्ती आहे.

प्रार्थना:

१. भाविक जन भगवान शिवांची पूजा पुढील कारणांसाठी करतात - मनःशांती प्राप्त करण्यासाठी, जाणतेपणे वा अजाणतेपणे केलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी आणि नृत्यामध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी.

२. आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी भाविक जन इथे तुलास्नान आणि  मूडूवन मुझुक्कु ह्या समयी ऋषभतीर्थामध्ये स्नान करतात. 

३. भाविक जन इथे शनिदोषांचा परिहार होण्यासाठी प्रार्थना करतात. 

४. गणितामध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी भाविक जन इथे श्री विनायकांची पूजा करतात.

पूजा:

दैनंदिन पूजा, साप्ताहिक पूजा, प्रदोष पूजा तसेच मासिक पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेला मयीलादुथुराईचा सप्त स्थान उत्सव

वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव, विशाखा नक्षत्र उत्सव

आडी (जुलै-ऑगस्ट): शेवटच्या शुक्रवारी लक्षद्वीप उत्सव तसेच पुरम नक्षत्रावर उत्सव

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ नक्षत्रावर उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ह्या महिन्याला तुला असं पण म्हणतात. ३० दिवसांचा तुला स्नान उत्सव, अन्नाभिषेक आणि स्कंदषष्ठी उत्सव

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): सोमवार पूजा

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै

मंदिराच्या वेळा: सकाळी ५.३० ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता: श्री मयूरनाथर मंदिर, मयीलादुथुराई, तामिळ नाडू ६०९००१

दूरध्वनी: +९१-४३६४२२२३४५, +९१-४३६४२२३७७९

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment