हे अष्टवीराट्टनं स्थळंगळ मधलं चौथं मंदिर आहे. मयीलादुथुराई-सेंबरनार कोविल मार्गावर मयीलादुथुराई पासून ११ किलोमीटर्स वर किळपरसलूर ह्या गावात हे मंदिर स्थित आहे. कावेरी नदीच्या काठावरील २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक स्थळ आहे. दक्ष संहार ह्या कथेशी हि जागा निगडित आहे. ह्या मंदिराला दक्षपुरिश्वरर मंदिर असं पण म्हणतात. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. वर्तमान बांधकाम हे चोळा साम्राज्याच्या राजाने ९व्या शतकात केलं असावं. कालांतराने सुंदरपांड्यनराजा, विजयनगर साम्राज्याचे राजे तसेच तंजावूरनायक राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये ह्या विविध राजांनी मंदिराला दिलेल्या भेटवस्तू तसेच देणग्यांचा उल्लेख आहे.
मूलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री दक्षपुरीश्वरर, श्री यागसंहारमूर्ती
देवी: श्री बालांबिका, श्रीइलंकोंबण्याल
उत्सव मूर्ती: दक्षसंहार मूर्ती
क्षेत्र वृक्ष: फणस, बिल्व, पारिजात (तामिळ मध्ये पवळमल्ली)
पवित्र तीर्थ: उत्तरवेदिका, होमकुंड, चंद्रपुष्करिणी
पूजा/आगम: कारण आगम
पुराणिक नाव: थिरुपरीयलूर
वर्तमान नाव: किळपरसलूर
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून पार्वती देवींना दाक्षायणी असं पण नाव आहे. भगवान शिव हे जटाधारी असून ते व्याघ्राजिन परिधान करतात आणि सर्वांगाला भस्म लावतात ह्या कारणाने ते दक्ष राजाला आवडत नव्हते. असे असून त्यांच्या कन्येने म्हणजेच दाक्षायणीने आपल्या पित्याच्या इच्छेविरुद्ध भगवान शिवांशीच विवाह केला. ह्या ठिकाणी दक्ष राजाला एक यज्ञ करायचा होता. ह्या यज्ञासाठी दक्ष राजाने सर्व देव, ऋषी आणि मुनींना आमंत्रण दिले पण भगवान शिवांना मात्र वगळले कारण त्यांना भगवान शिवांचा अपमान करायचा होता. पार्वती देवींना ह्या यज्ञामध्ये सहभागी व्हायचं होतं. भगवान शिवांची आज्ञा न मानता त्या ह्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या. दक्ष राजाने पार्वती देवींचा तसेच भगवान शिवांचा भर सभेमध्ये अपमान केला. पार्वती देवींना आपल्या पतीचा अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी यज्ञकुंडामध्ये आत्मसमर्पण केलं. जेव्हां भगवान शिवांना हे कळलं तेव्हां त्यांनी वीरभद्र आणि भद्रकाली ह्यांना यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी धाडलं. वीरभद्रांनी इथे येऊन यज्ञाचा विध्वंस केला तसेच सर्व देवांना म्हणजेच श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, इंद्रदेव, सूर्यदेव, चंद्रदेव ह्या सर्वाँना शिक्षा दिली. वीरभद्रांनी दक्ष राजाचा शिरच्छेद केला. पार्वती देवींना आपल्या पित्याची दशा बघवली नाही म्हणून त्यांनी भगवान शिवांना आपल्या पितांना म्हणजेच दक्ष राजाला क्षमा करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी दक्ष राजाला क्षमा केली आणि त्याच्या शरीराला मेंढीचे शीर जोडले. दक्ष राजाला आपली चूक लक्षात आली. त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. त्या प्रार्थना मेंढीच्या हंबरण्यासारख्या भासल्या म्हणून ह्या प्रार्थनांना चमकम असे नाव पडले कारण ह्यातल्या प्रत्येक प्रार्थनेचा शेवट "च मे" ह्या शब्दाने होतो. भगवान शिवांनी आज्ञा दिली कि हि प्रार्थना रुद्रामध्ये समाविष्ट केली जावी आणि जेव्हां रुद्र पठण होईल त्यावेळी हि प्रार्थना पण पठण करावी.
ज्या यज्ञकुंडामध्ये पार्वती देवींनी आत्मसमर्पण केलं त्या जागी कालांतराने तलाव बनला. इथे दक्ष राजाने यज्ञ केला म्हणून ह्या स्थळाला दक्षपुरी असे नाव प्राप्त झाले.
भगवान शिवांनी इथे दक्ष राजाला दिलेली सव वरदाने काढून घेतली (ज्याला तामिळ मध्ये परिथल असं म्हणतात) म्हणून ह्या स्थळाला परीयलूर असं नाव प्राप्त झालं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, अग्निदेव, यमदेव, वायूदेव, वरुणदेव, कुबेरदेव आणि सप्त ऋषी
वैशिष्ट्ये:
१. रुद्राभिषेक हे भगवान शिवांचे वैशिष्ट्य आहे आणि असा समज आहे कि रुद्राभिषेकाचा (रुद्रहोम) उगम ह्या स्थळी झाला.
२. श्री वीरभद्रांचं हे पहिलं मंदिर मानलं जातं. ह्या ठिकाणी श्री वीरभद्रांची पुढील नावांनी पण स्तुती केली जाते - आकाशभैरव, अघोरभैरव, अघोरवीरभद्र, पेरीयंदवर, पेथंदवर.
३. श्री वीरभद्रांनी दिलेल्या शिक्षेचा परिणाम म्हणून सूर्यदेवांना आपल्या एका दाताला मुकावं लागलं.
४. गाभाऱ्याच्या पाठीमागे दोन बाजूंना भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांची ते प्रार्थना करीत आहेत अश्या मूर्ती आहेत.
५. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या ठिकाणी स्तोत्रे रचली.
६. श्री सुब्रमण्य इथे उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांचा एक पाय त्यांच्या वाहनावर म्हणजेच मोरावर आहे.
७. मंदिराच्या पुढच्या बाजूस एक मंडप आहे ज्याचे छत लोखंडाचे आहे.
८. ह्या ठिकाणी देवाला साधाभात आणि दहीभात हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.
९. इथे नवग्रह संनिधी नाही पण सूर्यदेवांचे देवालय आहे.
मंदिराबद्दल माहिती:
२००० वर्षे जुनं असलेलं हे छोटं मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. प्रवेशद्वारावर रस्त्याच्या बाजूला एक कमान आहे. इथे ऋषभारूढर ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला श्री मुरुगन आणि श्री विनायक ह्यांची चित्रे आहेत. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आहेत. पण इथे ध्वजस्तंभ नाही. शिव लिंगाच्या पुढ्यात नंदि आणि बलीपीठ आहेत. प्रवेशाच्या कमानीजवळ श्री गणेशांचे देवालय आहे. ध्वजस्तंभाच्या पायथ्याला श्री विनायकांचे मंदिर आहे ज्याला कोडिमर विनायक असे नाव आहे. दुसऱ्या पातळीवर एक तीन स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. गाभारा लिंगाच्या आकाराचा आहे. पुढच्या मंडपामध्ये सहा हात असलेले वीरभद्रस्वामि ह्यांची मूर्ती आहे. इथली अर्धजाम पूजा हि फक्त वीरभद्रस्वामि ह्यांचीच केली जाते. मूर्तीच्या मागे एक यंत्र आहे. शिव लिंग आणि देवींच्या मध्ये देवींच्या बाजूला दक्षसंहार मूर्ती आहे. प्रकारामध्ये विनायक, विश्वनाथ, भैरव आणि सूर्य ह्यांची देवालये आहेत. कोष्टामध्ये दुर्गादेवी, लिंगोद्भवर, दक्षिणामूर्ती, चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत तसेच मोरावर एका पायावर उभे असलेले सुब्रमण्यम ह्यांची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला सेंथिल आंडवर असं नाव आहे. महामंडपामध्ये उत्सव मूर्ती आहेत आणि श्री वीरभद्रांची कांस्याची मूर्ती आहे ज्यामध्ये दक्ष त्यांच्या पायाशी आहे. उत्सवमूर्ती पुढीलप्रमाणे आहेत - श्री मुरुगन, श्री विनायक, प्रदोषनायक. श्री वीरभद्रांच्या हातांमध्ये त्रिशूल, दंड, तलवार, पकल (कवटी) आणि घंटा आहे. संहारमूर्तींच्या पायाशी श्री ब्रह्मदेव यज्ञाला सुरुवात करत आहेत अशी मूर्ती आहे.
ध्वजस्तंभाच्या जागी इथे सिद्धिविनायकांची मूर्ती आहे. श्री सूर्यदेवांचे स्वतंत्र देवालय आहे पण इथे नवग्रह नाहीत. दक्षांची मूर्ती श्री दक्षपुरीश्वरर ह्यांच्या पायाशी आहे. इथे आपल्याला श्री महागणपती, श्री कर्पग विनायक, श्री महालक्ष्मी, क्षेत्रपाल, शिवसूर्य आणि नालवर (म्हणजेच श्रेष्ठ चार नायनमार) ह्यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंडपामध्ये श्री विनायक, श्री वीरभद्र, श्री नटराज आणि सोमस्कंद ह्यांच्या उत्सव मूर्ती आहेत. श्री वीरभद्रांच्या मूर्तीसमोर दक्ष (मेंढीचे शिर असलेले) आणि दक्षांच्या पत्नी ह्यांच्या मूर्ती आहेत. काशी विश्वनाथ ह्यांच्या देवालयासमोर काळभैरव आणि नर्दन विनायक ह्यांच्या मूर्ती आहेत.
गाभाऱ्याच्या उजव्याबाजूला श्री अंबिका देवींचे स्वतंत्र दक्षिणाभिमुख देवालय आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये असून त्यांचे दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी भगवान शिवांची उपासना रुद्राभिषेक करून करतात.
२. दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी भाविक जन इथे ६०व्वा, ७०व्वा तसेच ८०व्वा वर्धापनदिन साजरा करतात.
३. भाविक जन इथे ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात.
पूजा:
कारण आगमानुसार इथे दैनंदिनपूजा केल्या जातात. अमावस्या आणि प्रदोष दिवशी इथे विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काहीं महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): तामिळ नववर्षदिनी इथे दिवसातून सहावेळा अभिषेक केला जातो.
वैकासि (मे-जून): श्रवण नक्षत्राच्या दिवशी विशेष अभिषेक आणि पूजा केली जाते.
आनी (जून-जुलै): अश्विन नक्षत्र दिवशी विशेष पूजा केली जाते.
आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्वा-फाल्गुनी उत्सव, ह्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दक्षसंहार मूर्तींवर अभिषेक केला जातो.
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायक चतुर्थी उत्सव
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अष्टमी पूजा, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): ह्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी भगवान शिवांची मिरवणूक होते. आणि रविवारी उत्सव मूर्तींची मिरवणूक काढली जाते.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्र दर्शन
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति उत्सव, अमावास्येला अभिषेक आणि रुद्राभिषेक
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १२, संध्याकाळी ५ ते ७
पत्ता: किळपरसलूर (थिरुपरीयलूर) येथील श्री विराट्टेश्वरर मंदिर, तालुका: थरंगंबडी, तामिळनाडू ६०९३०९
दूरध्वनी: +९१-४३६४२०५५५५, +९१-४३६४२८७४२९
भटजींचा दूरध्वनी: श्री षण्मुखसुंदर गुरुक्कल -+९१-९९४३३४८०३५,+९१-९६२६५५२८३५, श्री श्रीनाथ गुरुक्कल - +९१-९४४३७८५६१६
आभार: https://www.dharisanam.com/
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment