Sunday, May 26, 2024

नल्लूर मयानं

पंच मयानं मधलं हे चौथं मंदिर आहे. हे मंदिर थिरुमेयीज्ञानं ह्या गावात वसलेलं आहे. ह्याचे वर्तमान नाव थिरुनल्लूर मयानं असं आहे. पौराणिक काळांत ह्याचे नाव चतुर्वेदी मंगलम असे होते. 


कुंभकोणम पासून १६ किलोमीटर्स वर कुंभकोणम-कूडवसल मार्गावर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर आहे. पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक मंदिर आहे. शैव संत श्री संबंधर ह्यांनी ह्या मंदिरात भगवान शिवाची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री ज्ञानपरमेश्वरर, श्री मयानाथु मूलथनाथू पेरूमन

देवी: श्री ज्ञानाम्बिका, श्री पेरियानायकी

पवित्र तीर्थ: ज्ञानतीर्थ, चंद्र तीर्थ

पवित्र वृक्ष: पळस, बिल्व

पौराणिक नाव: थिरु मयानं, थिरु नल्लूर मयानं, नाथुर

जिल्हा: तंजावूर, तामिळ नाडू


मंदिराबद्दल माहिती:


ह्या मंदिरामध्ये राजगोपुर नाही. सध्याचे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर चोळा साम्राज्यातील राजाने दगड वापरून बांधले होते. ह्या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून त्यावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे शिल्प आहे. अगदी अलीकडचं मंदिराचं बांधकाम हे आदित्य चोळा १ ह्या राजाने केले. मंदिरातले २३ शिलालेख ह्या मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती देतात. येथील शिव लिंग स्वयंभू आहे.  स्थानिक भाविक लोकांच्या म्हणण्यानुसार इथे अजूनही शिवलिंगाभोवती वेटोळे घालून बसलेला सर्प इथे नजरेस पडतो. ह्याचा उल्लेख श्री संबंधर ह्यांनी केलेल्या भगवान शिवांच्या स्तुतीमध्येपण आढळतो. हे मंदिर मदकोविल शैलीचे आहे - म्हणजेच हे अशा रीतीने बांधले आहे कि ह्या मंदिरात हत्ती प्रवेश करू शकत नाही. गाभाऱ्यावरचे विमान हे गजपृष्ठ आकाराचे आहे. गाभाऱ्याचा आकार चौकोनी असून त्याचे शिखर गोलाकार आहे. मंदिरातले स्तंभ गोलाकार असून त्यावर सुंदर शिल्पचित्रे कोरलेली आहेत. 


मंदिरातील देवता आणि इतर देवालये:

मुख्य मंदिरामध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे देवालय आहे. ह्या शिवाय भगवान विष्णू, श्री मुरुगन, नवग्रह, थिरुज्ञानसंबंधर ह्यांची पण देवालये आहेत. नाग, श्री चंडिकेश्वर, श्री दक्षिणामूर्ती, आत्मलिंग, श्री शनीश्वरर, श्री भैरव, श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. परिक्रमेमध्ये श्री अमृतकडेश्वरर, श्री सट्टाईनाथर आणि श्री एकांबरेश्वरर ही शिव लिंगे आहेत. कोष्टामध्ये श्री गणेश, श्री भिक्षाटनर, श्री नटराज, श्री भैरव, श्री महाविष्णू आणि श्री विष्णुदूर्गा ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


मंदिरात ज्यांनी आराधना केली त्यांची नावे:

श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, थिरुज्ञानसंबंधर, चार वेद, आपस्तंभ ऋषी


मंदिरात साजरे होणारे सण:

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायक चतुर्थी


पूजा आणि प्रार्थना:

प्रत्येक दिवशी तिन्ही काळी येथे पूजा केली जाते. विवाहातल्या अडचणी, शैक्षणिक यश तसेच सर्वसाधारण समृद्धी साठी इथे भाविक प्रार्थना करतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment