Sunday, May 12, 2024

श्री काली मयानं

पंच मयानं मधलं हे दुसरं मंदिर तामिळ नाडू मधल्या नागपट्टीनं जिल्ह्यातील शिरकाली ह्या गावामध्ये वसलेलं आहे. हे मंदिर मईलादुथुराई ह्या गावापासून साधारण २० किलोमीटर्सवर चिदंबरम-कुंभकोणम मार्गावर आहे. खूप भव्य मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची तीन देवालये आहेत - श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री थोनिअप्पर आणि श्री सट्टाईनाथर. पाडळ पेथ्र म्हणजेच नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री संबंधर ह्या नायनमारांनी केली आहे. सध्याचं मंदिर हे १५०० वर्षे जुनं आहे जे चोळा राजांनी बांधलं. 


मुलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री उमामहेश्वरर, श्री थोनिअप्पर, श्री सट्टाईनाथर आणि श्री वटुकनाथर

देवी: श्री पेरियानायकी, श्री थिरुनिलाईनायकी, श्री स्थिरसुंदरी

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ आणि इतर २२ तीर्थे

क्षेत्र वृक्ष: पारिजात (तमीळमध्ये पवळमल्ली)

पौराणिक नाव: ब्रह्मपुरम्, शिरकाली, वेणूपुरम्, थोनीपुरम्, सिरपुरम्, पुन्थरै, वेणगुरु


क्षेत्र पुराण:

आख्यायिकेनुसार उरासन ऋषींनी कैलासावर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि त्यांना श्री पार्वती देवींसह इथे येऊन भक्तांवर अनुग्रह करण्याची विनंती केली. 


एकदा आदिशेष आणि वायुदेवांमध्ये वाद निर्माण झाला. आदिशेषांनी आपल्या १००० फण्यांनी कैलास पर्वताला आच्छादले. देवांनी विनंती केल्यावर आदिशेषांनी आपला एक फणा हलवला. वायुदेवांच्या प्रभावाने कैलास पर्वताचा एक तुकडा वेगळा झाला. हा तुकडा भगवान शिवांच्या आशीर्वादाने २० पक्ष्यांनी उचलून इथे आणला असा समज आहे. ह्या पर्वताच्या तुकड्याला थोनीमलै असं म्हणतात. 


श्री ब्रह्मदेवांना एकदा अहंकार झाला. त्यांचा अहंकार घालवण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना प्रणव मंत्राचा विसर घडवला. श्री ब्रह्मदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी भगवान शिवांची इथे शिव लिंग स्थापून आराधना केली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री ब्रह्मपुरीश्वरर असे नाव आहे. श्री ब्रह्मपुरीश्वरर लिंगावर दिवसातून सहा वेळा अभिषेक केला जातो. श्री थोनिअप्पर लिंगावर चार वेळा अभिषेक केला जातो. 


श्री महाबलींचा वध केल्यावर भगवान विष्णू खूप उन्मत्त झाले. शुक्रवारच्या रात्री भगवान शिवांनी श्री थिरुविक्रम (उलगनंद पेरुमल म्हणजेच भगवान विष्णू) ह्यांना उन्मत्त अवस्थेतून बाहेर आणले. म्हणून भगवान शिवांना इथे श्री सट्टाईनाथर असे संबोधले जाते. प्रत्येक शुक्रवारच्या रात्री इथे श्री सट्टाईनाथर ह्यांची विशेष पूजा केली जाते. हि पूजा खुप कल्याणकारी मानली जाते.


क्षेत्र पुराणानुसार सातव्या शतकामध्ये श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचा इथे जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी ते एकदा आपल्या पित्यांसमवेत भगवान शिवांच्या मंदिरात गेले होते. त्यांच्या पित्यांनी तीर्थावर स्नान करायला जाताना आपल्या पुत्राला म्हणजेच थिरुज्ञानसंबंधर ह्यांना तीर्थाच्या तीरावर ठेवले. तीन वर्षांच्या संबंधरांना जेव्हा भूक लागली तेव्हा ते रडायला लागले. तेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी तिथे आल्या आणि त्यांनी संबंधरांना ज्ञानरूप दूध (ज्ञानपल. तमिळमध्ये पल म्हणजे दूध) पाजले. म्हणून श्री थिरुज्ञानसंबंधरांना श्री मुरुगन ह्यांचा अवतार मानलं जातं. त्यांचे पिता जेव्हा स्नान करून परत आले तेव्हा आपल्या पुत्राच्या ओठावर दुधाचे थेंब बघून आश्चर्य वाटले. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधरांनी त्यांना आकाशाकडे बोट दाखवले आणि त्याचवेळी त्यांनी शिवांची स्तुती केली जी थेवरंमधली पहिली ओवी आहे. थेवरं हे नायनमारांनी भगवान शिवांप्रती गायलेल्या स्तुतींचा संग्रह आहे.  


मंदिराबद्दल माहिती:
हे तीन स्तरांचं मंदिर आहे. पहिल्या स्तरामध्ये श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्यांचे देवालय आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि देवीचे नाव श्री थिरुमलनायकी असे आहे. दुसऱ्या स्तरामध्ये श्री थोनिअप्पर ह्यांचे देवालय आहे आणि देवीचे नाव श्री पेरियानायकी असे आहे. इथे भगवान शिव नावेमध्ये (तामिळ मध्ये थोनी) श्री पार्वती देवींसह आहेत. ह्या देवालयात ते शिक्षक रूपामध्ये चित्रित केले आहेत. तिसऱ्या स्तरामध्ये श्री सट्टाईनाथर ह्यांचे देवालय आहे. इथे ते भैरव रूपामध्ये आहे. 

शिरकाली हे श्रेष्ठ नायनमार श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचे जन्मस्थान आहे. इथे श्री काली देवी ह्यांची आराधना केली जाते. म्हणून ह्या स्थळाचे नाव श्रीकाली असे होते पण कालांतराने ते शिरकाली असे झाले. श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री संबंधर ह्या श्रेष्ठ शैव संतांनी ह्या मंदिरासाठी एकत्रित ७१ भजने रचली आहेत. येथील मुख्य मंदिर म्हणजेच श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर हे पूर्वाभिमुख असून ते मंदिराच्या तीर्थाच्या काठावर आहे. श्री थोनिअप्पर ह्यांचे मंदिर मुख्य मंदिराच्या पश्चिमेला थोडा उंचावर आहे. श्री सट्टाईनाथर ह्यांचे मंदिर दक्षिण दिशेच्या पादचारी मार्गावरून दिसतं. 


श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचे मंदिर बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. ह्या मंदिराच्या बाजूला श्री थिरुनिलाईनायकी ह्यांचे मंदिर आहे. श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांच्या मंदिराच्या बाहेर श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री माणिकवाचगर ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांना श्री मुरुगन ह्यांचा अवतार मानलं जातं आणि म्हणूनच त्यांचं मंदिर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या मंदिरांच्या मध्यभागी आहे. ह्या रचनेला श्री सोमस्कंद रचना म्हणलं जातं. इथे २२ पवित्र तीर्थे आहेत ज्यातील ब्रह्म तीर्थ, काली तीर्थ आणि पराशर तीर्थ ही जास्त पवित्र मानली जातात. असा समज आहे कि श्री इंद्रदेवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिव इथे बांबूच्या वृक्षाच्या रूपात प्रकट झाले. म्हणून इथले क्षेत्र वृक्ष बांबू आहे. कोष्टामध्ये म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे श्री विनायकांना श्री ऋण तीर्थ विनायक असं संबोधलं जातं. प्रकारामध्ये (परिक्रमेमध्ये) श्री मुरुगन, श्री सोमस्कंद आणि ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. श्री अष्टभैरवांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री थिरुनिलाईनायकी देवींच्या मंदिराच्या परिक्रमेमध्ये श्री श्यामलादेवी, श्री इच्छाशक्ती, श्री ज्ञानशक्ती आणि श्री क्रियाशक्ती ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


ठळक वैशिष्ठ्ये:

महाप्रलयानंतर भगवान शिव चौसष्ठ कला परिधान करून ओंकाररूपी नावेतून (थोनी) श्री पार्वती देवींसह श्री उमामहेश्वर रूपात प्रकट झाले. त्यांनी पाहिलं कि हि जागा प्रलयानंतरही नाश पावली नव्हती. ह्या ठिकाणी भगवान शिव श्री थोनीअप्पर आणि श्री पार्वती देवी श्री थिरुनिलाईनायकी ह्या रूपात राहिले. 


श्री ब्रह्मदेवांनी शिव लिंगाची आराधना केली म्हणून भगवान शिव येथे श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्या रूपात स्थित झाले. तसेच भगवान शिवांनी येथे श्री ब्रह्मदेवांच्या अहंकाराचा नाश केला म्हणून ते श्री सट्टाईनाथर ह्या रूपात पण स्थित झाले.


राजा महाबलीचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंना ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला. ह्या दोष निवारणासाठी भगवान शिवांनी भगवान विष्णूंचे अजीन (म्हणजेच कातडं) परिधान केलं. श्री महालक्ष्मी देवींनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की भगवान शिवांनी भगवान विष्णूंची हत्या करून त्यांचं कातडं परिधान केलं आहे. त्यामुळे त्या विधवे सारखं जीवन जगायला लागल्या म्हणजेच त्यांनी आभूषण परिधान करण्याचं थांबवलं. म्हणून अजूनही इथे स्त्रिया ह्या मंदिरात येताना शृंगार करत नाहीत म्हणजेच केसांमध्ये फुले परिधान करत नाहीत. तसेच पुरुष मंदिरात येताना उत्तरीय म्हणजेच कंबरेच्या वर कपडे परिधान करत नाहीत. 


महाप्रलयानंतर श्री पार्वती देवींना इथे ज्ञानोपदेश प्राप्त झाला. श्री पार्वती देवी इथे श्री महालक्ष्मींच्या रूपात आशीर्वाद देतात. ह्या स्थळाला अकरावं शक्ती पीठ मानलं जातं. 

श्री भैरवांच्या स्थळांमध्ये ह्या स्थळाला काशीपेक्षाही जास्त महत्व आहे. 


१९ श्रेष्ठ सिध्दांपैकी एक श्री चट्टाईमुनीसिद्धर ह्यांची इथे जीव समाधी आहे. भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये एक उंच बैठकीवर हि समाधी स्थित आहे. ह्या समाधीवर रात्री १० वाजता अभिषेक केला जातो आणि मध्यरात्री अलंकार समर्पणानंतर नैवेद्य अर्पण केला जातो. इथून आपल्याला श्री सट्टाईनाथर ह्यांचं दर्शन होतं. 


इथे ज्यांनी आराधना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, श्री मुरुगन, श्री इंद्र, श्री बृहस्पती, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री राहू, श्री केतू, श्री आदिशेष, श्री काली देवी, श्री पराशर ऋषी, श्री रोमेश ऋषी, श्री वेदव्यास ऋषी आणि श्रेष्ठ शिवभक्त चक्रवर्ती शिबी राजा. 


मंदिरात साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम आणि स्कंदषष्ठी

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): आर्द्र दर्शन (अरुद्र दर्शन)

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, प्रदोष पूजा


श्री उमामहेश्वर मूर्तीवर चित्राई, आडी, ऎप्पासी, थै ह्या महिन्यांच्या पहिल्या दिवशी तेलाचा अभिषेक केला जातो. 

थै महिन्याच्या अमावास्येला, वैकासि महिन्यात मूळ नक्षत्रावर, आनी महिन्याच्या रोहिणी नक्षत्रावर आणि ऎप्पासी महिन्यात शताभिष नक्षत्रावर इथे विशेष पूजा केली जाते. 


प्रार्थना:

भाविक इथे अपत्यप्राप्ती साठी आणि खटल्यांतून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.  

No comments:

Post a Comment