Saturday, May 18, 2024

वीली मयानं

पंच मयानं मधलं हे तिसरं मंदिर आहे. पेरंलं आणि पंथोत्तम गावांच्या जवळ आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर अरसालारू ह्या उपनदीच्या काठावर पंथोत्तमपासून १० किलोमीटर्स वर तसेच मईलादुथुराई-थिरुवरुर मार्गावर मईलादुथुराई पासून २७ किलोमीटर्स वर हे मंदिर वसलं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक मंदिर आहे. श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी ह्या ठिकाणी भगवान शिवांची स्तुती केली आहे. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे.


मुलवर: श्री नेत्रबनेश्वर, श्री वीलीनाथर, श्री कल्याणसुन्दरेश्वरर

उत्सव मूर्ती: श्री कल्याणसुंदरर

देवी: श्री सुंदर गुजांबिका, श्री कात्यायनी, श्री अळळीयवनमुल्लईअम्मन

पवित्र तीर्थ: विष्णू तीर्थ, दामोदर तीर्थ आणि २५ इतर तीर्थे

क्षेत्र वृक्ष: वीली (चंदन, चंपा, फणस आणि कवठ ह्या वृक्षांना एकत्र वीली असं म्हणतात)

पौराणिक नाव: थिरुवीलीमलई

जिल्हा: थिरुवरुर, तामिळनाडू, तालुका: कुडवसल


क्षेत्र पुराण:


कात्य ऋषी ह्यांनी आपल्या पत्नीसह प्रखर तपश्चर्या करून श्री पार्वती देवींना प्रसन्न केलं आणि त्यामुळे त्यांना एका पुत्रीची प्राप्ती झाली. तिचं नाव त्यांनी कात्यायनी असं ठेवलं. कात्य ऋषींच्या इच्छेनुसार भगवान शिवांनी चित्राई ह्या तमिळ महिन्याच्या मघा नक्षत्रावर कात्यायनीशी विवाह केला. कात्य ऋषींनी भगवान शिवांना विनंती केली कि त्यांनी आणि श्री कात्यायनीने ह्या ठिकाणी वधू-वराच्या पोषाखात राहावं. त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री पार्वती देवी आणि भगवान शिव वधू-वराच्या पोषाखामध्ये आहेत. 


मिळीलैकुरूम्बूर हा शिकारी कवठ फळ वापरून भगवान शिवांची आराधना करायचा. भगवान शिव त्याच्या आराधनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी मिळीलैकुरूम्बूरला अष्टमहासिद्धी प्रदान केल्या. अजूनही इथे भक्तांना भगवान शिवांना कवठ अर्पण केल्याची दृश्य दिसतात. म्हणूनच ह्या स्थळाला वीलीमलई असं म्हणतात. 


एकदा जेव्हा इथे श्री अप्पर आणि श्री संबंधर हे इथे वास्तव्य करीत होते त्यावेळी इथे प्रखर दुष्काळ आला. श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी इथे दुष्काळ घालवण्यासाठी भगवान शिवांची स्तुती केली. भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांना लोकांना अन्नदान करण्यासाठी म्हणून ते रोज एक सोन्याचं नाणं देतील असं आश्वासन दिलं. श्री अप्पर ह्यांना त्यांनी पश्चिमेच्या बलिपीठावर रोज एक नाणं दिलं तर श्री संबंधर ह्यांना त्यांनी पूर्वेच्या बलिपीठावर रोज एक नाणं दिलं. हि बलिपीठे अजूनही येथे आहेत. ह्या बलिपीठांना पडिक्कासु बलिपीठे असं म्हणतात. श्री विनायकांना इथे श्री पडिक्कासु विनायक असं म्हणतात. 


जालंधर राक्षसाने भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र हिरावले. भगवान शिवांनी भगवान विष्णूंना ह्या ठिकाणी येऊन सुदर्शन चक्र परत मिळविण्यासाठी  त्यांची आराधना करावयास सांगितले. भगवान विष्णू येथे आले आणि त्यांनी एक तीर्थ निर्माण केलं ज्याचं नाव विष्णू तीर्थ आहे आणि भगवान शिवांची त्यांनी कमळांनी पूजा केली. अर्चनेसाठी जेव्हा एक कमळ कमी पडलं तेव्हा त्याची पूर्तता करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपलं एक नेत्र काढून ते कमळ म्हणून अर्पण केलं. भगवान शिव भगवान विष्णूंच्या ह्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र परत मिळवून दिले. भगवान विष्णूंनी अर्पण केलेले नेत्र अजूनही भगवान शिवांच्या पायाशी  आहे असा समज आहे. असा समज आहे की मुलवर विमान हे भगवान विष्णूंनी येथे आणले आहे. 


वीली वृक्ष इथे भरपूर प्रमाणात उगवत असल्याकारणाने ह्या स्थळाला वीलीकाडू असे नाव होते. 


असा पण समज आहे कि भगवान शिवांनी येथे श्री थोनी अप्पर ह्या रूपात दर्शन दिले. 


पुराणांत असा उल्लेख आहे कि उत्तरेकडून श्वेतकेतु राजा इथे आला आणि त्याने भगवान शिवांची आराधना केली. त्याला असे भाकीत सांगितले गेले होते कि तो अल्पायुषी आहे आणि इथे येऊन भगवान शिवांची आराधना केल्याने त्याचे आयुष्य वाढेल असा सल्ला दिला गेला होता म्हणून त्याने इथे येऊन आराधना केली. भगवान शिवांनी त्याचे मृत्यूपासून म्हणजेच श्री यमदेवांपासून संरक्षण केले. 


मंदिराबद्दल माहिती:


एकेकाळी ह्या स्थळी चंदन, चंपा, फणस आणि कवठ ह्यांचे घनदाट वन होते. ह्या सगळ्या वृक्षांना एकत्रितपणे वीली असं म्हणलं जातं. 


विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्याचं स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण ४ एकर वर पसरलेल्या ह्या मंदिराला सात स्तरांचं राजगोपूर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. इथे १०० स्तंभ असलेला मंडप आहे ज्याचं नाव वोवल (मराठी मध्ये वटवाघूळ) मंडप असं आहे. दहाव्या शतकातील शिलालेख ह्या मंदिरात आढळतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि दिसायला एखाद्या किल्ल्यासारखं आहे. इथलं तीर्थ म्हणजेच तलाव खूप मोठा आहे. हे मदकोविल शैलीचे मंदिर असून चोळा राजांनी बांधले आहे. 


इथे एक खूप जुनं, साधारण १०० वर्षे जुनं, पपईचं झाड आहे. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे. इथल्या नंदीचे नाव पाताळ नंदी असे आहे. हे मंदिर अशा रीतीने बांधले आहे कि ते बघताना असा भास होतो कि हे मंदिर नंदीवरच बांधलं आहे. 


भगवान शिव हे वराच्या पोशाखात आहेत आणि म्हणून त्यांना माप्पिळई स्वामी (नवरदेव) म्हणून ओळखले जातात. ह्या मंदिरामध्ये कोष्ठ मूर्ती नाहीत. 


श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांची मूर्ती वधु-वराच्या पोषाखात आहे. हि मूर्ती साधारण १५ फूट उंच आहे. 


इतर मुर्त्या आणि देवालये

दक्षिणेकडील परिक्रमेमध्ये श्री विनायकांचे देवालय आहे ज्यांचे नाव श्री पडिक्कासु विनायक असे आहे. पश्चिमेकडील परिक्रमेमध्ये श्री सोमस्कंद, श्री मुरुगन आणि श्री महालक्ष्मी देवी ह्यांची देवालये आहेत. उत्तरेकडील परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वर आणि श्री शिवगामी देवी समवेत श्री नटराज ह्यांची देवालये आहेत. पूर्व तसेच पश्चिम कोपऱ्यांमध्ये दोन बलिपीठे आहेत. गाभाऱ्याभोवती आधार म्हणून १६ सिंहांच्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या आतलं गोपुर हे रथाच्या आकाराचे आहे. श्री इंद्रदेव हे ह्या रथाचे सारथी भासतात तर भगवान शिव हे वराच्या पोशाखात रथामध्ये बसल्याचे भासतात. ह्या शिवाय श्री भिक्षाटनर, श्री कालसंहार मूर्ती, श्री त्यागराज मूर्ती. श्री दक्षिणामूर्ती, नालवर (म्हणजे चार श्रेष्ठ नायनमार), तसेच जुळे विनायक ज्यांना श्री इरत्ताई विनायक म्हणतात, ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. ह्याशिवाय इथे श्री बाल गणपती, श्री बाल सुब्रह्मण्य, शिवलिंगे, श्री मुक्ता देवी, पंचभूतांची प्रतीके म्हणून पांच लिंगे, श्री मयूरनाथर, श्री सूर्य, श्री भैरव, श्री मेयकंदर ह्यांची देवालये परीक्रमेमध्ये आहेत. श्री शनीश्वरर ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. एका स्वतंत्र परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवी, श्री मुरुगन आणि श्री गणपती ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. इथल्या उत्सवमूर्तीमध्ये भगवान विष्णू आपलं नेत्र काढून श्री कल्याणसुंदरांना अर्पण करत आहेत असं दृश्य आहे.


वैशिष्ट्ये:

१) श्री अप्पर आणि श्री सुंदरर इथे मठात राहिले

२) इथल्या गाभाऱ्याच्या भिंतीला भोक असून त्यातून एक पोपट रोज भगवान शिवांच्या दर्शनाला येतो असा समज आहे.


इथे ज्यांनी भगवान शिवांची आराधना केली त्यांची नावे: वशिष्ठ ऋषी, कात्य ऋषी, स्वर्गीय गाय कामधेनू, श्री कामदेवांची पत्नी श्री रतीदेवी, भगवान विष्णू आणि राजा मनू. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी तसेच मूळ नक्षत्रावर पूजा

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेम्ब-डिसेंबर): दीपोत्सव, स्कंद षष्ठी

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

आडी (जुलै-ऑगस्ट): आर्द्रनक्षत्रावर पुरम उत्सव, नवरात्री, प्रदोष पूजा


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment