Monday, May 15, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग १२

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग १ वाचला. त्यामध्ये आपण नायनमारांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात नायनमारांपैकी चार श्रेष्ठ नायनमार ज्यांना नालवर असं म्हणतात त्यांची माहिती करून घेऊ या.

बऱ्याचश्या शिव मंदिरांमध्ये ४ नायनमारांच्या एकत्र मुर्त्या असतात. हे चार नायनमार ६३ नायनमारांमध्ये श्रेष्ठ आणि प्रसिद्ध समजले जातात. त्यांना एकत्रित नालवर (तामिळ मध्ये चार, किंवा "ते चार") असं संबोधलं जातं. ह्या चार नायनमारांची नावे - १) श्री अप्पर ज्यांना थिरुनावूक्करसर असं पण म्हणतात, २) श्री सुंदरर ज्यांना सुंदरमूर्ती असं पण म्हणतात, ३) श्री सम्बन्धर ज्यांना थिरुज्ञानसम्बन्धर असं पण म्हणतात आणि ४) श्री माणिक्कवासगर.

ह्या चार नायनमारांना समयाचार्य (म्हणजे भक्तीचे आचार्य) असं पण संबोधलं जातं. त्यांची प्रार्थमिक शिकवण हि होती कि भगवान शिव म्हणजेच प्रेम आणि प्रेमभावनाच भगवान शिवांपर्यंत पोहोचायला मदत करते. म्हणून सर्व मानवांनी ऐहिक सुखाची लालसा न ठेवता केवळ भगवान शिवांप्रती प्रेमभावना निर्माण होऊन आपल्यावर आणि आपल्या आप्तांवर भगवान शिवांची कृपा कशी राहील ह्याचाच प्रयत्न करावा. कारण सर्वसुख मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिवांची कृपा. हि कृपा प्राप्त झाली कि मानवाला सर्व काही प्राप्त होऊन शाश्वत समाधान प्राप्त होतं.

शिवभक्तीचा प्रचार करण्यासाठी ह्या चार आचार्यांनी ठिकठिकाणी जाऊन शिवस्तुतीपर भजने गायली. त्यातील श्री सुंदरर, श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी गायिलेल्या भजनांना थेवरं म्हणतात तर श्री माणिक्कवासगर ह्यांनी गायिलेल्या भजनांना थिरुवाचगं असं म्हणतात. आजही शिव मंदिरांमध्ये थेवरं आणि थिरुवाचगं ह्यामधली भजने नित्यनेमाने गायली जातात.


पुढच्या अंकात आपण तामिळ महिन्यांबद्दल माहिती करून घेऊ या. 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment