मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग १० वाचला. त्यामध्ये आपण सनातन गुरूवरांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात भगवान शिवांचे ६३ श्रेष्ठ भक्त ज्यांना नायनमार असं म्हणतात त्यांची माहिती करून घेऊ या.
साधारण चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये बुद्ध आणि जैन धर्माचा खूप वेगाने प्रसार झाला. आणि त्यामुळे धार्मिक विधींचं आचरण जवळजवळ थांबलंच. साधारण सातव्याशतकापासून काही श्रेष्ठ शिव भक्त जन्माला आले आणि त्यांनी शैव पंथाचं पुनरुत्थापन केलं. सातव्या ते जवळजवळ दहाव्या शतकांच्या अवधीमध्ये ६३ शिव भक्तांनी हे काम केलं आणि त्यांना एकत्रित नायनमार असं संबोधलं जातं. ह्या नायनमारांमध्ये समाजातल्या सर्व थरांचे भक्त होते. काही जण राजे होते, काही शेतकरी होते, काही ब्रह्मचारी होते, काही गृहस्थ होते तर ह्यामध्ये काही स्त्रिया पण होत्या. ह्या शिवाय ह्या भक्तांचे जीवनसाथी (पती/पत्नी) हे पण शिव भक्त होते. ह्या नायनमारांपैकी काही ज्ञानी होते तर काही निरक्षर होते. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गुण किंवा कला समान होती आणि ती म्हणजे सर्वांनी शिवस्तुतीपर काव्य/भजने लिहिली. आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून त्यांनी हि भजने लिहिली आणि ती शिव मंदिरांमध्ये जाऊन गायिली पण. ह्या सर्व भजनांच्या संकलित ग्रंथांना एकत्रित थिरूमुराई असं संबोधलं जातं. ज्या ज्या मंदिरांमध्ये त्यांनी हि भजने गायिली त्या २७६ मंदिरांना पाडल पेथ्र स्थळं म्हणतात. ह्या सर्व मंदिरांमध्ये आपल्याला ह्या ६३ नायनमारांच्या मुर्त्या दिसतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या जन्माचे महिने आणि नक्षत्रांची माहिती पण लिहिलेली आढळते. ह्या मंदिरांच्या उत्सवांमध्ये भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री गणपती आणि श्री स्कंद ह्या देवांच्या उत्सवमूर्तींबरोबर नायनमारांच्या मुर्त्या पण मिरवणुकीमध्ये समाविष्ट केल्या जातात.
पुढच्या अंकात नायनमारांपैकी ४ नायनमार ज्यांना नालवर असं संबोधलं जातं त्यांची माहिती करून घेऊ या.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment