मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ९ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री भिक्षाटनर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात सनातन गुरूवर ज्यांना तामिळ मध्ये सनातन कुरवर असं म्हणतात त्यांची माहिती करून घेऊ या.
तामिळ मध्ये गुरुवरांना कुरवर असं म्हणतात. ह्यां कुरवरांनी शैव सिद्धांताची तत्वे सर्व विश्वात प्रचारित करण्याचं काम केलं. असं म्हणतात कि ह्या कुरवरांना साक्षात भगवान शिवांनी त्यांच्या श्री दक्षिणामूर्ती रूपामध्ये हि ह्या तत्वांचं ज्ञान दिलं. आणि त्यांना गुरुपद पण दिलं . त्यांना सनातन गुरूवर असं म्हणतात. सनातन गुरुवरांचे दोन वर्ग आहेत.
- आगम सनातन गुरूवर: हे चार गुरु होते. ह्यांना मानवी रूप नव्हतं. त्यांचं मुख्य स्थान हे कैलास पर्वत आहे. ते चार गुरूवर म्हणजे
- थिरु श्री नंदीदेव
- श्री संतन कुमार
- श्री सत्यज्ञानदर्शी
-
श्री परंज्योती ऋषी
असा समज आहे कि श्री दक्षिणामूर्तींपासून गुरुपरंपरा चालू झाली आणि ह्या चार गुरूवरांच्या क्रमाने ती पुढे चालू राहिली. - पूर सनातन गुरूवर: श्री परमज्योती ऋषींपासून शैव सिद्धांताचा प्रचार करण्याचं काम पुढील चार गुरुवरांनी केलं
- श्री मेयकंदर
- श्री अरुल नंदी शिवम
- श्री मरैज्ञान सम्बन्धर
-
श्री उमापती शिवाचारीयार
हे मानवी रुपातले गुरुवर तामिळनाडू मध्ये स्थित होते. त्यांच्या शिष्यांनी शैव सिद्धांत प्रचाराचं काम पुढे चालू ठेवलं आणि त्याकरता त्यांनी दोन मठ बांधले. एक थिरुवडुदुराई मध्ये आणि एक धर्मपूरम मध्ये. ह्या दोन मठांना कैलास परंपरा असं म्हणतात.
हीच परंपरा ज्या महान चार संतांनी सातव्या ते बाराव्या शतकांमध्ये चालू ठेवली त्यांना समयशैवगुरूवर असं नाव आहे. त्यांना नालवर असं पण म्हणतात. त्यांची नावे अशी
- थिरुज्ञानसम्बन्धर
- थिरूनावुक्करसर
- श्री सुंदर मूर्ती नायनार
- श्री माणिक्कवाचकर
चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये बुद्ध आणि जैन धर्मांचा प्रसार खूप वेगाने वाढत होता आणि तेथील बऱ्याच राजांनी ह्या धर्मांचं अनुसरण करायला चालू केलं. ह्यामुळे धार्मिक विधींचं आचरण खूप कमी झालं किंवा जवळजवळ थांबलंच. सातव्या शतकात शैव संतांच्या आगमनाने आणि त्यांच्या मोठ्या प्रयत्नाने ह्या स्थितीमध्ये बदल व्हायला चालू झाला आणि शैव सिद्धांताच्या आचरणाला परत चांगले दिवस आले आणि त्यामुळे बुद्ध आणि जैन धर्मांतरित झालेले राजे परत शैव सिद्धांताचं आचरण करायला लागले.
सातव्या ते बाराव्या शतकामध्ये वरील चार संतांबरोबरच जवळजवळ ५९ शैव संतांनी आपल्या भक्तीने शैव सिद्धांताचा प्रचार केला. ह्या एकूण ६३ शैव संतांनां नायनमार असा संबोधलं जातं.
ह्या नायनमारांनी जी शिवभक्तीपर भजने गायली त्या सगळ्यांना एकत्रित थिरूमुराई असं संबोधलं जातं. ह्याचे एकूण १२ खंड आहेत. आणि ज्या २७६ शिव मंदिरांची स्तुती ह्या भजनांमध्ये गायली गेली त्या शिव मंदिरांना एकत्रित पाडल पेथ्र स्थळं असं म्हणतात.
थिरूमुराईतले खंड
पुढच्या अंकात आपण ६३ श्रेष्ठ शिव भक्त ज्यांना एकत्रित नायनमार असं संबोधलं जातं त्यांची माहिती करून घेऊ या.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment