Sunday, March 19, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ३

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग २ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांची पांच मुखें, ज्याला पंचशिव म्हणतात, त्यांबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया. 

 

श्री सोमस्कंदर:


ह्या रूपामध्ये भगवान शिव हे गृहस्थाच्या रूपात दाखवले आहेत. सोम (म्हणजे श्री पार्वती देवी म्हणजेच उमा समवेत भगवान शिव) आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मध्यभागी त्यांचा पुत्र श्री कार्थिकेय (स्कंद) अशी मूर्ती असते त्या एकत्र मूर्तीला श्री सोमस्कंदर (सोम-सह-स्कंद) असं नाव आहे. पुराणांनुसार श्री विष्णूंनी अपत्यप्राप्तीसाठी भगवान शिवांची आराधना केली तेव्हा त्यांना मन्मथ नावाचा पुत्र झाला. पण श्री पार्वती देवींना हे आवडलं नाही कारण श्री विष्णूंनी त्यांना आराधना करताना वगळलं होतं. म्हणून त्यांनी श्री विष्णूंना शाप दिला कि भगवान शिवांकडून त्यांचा पुत्र चिताभस्म होईल. श्री विष्णूंना आपली चूक लक्षात आली म्हणून त्यांनी भगवान शिव आणि त्यांच्या समवेत श्री पार्वती देवी आणि त्यांचा पुत्र कार्थिकेय अशी मूर्ती बनवून त्याची आराधना केली. त्या आराधनेवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींनी श्री विष्णूंना वरदान दिलं की भगवान शिवांनी चिताभस्म केलेला मन्मथ (काम) पुन्हा पुनरुज्जीवित होईल आणि त्याची पत्नी रतीदेवी समवेत तो स्त्री पुरुषांमध्ये आकर्षण निर्माण करण्यास कारणीभूत होईल जेणेकरून मनुष्य जात जीवित राहील.


श्री भैरवर:


श्री भैरवर भगवान शिवांचं एक रूप आहे. भैरवर ह्यांच्याकडे काळाच्या (टाइम) व्यवस्थापनेचं काम आहे. म्हणून त्यांना काळभैरव असं पण म्हणतात. त्यांना क्षेत्रपाल असं पण म्हणतात कारण ते भगवान शिवांच्या मंदिराची देखभाल करतात. दक्षिण मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि दिवसाकाठी जेव्हां मंदिर बंद करण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने मंदिराच्या किल्ल्या श्री भैरवर ह्यांच्याकडे सोपवल्या जातात आणि परत जेव्हां दिवसाच्या सुरुवातीला मंदिर उघडण्याची वेळ येते त्यावेळी औपचारिकतेने किल्ल्या श्री भैरवरांकडून घेतल्या जातात. कारण श्री भैरवर काळाचे व्यवस्थापक आहेत, ज्या भक्तांना आध्यात्मिक उपासनेमध्ये वेळेचं योग्य नियंत्रण करायचं असतं ते उपासनेच्या आरंभी श्री काळभैरवांना प्रार्थना करतात. श्री काळ भैरवांचं वाहन कुत्रा आहे. म्हणून पुराणांमध्ये कुत्र्याला भरवणे हे दैवी कर्म मानलं जातं. श्री भैरवर ह्यांना प्रवाशांचे रक्षणकर्ते असं पण म्हणतात. म्हणून सिद्ध मुनींच्या (शैव मुनी) मते प्रवास चालू करण्यापूर्वी, मुख्यतः रात्रीचा प्रवास चालू करण्यापूर्वी, श्री भैरवरांसमोर दिवा लावून मग प्रवास चालू करावा. श्री भैरवांची आठ रूपे आहेत. ही आठ रूपे आठ दिशांचं पालन करतात. ह्यांना अष्टभैरव असं म्हणतात.  त्यांची नावे अशी - असिथान्गभैरव, रुरुभैरव, चंडभैरव, क्रोधन भैरव, उन्मथभैरव, कपालभैरव, भीषणभैरव, संहारभैरव.  

 

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.



No comments:

Post a Comment