Sunday, March 5, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग १

मागच्या अंकात आपण शिव मंदिरातल्या मुख्य मुर्त्यांची माहिती करून घेतली. आता या अंकापासून आपण शिव मंदिरातल्या इतर मुर्त्यांची माहिती करून घेऊया. या अंकामध्ये श्री रुद्र आणि एकादश रुद्र ह्यांची माहिती करून घेऊया.

श्री रुद्र  

हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये दोन महत्वपूर्ण काळ नजरेस येतात आणि ते म्हणजे वैदिक काळ आणि पौराणिक काळ. देवांची प्रतीके किंवा देव मानण्याच्या समजुतींमध्ये ह्या दोन काळांमध्ये फरक दिसतो. वैदिक काळामध्ये निसर्गाचे घटक आणि नैसर्गिक भावना ह्यांच्याशी देवांची प्रतीके आणि समजुती निगडित होत्या. उदाहरणार्थ रुद्र ही वैदिक काळातील देवता आहे. रुद्र मध्ये रु म्हणजे भीती उत्पन्न करणारा आणि द्र म्हणजे खूप मोठा, प्रचंड शक्ती असलेला असा अर्थ होतो.
 

निसर्ग हा क्रमबद्ध आहे. निसर्गातल्या प्रत्येक क्रियेला एक क्रम आहे. ज्याला धर्म असं म्हणतात. म्हणजेच निसर्ग आपला धर्म व्यवस्थित पाळतो. उदाहरणार्थ मानवीशरीरामध्ये पचनक्रियेची एक क्रमबद्धता आहे. शरीराला तुम्ही काहीही खायला द्या पण पचन संस्था हि आपल्या धर्माप्रमाणे क्रमबद्ध कार्य करून ते अन्न पचवते आणि त्यातील प्रथिने शरीराच्या विविध भागांमध्ये पोचविण्याचे काम करते. पचनसंस्था हे बघत नाही की अन्न योग्य आहे का अयोग्य. त्या पचनसंस्थेला काय योग्य आणि अयोग्य पुरवावं हे ठरवणे मानवाचं काम आहे. त्याने अयोग्य अन्न पचनसंस्थेला दिलं तर त्याचं फळ पण अयोग्यच मिळणार. तसेच पर्जन्य योग्य प्रमाणात पडावा म्हणून त्यासाठी पोषक स्थिती निर्माण होण्यामध्ये एक क्रमबद्धता आहे. नैसर्गिक प्रक्रिया मधून आपल्याला अनुकूलता प्राप्त करायची असेल तर आपल्याला तशी कर्मे करायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरामध्ये संतुलन राखायचं असेल तर आपण पचनसंस्थेला योग्य अन्न देणं अपेक्षित आहे. तसेच आपल्याला पर्जन्याची अनुकूलता मिळविण्यास म्हणजेच तो योग्य प्रमाणात पडावा अशी इच्छा असल्यास आपल्याला योग्य प्रमाणात झाडे लावणे आवश्यक आहे. पण जेव्हा मानव अनैसर्गिक किंवा अधर्मी कर्मे करतो तेव्हा त्यांचा परिणाम म्हणून निसर्ग प्रतिकूल फळे देतो. उदाहरणार्थ पर्जन्य अयोग्य प्रमाणात घडून वादळ, चक्रीवादळ, तुफान निर्माण होतात किंवा आरोग्यमय आहाराचं असंतुलन घडून महामारी सारख्या घटना निर्माण होऊन जीवन विस्कळीत होतं. ह्या सर्व नैसर्गिक क्रियांमधल्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या भीतीदायक घटना घडवून भीती निर्माण करणारी देवता म्हणजेच रुद्र. म्हणूनच आपण “निर्सगाने रौद्र रूप धारण केले आहे” अशासारखे वाक्प्रचार बघतो. ह्या सर्व भीतींमधून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल म्हणजेच आपल्याला निसर्गाची अनुकूलता प्राप्त करावयाची असेल तर ह्या रुद्र शक्तीला प्रसन्न करणं आणि प्रसन्न ठेवणं आवश्यक आहे.

ह्या देवांना प्रसन्न करण्यामध्ये दोन गोष्टी कामाला येतात. त्या म्हणजे धर्माला अनुसरून केलेलं कर्म आणि योग्य ध्वनींचा उच्चार. ध्वनींच्या योग्य उच्चारामुळे नैसर्गिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होते. आणि हाच वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञादी कर्मांचा पाया आहे. वेदांमधले देव म्हणजे सर्व निसर्गाचे घटक - आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. आणि ह्या घटकांची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी म्हणून वेदांमध्ये ह्या घटकांच्या अधिष्ठान देवतांच्या स्तुतीपर सूक्त आहेत. स म्हणजे चांगले किंवा शुभ आणि उक्त म्हणजे उच्चार. यज्ञांमध्ये अग्नि प्रज्वलित करून देवांच्या स्तुतीपर सूक्त म्हणून
त्या देवतांना आवाहन केले जाते आणि परत सुक्तांच्या घोषामध्ये अग्निमध्ये आज्य म्हणजे तूप अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाते. ह्या सूक्तांच्या शास्त्रबद्ध उच्चारांमुळे ह्या देवता प्रसन्न होऊन अनुकूलता प्रदान करतात असा समज आहे.

वेदांमधला रुद्र देव म्हणजेच पुराणांमधले भगवान शिव. ब्रम्हा, विष्णू, महेश, देवी हे सगळे पौराणिक देव म्हणून प्रसिद्ध आहेत. पौराणिक देवांना सहसा पुराणांमधली  त्यांच्या स्तुतीपर स्तोत्रे म्हणून प्रसन्न केले जाते. पण ह्या देवांचा अभिषेक करताना किंवा मंत्रपुष्पांजली वाहताना वेदांमधली सूक्ते पण म्हणतात.

रुद्र देवाला म्हणजेच भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी वेदांमध्ये रुद्रस्तुतीपर सूक्त आणि मंत्र आहेत. ह्या सर्व रुद्र स्तुतीपर सूक्तांना आणि मंत्रांना एकत्रित शतरुद्रियं असं नाव आहे. ह्यापैकी रुद्र नमक आणि रुद्र चमक ही सूक्ते प्रसिद्ध आहेत. सर्व शिव मंदिरात विशषतः सोमवारी रुद्र नमक आणि रुद्र चमक ह्यांच्या घोषामध्ये शिव लिंगावर अभिषेक केला जातो.
 

श्री एकादश रुद्र

विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेवाच्या क्रोधातून रुद्राचा जन्म झाला. रुद्राचं रूप अर्धनारीश्वर रूप होतं म्हणजेच अर्ध पुरुष आणि अर्ध नारी.

ह्यातील पुरुष रूपाचं विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्र निर्माण झाले. त्यातील काही श्वेतवर्णीय आणि मृदूभावी होते तर काही श्यामवर्णीय आणि क्रूरभावी होते. त्यांची नावे १) मन्यु २) मनू ३) म्हामस ४) महान ५) शिव ६) ऋतुध्वज ७) उग्ररेतस ८) भाव ९) काम १०) वामदेव ११) धृतव्रत

रुद्राच्या स्त्री रूपाचं पण विभाजन होऊन त्यातून अकरा रुद्राणी निर्माण झाल्या. त्यांची नावे* - १) धी २) वृत्ती ३) उसान ४) उर्ण ५) नियुत ६) सर्पिस ७) इला ८) अंबिका ९) इरावती १०) सुधा ११) दीक्षा

* ही नावे वरील रुद्रांच्या नावाच्या क्रमांशी जुळलेली नाहीत.

पुराणानुसार रुद्रर हे रुद्राचे परिचर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे - १) अज २) एकपाद ३) अहिर्बुध्न्य ४) त्वस्त ५) रुद्र ६) हर ७) शंभू ८) त्र्यम्बक ९) अपराजित १०) ईशान ११) त्रिभुवन. महाभारतानुसार हे रुद्रर म्हणजे श्री इंद्रदेवाचे सहचर दर्शवले आहेत तर श्री शिव आणि श्री स्कंद यांचे परिचर दर्शवले आहेत. मत्स्य पुराणामध्ये रुद्ररांची वेगळी नावे आहेत आणि असा समज आहे कि ते क्रूरभावी होते आणि त्यांनी श्री विष्णूंना त्यांच्या राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये साहाय्य केलं. त्या रुद्ररांची नावे - १) कपाली २) पिंगल ३) भीम ४) विरुपाक्ष ५) विलोहित ६) अजेश ७) शासन ८) शास्त ९) शंभू १०) चंड ११) दुर्व.

पुढच्या अंकामध्ये आपण भगवान शिवांच्या पांच मुखांची माहिती करून घेऊया. 

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment